उद्योग : एक साहसी उडी

सदर लेखन हा एक अनुभव असून उद्योग करण्याची इच्छा असलेल्या एका तरुणाला दिलेल्या मार्गदर्शनावर आधारित आहे. हे मार्गदर्शन हे त्या तरुणाची सद्य:स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वैयक्तिक घटकांचा विचार करून केलेले मार्गदर्शन आहे.

हे वैयक्तिक पातळीवर असले तरीही इतरांसाठीही बऱ्याच अंशी लागू असणारे आहे म्हणून या लेखात मांडलेले काही मुद्दे असहमतीचेही असू शकतात. त्याबद्दल वाचकांनी असे मुद्दे परिस्थितीप्राप्त समजून सोडून द्यावेत.

करीअर ही अशी गोष्ट आहे की जे ज्याचे त्यालाच घडवावे लागते. बरेच जण करीअर कौन्सिलरकडे जाऊन मार्गदर्शन घेतात, काही जण पहिल्यांदा जे समोर आले ते स्वीकारतात आणि ते करताना संधी शोधत असतात आणि संधी उपलब्ध झाली की उडी घेतात, काही जणांची मानसिकता मात्र अशी असते की, मला अमुक अमुकच करायचे आहे आणि ते मी कुठल्याही परिस्थितीत करणार म्हणजे करणारच.

याव्यतिरिक्त अनेक जण फार महत्त्वकांक्षा न ठेवता ‘ठेविले अनंते’ या हिशोबाने आयुष्य काढतात. असो. आज आपण अशा तरुणाच्या निश्चयाबद्दल बोलणार आहोत ज्याचे व्हिजन आहे आपला स्वत:चा उद्योग उभा करायचा.

हा तरुण माझ्या ओळखीचा आहे. खेड्यातून आलेला. बी.ई. मेकॅनिकल करून मला भेटायला आला. त्या वेळी त्याची प्राथमिकता नोकरी होती, कारण कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती. माझ्या सांगण्यावर एका कंपनीत रुजू झाला. दोनेक महिन्यांनी मला भेटायला आला.

त्याला त्याच्या कंपनी, नोकरीविषयी मी विचारले. त्याने कुठल्याही प्रकारची तक्रार न करता ‘चांगला आहे’ असे उत्तर दिले. (साधारणपणे मुले/लोक नोकरी करत असलेल्या कंपनी किंवा कामाबद्दल अभावानेच चांगले बोलतात, हा माझा अनुभव आहे.)

मी त्याला पुढे काय करणार हे विचारले, तेव्हा तो म्हणाला की, ‘दोन वर्षे काम शिकणार आहे आणि मग असं वाटलं की, आपण काही करू शकतो तर तेव्हाच पुढचा विचार करणार आहे.’

दिशा अगदी स्पष्ट होती. त्यानंतर एक दिवस तो अचानक उगवला आणि मला म्हणाला, “चालू असलेली नोकरी सोडली आणि आता एका छोट्या युनिटमध्ये काम सुरू केलंय.”

मी विचारलं, “का बरं? काय कारण?”

तो म्हणाला, “मला स्पेशल कामामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि या छोट्या युनिटमध्ये मला ते शिकायला मिळेल.”

असेच एखादे वर्ष निघून गेले.

एक दिवस त्याचा फोन आला. भेटायला वेळ मागत होता. दोन दिवसांनी मी एका रविवारी सकाळी बोलावले.

“नोकरी करून फक्त गरजा पूर्ण करता येतात, स्वप्ने पूर्ण करायची असतील तर उद्योगाशिवाय पर्याय नाही” असे कुठे तरी वाचलेल्या वाक्याने सुरुवात करून मला उद्योग करायचा आहे असे त्याचे मनोदय त्याने माझ्यासमोर व्यक्त केले.

गेले वर्ष-दीड वर्ष तो कुठल्या तरी ‘स्पेशल कटिंग टूल’ तयार करणाऱ्या छोट्या युनिटमध्ये काम करत होता आणि ह्या धंद्यात “लागत कमी आणि नफा खूप आहे,” असे तो मध्ये मध्ये सांगत होता.

“मला स्पेशल कटिंग टूल्स मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करायचा आहे,” असा त्याचा निश्चय त्याने मला सांगितला.

आता मला त्याच्या स्पेशल कटिंग टूल्सविषयी समजून घेणे गरजेचे होते म्हणून त्याला त्याविषयी विचारले.

तो म्हणाला, कार, ट्रक किंवा अशा प्रकारच्या मशीनचे पार्ट बनवत असताना अनेक प्रकारचे टूल्स वापरणे हे वेळखाऊ आणि खर्चीक असते. म्हणून असा एकच स्पेशल टूल डिझाइन केला जातो जो तीन-चार टूल्सचे काम एकत्र करून वेळ आणि पैसा वाचवतो.

