मी यशस्वी उद्योजक होणारच!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


एक गांडूळ उद्योजक होऊन शेतकर्‍याचा मित्र होतो, एक मधमाशी उद्योजक होऊन जगासाठी मध देऊन जाते, एक रेशमाचा किडा उद्योजक होऊन रेशीम देऊन जातो. मी तर एक माणूस आहे. मग माझे योगदान किती असायला हवे? मी किती मोठा उद्योजक व्हायला हवे? याचा आपण विचार केला, तर आपणही नजीकच्या काळात एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येऊ.

या जगातील प्रत्येकामध्ये सुप्त शक्ती दडलेली असते आणि प्रचंड कार्यक्षमता असते. आपल्यातील सुप्त शक्ती आणि प्रचंड कार्यक्षमता ओळखा. स्वत:मधील सुप्त शक्ती ओळखून जागृत करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला विजेता व्हायचे असते.

धीरूभाई अंबानी पेट्रोलपंपवर काम करत होते, अमिताभ बच्चन पडद्यावरील छोटा कलाकार होता, रजनीकांत बस कंडक्टर होता, मनमोहन सिंग ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करत होते, नारायण मूर्ती लॅब असिस्टंट होते, शाहरूख खान टीव्ही सीरिअलमध्ये काम करत होता, महेंद्रसिंग धोनी हा रेल्वेमध्ये टी.सी. होता, जॉनी लिव्हर धारावीच्या झोपडपट्टीत राहत होता.

जर या सामान्य व्यक्ती यशस्वी उद्योजक होऊ शकल्या, तर तुम्हीही तुमच्या जीवनात यशस्वी उद्योजक होऊ शकता. मोठी स्वप्ने पाहा, ध्येय लिहून ठेवा आणि विजेता व्हा. कराटे-कुंगफूची कला अवगत केलेल्या ब्रूस लीने मोठे स्वप्न पाहिले, आपले ध्येय लिहून ठेवले आणि तो विजेता झाला. दिनांक ९ जानेवारी १९७० रोजी त्याने लिहिलेले ध्येयपत्र न्यूयॉर्कमधील प्लॅनेट हॉलीवूड या ठिकाणी आजही प्रदर्शनात ठेवलेले आहे.

ते ध्येय पुढीलप्रमाणे होते – १९८० पर्यंत मी अमेरिकेतील नामवंत सिनेनट असेन, मी १० मिलिअन डॉलर्स कमवीन, या पैशाच्या मोबदल्यात मी प्रत्येक वेळी चांगली कामगिरी बजावीन आणि माझ्या भूमिकेने मी लोकांची मने जिंकीन. ब्रूस ली हा एक सिनेनट होता, ही त्याची जगाला माहीत असलेली ओळख; पण चित्रपटनिर्मिती हा त्याचा उद्योग होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही.

वॉरन बफेट हे जगातील श्रीमंतांच्या यादीतील दुसर्‍या क्रमांकावरील व्यक्तिमत्त्व म्हणतात, “गुंतवणूक करायची, तर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर करा.” त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेतले आहेत. वॉरन बफेट हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाचे प्रशस्तिपत्रक रोज पाहतात आणि झपाटल्यासारखे पेटून उठून काम करतात.

आपणही व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेऊन आपल्यामध्ये दडलेली सुप्त शक्ती जागृत केली पाहिजे. सतत शिकत राहिले तर आपणही विजेता होऊ शकतो. आपणच आपल्या उद्योगाचे शिल्पकार असतो. यशाच्या प्रवासाला सुरुवात करा. स्वत:ला प्रवाहात झोकून द्या. होय, आजचे तुमचे स्वरूप कदाचित नदीसारखे असेल, वाहत राहा.

तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी अथांग महासागरासारखे यश तुमच्याकडे येईल. आजपर्यंत काय झाले, याचा विचार करू नका. आजचा दिवस एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी शुभमुहूर्त आहे, असे समजून यशाची स्वप्ने रेखाटायला सुरुवात करा.

