वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्व

व्यवसायात उतरल्यापासून आम्हाला हवे असलेले ईप्सित साध्य करण्यासाठी आम्ही सतत काही ना काही तरी करण्यात गुंतलेलो असतो आणि त्यासाठी नवनवीन कल्पना व मार्ग पडताळून बघत असतो, जेणेकरून एखादी गोष्ट आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे करू शकतो आणि कमीत कमी वेळेत मिळवू शकू.

काही वेळा त्यातून असे काही तरी भन्नाट हाती लागते की, जिथे एक कामदेखील धड होण्याची मारामारी असते तिथे अनेक कामे आपण प्रभावीपणे हाताळायला लागतो, कारण वेळेच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी हवा असणारा राजमार्ग आपल्याला सापडलेला असतो.

काही जणांच्या बाबतीत हे प्रयोग कित्येक वेळा फसतात व मग आम्ही केवळ धडपडतच राहतो हवे ते ईप्सित साधण्यासाठी व शेवटी उद्योग क्षेत्रातील आपले स्थान कसेबसे टिकवण्यासाठी. फक्त विचार जरी केला तरी असे बरेच लोक तुमच्या नजरेसमोर येतील, तर काही बाबतीत हे तंतोतंत आपल्यालाच लागू होतं.

जर सर्व काही करणे जमत नसेल तर किमान एखादी बाजू तरी व्यवस्थितपणे हाताळण्याची आपण अपेक्षा करतो; पण दुर्दैवाने आमचा जास्तीत जास्त वेळ, हवे ते साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष कृतीत न जाता, फक्त आणि फक्त ते का होत नाही आहे, याच एका विवंचनेतच जातो. त्यामुळे उद्योगधंदावाढ वगैरे गोष्टी फक्त ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ होऊन जातात.

लोकांच्या आणि कित्येक वेळा स्वतःच्या नजरेतसुद्धा आम्ही फक्त मोठमोठ्या बाताच मारणारे; पण प्रत्यक्षात मात्र काहीच कृती न करणाऱ्या जमातीचाच भाग होऊन जातो.

आयुष्याचा पसाराच एवढा अफाट आहे की, त्यात प्रत्येक गोष्ट सामावणे केवळ अशक्य आहे असेच चित्र बहुधा असते; पण जर का प्रत्येक गोष्टीला यथोचित न्याय देऊन त्या आपल्या जीवनात अंतर्भूत केल्या तर अशक्य असे काहीही नसते. मग ती मिळालेली वेळ असेल किंवा माणसे किंवा हाती आलेली किंवा निर्माण केलेली एखादी संधी.

मान्य आहे आम्हाला खूप साऱ्या संकटांना तोंड द्यायचं असतं. अगदी प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत करत आपल्या उद्योगधंद्याची वाढ करायची असते आणि त्याचबरोबर गणिते जुळवायची असतात कुटुंबाला आणि स्वतःला वेळ कसा द्यायचा त्याची. हे सर्व एकत्र सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच असते, कारण जर एक करायला गेलो तर दुसरेच काही तरी डोके वर काढते किंवा दुसऱ्या गोष्टीत समस्या निर्माण होते.

विक्रीवर लक्ष दिले तर उत्पादन क्षमतेची समस्या आणि कधी माल तयार आहे, परंतु विक्रीच नाही, कारण त्याचे कोणतेही नियोजन नाही. कारण लक्ष फक्त एकाच गोष्टीवर केंद्रित केलेले, त्यामुळे दुसऱ्याचा बट्ट्याबोळ.

त्याचबरोबर उद्योगधंद्यातच जास्त वेळ दिला आणि जर कुटुंबाला व्यवस्थित वेळ नाही दिला तर घरात कुरबुरी सुरू होणार हे ठरलेले; पण जर का घरी जास्त वेळ दिला तर मात्र कार्यालयात आणीबाणीची अवस्था.

एकंदरीत सर्व जण आपल्या डोक्याचा दही करून त्याची लस्सी बनवून मस्त मिटक्या मारत पितात आणि आम्ही मात्र ‘ना घर का ना घाट का’ म्हणजे ना धड घरचा ना कार्यालयाचा असेच जीवन जगत असतो.

घरच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ दिला तर दुसऱ्या दिवशी कार्यालयासाठी पळापळ आणि कार्यालयामागे पळतोय तर मग उद्या घरासाठी धावपळ. या पळापळीच्या व धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ आमच्याकडे कधीच नसतो आणि जर का चुकूनमाकून मिळालाच तर काही तरी अघटित घडायलाच हवं आणि ते निस्तरता निस्तरता आमचा कस लागतो.

