आवडीचे काम करणे, हा समाधानी होण्याचा एकमेव मार्ग : स्टीव जॉब्स

एप्पल कंपनी आणि पिक्सार एनिमेशन स्टुडिओचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव जॉब्स यांनी १२ जून २००५ रोजी स्टॅनफॉर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केलेल्या भाषणाचे स्वैर भाषांतर.

आज तुमच्याबरोबर येथे जगातील एका सर्वोत्कृष्ट विद्यापीठातील तुमच्या पदवीदान समारंभाला मला बोलावले याचा मला अतिशय अभिमान वाटत आहे. मी महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण केलं नाही. खरं सांगायचं तर, महाविद्यालयीन पदवीशी माझा हाच एक सर्वात जवळचा संबंध आहे. आज मला तुम्हाला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी सांगायच्या आहेत.

पहिली गोष्ट आहे ठिपके जोडण्याची

मी रीड महाविद्यालयातून पहिल्या ६ महिन्यांनंनर बाहेर पडलो, पण नंतर पूर्णपणे सोडण्याआधी साधारण १८ महिने मी तसाच महाविद्यालयात पडीक होतो. मग मी का सोडून गेलो?

या गोष्टीला माझ्या जन्मआधी सुरुवात झाली. माझी जन्मदात्री आई एक तरुण,कुमारिका महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. तिने मला दत्तक देऊन टाकायचे ठरविले. तिला असे प्रकर्षाने वाटले की मला महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्यांनी दत्तक घ्यावे, त्यामुळे या सगळ्याची एका वकीलाने आणि त्याच्या पत्नीने माझ्या जन्माच्या वेळीच तयारी केली होती. फक्त जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा त्यांनी आयत्या वेळी ठरवले की त्यांना खरंतर मुलगी हवी होती.

त्यामुळे माझे आईवडील जे प्रतिक्षायादीत होते, त्यांना मध्यरात्री निरोप आला आणि विचारलं, “आमच्याकडे अनपेक्षितपणे एक मुलगा झाला आहे; तुम्हाला तो हवा आहे का?” ते म्हणाले, “नक्कीच”. माझ्या जन्मदात्रा आईला नंतर कळलं की माझी आई कधीच महाविद्यालयात गेली नव्हती आणि माझे वडील कधीच माध्यमिक शाळेत गेले नव्हते. तिने शेवटच्या दत्तक विधानांवर सही करायला नकार दिला.

थोड्या महिन्यांनी ती नरमली जेव्हा माझ्या पालकांनी वचन दिले की मी कधीतरी महाविद्यालयात जाईन आणि १७ वर्षांनंतर मी खरंच महाविद्यालयात गेलो. पण मी भोळसटासारखे असे महाविद्यालय निवडले जे जवळ जवळ स्टॅनफॉर्ड एवढेच महाग होते आणि माझ्या मध्यमवर्गीय पालकांची सगळी बचत माझ्या महाविद्यालयाच्या शिक्षणावरच खर्च होत होती. सहा महिन्यांनंतर मला त्यात काही तत्थ्य दिसेना.

आयुष्यात मला काय करायचे आहे याची मला काहीच कल्पना नव्हती आणि महाविद्यालयात जाण्याने ते मला कसे शोधून काढता येईल याचीही काही कल्पना नव्हती आणि इथे तर मी माझ्या आई-वडिलांनी आयुष्यभर जमवलेले सगळे पैसे खर्च करून टाकत होतो. म्हणून मी असं ठरवलं की ‘सगळं नीट होईल’ असा भरवसा ठेवून शिक्षणाला रामराम ठोकायचा. त्यावेळी ते सगळंच खूप भीतिदायक वाटलं होतं, पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की तो माझा सर्वात चांगला निर्णय होता.

महाविद्यालय सोडल्यावर मला नीरस वाटणारे पण सक्तीचे विषय मी टाळू शकलो आाणि आावडणाऱ्या विषयांच्या तासांना बसू लागलो. ते सगळं काही फारसं रोमहर्षक नव्हतं. मला वसतिगृहात खोली नव्हती म्हणून मी मित्रांच्या खोल्यांमध्ये फरशीवर झोपायचो, कोकच्या बाटल्या परत करून त्यावरचं पाच पाच सेंटचं डिपॉझिट गोळा करून त्यातून अन्न विकत घ्यायचो आणि दर रविवारी रात्री शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या हरे कृष्ण मंदिरात निदान एक तरी चांगलं जेवण मिळवण्यासाठी ७ मैल चालत जायचो.

