अनुवाद फक्त कथा-कादंबऱ्यांचाच असतो, असे आपल्याला वाटते, पण साहित्याच्या पलीकडेही कायदा, अर्थ, वैद्यकीय, जाहिरात, तंत्र, शेती, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, व्यापार अशा अनेक क्षेत्रांत अनुवादाची गरज भासत असते. विविध क्षेत्रांतली ही गरज ओळखूनच सुप्रिया देशपांडे यांनी वयाच्या ४८व्या वर्षी ‘होन्याकू रेमिडीज’ या ट्रान्सलेशन ब्युरोची (अनुवाद केंद्र) स्थापना केली.
स्वतःच्या व इतरांच्या अनुवाद कौशल्याचा अचूक वापर करून गेल्या बारा वर्षांत या ब्यूरोचा कारभार एवढा वाढवला की, आज त्यांची कंपनी जवळपास २ हजारहून अधिक ग्राहकांना (ज्यामध्ये परदेशी ग्राहकांचाही समावेश आहे) जगभरातील पन्नासपेक्षा जास्त भाषांमधील अनुवाद सुविधा पुरवत आहेत.
त्यासाठी जवळपास शंभरहून अधिक अनुवादकांचा ताफा जवळपास पाचशे वेगवेगळ्या लॅंग्वेज पेअर्समध्ये त्यांच्यासाठी काम करीत आहे. यामध्ये २३ भारतीय भाषा आणि अन्य परदेशी भाषांचा समावेश आहे.
खरेतर शाळा-महाविद्यालयांत शिकत असताना अनेकदा आपला अनुवादाशी संबंध येतो. मात्र त्यावेळी कळत नकळत आपल्याकडून आपलं हे भाषिक कौशल्य नजरेआड केले जाते. सुप्रिया देशपांडे यांनी मात्र आपल्या कौशल्याचे वेड कायम जागृत ठेवले, त्याचेच आकाराला आलेले फळ म्हणजे त्यांची ‘होन्याकू रेमिडीज’ ही विविध भाषांतील अनुवाद सुविधा पुरवणारी कंपनी.
या कंपनीच्या माध्यमातून सुप्रिया देशपांडे यांनी बारा वर्षांत घेतलेली झेप थक्क करणारी आहे, कारण ही झेप त्यांनी घेतलीय वयाच्या ४८व्या वर्षी. १९७८ मध्ये त्या कोकणातून मुंबईत आल्या. मुंबई महानगर पालिकेच्या के.इ.एम. रुग्णालयात लिपिक म्हणून रुजू झाल्या आणि अल्पावधीतच Assessment डिपार्टमेंटमध्ये विभाग निरीक्षक पदावरही पोचल्या.
या कार्यालयीन सेवाकालात कामाच्या निमित्ताने त्यांना प्रसंगी काही कागदपत्रांचे इंग्रजीतून मराठी-हिंदीत अनुवाद करायला लागायचे. अनुवादाचे हे कागद न्यायालयीन किंवा आर्थिक क्षेत्राशी संबंधित असायचे, पण एखादा कथा-कादंबरीतला उतारा अनुवादित करावा इतक्या सहजतेने त्या हे अनुवादाचे काम करायच्या. कायदेविषयक कागदपत्रांचे मराठीतून इंग्लिश मध्ये अनुवाद करणे हा त्यांचा आवडीचा विषय आहे.
कामाचा एक भाग म्हणून अनुवाद करत असतानाच, आपल्याला एखादी तरी परदेशी भाषा आली पाहिजे, असे सुप्रियाच्या मनाने घतले आणि त्यांनी फ्रेंच भाषा शिकायला सुरुवात केली. फ्रेंच बेसिक शिकल्यावर त्यांनी घरीच जपानी भाषेचा क्लास लावला. घरच्या घरी शिकूनच त्यांनी जपानी भाषेच्या दोन लेव्हल पूर्ण केल्या. जपान फाऊंडेशनच्या दोन परीक्षाही त्या उत्तमरीताने उत्तीर्ण झाल्या.
