व्यक्तिमत्त्व विकासाचे विविध स्तर


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


माणसाचा हा जो स्थूल भाग व शरीर आहे त्यात ही बाह्य साधने असतात. ह्या स्थूल भागाला संस्कृतमधे ‘स्थूल शरीर’ अशी संज्ञा आहे. याच्या पाठीमागे इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार ही मालिका असते. ही सारी आणि प्राण मिळून जो एक घटक तयार होता त्यालाच ‘सूक्ष्म शरीर’ असे म्हणतात.

या ‘प्राण’ नामक शक्ती अत्यंत सूक्ष्म अशा मूल तत्त्वांच्या बनलेल्या असतात. ही मूल तत्त्वे इतकी सूक्ष्म असतात की शरीराला कितीही इजा झाली तरी त्यांचा नाश होऊ शकत नाही. या शरीराला कितीही धक्के बसले तरी ती नष्ट होऊ शकत नाहीत. आपण जे स्थूल शरीर पाहतो ते स्थूल द्रव्यांचे बनलेले असते आणि म्हणून ते सतत नवनवीन बनत असते, त्यात सतत परिवर्तन होत असते. परतु आन्तर इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार ही अतिसूक्ष्म द्रव्याची बनलेली असतात.

ती इतकी सूक्ष्म असतात की ती युगानुयुगे टिकू शकतात. ती इतकी सूक्ष्म असतात की कोणतीही वस्तू त्यांना रोधू शकत नाहीत. कोणत्याही अडथळ्यांतून ती मार्ग काढू शकतात. स्थूल देह अचेतन आहे, त्याचप्रमाणे सूक्ष्म देहही अचेतन आहे, कारण तो सूक्ष्म जडद्रव्यांचा बनलेला आहे. जरी या सूक्ष्म शरीराच्या एका भागाला मन, दुसर्‍याला बुद्धी आणि तिसर्‍याला अहंकार असे म्हणतात तरी आपल्याला हे चटकन दिसून येईल की यांच्यापैकी कोणीही ‘ज्ञाता’ असू शकणार नाही.

मनाच्या, बुद्धीच्या आणि अहंकाराच्या सर्व क्रिया ह्या दुसर्‍या कोणासाठी तरी असतात. मन, बुद्धी, अहंकार ही सूक्ष्म जडद्रव्यांची बनलेली असल्यामुळे ती स्वयंप्रकाश असू शकत नाहीत, त्यांचा स्वत:चा असा प्रकाश वा चेतना नसते. उदाहरणार्थ हे टेबल आपल्याला दिसते ते कोणत्याही जड वस्तूमुळे दिसू शकत नाही म्हणून या सर्वांच्या पाठीमागे कोणीतरी दर्शनशक्तीचे कारण असा खरा द्रष्टा, खरा भोक्ता असला पाहिजे. त्यालाच संस्कृतमध्ये ‘आत्मा’ म्हणतात.

शरीर प्रतिक्षणी नष्ट होत आहे; मनही सतत बदलत आहे. शरीर म्हणजे नाना घटकांचा संयोग आहे, मनही तसेच आहे; आणि म्हणून ती दोन्ही सर्व प्रकारच्या परिवर्तनांच्या पलीकडे असलेल्या अवस्थेप्रत कधीच पोहोचू शकत नाहीत. परंतु स्थूल द्रव्याच्या-शरीराच्या-या क्षणभंगुर आवरणाच्या पलीकडे मनाच्या सूक्ष्मतर आवरणाच्याही पलीकडे मनुष्याचे खरे स्वरूप असलेला, शाश्वत, नित्यमुक्त असा आत्मा आहे.

ह्या आत्म्याचीच स्वाधीनता मनाच्या व जडशरीराच्या स्तरांतून झिरपत आहे आणि जरी तिच्यावर नामरूपाचा रंग चढवलेला आहे तरी ती आपले अबाधित अस्तित्व सर्वदा प्रत्ययास आणून देत आहे. ह्या आत्म्याचेच अमरत्व, त्याचेच आनंदमय स्वरूप, त्याचीच शांती आणि त्याचेच दिव्यत्व प्रकट होत आहे, आणि अज्ञानाच्या जाड्या थरांना न जुमानता ही सारी स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहेत. हाच खरा मनुष्य होय – तो भयातीत आहे, अमर आहे, मुक्त आहे.

आता स्वाधीनता तेव्हाच संभवते की जेव्हा कोणतीही बाह्य शक्ती कोणताच प्रभाव पाडू शकत नाही किंवा बदल घडवून आणू शकत नाही. स्वाधीनता त्याच्याच बाबतीत संभवते की जो सर्व मर्यादांच्या, सर्व नियमांच्या, कार्यकारणभावाच्या सर्व बंधनांच्या पलिकडे आहे.

