न्युनगंडाचा भयगंड सोडा आणि यशस्वी व्हा!

संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो मराठी माणसे मला संपर्क साधतात. सर्वांच्यात चांगलं टॅलेंट आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, ज्ञानही आहे; पण उद्योग, व्यापार करायचा म्हटलं की, एक प्रकारचा न्यूनगंड मनात आहे. व्यापार म्हणजे मराठी माणसाचे कामच नव्हे, असा एक मराठी माणसांच्या मनात स्वत:बद्दल समज होऊन तो मनात इतका घर करून बसलाय की, तो काय सहजासहजी निघायला तयार नाही.

त्याची कारणं तशीच आहेत. एक म्हणजे आजूबाजूला व्यापाराचे वातावरण नाही, बहुतेक सर्वजण नोकरी करणारेच. लहान मूल हे चिखलाचा गोळा असतो. ते पाहील ते तसेच शिकत जातं. मुलं पाहतात कुटुंबात आजूबाजूला नोकरी करतात. मग आपणही मोठे झाल्यावर नोकरीच करणार. मुलांच्यावरही नोकरी मिळविणे हेच एकमेव ध्येय ठरलेले असते.

चांगली नोकरी मिळवणे म्हणजे आयुष्यातील यशाचे सर्वोच्च शिखर गाठले असे वाटते. शाळेत चांगला अभ्यास का करावा? तर चांगली नोकरी (गुलाम) मिळण्यासाठी. कॉलेजात चांगले गुण मिळवायचे, का तर चांगल्या कंपनीत नोकरी (गुलाम) म्हणून लागण्यासाठी. जगात स्वत:हून नोकरदार (गुलाम) बनण्यासाठी इतका आटापिटा व स्पर्धा भारतातच पहायला मिळते.

मी एकदा धार्मिक संस्थानात गेलो होतो. तेथे एक हत्ती होता. त्या हत्तीच्या पायाला एक छोटीशी दोरी बांधली होती, पण एवढी छोटीशी दोरी सोडून तो हत्ती सहज पळून जाऊ शकला असता. माहूतला विचारलं, एवढ्या छोट्याशा दोरीवर हत्ती कसा काय बांधता? त्याला तर लोखंडी साखळीने बांधायला हवे.

तो माहूत म्हणाला, हे लहान पिल्लू असल्यापासून आम्ही तीच एक दोरी बांधतोय, तेव्हा हत्तीचा पक्का समज झालाय की, आपण ही दोरी तोडू शकत नाही.

तेव्हा आता हत्ती कितीही मोठा झाला असला तरी त्याला त्याच्या ताकदीचा अंदाज नाही. त्याची सुप्त शक्ती काही करू शकत नाही. न्यूनगंडाने भरलेली आहे. सुमारे 10 कोटी मराठी माणसांची ही अवस्था ह्या हत्तीसारखी झाली आहे. आपण फक्त नोकरीच करू शकतो, आपण फक्त ग्राहकच बनू शकतो, हा न्यूनगंड निघायला तयार नाही.

आपण नोकरी सोडून मालक बनू शकतो व ग्राहक नव्हे, तर व्यापारी बनू शकतो. ही मराठी माणसे शक्ती, बुद्धी असूनसुद्धा गरिबी, बेकारीत, नोकरीच्या प्रतीक्षेत. शेतीला पाणी येईल, शेतमालाला भाव मिळेल, ह्या प्रतीक्षेत आहेत.

थोडशा आधारावर जगत राहण्यामुळे ही मराठी मुलं मागे पडत आहेत. मला एक पदवीधर मुलगा भेटायला आला. पदवी घेऊन 2 वर्षे झाली. काही नोकरी नाही. मी विचारलं, पदवी करत असताना तू काय तयारी केलीस का? पदवी पूर्ण झाल्यावर 2 वर्षे काय केलेस?

त्याच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की, त्याचे पालक त्याला शिक्षण, खर्च, पॉकेटमनी इत्यादीला आरामात पैसे पुरवत होते. त्यामुळे जोपर्यंत पालक पैसे पुरवतायत तोपर्यंत काही काळजी नाही व तसदी घेण्याची व प्रयत्न करण्याची गरज नाही अशी बॉडी लँग्वेज होती.

तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक म्हातारी होती. तिने एक पोपटाचे पिल्लू आणले. थोडे दिवस घरात पाळले. थोडे मोठे झाल्यावर तिने बागेत सोडले, पण ते काय हवेत उडेना. ते पिल्लू तिने तिच्या बागेतील एका फांदीवर बसविले. तिने झाड हलवले, आवाज काढले, पण काही केल्या पोपट काही हवेत झेप घेईना. शेवटी म्हातारीने गावात दवंडी पिटवली की, पोपट हवेत उडवेल त्याला 5 हजार बक्षीस.

मग एका शेतकर्‍याने ते चॅलेंज घेतले व तो बागेत आला व ज्या फांदीवर पोपट बसला होता ती फांदी एका झटक्यात मोडून काढली व पोपट हवेत उडाला व उंच उंच गेला. सर्वांना इतकी साधी गोष्ट करायची होती हे कळलेच नाही. तसेच बहुसंख्य पालकांनाही कळालेली नाही.

मराठी मुलांच्यात खूप मोठी सुप्त शक्ती आहे; पण…

जोपर्यंत पालक आधार देतात, दोन वेळचं खायला मिळतंय ना?
कशाला उद्योग, व्यापाराच्या झंझटमध्ये पडा? कशाला मुंबई, पुण्याला जा?
बघू या थोडे दिवस, काही महिने, वर्षे वाट बघू, देऊ स्पर्धा परीक्षा वगैरे

अशी वर्षानुवर्षे जातात व शेवटी स्वत:मध्ये सुप्त शक्ती व टॅलेंट असतानासुद्धा करीअर बरबाद होते!

तेव्हा जसं त्या शेतकर्‍याने फांदी मोडून काढली तसे पालकांनी मुलांचा आधार काही ठरावीक काळानंतर काढून घ्यावा तरच मुलं कर्तृत्व, ज्ञान दाखवतील.

व्यापारी समाजातील मुलं काही स्वर्गातून व्यापार शिकून येत नाहीत. तीही तुमच्या-आमच्यासारखी माणसंच आहेत. तेव्हा मराठी माणसात वाघाचे धाडस, हत्तीएवढी ताकद व पक्ष्याप्रमाणे उंच झेप घेण्याचे बळ आहे. स्वत:ची ताकद स्वत: ओळखून उद्योगाच्या जगात झेप घेतली पाहिजे.

– प्रा. प्रकाश भोसले

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?