जपानी उत्तम अवगत झाल्यावर त्यांनी मराठी-हिंदीबरोबरच जपानी भाषेतीलही छोटे-मोठे कागदही इंग्रजीत अनुवादित करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचे अनुवादाचे हे वेड वाढत गेले आणि त्यांना बाहेरूनही अनुवादासाठी खूप विचारणा व्हायला लागली, तेव्हा अखेर २००७ साली त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि स्वतःची अनुवाद कंपनी स्थापन केली.
सुप्रिया देशपांडे यांनी आपल्या कंपनीचे ठेवलेले ‘होन्याकू रेमिडीज’ हे नावही बोलके आहे. होन्याकू या जपानी शब्दाचा अर्थ “अनुवाद”. मात्र ही अनुवादसेवा त्यांनी फक्त तांत्रिक अनुवादापुरतीच मर्यादित ठेवली नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात त्याच्याबरोबर वैद्यकीय, विधी, तांत्रिक, अभियांत्रिकी विषयावरील कागदपत्रांच्या अनुवादालाही सर्वाधिक मागणी आहे.
सुरुवातीला त्या स्वतःच हिंदी, मराठी, इंग्रजी, फ्रेंच व जपानी भाषेत अनुवाद करायच्या. मात्र अल्पावधीतच कामाचा व्याप वाढत गेला, मागणी वाढत गेली आणि सर्व भारतीय भाषांबरोबरच जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी, रशियन, युक्रेनियन, इटालीयन, इंडोनेशियन, अरेबिक, चिनी, कोरीयन, टर्कीश, पोलीश, डच, डॅनिश अशा अनेक भाषा जाणणाऱ्यांचा शोधही ग्राहकांच्या भाषांतराच्या गरजांनुसार घ्यावा लागला.
कारण विविध भाषेतील अनुवादाची कामे त्यांच्याकडे येऊ लागली. आजच्या घडीला ११ फार्मास्युटीक्ल कंपन्या, तसेच काही लॉ फर्म्स, नामांकित ‘टाटा ग्रुप’मधील पाच कंपन्या, ई-लर्निंगमधील जायंट कंपन्या हे त्यांच्या सेवा गेली काही वर्षे सातत्याने घेत आहेत.
हे सगळे करीत असताना पुरातन मोडी लिपी ही त्यांच्या नजरेतून सुटली नाही. २०१४ मध्ये त्या स्वत: मोडी लिपी शिकल्या आणि त्यातून मोडी लिपीमधून मराठी लिपीमध्ये लिप्यांतराच्या सेवेची ही त्यांच्या यादीत भर पडली. या त्यांच्या उपक्रमामध्ये गरजू असलेल्या आणि अनुवादाचे कौशल्य असलेल्या अनुवादकांना संधी देणे आणि त्यांना रोजगार पुरवण्याकडे त्यांचा कटाक्ष आहे.
जाहिरात क्षेत्रात काम करणार्या कंपन्यांना नेहमीच त्यांची नवी उत्पादने बाजारात आणताना देशभर एकाच वेळी लाँच करणे फायदेशीर होते. तेव्हा ती प्रॉडक्ट ज्या-ज्या राज्यात-देशांत वितरित होतात, तिथल्या प्रादेशिक भाषेत त्या प्रॉडक्टची माहिती बॉक्सवर देणे गरजेचे असते.
त्याचप्रमाणे विविध जाहिरात कंपन्यांची जी माहितीपत्रके असतात, तीही ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांना वेगवेगळ्या भाषांत प्रसिद्ध करावी लागतात. त्यासाठी एकच मजकूर त्यांना वेगवेगळ्या भाषेत अनुवादित करून तसेच त्याचे डिझायनींगसह मिळणे आवश्यक असतो. फक्त अनुवादाचेच नाही तर त्यासोबत डिझायनींग आणि कमर्शियल प्रिंटीगची सेवासुद्धा सुप्रिया देशपांडे यांच्या अनुवाद कंपनीमधून पुरवली जाते.
माहिती तंत्रज्ञानाने जी थक्क करणारी भरारी घेतली आहे, त्याने आपल्या दैनंदिन जीवनाचा कोणताही कोपरा सोडलेला नाही. काही मोजक्या अक्षरात भारतीय भाषांमधून एसएमएस पाठवणे हे एक आव्हानात्मक काम करताना येणारा अनुभवही सुप्रिया यांनी घेतला आहे.
