कॅमेरॉन हेराल्ड हे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आहेत. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी पहिली कंपनी स्थापन केली. २०१० साली ‘टेड टॉक’ या जगप्रसिद्ध परिसंवादात ‘बालवयातीय उद्योजकीय संस्कारांची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान दिले होते. हे व्याख्यान किशोरवयीन विद्यार्थी आणि त्यांचे पालक या दोन्हींच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. म्हणून त्या भाषणाचा हा स्वैर अनुवाद.
माझे शालेय शिक्षण होऊ शकले नाही, पण मला आठवते की, अगदी लहान असतानाही मला पैसा आवडत असे आणि व्यवसायसुद्धा!
मला उद्योजकतेची गोडी होती. मी याबद्दल माझ्या पत्नीशीच प्रथम बोललो आणि तिला हेसुद्धा सांगितले की, ज्यांच्यात उद्योजकतेचे सुप्त गुण आहेत अशा बालकांना हेरण्याची संधी आपण गमावली असे मला वाटते. उद्योजक होणे ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्या समाजात अजूनही तसे मानले जात नाही.
आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला हे सतत सांगण्यात यायचे की, मन लावून अभ्यास करा. माझ्यासाठी वडिलांनी फ्रेंच भाषेचा शिक्षक नेमला होता, पण अजूनही मला चांगले फ्रेंच येत नाही. दोन वर्षांपूर्वी मी एमआयटीमध्ये जगभरातून आलेल्या उद्योजकांसमोर व्याख्यान दिले.
लहानपणी मी शहर स्तरावरची वक्तृत्व स्पर्धा जिंकली होती. तेव्हा हा मुलगा चांगले भाषण करतो. म्हणून याला चांगला वक्ता बनविण्यासाठी प्रशिक्षक नेमला पाहिजे, असे कुणीच म्हणाले नव्हते. मला जे येत नाही त्यासाठी शिक्षक नेमला जावा, असेच सगळ्यांचे मत होते.
वास्तविक पाहता, आपल्या मुलांना वकील बनवण्याऐवजी उद्योजक बनविण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. मात्र आपली शिक्षणव्यवस्था डॉक्टर आणि वकील पैदा करण्यावर भर देत आहे व उद्योजक बनविण्याकडे कोणाचाच कल नाही.
जर उमलत्या वयातच मुलांनी उद्योजक बनण्याची स्वप्ने पाहिली, तर आज आपल्यासमोर जग बदलण्याची समस्या उभी ठाकली आहे ती नसतीच मुळी, कारण त्या वयात एखादी गोष्ट होणे शक्य नाही, हे आपल्याला मुळीच कळत नसते. हे जमणार नाही, असेही वाटत नसते.
नोकरीसाठी सरकारच्या अपेक्षेवर राहण्यापेक्षा स्वत: रोजगार निर्माण करा!
आपल्या मुलांना पानात शिजवलेला मासा वाढण्यापेक्षा मुलांना मासेमारी करण्यास शिकविले पाहिजे हे त्यांचे पालक म्हणून आपले खरे कर्तव्य आहे. ‘एखाद्या माणसाला खायला मासा देऊन त्याचे फक्त एक दिवस तुम्ही पोट भरू शकता, पण त्याला मासेमारी शिकवली तर तो आयुष्यभर आपले पोट भरू शकतो’, अशी जुनी म्हण आहे.
मुलांना उद्योजकतेची शिकवण दिली तर ती हाताला काम मिळावे म्हणून सरकारकडे आशेने पाहण्याऐवजी स्वतःच रोजगार निर्माण करतील. मात्र आपण आपल्या अपत्यांना काय करू नये हेच दिवसभर शिकवत बसतो. शाळेत मुलांना डॉक्टर, वकील, कारकून, शिक्षक, पायलट बनण्यासाठी प्रेरित करतात.
प्रसारमाध्यमे त्यांना मॉडेल, गायक अथवा खेळाडू बनण्यास सांगतात. एवढेच नव्हे तर आपला एमबीएचा अभ्यासक्रम मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये त्यांना नोकरी करण्यास सांगतो, मात्र उद्योजक बनवीत नाही. त्यामुळेच मला ६१ टक्के गुण मिळूनही मी एमबीए करणे नाकारले.
या कंपन्या कोण स्थापन करतात? काही मोजके लोकच ना! मी वाचलेल्या साहित्यात ‘अॅटलस श्रग्ड’ हेच एकमेव पुस्तक मला असे दिसले की, ते उद्योजकाला नायक बनविते. माझे दोन्ही आजोबा, माझे वडील, माझे दोन भाऊ, एवढेच नव्हे तर माझी बहीणसुद्धा उद्योजक होते आणि कंपन्यांचे मालक होते.