तुम्ही खरोखरच यशस्वी उद्योजक होऊ शकता. तुमची आजची परिस्थिती काय आहे आणि आज तुम्ही कोण आहात, याची अजिबात पर्वा करू नका. तुम्ही तुमच्या आयुष्याचे नव्याने नियोजन करून जीवनाचा आनंद उपभोगू शकता. मानसशास्त्राचा एक असा नियम आहे की, तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये स्वत:विषयी विचारांचे जे चित्र उभे करता, कालांतराने तुम्ही त्या चित्रामध्ये स्वत:ला पाहता आणि तसेच बनता.

एक तीस वर्षीय महिला होती. पती आणि दोन मुलं असे तिचे छोटेसे कुटुंब होते. तशी ती सुखी होती, पण चाकोरीबद्ध जीवन जगत होती. वाढत्या वयाबरोबर तिला जाणीव होत होती की, ती एक सामान्य स्त्री आहे आणि ती जगायचं म्हणून जगत आहे. तिच्या कुटुंबाला तिची फारशी गरज भासत नव्हती.

एके दिवशी गाडी चालवत असताना या स्त्रीचा अपघात झाला आणि काही काळ ती बेशुद्धावस्थेत होती. जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा तिचा स्मृतिभ्रंश झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून समजले. तिचा नवरा, मुले, डॉक्टर, नातेवाईक आणि मित्रमंडळी सर्वांना तिच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. ते सगळेच तिची काळजी घेऊ लागले, तिच्याशी प्रेमाने, आपुलकीने वागू लागले, त्यामुळे त्या स्त्रीला आपण कोणी तरी महत्त्वाची व्यक्ती आहोत, याची जाणीव होऊ लागली.

त्या स्त्रीने आपल्या फावल्या वेळेत स्वत:चा उद्योग सुरू केला. पाहता पाहता तिला त्या उद्योगात भरघोस यश मिळू लागले. तिची ही एक यशस्वी उद्योजिका म्हणून नव्याने नावारूपाला आलेली भूमिका लोकांना खूप आवडली. सर्वांनी तिचे कौतुक केले. त्या स्त्रीला तिचे महत्त्व पटले. तिच्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त झाला.

तिला एक नवीन दिशा मिळाली. विचार बदलल्यामुळे तिला एक नवीन जन्म मिळाला. या उदाहरणातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, जर आपणही विचार बदलले तर आपलेही जीवन बदलेल. आपण कोणतीही कल्पना आणि विचार घेऊन या जगात येत नाही. एखाद्या कोर्‍या पाटीप्रमाणे आपले जीवन असते. जे आपण लहानपणापासून शिकतो, तेच आपल्या मेंदूवर कोरले जाते आणि आपण त्या कोरलेल्या विचारांप्रमाणे जीवन जगतो.

आपण स्वत:विषयीचा जो समज निर्माण केला आहे, त्याप्रमाणे आपण वागतो. आपण या जगात कोणत्याही भीतीशिवाय येतो; पण काळाच्या ओघात अपयशाची, टीकेची, झिडकारले जाण्याची, नुकसानाची भीती आपण आत्मसात करतो आणि अचानक ‘मला शक्य नाही’ या विचारांमध्ये स्वत:ला अडकवून टाकतो.

एखादा प्रयत्न करण्याआधीच आपण माघार घेतो, कारण आपल्या मेंदूत भीतीचे घरकुल तयार होते. अशा प्रकारच्या नकारात्मक भावनांमुळे निर्माण झालेल्या भीतींना खतपाणी पुरवणे टाळा. आय.बी.एम.चे माजी संस्थापक थॉमस वॅटसन म्हणतात, “जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर आधी अनेकदा अपयशी व्हा. अपयशाच्या पायर्‍या चढल्यावरच यश संपादन होते.”

आफ्रिकेमध्ये एक शेतकरी होता. एक दिवस त्याच्याकडे एक शहाणा मनुष्य आला. त्याने शेतकर्‍याला हिर्‍याचे महत्त्व समजावून सांगितले. तो शहाणा माणूस म्हणाला, “जर तुझ्याजवळ अंगठ्याएवढा हिरा असेल, तर तू या शहराचा मालक होऊ शकतोस. जर तुझ्याजवळ हिर्‍याचा खजिना असेल, तर तू या देशाचा राजा होऊ शकतोस.”