दुसर्‍या शब्दांत सांगावयाचे म्हणजे जे अपरिवर्तनशील आहे तेच मुक्त असू शकते आणि म्हणून तेच अमर असू शकते. हा पुरुष, हा आत्मा, मनुष्याचे हे खरे स्वरूप मुक्त, अपरिवर्तनीय, सर्व मर्यादांच्या पलीकडे आहे, आणि म्हणून त्याला जन्म-मृत्यू नाही.

प्रत्येक मानवी व्यक्तित्वाची काचेच्या एखाद्या गोलाशी तुलना करता येईल. प्रत्येकाच्या केंद्रस्थानी तीच एक शुद्ध, शुभ्र ज्योती आहे – त्याच परमात्म्याची ज्योत तेवत आहे. परंतु काचेच्या रंगात व जाडीत विविधता असल्यामुळे त्या गोलामधून बाहेर पडणारी किरणे विविध रूपे धारण करतात.

प्रत्येक मध्यवर्ती ज्योतीचे सौंदर्य आणि तिचा प्रकाश ही सारखीच आहेत; आणि वरवर जी असमानता दिसून येते ती त्या ज्योतीला व्यक्त करणार्‍या जड माध्यमाच्या अपूर्णतेमुळेच आहे. जसजशी आपली अधिकाधिक आध्यात्मिक उन्नती होत जाते तसतसे हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक होत जाते.

मनुष्याचे दिव्यत्व

‘‘हे अमृताच्या पुत्रांनो, हे दिव्यधामवासी देवांनो, या, तुम्ही सर्वजण श्रवण करा. मी त्या अनादि, महान पुराण पुरषास जाणले आहे. आदित्यासारखा त्याचा वर्ण, अज्ञान त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याला जाणल्यानेच मृत्यूच्या तावडीतून सुटू शकाल, अन्य मार्ग नाही.’’

‘अमृताचे अधिकारी’ – किती मधुर आणि किती उल्हासवर्धक नाव हे! बंधूंनो, या गोड नावाने मला तुम्हास संबोधू द्या. तुम्ही अमृताचे अधिकारी आहात! हिंदू तुम्हाला पापी म्हणण्याचे साफ नकारतो. ईश्‍वराचे पुत्र तुम्ही, तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र, पूर्ण. तुम्ही ह्या मर्त्यभूमीवरील देवता. तुम्ही पापी? अशक्य.

मानवाला पापी म्हणणेच महापाप. विशुद्ध मानवात्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे. बंधूंनो, तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वत:ला मेषतुल्य का समजता? उठा, मृगराजांनो, उठा, आणि आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरामरणरहित, मुक्त आणि नित्यानंदस्वरूप आत्मा आहात. तुम्ही जड नाही. तुम्ही देह नाही. जड तुमचा दास, तुम्ही जडाचे दास नाही.

हे जग, हे शरीर, हे मन देखील भ्रमच आहे. तुम्ही अनंत आत्मा आहात! आणि या लुकलुकणार्‍या तार्‍यांनी तुम्ही फसविले जाता! ही लज्जास्पद गोष्ट आहे. तुम्ही ईश्‍वर आहात. या लुकलुकणार्‍या तार्‍यांचे अस्तित्व तुमच्यामुळेच आहे.

मानवामधे जे काही शक्तिमान व शुभ असे दिसून येते ते त्या दिव्यत्वाचाच परिणाम आहे आणि हे दिव्यत्व बहुसंख्य लोकांत व्यक्त झालेले नसले तरी माणसामाणसामधे मूलत: भेद नाही, कारण सगळ्यांचेच स्वरूप मूलत: दिव्य आहे. जणू काही एक अनंत महासागर आपणा सर्वांच्या मागे असून तुम्ही-आम्ही सर्वचजण त्याच्या पृष्ठभागावरील लाटा आहोत.

आपल्यापैकी प्रत्येक जण – ते अनंत अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून स्व-रूपत: प्रत्येकालाच त्या सच्चिदानंदरूपी महासागरावर जन्मसिद्ध अधिकार आहे; आणि आपल्यामधे जो भेद आहे तो या दिव्यत्वाची वा ईश्वरत्वाची अभिव्यक्ती करण्याच्या आपल्या कमीअधिक क्षमतेमुळेच निर्माण झाला आहे.

आत्म्याच्या ह्या अनंत शक्तीचा प्रयोग जडावर केल्यास भौतिक अभ्युदय होतो, मनावर केल्यास बौद्धिक उन्नती साधते, आणि स्वत:वरच केल्यास नराचा नारायण बनतो. …स्वत:चा अंतरस्थ ब्रह्मभाव व्यक्त करा. मग आतबाहेर सर्वत्र सुसंवाद निर्माण होईल.

– स्वामी विवेकानंद

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?