टीम बिल्डिंग ‘मी’पासून ‘आम्ही’चा प्रवास

एकट्याने जे आपल्याला आधी अशक्य वाटत असतं ते आपल्या टीमची सोबत मिळाल्यावर सोपे वाटायला लागते. जेव्हा प्रत्येक टीम मेम्बर त्याला जितकं शक्य आहे तितके प्रयत्न लीडरने दिलेले टार्गेट अचिव्ह करण्यासाठी धडपडतो तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम टीमच्या परफॉर्मन्सवर होतो.

उद्योजक व्यवसायाला सुरुवात करतो तेव्हा तो एकटा असतो; परंतु जर  व्यवसायाचा व्याप वाढायला हवा असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी एकट्याने करून तुमचे जे काही ध्येय असेल ते गाठणे शक्य होत नाही. तुमच्यासोबत सुरुवात केलेले अनेक उद्योजक तुमच्या पुढे गेलेले दिसले की, तुम्हाला आश्चर्य वाटायला लागतं की, याने कोणती अशी जादू केली, की हा माझ्या १० ते २५ पट पुढे निघून गेला.

तुलना नेहमी यशस्वी लोकांशी करा; कारण ते तुमचे स्पर्धक असतात. अयशस्वी लोकांशी करू नका; कारण तुम्ही त्यापैकी एक असता.

“एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, एकत्र काम करणे म्हणजे यश होय.” : हेन्री फोर्ड

टीम म्हणजे काय?

जेव्हा आपण आपलं आकाश रुंदावण्याचा आणि अधिक उंच उडण्याचा विचार करतो म्हणजेच उद्योगविस्ताराचा विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला पहिली अडचणही येते ती म्हणजे ही गोष्ट आपण एकटे करू शकत नाही. तेव्हा आपण आपली टीम बनवण्याची वेळ आली आहे याची आपल्याला जाणीव होते.

मग आपण टीम बनवण्याचा व एकापेक्षा अधिक व्यक्तींना कामावर ठेवायला सुरुवात करतो. त्या व्यक्तीची  नेमणूक करताना प्रत्यक्ष कामाच्या गरजेप्रमाणे त्या त्या व्यक्तीत ते गुण आहेत किंवा नाहीत व ती व्यक्ती त्या कामाकरिता योग्य आहे किंवा  नाही याची खात्री अगोदर करून मग त्यांची नेमणूक करावी.

तसेच ह्या सर्व व्यक्ती एकत्रितपणे काम करण्यास योग्य आहेत की नाही हे जसजसा वेळ जातो तसे समजते. टीमला एकत्र  येऊनच काम करावं लागतं; पण टीम आपणहून काम करत नाही. टीमला एकत्र आणावं लागतं आणि त्यातील सर्व टीम सदस्यांना काम करावंसं वाटेल असं वातावरण टीममध्ये असावं लागतं. एक चांगली टीम म्हणजे फक्त एकत्र काम करणार्‍या लोकांचा समूह नव्हे, तर अशा लोकांचा समूह जो एकमेकांवर विश्वास ठेवतो. त्यांचे ध्येय कायम एकच असते.

अशा सर्व व्यक्तींचा समूह हा एकत्र काम करतो. त्यांना एक टीम लीडर दिला जातो. त्यांना तो टीम लीडर आपापले काम वाटून देतो. लीडरला चौफेर लक्ष ठेवून कोणाला कुठलाही प्रॉब्लेम नाही किंवा कुणामुळे कुठलाही त्रास होत नाही ना याकडे लक्ष द्यावे लागते.

सर्व टीम एकदम उभी करता येत नाही. अनेक वेळा ते आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. टीम मेंबर निवडताना काही अनुभवी, तर काही अनुभव नसलेले व कॉलेजमधून बाहेर पडलेले नवतरुण यांची सांगड आर्थिकदृष्ट्या बॅलन्स होते.