आम्ही त्या सुरू करण्याचे ठरविले, कारण आम्ही केवळ त्यासाठीच लायक होतो. कुणाच्या हाताखाली काम करणे आम्हाला शक्यच वाटत नव्हते. आमची मुलेही हाच मार्ग चोखाळतील.
‘आंत्रेपिनर्स असोसिएशन’ आणि ‘यंग प्रेसिडेन्ट्स ऑर्गनायझेशन’ या दोन संघटनांत माझा सहभाग आहे. आम्हा यंग प्रेसिडेन्ट्समध्ये अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर आणि बायपोलर डिसऑर्डरची १९ पैकी १८ लक्षणे दिसून येतात ही गोष्ट उघडकीस आली. बायपोलर डिसऑर्डर हे सीईओ डिसीजचेच दुसरे नाव आहे हे आपणास माहीत आहे का? हा आजार ट्रेड टर्नरला होता. हा आजार स्टीव्ह जॉब्सला होता.
‘नेटस्केप’चे संस्थापक असलेल्या तिघांनाही हा आजार होता. याची लक्षणे लहान मुलांमध्येही आपल्याला दिसू शकतात; पण आपण त्यांना प्रतिरोध करतोय आणि सांगतोय, “नका बनू उद्योजक. अन्य पद्धतीत सामावून जा. विद्यार्थी बना.” माफ करा, पण उद्योजक विद्यार्थी नसतात.
ते काळाच्या पुढे असतात. ते खेळ मांडतात. ते परीक्षेत कॉपी करतात. आपला गृहपाठ दुसर्यांकडून करून घेतात. जर आपल्याला उद्योजक व्हायचे असेल तर अकाऊंटिंग करत बसण्याची गरज नसते. आपण अकाऊंटंट कामावर ठेवू शकतो. ही गोष्ट मला अगोदरच कळली होती.
उद्योजकाची व्याख्या काय?
जो संघटन करतो, जो संचालन करतो आणि व्यवसायातील जोखीम उचलतो तो उद्योजक. मग यासाठी शालेय शिक्षण घेतलेच पाहिजे अथवा एमबीएचा अभ्यासक्रम केलाच पाहिजे असा याचा अर्थ नसतो. या गोष्टी स्वभावातच असायला पाहिजेत, की त्यांची सवय लावून घेता येते? मी समजतो की, दोन्ही मार्गांनी हे होऊ शकते. उद्योजक म्हणूनच माझे पालनपोषण केले गेले.
शाळेत जे काही शिकवण्यात येत आहे ते मी फारसे ग्रहण करू शकत नाही, हे माझ्या वडिलांच्या लक्षात आले आणि मला उद्योजकता शिकवता येईल हेही त्यांना लवकरच उमगले. त्यामुळे नोकरीसाठी तोंड वेंगाडण्याची नावड तसेच अन्य लोकांना रोजगार देण्यासाठी कंपन्यांची उभारणी करण्याची आवड त्यांनी आम्हा तिघा अपत्यांच्या मनात निर्माण केली.
जेव्हा मी सात वर्षांचा होतो तेव्हा कोटांचे हँगर विकण्याची कल्पना मी आईजवळ बोलून दाखविली. तिने हँगर आणणार कुठून, असे विचारल्यावर मी तिला तळघरातील कपाटात मी जमवून ठेवलेले हजार हँगर्स दाखविले, कारण जेव्हा ती मला बाहेर मुलांसोबत खेळायला पाठवीत असे तेव्हा मी शेजारपाजारच्या घराघरांत जाऊन ते हँगर्स विकण्यासाठी मागून आणत असे.
आपल्याला एका कोट हँगरचे दोन सेंट मिळू शकतात हे मला दिसले होते. तसेच आपण लोकांसोबत घासाघीस करू शकतो हेही मला उमगले होते. एका व्यक्तीने मला तीन सेंट देऊ केले होते आणि मी त्याला साडेतीन सेंटपर्यंत खेचले होते. मला अर्धा सेंटसुद्धा मिळू शकतो हे मला त्याही वयात उमगत होते.
मी घरोघरी जाऊन लायसेन्स प्लेटची संरक्षक आवरणे विकली. घाऊक बाजारातून ते विकत घेण्यासाठी मला वडिलांनी एक दुकानदार शोधून दिला होता. तेव्हा मी नऊ वर्षांचा होतो. एका माणसाकडे दोन कार होत्या. मी त्याला प्रत्येक कारसाठी दोन अशी चार संरक्षक आवरणे विकू शकत होतो, पण तो घेण्यास तयार नव्हता. त्यातील एका गाडीची एक नंबर प्लेट फारच खराब झाली होती.