त्यामुळे बिच्चाऱ्या माणसाने करावे तरी काय? उद्योगधंद्यातील समस्यांचे निरसन की फक्त घरी बसून कुटुंबाची काळजी?

छे!

आम्ही घरी बसून उद्योगधंद्याचे गणित सोडवत बसतो व कार्यालयात बसून घराच्या समस्यांचा निचरा आणि हा दिनक्रम आम्ही नित्यनेमाने आणि अगदी प्रामाणिकपणे पाळतो न चुकता. यामध्ये आम्ही कोणतीच चालढकल करत नाही किंवा कोणतीही दिरंगाईदेखील यात खपवून घेतली जात नाही.

पण निचरा खरोखरच होतो का?
की आणखी कचऱ्याची त्यात भर पडते?

काहीही असो, पण एवढी महत्त्वाची कामे जर आम्ही नित्यनेमाने करत असताना कोण बोलायची हिम्मत करेल की, आमच्या आयुष्यात सातत्य नाही आहे म्हणून? आहे कुणाची हिंमत?

आता तुम्हीच सांगा, एवढं सगळं टापटीपपणे होत असताना कुणाला काय घेणेदेणे असेल का वेळेच्या व्यवस्थापनाशी?

छे! अजिबात नाही.

खरे तर दिवसभरामध्ये आपण कायकाय करणार आणि कसे करणार हे आपण ठरवतोदेखील; पण करतो मात्र काही तरी वेगळेच.

आपण नेहमी तेच करतो जे आपल्या डोक्यावर पडते आणि जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या डोक्यावर पडत नाही तोपर्यंत आम्ही ते नाही करत, मग ती कोणतेही काम असो.

त्यानंतर ठरवलेले काम आपण आजचं उद्यावर, उद्याचं परवावर ढकलतो; पण तो उद्या-परवा आपल्या आयुष्यात कधीच उगवत नाही. जरी उगवला आणि ते काम पूर्ण जरी केले तरी त्याचे कोडकौतुक नसतेच, समाधानही नसते, कारण जेमतेम दोन-तीन तासांच्या कामासाठी कधीकधी आपण महिने-दोन महिने, तर कधीकधी काही वर्षे घेतलेली असतात.

जरा विचार करून बघा, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाचा पगार असा पुढे ढकलता येतो का ते आणि जर तसे केलेत तर त्याचे फलित काय असेल?

ती व्यक्ती दुसरा पर्याय नसेपर्यंत किंवा जुना कर्मचारी असेल तर काही दिवस कळ सोसेल; पण त्यानंतर मात्र तुम्हाला कायमचा रामराम करून निघून जाईल. हेच लागू होते तुमच्या ग्राहकांना आणि तुमच्या जवळच्या लोकांनादेखील. लोकांचे सोडा, पण जर तुम्हाला स्वतःला कुणी असे ताटकळत ठेवले तर तुम्हीदेखील दुसरा पर्याय शोधाल, नाही का? पण मग जेव्हा तुम्ही कोणतेही नियोजन न करता उद्योगधंदा सुरू ठेवता त्या वेळी काय असेल त्याचे फलित? काही भाष्य करायची गरज आहे का त्यावर?

ज्या वेळी काम करायला हवे त्याच वेळी जर ते केले तर पुढच्या खूप साऱ्या समस्यांची उत्पत्तीच होणार नाही. त्यामुळे पुढील अनावश्यक कटकटीतून आपली सुटका होऊ शकते. जर घरी असाल तर घरी वेळ द्या आणि कार्यालयात असाल तर कार्यालयाला. पण वेळच्या वेळी कामे करायची सवय बहुतेक वेळा नसतेच मुळी आम्हाला.

आमच्या जगण्याचे एकच धोरण असते ते म्हणजे आज जगतोय ना मी आरामात, मग कशाला उद्याची बात? उद्या पाहिला आहे का कुणी? जसे आता जगतोय तसेच उद्याही जगू की, मग का उगाच आताच डोक्याला शॉक लावून घ्यायचा. करू उद्या आरामात.