मला ते सगळं आवडीचं वाटलं. माझं कुतूहल आणि अंतर्ज्ञान यांचा पाठपुरावा करून मला जे काही मिळालं ते बहुतेक सगळं पुढे अनमोल ठरलं. उदाहरणार्थ: त्यावेळी रीड कॉलेजातील लेखनशैलीचं शिक्षण बहुधा देशात सर्वोत्कृष्ट असावं. संपूर्ण आावारात प्रत्येक भित्तिचित्र, प्रत्येक ड्रॉवरवरचं प्रत्येक लेबल हे सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं असे. मी महाविद्यालय सोडून दिले असल्याने आणि नेहेमीचे विषय घेत नसल्याने, मी लेखनशैलीचा विषय घेऊन ते शिकायचे ठरवले.

मी सेरीफ आणि सान सेरीफ अक्षररचनेबद्दल शिकलो, विविध अक्षरांमधील विविध अंतराच्या रचनेबद्दल शिकलो,मी शिकलो कशी एक महान अक्षररचना महान होते. ते सुंदर आणि ऐतिहासिक होते,कलात्मकतेचा असा एक सुक्ष्म पैलू जो विज्ञान समजू शकत नाही आणि तो मला आकर्षक वाटला.

यातील कशाचाही माझ्या आयुष्यात काहीही व्यावहारीक उपयोग नव्हता. पण दहा वर्षांनी, जेव्हा आम्ही पहिल्या Macintosh संगणकाची रचना करीत होतो, तेव्हा ते सगळे मला परत आठवले आणि ते सगळे आम्ही Mac च्या रचनेत एकत्रित केले.

सुंदर अक्षररचना असलेला तो पहिला संगणक होता. जर मी महाविद्यालयात तो एक विषय घेतला नसता, तर Mac मधे कधीच विविध अक्षररचना किंवा सम-अंतराची अक्षररचना नसती. पुढे Windows ने फक्त Mac ची नक्कल केली, त्यामुळे दुसर्‍या कुठल्याही संगणकात ती असण्याची शक्यता नाही.

जर मी महाविद्यालयातून बाहेर पडलो नसतो, तर मी कधीच सुलेखनाच्या तासिकेमध्ये गेलो नसतो आणि संगणकात बहुतेक कधीच सुंदर अक्षररचना आली नसती, जी आता आहे. खरंतर मी जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हा भविष्यकाळात पाहून हे ठिपके जोडणे शक्य नव्हते. पण दहा वर्षांनी मागे वळून पाहताना, हे सर्व फारच स्वच्छ दिसत होते.

परत मुद्दा असा की, तुम्ही ठिपके पुढे भविष्यकाळात पाहून जोडू शकत नाही,तुम्ही फक्त ते मागे वळून पाहताना जोडू शकता. म्हणून तुम्ही फक्त खात्री बाळगली पाहिजे की भविष्यकाळात हे ठिपके एका प्रकारे जोडले जातील. तुम्ही काही गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजेत-तुमची अंतर्भावना, नशीब, जीवन, कर्म, जे काही या दृष्टिकोनाने माझी कधीच निराशा केली नाहियेआणि यानेच माझ्या जीवनात आमुलाग्र बदल केला आहे.

प्रेम आणि नुकसान

मी नशीबवान होतो – मला ज्याची आवड होती ते मला आयुष्यात लवकर सापडले. मी जेव्हा २० वर्षांचा होतो, तेव्हा वॉझ आणि मी माझ्या आईवडिलांच्या गॅरेजमध्ये एप्पल चालू केली. आम्ही खूप मेहेनत केली, आणि १० वर्षांत आमच्या दोघांच्या गॅरेजमधील कामापासून एप्पल एक २ अब्ज डॉलर्सची ४००० पेक्षा जास्त लोकांची कंपनी झाली.

आम्ही आमचं सर्वोत्कृष्ट निर्माण – Macintosh – एका वर्षापूर्वी सुरू केलं होतं आणि मी तेव्हाच ३० वर्षांचा झालो होतो. त्यानंतर मला काढून टाकलं. तुम्ही सुरू केलेल्या कंपनीमधून तुम्हाला कसं काढून टाकता येईल? खरंतर, जशी एप्पल वाढली तशी आम्ही अशा एकाला कामावर घेतलं जो, मला वाटलं, माझ्या बरोबर कंपनी चालवण्यासाठी खूप हुशार होता आणि साधारण पहिल्या वर्षासाठी सर्व गोष्टी ठीक झाल्या.

