आपली कौशल्ये विकसित करा

महेश जाधव (नाव बदललेले) एका प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रेता म्हणून काम करतो. त्याचे मासिक वेतन केवळ सहा हजार रुपये आहे. राज शर्मा (नाव बदललेले) एका कंपनीसाठी घरोघरी जाऊन वस्तुविक्रीचे काम करतात. मासिक वेतन पाच हजार रुपये.

मालिनी (नाव बदललेले) मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. वेतन आठ हजार. ही नामावली न संपणारी आहे. ही परिस्थिती ही मंडळी अशिक्षित असल्यामुळे त्यांच्यावर आलेली नाही, तर विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचे पदवीधर असूनही त्यांच्याकडे आवश्यक कौशल्य नाही जे व्यवसायातच नव्हे तर आयुष्यात प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडते.

हे कौशल्य नसल्यामुळे त्यांना सामाजिक वर्तुळात काहीही स्थान नाही. या मंडळींमध्ये अभाव असलेल्या गुणांना ‘रोजगार कौशल्य’ असे म्हणतात. या कौशल्यात संपूर्ण व्यवहारज्ञान, देहबोली, सादरीकरण क्षमता, संभाषण कौशल्य आदी गोष्टींचा अंतर्भाव होतो. या रोजगार कौशल्याचे प्रत्येक अंग तितकेच महत्त्वाचे आहे. यातील प्रत्येक गोष्ट एखाद्याचे व्यावसायिक भविष्य घडवू शकते किंवा बिघडवूही शकते.

अनेक अहवाल आणि सर्वेक्षणे दर आठवड्याला प्रसिद्ध होत असतात. ज्यात स्पष्ट म्हटलेले असते की, महाविद्यालयांमधून दरवर्षाला हजारोंच्या संख्येने पदवीधर बाहेर पडत आहेत; परंतु त्यातील केवळ 20 टक्केच लोक यशस्वीरीत्या त्यांच्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात करू शकतात. उर्वरित 80 टक्के लोकांमध्ये योग्य संधी हुडकण्याचे कौशल्य नसते किंवा मिळालेल्या संधीचे सोने करण्याची क्षमता नसते.

कामाच्या ठिकाणीही बढती मिळविण्यात तोच अग्रेसर असतो ज्याच्याकडे रोजगार कौशल्य असते. सामाजिक एकत्रीकरण याबाबतच्या भागाकडे आपण अद्यापही पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. या कौशल्याच्या काही नियमांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि तोंडघशी पडतो.

आपण स्वत:ला आदर्श म्हणून समाजापुढे प्रस्थापित करीत नाही. उलट बर्‍याचदा तर आपल्याला हेही माहीत असते की, ज्याकडे आपल्याला आदर्श म्हणून पाहतो ती व्यक्ती कदाचित चुकीच्या मार्गाने वर आलेली आहे. उच्चशिक्षण घेऊनदेखील मनासारखे उत्पन्न न मिळू शकल्याने युवा पिढीत गुन्हेगारीकडे वळत आहे. अर्थातच पैसे मिळविण्यासाठी आवश्यक असलेले रोजगार कौशल्य नसल्याचे गंभीर परिणाम होतात.

या कौशल्याच्या अभावामुळे एखाद्याची वाढ खुंटते आणि त्यातून येणार्‍या नैराश्यांमुळे माणूस चुकीच्या मार्गाकडे ओढला जातो. त्यामुळे अशा मानसिकदृष्ट्या दुर्बलांसाठी शिकवण्या सुरू करणे हा गुन्हेगारी घटविण्याचा एक चांगला पर्याय आहे.

इथे एक कठीण प्रश्‍न विचारता येऊ शकेल. हे रोजगार कौशल्य आत्मसात करण्यास मी सिद्ध आहे का? तसा माझा कल आहे का? मी निवडलेल्या व्यवसाय क्षेत्रात या कौशल्याची पहिल्या दिवसापासून आवश्यकता आहे का? नेमके कोणते कौशल्य मिळवणे आवश्यक आहे? आणि ते मी किती दिवसांत मिळवणार आहे? उपलब्ध संधींसाठी माझ्याजवळचे कौशल्य पुरेसे आहे का? नसेल तर मी आणखी संधी कशा शोधणार आहे.