आजचे काम उद्यावर ढकलण्याला चालढकल म्हणतात, नाही का? आणि आम्हाला हे पक्के ठाऊक असते की, आम्ही चालढकल करत आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला तिसर्या व्यक्तीची गरज नसते; पण ते माहीत असतानादेखील आम्ही चालढकल करतच राहतो व अपेक्षा करतो की, आपण ठरवलेली कामे अगदी वेळेवर किंवा वेळेच्या अगोदरच पूर्ण झाली पाहिजेत.

ते शक्य नसते कारण आपण त्यासाठी कोणतीही कृती केलेलीच नसते; पण ते जाणवेपर्यंत आमची अवस्था अग्निशमन दलासारखी झालेली असते. अग्निशमन दलाचे काम काय असते? तर जिथे आग लागली असेल तिथे जाऊन ती विझवणे; पण आमच्याकडे तर कायम आग लागलेली असते त्यामुळे एक आग विझवायच्या आत दुसरी, तिसरी, पाचवी, दहावी आग आपली वाट पहात असते.

काही आगी विझतात, तर काही तशाच धगधगत राहतात, अगदी आयुष्यभर आणि आम्ही मात्र कायम त्यामध्ये होरपळून निघत असतो. मग फक्त एकच तुणतुणे आम्ही वाजवत बसतो की, वेळ नाही आहे माझ्याकडे, नाही तर मी असं केलं असतं किंवा तसं केलं असतं.

अगदी १० लाखांचा किंवा १० करोडचा धंदा मी सहज १०० कोटींचा केला असता वगैरे वगैरे. २४ च्या ऐवजी २५-२६ तास असावेत ही नेहमीचीच ओरड. नाही तर देवाने असा अन्याय तरी करू नये, जेवढी झेपतील तेवढीच कामे द्यावीत. एक तर वेळ तरी जास्त द्यावा किंवा कामे (आव्हाने) तरी कमी किंवा झेपतील तेवढीच द्यावीत.

एक तर वेळ कमी आणि त्यात आव्हाने जास्त आणि तो वेळदेखील सुसाट वेगाने पळतच सुटलाय वेड्यासारखा, कसं करायचं तरी कसं हे वेळ व्यवस्थापन?

या भूतलावर एकही व्यक्ती अशी नाही आहे जिला २४ तासांपेक्षा जास्त वेळ दिवसभरात मिळत असेल; पण तरीही बहुतेक जण आणखीन जास्त वेळ मिळाला असता तर बरे झाले असते असंच तुणतुणे वाजविताना दिसतात, कारण आम्हाला वेळ नेहमीच कमी पडतो, अगदी कितीही जास्त मिळाला तरीही. जरी आम्हाला दिवसाच्या त्या २४ तासांऐवजी ५० तास मिळाले तरीदेखील ते आम्हाला कमीच पडणार, कारण ती वेळ कशासाठी, कशी आणि कुठे वापरायची ह्याचीच स्पष्टता बहुतेक वेळा आम्हाला नसते.

वेळ व्यवस्थापनाबद्दलचा सार्वत्रिक समज म्हणजे वेळापत्रक बनवायचे आणि त्या वेळापत्रकानुसार आयुष्य जगायचे. पण किती जण वेळापत्रक बनवतात? किती जण त्यानुसार आयुष्य जगतात? जेमतेम १ टक्के लोकदेखील वेळापत्रक बनवत नसतील; पण तुम्हाला बरे वाटावे म्हणून आपण ५ टक्के समजू या. तुम्ही त्या ५ टक्क्यांत तरी येता का?

कमीत कमी ९५ टक्के लोक अग्निशमन दलाचे बिनपगारी कामगार असतात जे कायम स्वतःच्याच आगी विझवण्यात व्यस्त असतात; पण भली मोठी आगदेखील एका छोट्याशा ठिणगीनेच लागलेली असते. ती छोटीशी ठिणगी महारुद्र रूप धारण करून जसं सर्व काही भस्मसात करून टाकते तसेच काहीसे आपल्या आयुष्यातही होत असते, अगदी नित्यनेमाने.

दुर्दैवाने यातील बहुतेक आगी आपल्याच चुकीमुळे लागतात आणि आमचे उर्वरित आयुष्य जाते त्या आगी विझवण्यात. ठिणगी पडताक्षणीच जर ती विझवली गेली तर मात्र काहीही नुकसान नसते किंवा जरी असला तरी किरकोळच असेल तो. जास्तीत जास्त चटका लागेल त्याने, पण त्यावरच भागेल. वणवा लागून सर्व नाहीसे होण्यापेक्षा हे कधीही चालेल, नाही का?