अनुभवी लोकांची लीडरशिप व तरुणांची सक्रियता यांची सांगड टीमचे योगदान बरेच वेळा वाढवते. अनुभवी लोकांची लीडरशिप जर कुठल्याही  काही अडचणी आल्या तर मार्गदर्शनदेखील करू शकते तसेच जर कुठलीही अडचण आली तर त्यातून बाहेर पडण्याचा रस्तादेखील पटकन काढते.

तरुणांना अनुभव घेण्याची व नवीन काही शिकण्याची तसेच झालेल्या चुका सुधारण्याची त्यांना इच्छा असते. असे तरुण योग्य आणि उत्साही मिळाले तर टीम लीडरच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतात. योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाद्वारे त्यांच्यामधून भविष्यात टीम लीडर घडवणे शक्य असते.

ह्या सर्व प्रोसेसला फॉर्मेशन ऑफ टीम म्हणजे टीम बनवणे, असं म्हणतात. एक उत्तम टीम तुमचे स्वप्न पूर्ण करू शकते. टीम ही एकमेकांवरील विश्वास, आदर, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा दिलेला आधार या पंचकर्मांवर उभी असते.

टीम वर्क म्हणजे काय?

ज्या टीममधील मेंबर्स आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर टीमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी करतात ती टीम ध्येयापासून कधीच दूर राहत नाही.

एकट्याने जे आपल्याला आधी अशक्य वाटत असतं ते आपल्या टीमची सोबत मिळाल्यावर सोपे वाटायला लागते. जेव्हा प्रत्येक टीम मेम्बर त्याला जितकं शक्य आहे तितके प्रयत्न लीडरने दिलेले टार्गेट अचिव्ह करण्यासाठी धडपडतो तेव्हा त्याचा एकत्रित परिणाम टीमच्या परफॉर्मन्सवर होतो.

आपण  आयुष्यात टीम वर्क पहिल्यांदा कधी शिकतो?

इंजिनीअरिंग किंवा मेडिकलचे विद्यार्थी आणि आता तर सारेच विद्यार्थी असाइनमेन्ट पूर्ण करण्याकरिता एकमेकांना मदत करत असतात. त्यांचे वेगवेगळे ग्रुप असतात. तेच टीम वर्क आयुष्यभर तुमच्या कामी येतं याची तेव्हा कल्पना नसते. प्राणीदेखील कळप करून राहतात व संकटांशी एकत्र येऊन सामना करतात. त्यांचे बळ हे टीम आणि टीम वर्क हेच असते.

‘थ्री इडियट्स’ चित्रपट पाहून झाल्यावर काही लोकांनी नाकं  मुरडली; पण बर्‍याच लोकांना तो आवडला. आमिर खान किंवा करीना कपूर असल्यामुळे आवडला. सशक्त पटकथा असल्यामुळे आवडला. यात जॉय लोबो नावाचा विद्यार्थी आत्महत्या करतो आणि त्याला कोणी वाचवू शकत नाही.

‘थ्री इडियट्स’मधील आमिर खानचे दोन मित्र फरहान अख्तर आणि राजू रस्तोगी. जो आपल्या मित्रांना वाचवायला आत्महत्या करायचा प्रयत्न करतो आणि हे दोघे त्याला वाचवायला जिवाचं रान करतात. तो  वाचतो आणि त्याचं कारण फक्त डॉ.चा रोल करणारी करीना कपूर आणि त्याच्या दोन्ही मित्रांमुळे. हे असतं टीम वर्क.

यातून शिकायला हेच मिळतं की, “टॅलेंटने गेम जिंकता येतो, परंतु चॅम्पियनशिप फक्त टीम वर्क आणि बुद्धिमत्ता वापरूनच  जिंकता येते.” : मिशेल जॉर्डन

कुठे जातात आपली ही ‘टीम वर्क’ची स्किल्स?

