व्यवसायवाढीसाठी लिंक्डइनचा प्रभावी वापर कसा करता येईल?

लिंक्डइन हा आजच्या सोशल मीडियामधील सर्वात प्रोफेशनल मानला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आज लिंक्डइनचा वापर आपला व्यवसाय वाढवणे, आपण ज्या प्रकारची नोकरी करतो तशीच नोकरी करणार्‍या इतर लोकांशी ओळख करून घेणे, आपल्या व्यवसायात नवीन लोकांची भरती करणे अशा अनेक गोष्टींसाठी केला जातो. म्हणजेच आपले प्रोफेशनल नेटवर्क विकसित करणे हा लिंक्डइनचा उद्देश आहे.

योग्य लोकांशी योग्य संबंध निर्माण करणे हा यशस्वी उद्योगाचा जणू कानमंत्रच आहे आणि हेच काम आपण लिंक्डइनद्वारे करू शकतो. आता पाहू ते कसे करता येईल.

ब्रँडिंग

व्यवसायवाढीच्या दृष्टीने ब्रँडिंगला खूप महत्त्व आहे. ब्रँडिंग म्हणजे विक्री नव्हे. आपण एखाद्या वस्तूची जाहिरात पाहिली की लगेच जाऊन ती वस्तू विकत घेत नाही, तर आपल्याला जेव्हा त्या वस्तूची गरज असते तेव्हा आपण आधी पाहिलेली जाहिरात आपल्याला आपोआप आठवते आणि मग आपण जाऊन ती वस्तू विकत घेतो. यालाच म्हणतात ब्रँडिंग अर्थात आपले उत्पादन ग्राहकांच्या डोक्यात भिनवणे. लिंक्डइनद्वारे ब्रँडिंग अनेक प्रकारे होऊ शकते.

आपल्या गुणांना लोकांसमोर आणणे

लिंक्डइनवर आपली एक प्रोफाइल असते, जी लिंक्डइनवरील इतर लोकांना दिसते. त्यात आपले नाव, आपले कामाचे ठिकाण, आपला हुद्दा, फोन नंबर, शिक्षण अशा अनेक गोष्टी असतात ज्यातून आपली ओळख लोकांना कळते. आपण जितकी जास्त आणि सविस्तर माहिती भरू त्यानुसार आपल्या प्रोफाइलची कुवत ठरवली जाते.

आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा ती ‘बिगिनर’ असते आणि आपण व्यवस्थित सर्व माहिती भरली की ती ‘ऑल स्टार’ प्रोफाइल होते. आपण आपली जितकी सविस्तर माहिती भरू तितके आपण लोकांना लिंक्डइनवर सहजपणे जोडले जाऊ शकतो, कारण लिंक्डइनवर लोक फक्त नावांनीच नाही तर राहण्याचे ठिकाण, कामाचे स्वरूप, व्यवसायाचे क्षेत्र अशा अनेक प्रकारांनी इतरांना शोधतात.

लिंक्डइन प्रोफाइलवर एकाच ठिकाणी आपली सविस्तर माहिती लोकांना दिसल्यामुळे आपण त्यांना लक्षात राहतो आणि ज्या वेळी त्यांना गरज असते तेव्हा आपण किंवा आपले उत्पादन त्यांना बरोबर आठवते.

आपले नेटवर्क आणखी वाढवा

व्यवसाय म्हटले की नवनवीन ओळखी वाढवणे आलेच. आपण कितीही ठरविले तरी प्रत्यक्ष भेटी आणि ओळखी या एक मर्यादेपर्यंतच होऊ शकतात. यापुढे जर आपल्याला जायचे असेल तर आपण सोशल मीडियाचा वापर त्यासाठी करू शकतो. लिंक्डइनवर आपण लोकांना त्यांची नावे, कामाचे स्वरूप, कंपनीचे नाव अशा अनेक प्रकारे शोधू शकतो.

आपल्या माहितीशी जुळणार्‍या लोकांची नावे People you may know द्वारे लिंक्डइन आपल्याला कळवत राहते. म्हणजेच लिंक्डनद्वारे आपण आपले ग्राहक आणि कर्मचारीच नाहीत तर आपल्या क्षेत्रातील सर्वांशीच ओळखी निर्माण करू शकतो.

नुसत्याच ओळखी नाहीत तर नाती तयार करा

लिंक्डइनवर ओळखी निर्माण करणे म्हणजे नुसते मित्र वाढवणे हा हेतू नाहीये, तर आपल्या व्यवसायवाढीत आपल्याला कुणाची मदत होईल, भविष्यात आपले ग्राहक कोण असतील, आपल्याला कच्चा माल पुढे कोण पुरवणार या सर्वांचा आताच विचार करून अशा व्यक्तींशी लिंक्डइनद्वारे प्रोफेशनल नाती तयार केली तर नक्कीच फायदा होईल. आता जरी आपल्याला त्याचा प्रत्यक्ष फायदा होत नसेल, तरी भविष्यात हेच लोक आपल्याला उपयोगी पडतील.