पण मग आमची भविष्याबाबतची दृष्टी वेगळी होऊ लागली आणि शेवटी आमच्यात वितुष्ट आलं आणि असं जेव्हा झालं, तेव्हा आमच्या संचालक मंडळाने त्याची बाजू घेलती. अश्याप्रकारे ३०व्या वर्षी मी कंपनीच्या बाहेर होतो आणि खूपच सार्वजनिकरित्या बाहेर होतो. माझ्या संपूर्ण प्रौढ जीवनाचे जे लक्ष्य होते ते गेले होते आणि हे सर्व विनाशक होते.

काय करावे हे पुढचे काही महिने मला खरंच माहीत नव्हते. मला असं वाटलं की मी आधीच्या पिढीच्या उद्योजकांना निराश केले होते – कारण मी माझ्याकडे सुपूर्त केलेली छडी टाकली होती. मी डेव्हिड पॅकार्ड आणि बॉब नॉईसना भेटलो आणि अश्या मोठ्याप्रकारे अपयशी ठरल्याबद्दल माफी मागितली.

हे एक खूपच मोठे सार्वजनिक अपयश होतेआणि मी तर सिलिकॉन व्हॅलीमधून पळून जाण्याचाही विचार केला. पण काही गोष्टी हळुहळू मला लक्षात येऊ लागल्या – मला अजुनही मी जे काम केले त्याबद्दल आत्मियता होती. एप्पलमध्ये झालेल्या घटनांनी ती एक गोष्ट बदलली नव्हती. मला धुडकावून लावलं होतं,पण मला अजूनही त्याबद्दल आत्मियता होती आणि म्हणून मी परत सुरुवात करायची ठरवली.

मला त्यावेळी ते दिसलं नाही, पण असं होतं की एप्पलमधून काढलं जाणं ही माझ्या जीवनात घडलेली एक सर्वात चांगली गोष्ट होती. नवखेपणातील हलकेपणाने यशस्वी होण्याच्या वजनदारपणाची जागा घेतली होती, सर्वच बाबतीत कमी शाश्वती. त्याने मला माझ्या जीवनातील एका सर्वात कल्पक कालावधित प्रवेश करायला मुक्त केलं होतं.

पुढच्या पाच वर्षांत, मी नेक्स्ट कंपनी चालू केली, अजून एक पिक्सार नावाची कंपनी चालू केली आणि मी एका वेगळ्याच स्त्रीच्या प्रेमात पडलो. पिक्सारने जगातील पहिला संगणकीय एनिमेशन चित्रपट बनविला. टॉय स्टोरी आणि ती कंपनी आता जगातील एक सर्वात यशस्वी एनिमेशन गृह आहे.

काही उल्लेखनीय घटनांच्या कलाटणीमध्ये,एप्पलने नेक्स्ट विकत घेतली, मी एप्पलमध्ये परत आलो आणि आम्ही जे तंत्रज्ञान नेक्स्टसाठी विकसित केले होते ते आता एप्पलच्या नवनिर्मितीचा प्रमुख स्थानी आहे आणि लॉरेन आणि माझे एक सुंदर कुटुंबं आहे.

मला खात्री आहे की जर मी एप्पलमधून काढला गेलो नसतो तर या पैकी काहीही झाले नसते. ते एक भयानक चवीचे औषध होते, पण मला वाटतं ती रोग्याची गरज होती. कधी कधी जीवन तुमच्या डोक्यावर एखाद्या विटेने आघात करतं. विश्वास सोडू नका. हे नक्की की, जे मी करत होतो ते मला आवडत होतं आणि केवळ त्यामुळेच मी ते करत राहू शकलो.

तुम्हाला जे आवङतं ते नेमकं तुम्ही शोधलं पाहिजे, जसं आपण आपल्याला आवङेल असाच जोङीदार शोधतो, तसे आवङेल असेच काम शोधले पाहिजे. तुमचं काम तुमच्या आयुष्याचा एक मोठा हिस्सा असणारे आणि समाधानी होण्याचा एकमेव मार्ग आहे असं काम करायचं जे तुम्हाला महान वाटतं आणि महान काम करण्याचा एकमेव मार्ग आहे की तुम्ही जे करताय ते तुम्हाला आवडलं पाहिजे.

तुम्हाला जर ते अजून मिळालं नसेल तर शोधत राहा. शांत बसू नका. जसं मनाच्या सगळ्या बाबतीत होतं तसं, जेव्हा तुम्हाला ते मिळेल तुम्हाला ते कळेल आणि कुठल्याही सुंदर नात्याप्रमाणे, जशी वर्ष उलटतात तसं तसं ते आणखी सुंदर होत जातं.

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?