नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘सोल प्रोप्रायटरशीप’ हीच उत्तम पद्धत

तुम्हाला व्यवसायाची सुरुवात करायची आहे, पण व्यवसाय सुरू कसा करतात? त्याची नोंदणी कशी, कुठे करतात असे प्रश्न पडत असतील तर सोल प्रोप्रायटरशीप म्हणजे एकल मालकी पद्धतीने व्यवसाय सुरू करायला हरकत नाही.

व्यवसाय सुरू करण्याची ही सर्वात प्रचलित व सोपी पद्धत आहे. या नोंदणी प्रकारात व्यवसाय सुरू करणे तसेच बंद करणे हे दोन्ही सोपं आहे.

व्यवसायाची सुरुवात करताना या पद्धतीने करा, पण यातून व्यवसाय करणे म्हणजे काय हे शिकल्यानंतर वन पर्सन कंपनी आणि सोबत कोणी भागीदार असतील तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये व्यवसाय परावर्तित करा.

कंपनी स्थापन करून उद्योग वाढवण्यासाठी लागणारा उद्योजकीय अनुभव हा सोल प्रोप्रायटरशीपमधून घेता येऊ शकतो. तसेच भागीदारी स्वरूपाचा उद्योग सुरू करण्यासाठीही हीच बाब लागू पडते.

व्यवसायाची सुरुवात सोल प्रोप्रायटरशीपने का करावी तर कागदपत्रांचे जंजाळ, नोंदणीची किचकट प्रक्रिया, विविध करांची नोंदणी व त्यामधील गुंतागुत यामुळे नव्याने व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असलेल्यांची उमेद कमी होऊ शकते.

भागीदारीमध्ये मुख्यत्वे: करून माणसांची पारख करण्याची क्षमता अंगात रूजवावी लागते. या सर्व दृष्टीने स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असल्यास सुरुवातील हा सर्वात योग्य पर्याय ठरू शकतो.

एकल मालकी तत्त्वावरील उद्योगात गुंतवणूक स्वत: मालकालाच करावी लागते. त्यामुळे भविष्यात ज्यांना उद्योजकीय जीवनाची सुरुवात करायची आहे, त्यांनी आधीपासूनच तसे आर्थिक नियोजन करणे सोयीचे ठरते.

सोल प्रोप्रायटरशीपमध्ये मालक हा स्वत:च सर्व व्यवस्थापकीय गोष्टींना जबाबदार असतो. कायद्याच्या दृष्टीने मालक व त्याचा व्यवसाय या दोन्हींचे अस्तित्व एकच असते. त्यामुळे त्यातून होणारा नफा अथवा तोटा याला तो एकटाच जबाबदार असतो.

मालक स्वत:च सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकारी असल्यामुळे अशा प्रकारच्या उद्योगात निर्णयप्रक्रिया ही जलद असते. मात्र मालकाच्या निर्णयक्षमतेच्या मर्यादा कंपनीच्या मर्यादा ठरतात. त्याचे बरे-वाईट परिणाम कंपनीवर प्रत्यक्षरीत्या होतात. यातून सुलभ मार्ग म्हणजे उद्योजक हा अभ्यासू असावा तसेच त्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

एकल मालकी तत्त्वावरील उद्योगाचे फायदे

 • व्यवसायाची सुरुवात करण्यास सोपा
 • व्यावसायिक गोपनीयता जपण्याच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षीत.
 • कामाच्या वेळा, कामाची पद्धत ठरवणे तसेच त्यात आवश्यकतेनुसार बदल करणे सोपे.’ग्राहक, वितरक, पुरवठादार यांच्याशी प्रत्यक्ष संबंध ठेवणे शक्य.
 • या प्रकारामध्ये कायद्याच्या दृष्टीने मालक आणि त्याचा व्यवसाय हे एकच असल्यामुळे केवळ आयकर भरणेच अनिवार्य असून उद्योग क्षेत्राशी संबंधित असलेला कॉर्पोरेट टॅक्स भरण्याचे बंधन नसते.
 • तुमचे आणि व्यवसायाचे अस्तित्व एकच असल्याने इनकम टॅक्समध्ये एका व्यक्तीला ज्या ज्या सवलती मिळतात त्याच तुम्हाला मिळतात.

नोंदणी व अन्य बाबी

एकल मालकी तत्त्वावरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोंदणी आवश्यक नसते. तुम्ही फक्त उद्यमी रजिस्ट्रेशन करून हा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र बँकेत व्यवसायाच्या नावाचे चालू खाते (Current Account) काढण्यासाठी व्यवसायाचे दोन ते तीन पुरावे लागतात. यासाठी तुम्ही खालील नोंदणी किंवा परवाने काढू शकता.

गुमास्ता : महानगर पालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून तुम्हाला शॉप अँड एस्टॅब्लीशमेंट लायसन्स म्हणजेच गुमास्ता परवाना मिळतो. दहा किंवा दहाहून अधिक कामगार तुमच्याकडे काम करत असतील तर हा परवाना बंधनकारक आहे. एकदा हा परवाना काढल्यावर दर वर्षी याचे नूतनीकरण करावं लागतं.

तुम्ही एकटेच व्यवसाय करत असाल किंवा नऊपेक्षा कमी कर्मचारी संख्या असेल तर गुमास्ता परवाना बंधनकारक नाही. पण तुम्ही शॉप अँड एस्टॅब्लीशमेंट लायसन्ससाठी इन्टिमेशन देऊन त्याची पावती बँकेत व्यवसायाचा पुरावा म्हणून सादर करू शकता.

जीएसटी नोंदणी : उत्पादन क्षेत्रात ४० लाखांची उलाढाल व सेवा क्षेत्रात २० लाखांची उलाढाल असल्यास जीएसटी नोंदणी बंधनकारक आहे. तुमची उलाढाल त्याहून कमी असेल तरीही तुम्ही स्वेच्छेने नोंदणी करू शकता.

व्यवसायाची जीएसटी नोंदणी केलेली केव्हाही फायद्याची ठरते, मात्र दर महिन्याला त्याचे आवश्यक ते ते रिटर्न्स तुम्ही फाईल केले पाहिजेत. अन्यथा दंड भरावा लागू शकतो.

पॅन नंबर : सोल प्रोप्रायटरशीप व्यवसायात मालकाचा आणि व्यवसायाचा पॅन नंबर एकच असतो. त्यामुळे तुमचा पॅन नंबर काढलेला असणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणाकडून advance इनकम टॅक्स घ्यायचा असल्यास पॅनसोबत Tax Collection and Deduction Account Number (TAN) घेतलेला असणेही गरजेचं ठरत.

प्रोफेशनल टॅक्स : नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला वर्षातून एकदा प्रोफेशनल टॅक्स भरावा लागतो. कर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने तुम्ही प्रोफेशनल टॅक्स भरू शकता.

ट्रेडमार्क : सोल प्रोप्रायटरशीपमध्ये व्यवसायाच्या नावाची व व्यवसायाची नक्कल होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे व्यवसायाचे नाव ट्रेडमार्क करून ठेवणे फायद्याचे ठरू शकते.

Author

 • शैलेश राजपूत

  शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

  व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

  संपर्क : ९७७३३०१२९२

  View all posts
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?