मार्केटिंग

मार्केटिंग म्हणजे लोकांना नक्की कोणत्या उत्पादनांची गरज आहे हे जाणून घेऊन योग्य लोकांना योग्य वेळेत आणि योग्य किमतीत उत्पादने पुरवणे. लिंक्डइनद्वारे पुढील तीन टप्प्यांत आपण मार्केटिंग करू शकतो.

आपला व्यवसाय लोकांसमोर आणा : लोकांना जर आपला व्यवसाय माहीतच नसेल तर ते आपल्याकडून काही विकत घेणे शक्यच नाही. त्यामुळे सर्वात प्रथम लिंक्डइनवर आपले कंपनी पेज बनवा. या पेजमध्ये आपल्या व्यवसायाची थोडक्यात माहिती जसे नाव, ठिकाण, फोन नंबर वगैरे आपण भरू शकतो जी सर्व लोकांना दिसते.

लोकांशी जोडले जा : आपले भविष्यात ग्राहक कोण असतील हे आधी जाणून घ्या. असे लोक आपल्या कंपनी पेजवर का येतील, असा विचार करा आणि त्या प्रकारच्या पोस्ट्स आपल्या कंपनी पेजवर करणे सुरू करा. (जसे माहितीपर ग्राफिक्स, यशस्वी उद्योजकांचे अनुभव इ.) या पोस्ट्समध्ये विक्रीच्या पोस्ट्ससुद्धा असतीलच.

जोडलेले संबंध कायमस्वरूपी जपा : नवीन लोकांशी लिंक्डइनद्वारे जोडले जाणे फार काही कठीण नाही; परंतु एकदा जोडले गेल्यावर हे नाते कायमस्वरूपी टिकवणे मात्र कठीण. यासाठी आपल्या व्यवसायावर काही सोपे उपाय आपण करू शकतो. जसे आपल्या ग्राहकांकडून ‘रिव्ह्यू’ घेऊन ते शेअर करणे, लिंक्डइनवर आपण भरलेली आपली कौशल्ये म्हणजेच स्किल्स लोकांना Endorse करायला सांगणे, लोकांच्या मेसेजेसना लवकरात लवकर उत्तर देणे इ.

विक्री

आपण कोणतेही सोशल मीडिया आपल्या ग्राहकांशी संबंध निर्माण करण्यासाठी वापरतो; परंतु यामागचा आपला मूळ हेतू हा विक्रीत वाढ होणे हा असतो. लिंक्डइनद्वारे विक्रीत वाढ कशी करता येईल हे आता पाहू.

अशी प्रोफाइल बनवा जी विक्रीला प्रोत्साहन देईल

लिंक्डइनवर आपली प्रोफाइल आणि पेज जर उत्तम आणि पूर्ण असेल तर लोक त्याला भेट देणारच; परंतु लोक नुसते आले, प्रोफाइल पाहिली आणि गेले असे होता कामा नये, तर आलेले लोक आपल्या पेज किंवा प्रोफाइलमध्ये गुंतले पाहिजेत, तरच विक्री होईल. यासाठी आपल्या पेज किंवा प्रोफाइलवर लोकांना आवडतील, आकर्षक वाटतील अशा पोस्ट्स हव्यात.

यात आपल्या वेबसाइटवरील माहितीच्या लिंक्स शेअर करणे, लोकांना विविध प्रश्न विचारून त्यावर त्यांचे मत घेणे, विविध ऑनलाइन स्पर्धा घेणे अशा अनेक गोष्टी आपण आपली कल्पकता वापरून करू शकतो. या सर्वामुळे पहिल्या वेळीच लोक खरेदी करतील असे नाही, पण लोक आपल्या पेजला पुन्हा भेट द्यायला जरूर येतील; परंतु या सर्वात विक्रीच्या पोस्ट्स विसरू नका.

आपल्या पेजवर येणार्‍या लोकांचा कल पाहून आपण साधारण किती वेळा विक्रीच्या पोस्ट करणे उत्तम याचा अभ्यास करा. विक्रीच्या पोस्टमध्ये आपण लोकांना थेट त्यांनी काय करायचे हे सांगा. उदा. आमच्या या या नंबरवर फोन करून बुक करा किंवा आमच्या या पोर्टलवरून खरेदी करा किंवा आपल्या जवळच्या या दुकानात आमचे उत्पादन उपलब्ध असेल इ.

योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचा

आपले लिंक्डइन अकाऊंट हे आपल्या ग्राहक किंवा आपल्या उत्पादनाचे वापरकर्ते यापर्यंत पोहोचले तरच त्याचा फायदा आहे. जे लोक आपले उत्पादन विकत घेतील अशा लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचा विचार करा. जर आपले अकाऊंट किंवा लिंक्डइन पेज हे जास्तीत जास्त योग्य लोकांपर्यंत पोहोचले तर आपला Conversion Rate वाढेल. (म्हणजेच किती लोकांनी आपली पोस्ट पाहिली आणि त्यातील किती लोकांनी आपल्याकडे खरेदी केली.)

यासाठी आपल्या पेजवरचा कंटेंट हा आपल्या संभाव्य ग्राहकांच्या आवडीनिवडींप्रमाणे असायला हवा. जसे, आपला खाद्यपदार्थांचा व्यवसाय असेल तर आपण लोकांना त्यांच्या स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या पद्धती विचारू शकता आणि जागेनुसार वेगवेगळ्या चवींचे पदार्थ बनवू शकता.

मेसेजद्वारे विक्री करा

लिंक्डइन हे एक प्रोफेशनल सोशल मीडिया असल्याने यातील मेसेजेस हे योग्य प्रकारे वापरले तर आपल्या व्यवसायाला खूप फायदा होऊ शकतो. योग्य प्रकारे वापरणे म्हणजे एकच मेसेज सर्वांना पाठवणे नाही, तर आपल्या उत्पादनांमध्ये इच्छुक असलेल्या लोकांशी संवाद साधणे. तसेच जर आपण पेड गोष्टी वापरण्यास तयार असाल, तर एखाद्या व्यक्तीशी कनेक्टेड (लिंक्डइनवर जोडलेले) नसाल तरीसुद्धा आपण त्यांना इन-मेल पाठवू शकाल ज्यावर लिंक्डइन आपल्याला काही पैसे लावेल. तसेच जर आपल्या इन-मेलला सात दिवसांत उत्तर नाही दिले तर तेच पैसे पुन्हा वापरून आपण दुसरा एक इनमेल करू शकाल.

योग्य लोकांची नियुक्ती करा

लिंक्डइनवर आपण आपल्या व्यवसायाची योग्य आणि ठाम अशी प्रतिकृती उभी करू शकता, म्हणजेच जे काही आपल्या व्यवसायात चालते ते आपण लिंक्डइन प्रोफाइलद्वारे लोकांना दाखवू शकता. त्यामुळे आपल्या व्यवसायात इच्छुक असलेले लोक आपल्याशी विविध प्रकारे जोडले जाऊ लागतील.

आपल्या गरजेनुसार आपणसुद्धा लिंक्डइनवर नियुक्ती करण्यासाठीची पोस्ट करू शकता. म्हणजेच आपल्याकडे कोणत्या जागा रिकाम्या आहेत का हे आपण लिंक्डइनद्वारे लोकांना सांगू शकता आणि त्यात इच्छुक असलेल्या लोकांशी संपर्क साधून योग्य व्यक्तीची निवड करू शकता.

लिंक्डइनचे सुमारे ३० कोटी वापरकर्ते आहेत. त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचणे लिंक्डइनमुळे शक्य होऊ शकते. लिंक्डइनच्या माहितीप्रमाणे अंदाजे ३१ हजार लोक एखाद्या पोस्टला पाहतात व साधारणपणे 250 लाइक्स आणि ऐंशी प्रतिक्रिया त्यावर देतात. अंतिमतः या सगळ्याचा परिणाम विक्री वाढण्यावर होतो. आपल्या पोस्ट्समध्ये पुढील पाच सोपे नियम वापरले तर त्या नक्कीच परिणामकारक होतील :

अ) नियमित कंटेंट पोस्ट करा : इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे लिंक्डइनलासुद्धा नियमित कंटेंट पोस्ट करावा लागतो. तो कंटेंट उत्तम दर्जाचा व आपल्या क्षेत्राशी निगडित असणे गरजेचे आहे; तरच त्याचा परिणाम वाचकांवर जास्तीत जास्त पडतो. नियमित पोस्ट करणे म्हणजे नक्की किती दिवसांनी? हा प्रश्न आपल्याला आता पडला असेल, तर आठवड्यातून कमीत कमी दोनदा व जास्तीत जास्त तुमच्या फॉलोअर्सच्या मागणीनुसार. त्या पोस्टचे आकार लिंक्डइनसाठी योग्य होणारे असले पाहिजेत म्हणजे लोकांना ते योग्य प्रकारे दिसून लोक त्याकडे आकर्षित होतील.