एक अशीच आपल्याला कायम जडलेली सवय म्हणजे आता करतो, लगेच करतो, दोनच मिनिटांत करून देतो, पाच मिनिटे, फक्त पाच मिनिटे, मग झालंच म्हणून समजा!

काम कोणतेही आणि कशाही प्रकारचे असो, आमचे उद्गाार ठरलेले. कदाचित ते काम करायला आपल्याला कमीत कमी 3 ते 4 तास लागतील किंवा काही दिवस, पण आमचे उद्गािर ठरलेले. कदाचित ते काम करण्यासाठी सध्या करत असलेले हातातील काम सोडावे लागेल आणि त्याचे दुष्परिणाम भयंकर असतील. कदाचित तसे काही भयानक घडणार नाही, पण…

त्यापेक्षा जर वेळेचे व्यवस्थितपणे व्यवस्थापन केले तर नाही चालणार का? कसे चालेल ते?

काय वेडबिड लागले आहे का तुम्हाला हा असा वेळ फुकट घालवायला? अहो, एक तर एवढी कामे डोक्यावर पडली आहेत ती अगोदर उरकायची की ते नियोजन, आखणीबिखणी काय असते ते करत बसायचे? अहो, उद्योगधंद्यात राहायचे तर सतत काम करत राहावे लागते, नाही तर कुठच्या कुठे फेकले जाऊ. धंदा करायचा आहे आम्हाला. खूप पुढे जायचे आहे, नाही तर तुमचे ऐकत बसलो तर झाली आमची प्रगती. काहीही… म्हणे नियोजनबद्ध आयुष्य… इथे तर एकच हिशोब आहे, जेवढे जोरात पळता येईल तेवढ्या जोरात पळत राहायचं मग ते कोणत्याही दिशेने का असेना. लोकांना आपण रिकामे दिसता कामा नये.

असे भरपूर लोक भेटतात मला ज्यांच्या मते नियोजन करायला वेळ घालवण्यापेक्षा ती करून टाकलेली उत्तम. तसेही ठरवलेली कामे होतात तरी कुठे? आणि तसेही तेच करावे लागते जी कामे डोक्यावर पडतात, नाही का?

पण जे नियोजनाचे महत्त्व समजतात ते साम्राज्य उभे करतात आणि बाकीचे टिकण्यासाठी रोजची मारामारी चालू ठेवतात व शेवटी कुणाच्या तरी माथी त्यांचे अपयश मारून कायमचे उद्योगधंद्याला रामराम ठोकतात. नुसते उद्योगधंद्यातच नाही तर कोणत्याही गोष्टीसाठी नियोजन आणि कामांची आखणी आणि वाटणी अतिशय महत्त्वाची आहे. जर ते व्यवस्थित जमले तर अर्धे यश तुम्ही मिळवले म्हणून समजा.

गेली कित्येक वर्षे मी वैयक्तिक मार्गदर्शन, कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे यात कार्यरत असल्याने माझा लोकांशी संबंध नित्याचाच. अशाच एका वेळ व्यवस्थापनावरील कार्यशाळेत ‘वेळ अनमोल’मध्ये मी एका गृहस्थांशी संवाद साधत होतो. जशी बहुतेक जण देतात तशीच मोघम उत्तरे तेदेखील देत होते.

त्यांचे म्हणणे होते की, ते त्यांचा वेळ कधीच फुकट घालवत नाहीत, ते कोणतेही काम लगेच करतात व वेळेचा पुरेपूर वापर करतात. कसं? तर, त्यांच्याकडे बाइक असल्यामुळे ते कुठेही लगेच पोहोचू शकतात, त्यामुळे ते वाट बघत नाही बसत. तडक बाइकवर बसतात जिथे जायचं तिथे जातात. आपलं काम पूर्ण करतात आणि परत येतात.

मी म्हटले, खरंच छान आहे. तुमच्याकडे बाइक असल्याने तुमची खूपच छान सोय झाली आहे. नाही तर तुमची खूप सारी कामे कधी पूर्णच झाली नसती किंवा ती पूर्ण करायला तुम्हाला खूप त्रास घ्यावा लागला असता; पण खरोखर ही कामे अशी होती ज्यासाठी तुम्हाला स्वतःला वैयक्तिकरीत्या तिथे ग्राहकाकडे किंवा दुसऱ्या कुणाकडे जाण्याची गरज होती? की ही कामे साधा एक फोन करूनदेखील शक्य झाली असती? जर फोनवर किंवा अन्य दुसर्या कोणत्याही प्रकारे हे शक्य असेल तर वैयक्तिक भेट देण्याची गरजच काय? त्या वेळेत आणखी काही महत्त्वाची कामे करता येतील ना?