अनेक प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार हे हल्ली फोन किंवा अन्य छोट्या गॅजेट्सच्या सहाय्याने संभाषण रेकॉर्ड करून उघडकीला आणले जातात. त्यासाठी आवश्यक असलेली ऑडिओ ट्रान्सक्रिप्शनची सेवा काळाची पावले ओळखून सुप्रियाने आपल्या सेवामध्ये समाविष्ट केली.
आपल्या या नव्या उद्योगाच्या यशाची सुप्रिया देशपांडे यांना खात्री होती. त्यामुळेच मुलुंडला घरातून काम करीत असताना, त्यांनी गोरेगावला जेव्हा कमी बजेटमध्ये ऑफीसेस उपलब्ध झाली त्याचा फायदा घेऊन, घरापासून लांब होते तरीही नव्या जागेत आपल्या ऑफीसचे बस्तान बसवण्याचे धाडस केले.
त्यांच्या कंपनीतर्फे मिळणाऱ्या अनुवाद सुविधेला लोकमान्यता मिळाली होतीच, पण २००९ मध्ये त्यांच्या कंपनीला ISO 9001-2008 त्यानंतर ISO 9001-2015 सर्टिफिकेटही मिळाले.
या व्यवसायामध्ये मजल दर मजल करीत त्यांनी २०१३ मध्ये मुलुंडमध्ये होन्याकू रेमिडीजची सहकंपनी ‘कायझेन लिंग्विस्टिक्स’ या बॅनरखाली स्थापन करून तेथे परदेशी भाषांचे कोचिंग, ऑडिओ ट्रान्सक्रिप्शन या सेवाही सुरू केल्या आहेत.
त्यांना या क्षणी सांगताना आनंद होतो की त्यांच्याबरोबरीने काम करणार्या त्यांच्या यजमानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ‘कायझेन लिंग्विस्टिक्स’मधून दोन वर्षांच्या कालावधीत चाळीस विद्यार्थी परदेशी भाषा शिकून अनेक ठिकाणी काम करीत आहेत.
या दोन्ही केंद्रामधून पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील ग्राहकांना त्या ट्रान्सलेशन, प्रुफ रीडींग, एडीटींग, डीटीपी, कमर्शियल प्रिंटींग, मेडीकल ट्रान्स्क्रिप्शीनच्या त्या सेवा पुरवत आहेत.
या नव्या केंद्रात परदेशी भाषांमध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग सुरू करणे हा या उपक्रमांचा एक भाग असेल. त्यासाठी काही नामांकित कंपन्यांकडून विचारणाही होऊ लागली आहे.
तसेच ठाणे येथील संस्कृती प्रतिष्ठानने चाकोरीबाहेर जाऊन एखादे काम करुन अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या त्यांच्या कार्याची नोंद घेऊन “शिवगौरव पुरस्कार २०१४”साठी त्यांची निवड केली. ही निवड १२ वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या संपादकांकडून केली गेली होती. हा पुरस्कार देऊन आतापर्यंत विविध क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींना गौरवण्यात आले आहे.
त्यांच्या होम ग्राउंड – मुलुंडमधील विरंगुळा केंद्राने त्यांच्या कामाची नोंद घेऊन १० जानेवारी २०१५ रोजी त्यांना “सुमतीबाई वाघ उद्योगिनी पुरस्कार” प्रदान केला. त्यांच्या अथक परिश्रमाने उभ्या केलेल्या व्यवसायात दरवर्षी वाढ होत असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
विविध लॉ फर्म्स, डेव्हलपर्स, अॅडव्होकेट्स यांना मराठीतून इंग्लिशमध्ये कायदेशीर दस्तऐवजांचे अनुवाद पुरवत असताना कॉर्पोरेट कंपन्याना भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद देणे आणि यातून ग्राहकांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. हे सगळे होत असताना त्यांचे पाय अजून जमिनीवर आहेत. “Miles to go before I sleep” या ध्यासाने काम अविरत चालू आहे.
संपर्क : ९८२१८४४२६५
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.