ब) ग्रुप डिस्कशनमधून नवनवीन कल्पना शोधा : आपल्याला जर लिंक्डइनवर नियमित पोस्ट करायचे असेल तर नवीन कंटेंट तर लागणारच जो आपल्या क्षेत्राशी निगडित वेगवेगळे विषय मांडून आपल्या वाचकांना एक उत्तम दर्जाचे साहित्य मिळवून देईल. हा सगळा नवनवीन मजकूर आपल्याला काही डिस्कशन ग्रुप्सवर मिळेल. त्यातले आपल्या व्यवसायाशी निगडित ग्रुप्स जॉइन करून तिथल्या ग्रुप डिस्कशन्समध्ये सहभागी झाले व त्या ग्रुप्सच्या सभासदांमध्ये आपल्या पोस्ट पसरवल्या तर त्याचा नक्कीच फायदा होईल.

क) आपल्या क्षेत्राबद्दल बोला : आपल्या पोस्ट्स नेहमी वेचक-वेधक असाव्यात. आपल्या वाचकांची गरज जाणून घेऊन त्यानुसार आपल्या पोस्टिंगमध्ये बदल घडवून आणता येतो. आपल्या पोस्ट फक्त विक्रीच्या असायला नकोत. तसेच त्या फक्त आपल्या कंपनीबद्दल बोलणार्‍यासुद्धा नसाव्यात.

प्रत्येक पोस्ट करताना आपल्या ग्राहकांना त्याचा काय फायदा होईल याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांना काही त्यांच्या उपयोगाचे वाटले तरच आपल्या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळतो. नाही तर कालांतराने लोक आपल्या पोस्टकडे दुर्लक्ष करू लागतात.

उदा. आपण एखादी डिजिटल मार्केटिंग कंपनी असाल, तर त्या विषयाला अनुसरून टिप्स शेअर करा ज्यातून आपले कौशल्य ग्राहकांपर्यंत पोहोचेल. आपल्या ग्राहकांमध्ये विश्वसनीयता निर्माण करण्यासाठी हे एक चांगले माध्यम आहे. एकदा का लोकांना आपल्या पोस्ट्सची किंवा आपल्या कंटेंटची सवय लागली की आपण विक्रीची पोस्ट केल्यावरही लोक ती कुतूहलाने वाचतील.

ड) वाचकांना स्टोरी-टेलिंगच्या माध्यमातून गुंतवा : गोष्टी कोणाला आवडत नाहीत? सर्वांनाच गोष्टी ऐकायला आवडतात. आपल्या ग्राहकांना आपल्या ब्रँडशी भावनिकरीत्या जोडण्यासाठी स्टोरी-टेलिंग ही एक प्रभावशाली पद्धत आहे. जास्त करून तो उत्साहवर्धक व प्रोत्साहक मजकूर असावा.

लिंक्डइनच्या माध्यमातून आपण आपल्या टार्गेट ग्राहकांना किवा वाचकांना स्टोरी-टेलिंगच्या माध्यमातून आपल्या ब्रँडमध्ये सहभागी करून किवा गुंतवून घेऊ शकता. अशा ज्या पोस्ट्स असतात त्यांचे शेअर्स, लाईक्स व कमेंट्स इतर पोस्ट्सपेक्षा जास्त असतात. म्हणजेच लोक अशा प्रकारच्या पोस्ट्समध्ये जास्त रस दाखवतात.

इ) लिंक्डइनचे ट्रॅफिक आपल्या वेबसाइटवर न्या : लिंक्डइन एक असा सोशल मीडिया आहे जिथे एंगेज्मेंट सतत वाढवणे महत्त्वाचे असते; परंतु नुसतेच लिंक्डइनवर फॉलोअर्स वाढून आपल्या उद्योगाला त्याचा फायदा होणार नाही, तर या संधीचा फायदा घेऊन आपण जास्तीत जास्त लोक आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर न्यायला हवेत.

प्रत्येक पोस्ट जी आपण लिंक्डइनवर करतो त्या पोस्टसोबत आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगची लिंक असणे गरजेचे असते आणि तरच ते फायदेशीर ठरते. सोशल मीडियाच्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत: कंटेंट, एंगेज्मेंट आणि त्यातून विक्री.

जर आपण ती लिंक दिली, तर ग्राहक किंवा वाचक अधिक माहितीसाठी त्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर येऊन आपल्या उत्पादन किंवा सेवेबद्दल अजून माहिती वाचून आपल्याशी संपर्क साधतील. म्हणजेच आपले अंतिमतः जो लिंक्डइन मार्केटिंगसाठी वापरण्याचा उद्देश आहे तो साध्य होईल.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

    View all posts

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?