टीम वर्क म्हणजे फक्त जेथे मी कमी आणि आम्ही जास्त  सांगणे. शिक्षण झालं आणि  डिग्री हातात पडली की, आम्ही आणि आपल्यावरून माणूस हळूहळू कधी मी आणि माझं  याकडे जातो हे त्याला कळत नाही. एकट्याने प्रगती होत नाही.

ऑफिसमध्ये सगळ्यांशी मिळून मिसळून वागलं तर तुमची कामं सोपी होतात हे ज्याला  समजतं त्याची कुठलीही कामं कधीच अडत नाहीत, कारण जो देण्यात जास्त असतो त्याला समोरून आपोआप मिळत जातं. प्रत्येक ठिकाणी पैसा लागत नाही, तर लागतं सौदार्ह आणि दुसर्‍या व्यक्तीची अडचण सोडवण्याची आणि मदत करण्याची वृत्ती.

जे लोक पटकन मी ते आम्ही आणि तू आणि मी मिळून  वर येतात ते पटकन कुठल्याही टीममध्ये शिरतात, कारण टीम वर्क  त्यांच्या नसानसांत भिनलेलं असतं. टीममध्ये वेळेला फार महत्त्व असतं आणि तुमचा एक कौतुकाचा शब्द, होईल रे, मी आहे ना,  काळजी करू नको, आपण करून टाकू, हे शब्द खूप आधार देतात. टीममध्ये विश्वास आणि टीम वर्कमध्ये प्रत्येक मेंबरमध्ये सहकार्याची भावना असल्याशिवाय यश मिळत नाही.

चांद्रयान-२ च्या पूर्ण रात्री आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये बसून होते व अंतिम क्षणी जेव्हा संपर्क तुटला तेव्हा सर्व जण मौन होते तेव्हा इस्रोचे मुख्य अधिकारी के. सिवन यांना दुःख अनावर झालं तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी त्यांना मिठी मारून त्यांचं सांत्वन केलं. आपण पंतप्रधान म्हणून याच टीमचे एक भाग आहोत यातच त्यांचं टीम वर्क दिसतं.

टीम बिल्डिंग म्हणजे काय?

“जेव्हा सगळे एकत्र एकाच दिशेने पुढे जात राहतो, त्या वेळेस यशही काळजी घेते की, तुमचा प्रवास त्याच्याच दिशेने आपोआप होईल.” : हेन्री फोर्ड

वरील वाक्यातील एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे. जर सगळी टीम एकाच दिशेने जायला हवी असेल तर तिचे सुकाणू तुमच्या हातात हवे. अशी टीम एका रात्रीत तयार होत नाही. तिच्याकरिता आणि तिच्यावर परिश्रम घ्यावे लागतात. अशी टीम तयार करणे म्हणजेच इफेक्टिव्ह टीम बिल्डिंग. वेगवेगळे तज्ज्ञ ह्यात थोडे वेगवेगळे मुद्दे मांडतात; परंतु सर्वसामान्यपणे खालील मुख्य मुद्दे सर्व प्रकारच्या टीम्सना लागू होतात.

नेतृत्वगुण : टीम बिल्डिंगमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळी अनेक लोकांच्या सहयोगाने काम पूर्ण करून घेणे. जर तुमच्याकडे वेगवेगळ्या टीम्स असतील, तर ही गोष्ट सोपी जाते. नवीन सुरुवात असेल तर पहिल्या दोन टीम्समध्ये तुम्ही वरील स्किलवर ताबा मिळवून या स्किलवरदेखील विजय मिळवू शकता.

संवाद – संवाद हवा, विसंवाद नको. सर्व टीम मेम्बर्स यांचा आपापसांत विश्वासाने संवाद हवा. त्या सर्वांचा टीम लीडरशी संवाद असणे फार महत्त्वाचे. कोणाला काही बोलायचे आहे; पण तो बोलायला लाजतोय ही गोष्ट टीम लीडरच्या लक्षात आलीच पाहिजे.