थोडक्यात जेसीबी मशीन जसे दहा-वीस माणसांचे काम करते तसेच हा स्पेशल टूल काम करतो.

मी म्हणालो, “हे बघ, नोकरी हा एक सुरक्षित मार्ग आहे. थोडक्यात ‘दिन जाव पैसा आव.’ धंद्यात तसे नसते. उद्योग करणे म्हणजे वाघिणीचे दूध काढण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. तुझी तयारी आहे का?” मला त्याला सावध करायचे होते; कारण नंतर त्याला पश्चात्ताप वाटू नये.

तो म्हणाला, “हो, माझी तयारी आहे.”

मला त्याच्या घरची परिस्थिती माहीत होती. आहे ती नोकरी सोडून उद्योग करणार म्हटल्यावर घरातून आर्थिक मदत तर सोडाच, पण प्रचंड विरोध होणार होता. खेड्यात मुलगा नोकरीला लागला की; घरचे त्याचे दोनाचे चार करून मोकळे होतात आणि हा इथे डोक्यात नोकरी सोडून उद्योग करण्याचे खूळ डोक्यात घेऊन बसला होता.

मी त्याला निक्षून म्हणालो, “ठीक आहे. मला काही महत्त्वाचे मुद्दे तुला सांगावेसे वाटतात ते तुला सांगतो. यावर चार दिवस पूर्ण विचार करून मग मला भेट. त्यानंतर आपण उद्योग करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीची चर्चा करू.

1) उद्योग सुरू झाल्यानंतर कमीत कमी दोन वर्षे तरी घरात काही पैसे येतीलच याची खात्री नसते त्यामुळे दोन वर्षे स्वत:चा खर्च कसा भागवणार ते ठरव.

2) पहिली दोन वर्षे रजा, सणवार, मौज वगैरे विसरून जावे लागणार, मग नोकरी बरी होती असे वाटू लागते. हे ध्यानात घे.

3) मग पुन्हा नोकरी करू असे होत नाही, कारण सर्व्हिस ब्रेक तुमच्या करीअरसाठी मारक ठरते.

4) उद्योग हेदेखील एक करीअरच आहे. दक्षिण भारतीय अनेक लोक करीअर करायचे आहे म्हणून पस्तीस ते चाळीस वर्षांपर्यंत लग्न हा विषय किंवा या तोडीची कोणतीही मोठी जबाबदारी दूर ठेवतात. थोडक्यात ‘आधी लगीन कोंढाण्याचे’ अशी ध्येयपूर्तीची ओढ पाहिजे.

5) उद्योगामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पैसा. बाकी सगळी सोंगे करता येतील; पण पैशाचे सोंग करता येत नाही. म्हणून हा उद्योग सुरू करण्यापूर्वी तुला काही आर्थिक तरतूद अतिशय आवश्यक आहे असे मला वाटते. स्पेशल टूल्स बनवणे हे तर क्रिएटिव्ह काम आहे. त्यामुळे तर तुला ते करायचे आहे तर डोक्यात इतर विचार असू नयेत.

माझे मुद्दे त्याने नोंद केले आणि पुढच्या आठवड्यात येतो, असे सांगून तो गेला.

सल्लागार म्हणून मी त्याला उद्योगात उतरण्यापूर्वी पूर्वतयारी काय असावी आणि उद्योजकता म्हणजे नोकरी नव्हे याची पूर्ण कल्पना दिली होती, आता निर्णय त्याला घ्यायचा होता आणि तो जर ठाम असेल तरच उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे पुढील टप्पे मी त्याला सांगणार होतो.

पुढच्या आठवड्यात तो वेळ काढून एका रविवारी तो आला.

“मी तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार केला आहे. घरच्यांनाही माझा निर्णय सांगितला. सगळ्यांनी मला वेड्यात काढले. मी ऐकत नाही असे लक्षात आल्यावर वैतागून म्हणाले की, ‘तुला जे काय करायचे ते तू कर. आम्हाला तुझ्याकडून एका पैशाचीसुद्धा अपेक्षा नाही आणि तूपण आमच्याकडून काही अपेक्षा करू नकोस. तुझे शिक्षण केले आणि कमावण्यायोग्य बनवले. आता आमची जबाबदारी संपली.”

हा मुलगा नक्कीच पुढे जाणार हे त्याच्या डोळ्यातील चमक मला सांगत होती.

“ठीक आहे. आता आपण तुझ्या उद्योगासाठी काय काय तयारी करावी लागेल याची सविस्तर चर्चा करू.

