वेळेला महत्त्व असते, हे कळण्याची पण वेळ यावी लागते!

कधी एकदा सुट्टी पडते आणि मस्त धमाल करायला मिळते ही बच्चे कंपनीची स्वप्ने, पण त्याचवेळी पालकांच्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत असतात. आता शाळा संपून सुट्टी सुरू होणार मग या मुलाचं करायचं तरी काय? बाप रे, दिवसभर सांभाळायचं तरी कसं यांना?

इथे मुलांना मजा करायची असते तर तिथे ही सुट्टी पालकांची त्या वेळेची सर्वात मोठी समस्या असते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही त्यामुळे जबरदस्त गोची झालेली असते त्यांची. त्यावरचा तोडगा किंवा रामबाण उपाय म्हणजे मुलांना कशात तरी गुंतवायचं.

मग ते त्यांच्यावर चांगले संस्कार घडवण्यासाठी कॅम्प असतील किंवा उद्या ते ज्या जीवघेण्या स्पर्धेला तोंड देणार आहेत त्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी, आतापासूनच धडे गिरवण्यासाठी किंवा पालकांच्या मते त्यांच्या पाल्यात जे दोष आहेत त्याच्या निर्मूलनासाठी एखादा कॅम्प किंवा कार्यशाळा.

यातलं काहीएक जमण्यासारखे नसेल तर किंवा अगदी सुरुवातीपासूनच ठरवून टाकलेलं की सुट्टी पडली की लागलीच पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करून टाकायची. म्हणजे परीक्षेत तेवढेच ५-१० टक्के तरी अजून जास्त मिळतील.

वर्षभर अभ्यास एके अभ्यास हेच गणित असते पण निदान सुट्टीत तरी काहीतरी वेगळे पाहिजे म्हणजे त्यांना थोडे ताजेतवाणे वाटेल आणि शाळा-कॉलेज सुरू झाल्यावर अभ्यासात योग्य लक्षदेखील लागेल. पण छे आमचा या गोष्टींवर अजिबात विश्वास नसतो.

आम्हाला फक्त एकच कळते की वेळ सुसाट वेगाने चालला आहे आणि जर त्याच वेगाने आपणही वाटचाल नाही केली तर आपले काही खरे नाही. त्यामुळे वेळ अजिबात फुकट जाता कामा नये कारण वेळ खूप महत्त्वाचा आहे.

काही मुलांसाठी एक कॅम्प संपला की दुसरा कॅम्प. सतत कशात तरी गुंतलेले. त्याच्यासोबत सुट्टीतले छंद वर्ग? छंद पालकांचे पूर्ण होतात की मुलांचे हा एक मोठा प्रश्न आहे. छंद वर्ग जसे पोहणे, चित्रकला, हस्तकला, नृत्यवर्ग, कराटे वगैरे वगैरे कितीतरी गोष्टी. जेवढे पालक व्यस्त नसतील तेवढी त्यांची मुले व्यस्त.

दीड-दोन महिन्यांची सुट्टी आली कधी आणि गेली कधी तेच कळत नाही. काही वर्षांनी खरोखर अशी परिस्थिती उद्भवेल की मुलांना ती सुट्टीच नकोशी वाटेल. कारण जर सुट्टीमध्येदेखील फक्त कॅम्प एके कॅम्प किंवा अभ्यास एके अभ्यास किंवा तत्सम गोष्टीच कराव्या लागणार असतील आणि त्यात विरंगुळ्यासाठी वेळच नसेल तर हवी कुणाला ती सुट्टी?

अरे ती मुले आहेत की मशीन? मशीनदेखील काही काळासाठी बंद करावी लागते जेणेकरून ती थोडी थंड होईल आणि तिची व्यवस्थित काळजी घेतली तरच ती आणखी चांगल्याप्रकारे काम देईल. उत्पादनही वाढेल आणि मशीनचे आयुष्यदेखील.

हे आम्हाला कळत नाही अशातला भाग नाही, पण कळत असूनसुद्धा आम्ही स्वतःला आणि आपल्या मुलांना त्या मशीनपेक्षा बेकार पद्धतीने वागवतो. का तर वेळ महत्त्वाची आहे.