संशोधन असे सांगते की, आपल्या क्षेत्रात दोन पावले पुढे गेलेल्या मंडळींनाही व्यावसायिक निर्णय अडचणी येतात. मग ते त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे साहाय्य घेऊन सध्याच्या नोकर्‍यांचे कल आणि त्यांच्या व्यावसायिक क्षेत्राचे भवितव्य यांचा मेळ घालून पाहात असतात.

ते अधिक वेतनाच्या नोकर्‍यांच्या किंवा बढत्यांच्या प्रयत्नात असतात; परंतु मोठ्या वेतनासाठी आवश्यक कौशल्ये आणि त्यांच्याजवळील कौशल्ये त्यांच्यातील भेद ते लक्षात घेत नाहीत. ते केवळ नामांकित कंपनीत काम करण्याची स्वप्ने पाहतात; परंतु तेथे काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि मूलभूत पात्रतेचे निकष विचारातच घेत नाहीत.

हे सर्वांनाच माहीत आहे की, भारतात दोन वर्षांपूर्वीपर्यंत विद्यार्थ्यांना असे ‘अ‍ॅप्टीट्यूट चाचणी’ ही शैक्षणिक क्षेत्राचा महत्त्वाचा भाग आहे असे वाटत नव्हते. आता शैक्षणिक क्षेत्रात खाजगी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे आगमन झाल्यामुळे इयत्ता दहावीत असतानाच ‘अ‍ॅप्टीट्यूड चाचणी’ करण्याकडे कल वाढत आहे. या क्षेत्रातील मार्गदर्शकही आता ‘अ‍ॅप्टीट्यूड चाचणी’बद्दल जागृती करीत आहेत.

‘अ‍ॅप्टीट्यूड चाचणी’मुळे वाटेल त्या मार्गांवरून भरकटण्यापेक्षा व्यावसायिक क्षेत्राच्या निवडीला योग्य दिशा मिळत असल्याचे ते पटवून देत आहेत. एमबीएच्या विद्यार्थ्यांना त्यांचे विशेष प्रावीण्याचे विषय निवडण्यासाठी साहाय्य करणारे मार्गदर्शक सांगतात की, एमबीए करणार्‍या यापैकी सुमारे ९० टक्के मुलांनी यापूर्वी ‘अ‍ॅप्टीट्यूड चाचणी’ केलेली नाही. त्यामुळे ते गोंधळलेले आहेत.

‘अ‍ॅप्टीट्यूड चाचणी’ केल्यानंतर हे मार्गदर्शक त्यांना त्यांच्या चांगल्या आणि कमकुवत अंगांची जाणीव करून देतात. तसेच त्यांना रोजगार कौशल्य वाढविण्यासही सांगण्यात येते. या प्रक्रियेमुळे एमबीए झालो म्हणजे झाले जिंकले सगळे हा त्यांचा चुकीचा समज घालविण्यासही साहाय्य होते.

अभ्यासातून निष्पन्न झाले आहे की, पदव्युत्तर शिक्षण घेणारे केवळ १० टक्केच विद्यार्थी त्यांना हव्या त्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:ला ‘असे का’ हा प्रश्‍न विचारण्याची आवश्यकता आहे.

स्वत:च्या गुणावगुणांबद्दल आणि क्षमतेबद्दल संपूर्ण माहिती घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याकडे सध्याच्या पिढीचा कल वाढतो आहे, हे चांगलेच आहे. त्यांना व्यावसायिक क्षेत्रात प्रयोग करण्याची भीती वाटत नाही, कारण रोजगार क्षमता हा आता शिक्षणाचाच भाग होत आहे. त्यांना माहीत आहे की, त्यांच्याकडे असलेल्या या कौशल्यामुळे ते कधीही उपाशी राहणार नाहीत!!

जस्मीत कौर
(लेखिका क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून, त्या प्रसिद्ध करिअर समुपदेशकदेखील आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?