अ) बाजारपेठ : कुठल्याही उद्योगात सुरुवात करताना प्रथम त्यासाठी बाजारपेठ कुठे कुठे आहे याचा अभ्यास करणे आवश्यक असते. याला मार्केट सर्व्हे असे म्हणतात. आपण उत्पादन करत असलेल्या वस्तू किंवा देत असलेल्या सेवेची उपयुक्तता कुठे आणि किती आहे, अशा प्रकारची गोष्ट देणारे अन्य किती जण आहेत, त्यांच्याबद्दल मार्केट रिपोर्ट कसा आहे, आपणास किती शेअर मिळू शकेल, अशा अनेक बाबींचा अभ्यास म्हणजेच मार्केट सर्व्हे.

एकदा कुठे मार्केट आहे आणि आपल्या उत्पादनला वाव आहे हे लक्षात आले की मग कस्टमर, डिलर, एजंट वगैरेची माहिती गोळा केली पाहिजे. अशा प्रकारचे सर्व्हे करून देणाऱ्या संस्थाही देशात उपलब्ध आहेत.

तुझी जमेची बाजू ही आहे की, तुला जो उद्योग सुरू करावयाचा आहे त्या उत्पादनाच्या कंपनीत तू मागील दोन वर्षे काम करत आहेस. त्यामुळे तुला ग्राहक आणि बाजारपेठ दोन्हीची माहिती आहे. तुला येथून पुढे स्वत:च्या कंपनीसाठी कोण कोण उपयोगी पडेल अशा प्रत्येकाशी संबंध दृढ करावे लागतील.

सध्याच्या तुला माहीत असलेल्या ग्राहकांशिवाय आणखी नवीन ग्राहक मिळू शकतील का? ही चाचपणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्पर्धा ही कमी होऊ शकेल. थोडक्यात आपल्या कस्टमर बेसची पूर्ण माहिती मिळाल्यावरच पुढे पाऊल टाकले पाहिजे.

ब) प्रकल्प अहवाल : पुढची पायरी म्हणजे प्रकल्प अहवाल तयार करणे. चार्टर्ड अकाऊंटंट हा रिपोर्ट तयार करून देतात. सामान्यत: यात-

  • उद्योगाला लागणारी जागा
  • विद्युतजोडणी
  • यंत्रसामूग्री आणि अ‍ॅक्सेसरीज
  • कच्चा माल
  • मनुष्यबळ (कामगार, स्टाफ वगैरे)
  • इतर…

वरील गोष्टींसाठी लागणारी गुंतवणूक, त्यातून मिळणारे उत्पन्न, खर्च, नफा वगैरेचे विवरण असते. प्रकल्प अहवाल बँक किंवा तत्सम फायनान्स कंपनीला कर्ज मिळविण्यासाठी सादर करावा लागतो.

प्रकल्प अहवाल पाहून संबंधित अधिकारी तुमच्याबरोबर चर्चा करतात आणि सगळ्या गोष्टी नियमानुसार असतील आणि अहवाल कर्ज देण्यायोग्य असेल तर कर्जाची प्रक्रिया सुरू होते.

क) गुंतवणुकीवरचा परतावा : ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही केलेली गुंतवणूक, देयक व्याज, खर्च व इतर देयक वजा करता किती दिवसांत गुंतवणुकीवर परतावा मिळतो हे पाहाणे आवश्यक असते.

तसे पाहिले तर हा प्रोजेक्ट रिपोर्टचाच एक भाग आहे; पण मुद्दाम हा वेगळा मुद्दा मांडला आहे, कारण आपण बँकेसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो त्यामध्ये काही गृहीतके असतात; पण आपली क्षमता, मार्केटमधील चढ-उतार; इत्यादी गोष्टींचा विचार करून आपण एक व्यावहारिक गणित मांडले पाहिजे. म्हणजे ऐन वेळी आलेल्या अडचणीचा सामना करण्यासाठी इतर गोष्टींचे वेळीच नियोजन करणे सोपे जाते.

वेगवेगळ्या तज्ज्ञांची या बाबतीत वेगवेगळी मते असू शकतात. Return on investment अगदी 12 महिन्यांपासून 36 महिन्यांत आला तरच उद्योग करण्याजोगा आहे असे म्हटले जाते. शेवटी प्रत्येकाने आपापले ठरवायचे असते.

हा झाला पहिला टप्पा. यात तुमच्या कल्पनेपासून ते प्रत्यक्ष असा प्रवास आहे.

यानंतर येते ते प्रत्यक्षातील फिल्ड वर्क. वस्तू तयार करण्यासाठी लागणार्‍या गोष्टी.