हा भाग वेगळा की आम्हाला दोन तासांचे काम करायला कधीकधी दोनदोन वर्षे लागतात. पण त्याला आमची परिस्थिती जबाबदार असते आम्ही नाही. उगाचच आम्ही आजच्या गोष्टी उद्यावर नाही ढकलत. काहीतरी योग्य कारण असतेच आमच्या वागण्याला.

हा भाग वेगळा की दुसर्‍यांच्या कोणत्याही चुकीला मात्र आम्ही चुकीच मानतो. तिथे कोणतेही कारण आम्हाला मान्य नसते. कारण आम्ही कसेही वागलेले चालेल पण दुसर्‍यांनी बिल्कुल नाही. आमच्या मुलांनी तर नक्कीच नाही.

त्यांनी मात्र योग्यच वागलेच पाहिजे. त्यांना वेळेत काम करायची सवय लागलीच पाहिजे. नाहीतर या जीवघेण्या स्पर्धेत त्यांच्या टिकाव नाही लागणार. बरं, जर त्यांचा टिकाव नाही लागणार तर आतापर्यंत तुमचा टिकाव कसा लागला? जादूची छडी आहे का तुमच्याकडे? नाही ना?

तरीही या जीवघेण्या स्पर्धेत कितीतरी भल्यामोठ्या अक्षम्य चुका करूनही तुम्ही टिकलात. कसे बुवा? जर तुम्ही टिकू शकलात तर जेव्हा त्या मुलांवर वेळ येईल त्यावेळी तेही शिकतील की तग धरायला. त्याचा बागुलबुवा आताच करायची खरोखर गरज आहे काय?

तुम्ही भलेही दिवसरात्र काम करण्याचा अट्टाहास कराल, परंतु रात्र झाली की थोडासा आराम हा करावाच लागतो. तुम्ही कितीही घुबडासारखा जागण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्या नकळत झोप येणारच. जर तसे नाही तर झाले तर रुग्णालय किंवा मानसतज्ज्ञाची गाठ ठरलेली. रुग्णालयात आराम करण्यापेक्षा जर सुट्टी आहेच तर ती उपभोगायला काय हरकत आहे?

तुम्हाला मुलांची काळजी आहे आणि त्यांना उत्तमोत्तम देण्याचा तुमचा प्रयत्न आहे हे सर्व काही मान्य; परंतु मुलांना काय हवे हे कधी तपासून पाहिले आहे का तुम्ही? क्वचितच किंवा निव्वळ योगायोग म्हणा पण जे तुम्हाला हवे आहे तेच त्यां मुलांनाही हवे असते कधीकधी.

बहुतेक वेळा ते मनाविरुद्ध तुमचे म्हणणे ऐकतात किंवा तुम्ही दिलेल्या एखाद्या प्रलोभनामुळे. पण त्याऐवजी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधून बघा कदाचित परिणाम काहीतरी भन्नाट निघतील.

जर का त्यांचे पक्के मत बनले की तुम्ही त्यांचा संभाव्य त्रास टाळण्यासाठी त्यांना दूर लोटता आहात, तर कदाचित ते कायमचे दुरावले जातील. त्यामुळे वेळ महत्त्वाची आहे, असे पिपेरीवादन करता करता तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या व्यक्तींनाच कायमचे मुकाल.

मान्य आहे की लहान वयात मुलांना चांगल्या सवयी लावणे गरजेचे असते. योग्य वेळेवर त्यांना शिकवणे गरजेचे असते वगैरे वगैरे अगदी मान्य. पण जे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे ते त्यांच्यासाठी महत्त्वाचे असेलच हे कशावरून? शिकवलेले वाया जात नाही पण जबरदस्ती शिकवले तर डोक्यातही जात नाही.

त्यामुळे जी वेळ तुम्ही महत्त्वाची मानताय कदाचित ती त्यांच्यासाठी महत्त्वाची नसेल. शेवटी वेळ महत्त्वाची आहे हे कळण्याचीही वेळ यावी लागते. मला खात्री आहे की तुमची ती वेळ आली आहे.

– शैलेश तांडेल
९३२२३३८६८६

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?