त्या रात्री शेतकरी झोपला नाही. आपल्याकडे एकही हिरा नाही, ही खंत त्याला सतावत राहिली आणि त्याने हिरा मिळवण्याचा निश्चय केला. दुसर्‍या दिवशी त्या शेतकर्‍याने आपले सर्व शेत विकून टाकले. कुटुंबाची खाण्यापिण्याची व्यवस्था करून तो हिर्‍याच्या शोधात बाहेरगावी निघून गेला. त्याने संपूर्ण देश पालथा घातला, पण त्याला हिरे मिळाले नाहीत. तो युरोपमध्ये गेला, स्पेन देशात गेला, पण त्याच्या पदरी निराशाच आली. शेवटी कंटाळून त्याने नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली.

ज्या माणसाने त्या शेतकर्‍याचे शेत विकत घेतले, त्याला आपल्या शेतात इंद्रधनुष्यासारखा चमकणारा दगड दिसला. त्याला तो दगड आवडला आणि त्याने तो उचलून घरात बैठकीच्या खोलीत ठेवला. एक दिवस तो शहाणा माणूस या शेतकर्‍याकडे आला आणि त्याने तो चमकणारा दगड हिरा आहे, हे ओळखले.

शहाणा माणूस त्या शेतकर्‍याबरोबर शेतावर गेला आणि तेथील काही दगड प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिले. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तो दगड खरोखरच हिरा होता. त्या हुशार माणसाने शेताचे निरीक्षण केले आणि त्याला असे आढळून आले की, शेतामध्ये जागोजागी कित्येक एकरामध्ये असे हिरे दबलेले होते.

संधी आपल्याजवळच आहे, तिला शोधण्यासाठी इकडेतिकडे जाण्याची गरज नाही. गरज आहे ती संधी ओळखण्याची. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. समोर आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. रोज स्वत:ला प्रश्न विचारा, “आज आपण जे काही केले त्या कर्तव्यात कसूर तर केली नाही ना?” आहोत तोवर चांगले, समृद्ध जीवन निरपेक्षपणे जगायचे.

कोणावर ओझे व्हायचे नाही आणि कशाची हाव बाळगायची नाही, त्यामुळे या गोष्टी गेल्या तरी एका मर्यादेपुढे खंत वाटणार नाही. जीवनात यशप्राप्ती करायची असेल, तर संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच संकल्प तडीस नेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून त्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करा. यश तुमचेच आहे.

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा होते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून जी तयारी करतो, जो प्रयत्न करतो, त्याला संकल्प असे म्हणतात. यशस्वी व्यक्ती संकल्पाच्या आधारे स्वत:चे स्वप्न साकार करतात आणि यशस्वी होतात. जे जीवनात यशस्वी होत नाहीत, ते फक्त स्वप्नांचे मनोरथ बांधतात, पण त्यासाठी कृती करत नाहीत.

प्रत्येक संकल्पाचे उगमस्थान ‘मी’ आहे. आपली इच्छा वेगळी आणि आपण केलेला संकल्प वेगळा असतो. उदा. मी कन्याकुमारीला जाईन, ही इच्छा झाली. मी कन्याकुमारीला जाण्यासाठी सोमवारी निघणार आहे, हा संकल्प झाला. मी कन्याकुमारीला निघालो, ही कृती झाली. जेव्हा आपण महत्त्वाच्या इच्छेची निवड करून त्या इच्छेला महत्त्वाकांक्षेत रूपांतरित करतो, तेव्हा ती महत्त्वाकांक्षा आपल्याला कार्यरत करून संकल्पसिद्धीस मदत करते.

काही व्यक्ती इच्छा तर खूप बाळगतात. वर्षाच्या शेवटच्या दिवशी संकल्पही करतात, पण काही व्यक्ती केलेला संकल्प काही वेळातच विसरून जातात, तर काही जण थोडा काळ त्या संकल्पावर कार्यरत होतात. पुढे तेही त्या संकल्पावर पाणी सोडतात. अगदी मोजक्या व्यक्ती आपल्या संकल्पांवर ठाम राहतात आणि पुढचे पाऊले टाकून केलेला संकल्प तडीस नेतात, तेच यशस्वी उद्योजक होतात.

– डॉ. उमेश कणकवलीकर
nishamissionvijeta@yahoo.com
९८५०८३८६७७

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?