1) यंत्राची निवड : बाजारात मोबाइल फोन अगदी एक हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ते त्यात असलेल्या फीचर्सवर आणि ग्राहकाला किती उपयुक्तता आहे यावर अवलंबून असते. तसेच आपल्याला लागणारे मशीन कशा प्रकारचे असावे, आपल्या उत्पादनाची गरज काय आहे, त्यात काय काय फीचर्स आहेत वगैरे गोष्टींचा आढावा घेऊन मशीनची निवड केली पाहिजे.

मशीन/इक्विपमेंट अशा प्रकारे निवडावे ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. त्याच वेळी ते फार महागडे नसावे. मशीनबद्दल स्वत:ला माहिती असणे आवश्यक आहे. सल्ला म्हणून एखाद्या एक्सपर्टचा विचार घ्यायला हरकत नाही.

आजकाल इंडस्टीमध्ये मशीन भाडेतत्त्वावरही उपलब्ध असतात आणि उद्योग सुरू करताना हा एक परवडण्यासारखा पर्याय आहे.

2) कुशल मनुष्यबळ : कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री चालवण्यासाठी काही प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. तू जे स्पेशल टूलिंग करणार आहेस त्यात तर कुशल मनुष्यबळ निश्चित पाहिजे, कारण गुणवत्तेत थोडाही फरक झाला तर सगळेच मुसळ केरात आणि आर्थिक नुकसान वेगळे.

3) गुणवत्ता आणि ग्राहक संतुष्टता : या प्रवासातील हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. तुमचे उत्पादन किंवा सेवा गुणवत्तापूर्ण असेल तर ग्राहक संतुष्ट होईल आणि उद्योग वाढेल. एका ग्राहकासोबत दुसरा ग्राहक जोडला जाईल.

गुणवत्ता कशी असावी?

एक उदाहरण देतो- एका मोटरसायकलची टॅग लाइन होती, “Fill it – Shut it – Forget it” मी या ब्रँडची मोटरसायकल दहा वर्षे वापरली आणि खरोखरीच मला तो प्रत्यय आला.

अशा प्रकारचा विश्वास जर तुझे उत्पादन देऊ शकेल तर तू जिंकलास.

4) विक्री आणि वसुली : आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या गोष्टीसाठी एवढे श्रम केले त्याची विक्री झाली नाही तर त्याला काय अर्थ?

उद्योग आहे म्हणजे विक्री आलीच. (तसेही नोकरी करणारेही एका अर्थाने उद्योगच करत असतात.) ‘They Sale their Services’  मालाची वेळेवर डिलिव्हरी किंवा उपलब्धता झाली की विक्री चांगली होते. उदा. मुंबईच्या मार्केटमध्ये फुले दुपारी 12 वाजता पोहोचली तर ती कोण विकत घेणार?

ती भल्या सकाळी पोहोचली तर विकली जातील. गुणवत्तबरोबरच वेळेवर उपलब्धता ही विक्री चांगली होण्यास मदत करते. वेळेवर डिलिव्हरी हे विक्री चांगली होण्यास मदत करते.

वसुली अर्थात Payment from customer तुमच्या परचेस ऑर्डरमध्ये पेमेंट टर्म जरी 30 दिवस असे असले तरीही ते तेवढ्या दिवसांत मिळेल याची खात्री नाही आणि ही वस्तुस्थिती आहे. उद्योग हा ग्राहकापेक्षाही मार्केटड्रिव्हन (म्हणजे मार्केटमध्ये असलेल्या अनिश्चिततेमुळे) असल्यानेही पेमेंटचा प्रश्‍न असू शकतो.

यातदेखील पेमेंट वेळेवर किंवा वस्तू दिल्यादिल्याही मिळू शकते. त्यासाठी तुमचे नाणे खणखणीत असावे लागते. माझ्या माहितीत काही लोक आहेत जे पूर्ण अ‍ॅडव्हान्स घेतल्याशिवाय काम करत नाहीत. तरीही ग्राहक त्यांच्याकडे रांगा लावून उभे असतात. ‘Quality Speaks’

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ‘पैशाचे सोंग आणता येत नाही’ म्हणून वसुली नाही तर उद्योग नाही.”

एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे मन लावून त्याने सर्व गोष्टी  टिपून घेतल्या.

‘सर आता एक एक गोष्टीवर काम सुरू करतो, काही अडचण वाटली तर येतो भेटायला.”

 त्याने माझा निरोप घेतला.

– एस. पी. नागठाणे
7028963255
spnagthane@gmail.com
(लेखक अनुभवी उद्योजक असून सध्या काही कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम पाहतात.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?