ती त्याच्या बायकोची कार होती. तेव्हा मी म्हणालो की, आपण येथे एक संरक्षक आवरण लावून पाहू या का? आणि त्यासाठी मी त्याला तयार केले, कारण चार विकता येणार नाहीत तर एक तरी संरक्षक आवरण विकून पाहू या, असा विचार त्या वयातही माझ्या मनात आला होता.
नंतरच्या काळात मी कॉमिक्स पुस्तकांचीही विक्री केली. यासाठी मी समुद्रकिनार्याच्या एका टोकाला असलेल्या गरीब वस्तीतील मुलांची पुस्तके विकत घेत असे आणि दुसर्या टोकाला श्रीमंत वस्तीत राहणार्या मुलांना विकत असे. कमी पैशात खरेदी आणि जास्त किमतीला विक्री असे करून मला नफा मिळत असे. गरीब मुलांकडे पैसे नसल्यामुळे ते माझे ग्राहक बनणे शक्य नव्हते आणि श्रीमंत मुलेच मला पैसे देऊ शकतात हे मी जाणून होतो.
मंदीच्या काळातही अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये १३ ट्रिलियन डॉलर्स खेळत होते. त्यातूनच काही आपण पदरात पाडून घ्यावेत हे मी जाणून घेतले होते. मात्र आपल्याला माल कोठून मिळतो हे कधीच सांगू नका. मी पुस्तके कोठून आणतो हे एका श्रीमंत मुलाला कळल्यावर मी त्याच्याकडून जास्त पैसे उकळले म्हणून त्याने मला चांगलाच मार दिला होता.
मी पेपरची लाइन टाकावी, असा मी दहा वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी आग्रह धरला होता. मला ते पसंत नव्हते, पण तो माझा नवा धंदा असेल, असे त्यांनी म्हटल्यावर मला दोन लाइन्स घ्याव्या लागल्या आणि दुसरी लाइन टाकण्यासाठी मी आणखी एक मुलगा मदतीला घेतला. मी त्याला पगार देत असे. तेव्हा मला कळले की, पैसा कसा कमावला जातो! मग मी नोकरदार बनणार नाही हे माझ्या मनावर पक्के ठसले होते.
माझ्या वडिलांच्या मालकीचे एक स्पेअर पार्ट्सचे दुकान होते. तेथे काही जुने पार्ट्स पडले होते. त्यांनी ते फेकून द्यायचे ठरवले होते. तेव्हा याचे आपल्याला पैसे मिळू शकतात हे माझ्या लक्षात आले आणि मी माझ्या सायकलीवरून फिरून आजूबाजूच्या अन्य दुकानांतूनही ते भंगार गोळा केले व ते विकून चांगले पैसे कमावले.
गमतीचा भाग म्हणजे त्यानंतर तीस वर्षांनी ‘१-८००-गॉट जंक’ आम्ही उघडले व त्यातूनही पैसा कमवला. अकराव्या वर्षी मी पिन कुशन्स तयार केले आणि मी त्यांना करड्या तपकिरी रंगाने रंगविले.
जेव्हा ते विकण्यासाठी लोकांच्या दारावर गेलो तेव्हा मी त्यांना ‘आपण एखादे पिन कुशन घेता का?’ असे न विचारता ‘आपल्याला कोणत्या रंगाचे पिन कुशन हवे?’ हाच प्रश्न विचारला. एवढ्या लहान मुलाला कोण नाही म्हणणार? शिवाय न रंगविलेला व तपकिरी रंगाचा असे दोन पर्याय उपलब्ध होते की! अगदी लहान वयातच हे सूत्र मला कळले होते.
शारीरिक कष्टाची कामे तुम्हाला थकवतात, पण मला लॉनची कापणी करायला आवडले, कारण मला त्याचे पैसे मिळत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठरावीक कालांतराने ते काम परत करावे लागे आणि मला पुन्हा पैसे मिळत. हे पिन कुशन विकण्यापेक्षा चांगले काम होते, कारण एका माणसाला आपण एकापेक्षा अधिक पिन कुशन पुन:पुन्हा विकू शकत नाही. म्हणून मला पुनरावर्ती प्रकारचे काम जास्त आवडत होते.