आमच्या संवादात त्यांच्या वागण्यातील आणखी काही कच्चे दुवे बाहेर निघाले व त्यांना जाणवले की, त्यांना जोपर्यंत ते स्वतः जाऊन काम नाही करत तोपर्यंत समाधान नाही मिळत. म्हणून ते फोन वगैरे करत न बसता स्वतः जातीने प्रत्येक कामात लक्ष घालून पूर्ण करतात; पण त्यामुळे अशी किती तरी कामे त्यांना एकट्यालाच करावी लागतात जी दुसऱ्याकडूनदेखील होऊ शकली असती आणि त्यांना तो वेळ आणखी कोणत्या तरी कामासाठी वापरता आला असता.

ज्यामुळे त्यांचाच फायदा झाला असता; पण काय आहे ना, सर्वच कामे आम्हाला स्वतःलाच करायची असतात, अगदी हाताखाली माणसे असतानादेखील आणि नसली तर मग काय मालक आणि शिपाई दोन्हीही आपणच; पण माणसे असतानादेखील हा अट्टहास कशासाठी?

मान्य आहे की, तुम्ही सर्वच कामे चांगल्या प्रकारे करू शकता; पण त्या प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो. मिळतो का तो वेळ तुम्हाला लोकांपेक्षा जास्त? जर शिपायाचे किंवा लिपिकाचे काम तुम्ही केलेत तर तेवढा वेळ होतो का तुमच्या आयुष्यात जमा? नाही म्हणजे २४ चे ४८ किंवा ७२ तास करून मिळतात का तुम्हाला? जरी मिळाली तरी तुमचे उद्योगधंद्यात येण्याचे नेमके प्रयोजन हेच होते का? नाही ना, मग अशा कामांसाठी वेळ काढा जी तुम्हाला तुमचे प्रयोजन सार्थक करण्यास मदत करतील.

एकंदरीत मालकाला अजिबात वेळ नाही. बिच्चारा सकाळी आठ-नऊ वाजल्यापासून रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत मरमर काम करत असतो आणि हाताखालच्या माणसांना फुरसतच फुरसत. हवा तेवढा मोकळा वेळ. एकदम निवांत आयुष्य. म्हणजे शिपाई तंबाखू मळत बसतो आरामात मस्त आणि मालक मात्र स्वतःलाच चुना लावण्यात व्यस्त.

असे नको असेल तर काही गोष्टी बदलणे गरजेच्या आहेत. भविष्याची नुसती काळजी करून भविष्य बदलता येत नाही, तर तुम्ही आता काय कृती करता आहात त्या कृतीवरच तुमचं भविष्य ठरतं किंवा घडतं आणि जर ते भविष्य घडवायचं असेल तर वेळ व्यवस्थापनाला पर्याय नाही.

उद्योजक म्हणजे चोवीस तास काम व काम ही संकल्पना डोक्यातून काढून टाका आणि वेळेचा योग्य आणि नेमका वापर करायला शिका.

पुन्हा एकदा थोडक्यात :
  • कोणतीही गोष्ट एका विशिष्ट वेळेवरच करायला हवी.
  • कामाची योग्य आखणी आणि वाटणी करावी आणि त्याप्रमाणेच काम करायचे.
  • काम नियोजनबद्धच हवे; त्यासाठी थोडा वेळ काढा म्हणजे तुमचा भरपूर वेळ वाचेल आणि कामाचे समाधानही मिळेल.
  • तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करा. जसे व्हॉट्सअॅ्प व त्याचबरोबर किती तरी व्हिडीओचे पर्याय उपलब्ध आहेत आता.
  • तंत्रज्ञान जर व्यवस्थितपणे वापरले तर धंद्यात फायदाच होईल; पण फक्त अतिरेक नसावा.
  • स्वतःला आणि कुटुंबाला व्यवस्थित वेळ द्या.

आता ‘स्मार्ट उद्योजक’ व्हायचं की…?
निर्णय संपूर्णतः तुमचाच.

– शैलेश तांडेल
७२०८११२३३१
(लेखक जीवन कौशल्य प्रशिक्षक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?