ऐकण्याची कला – आपण फक्त एकतर्फी संवाद करतो. समोरच्याचे बोलणे ऐकण्याची मानसिकता लीडर व सर्व टीम लीडरने आपल्यात तयार करायला हवी. प्रभावी टीम बिल्डिंगसाठी ते फार गरजेचे असते. कारण समस्या समजल्या तरच उपाय करता येतात.

आत्मविश्‍वास तयार करणे : टीम लीडरमध्ये स्वतःबद्दल आणि टीमबद्दल आत्मविश्‍वास हा तुम्ही दाखवलेल्या विश्वासाने वाढवावा आणि टिकवावा लागतो आणि नवीन टीम लीडर बनताना त्याला स्वतःबद्दल विश्‍वास हा तुम्ही आणि टीम लीडर कसा देईल हे तुम्ही पाहावं लागतं. तरच एकातून दुसरी आणि दुसर्‍यातून तिसरी टीम बनवू शकता.

संयम – तुम्हाला थोडा धीर हा धरावाच लागतो. प्रत्येक गोष्टीचा वेटिंग पीरिअड असतो. तो तुम्हाला द्यावा लागतो. टीमला घडायला जो वेळ लागणार आहे तो देणे गरजेचे असते. तिथे घाई करून चालत नाही.

भक्कम पाठिंबा – तुम्हाला कायम तुमच्या टीमच्या पाठीशी घट्टपणे उभं राहावं लागतं. जसं भारतीय टीमचा कप्तान महेन्द्रसिंग धोनी याने 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती. लीडरचा सपोर्ट असेल तर अशक्य गोष्टपण शक्य करण्याची टीममध्ये क्षमता येऊ शकते.

इंटरपर्सनल रिलेशनशिप – सर्व टीम मेम्बर्सचे आपापसांत एक नाते हवे. त्याचा दीर्घकाळ परिणाम फार चांगला होतो. टीम मेम्बर्सना टिकवून ठेवण्यासाठी याचा फार फायदा होतो. यासाठी वाढदिवस, गेट-टुगेदर, ट्रिप यांसारखे पर्याय आयोजित करून सर्वांमध्ये हे नातं तयार करून जपले जाऊ शकते.

ब्रेनस्ट्रॉमिंग आणि ट्रेनिंग – सर्व टीम मेम्बर्स आणि लीडर्स यांच्या तीन-चार महिन्यांतून एकदा होणार्‍या नियमित मीटिंगमध्ये ब्रेनस्ट्रॉमिंग म्हणजे नवीन बदल, काम करणार्‍या सदस्यांकडून, कामगारांकडून येणार्‍या सूचना, ग्राहकांच्या सूचना, वारंवार होणारी मागणी आणि तक्रार यावर चर्चा किंवा त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या जातात. या मीटिंगद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांना नवीन गोष्टींची माहिती देऊन अद्ययावत ठेवले जाते.

“व्यवसायात महान गोष्टी कधीच एका माणसाने  केल्या नाहीत” : स्टीव्ह जॉब्स

स्टीव्ह जॉब्स यांच्या वरील विधानात माझ्या पूर्ण लेखाचं सार आहे. जर तुम्हाला व्यवसायात असामान्य किंवा महान गोष्टी करायच्या असतील तर सोबत तुमची टीम लागते. तुमच्यावरील  विश्वास, आदर, लोकांना समजून घेण्याची वृत्ती आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा दिलेला आधार यामुळे ते सोबत टिकतात.

त्यांच्या पुढील प्रवासात तुम्ही नवीन लोक ठेवून व्यवसाय वाढवून जी टीम तयार करता ती तुमच्या स्किलवर असते. टीम मेम्बर्स, त्यांना सांभाळणे आणि नवीन  दुसर्‍या  टीम बनवत राहाणे  हाच शून्यातून प्रगतीकडे आणि प्रगतीतून यशाकडे जाण्याचा मार्ग आहे.

– पराग घारपुरे
९४२२८४२७७४

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?