अशाच पद्धतीने कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचा मार्गही मी शोधत गेलो. मागणी आणि पुरवठा या तंत्राचा योग्य तो उपयोग करून घेतला, तर एखादी वस्तू तिच्या दरापेक्षा चौपटीने चढ्या दराने विकता येते हेसुद्धा मला चौदाव्या वर्षीच उमगले. पैशाचा दुरुपयोग टाळणे हेसुद्धा पालकांनी मुलांना शिकविले पाहिजे.
माझ्या हातून एकदा निष्काळजीपणे एक नाणे रस्त्यात पडले होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला ते शोधून आणायला सांगितले. ते म्हणाले, “मी राबून रक्ताचे पाणी करून पैसे मिळवतो, ते तुला असे उधळता येणार नाहीत.” आणि मी खरोखरच धडा शिकलो.
मुलांच्या हातात विनासायास पैसा ठेवणे म्हणजे त्यांना वाईट सवय लावणे होय. माझा एक मुलगा नऊ वर्षांचा आहे, तर दुसरा सात; पण मी त्यांना काही जबाबदारी सोपवतो आणि ती पार पाडायला लावतो व त्यांना बक्षीस देतो. त्यामुळे ते संधी शोधून तिचा योग्य उपयोग करायला आपोआच शिकतात.
अशा रीतीने माझी मुले जे कमावतात अथवा त्यांना भेट म्हणून मिळतात त्या पैशाचा अर्धा भाग ते खेळणी खात्यात तर अर्धा भाग घर खात्यात टाकतात. खेळणी खात्यात जमलेला पैसा ते त्यांना वाटेल तसा वापरू शकतात; पण घर खात्यात जमलेला पैसा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. तो गुंतवण्यासाठी त्यांच्याकडे स्टॉक ब्रोकरसुद्धा आहे.
मुलांना झोपवण्यासाठी त्यांना नेहमी स्वतःच गोष्ट सांगत बसू नका. त्यांना लाल शर्ट, निळा टॉय, एक कांगारू आणि एक लॅपटॉप द्या व या वस्तूंपासून एखादी गोष्ट बनवायला सांगा. मी असेच करतो. मुले यामुळे वस्तू विकायला शिकतात, त्यांच्यात कल्पकता वाढते, ते आपल्या पायावर उभे राहायला शिकतात.
मुलांना एखाद्या समूहापुढे उभे करा आणि बोलायला सांगा. मग ती त्यांचीच मित्रमंडळी का असेना! त्यांच्यापुढे नाट्याभिनय करायला सांगा अथवा भाषण द्यायला सांगा. मुलांना ज्या शिकवायला हव्यात तीच ही उद्योजकीय कौशल्ये आहेत. खराब ग्राहक अथवा खराब कर्मचारी कसे असतात हे मुलांना ओळखायला शिकवा.
जेव्हा तुम्ही एखाद्या ग्राहकसेवेचा लाभ घेत असाल अथवा एखाद्या रेस्टॉरंटमधील सेवेचा लाभ घेत असाल तेव्हा जर ती खराब असेल तर ती बाब मुलांच्या नजरेस आणून द्या. आपल्या अवतीभवती या गोष्टी घडतच असतात, पण आपण या संधीचा लाभ घेत नाही. त्याऐवजी मुलांनी ट्यूटरकडे जावे हे त्यांना आपण शिकवितो.
घरात जर जुनी खेळणी पडली असतील तर ती विकण्यासाठी त्यांना शिकवा. यासाठी ई-मेलचा आधार घ्या. किंमत कशी ठरवतात, किमतीचा अंदाज कसा बांधतात या गोष्टी त्यांना शिकू द्या. असे करून पैसा कसा कमावता येतो हे त्यांच्या लक्षात आणून द्या. जो पैसा मिळेल तो अर्धा खेळणी खात्यात आणि अर्धा घर खात्यात जमा करा. माझ्या मुलांना हा खेळ खूप आवडतो.
उद्योजक होण्यासाठी उद्दिष्टपूर्ती, ठामपणा, नेतृत्वगुण, अंदाज बांधणे, परस्परावलंबित्व, मूल्ये या कौशल्यगुणांची आवश्यकता असते. किशोरवयीन मुलांच्या अंगात ही कौशल्ये असतात, आपल्याला त्यांचा विकास करता आला पाहिजे. मुलांना वकील बनू देऊ नका, असे मी सांगत नाही; पण यापेक्षा उद्योजक होणे नक्कीच चांगली गोष्ट आहे, कारण येथे फार मोठ्या प्रमाणात संधी आहेत हे लक्षात घ्या.
‘आपण काहीही करू शकतो असे तुम्हाला वाटते?’ हो, नक्कीच. कारण जे आपल्याला अशक्य वाटत असते ते करणे सोपे असते. एक मनुष्य काही तरी वेगळे घडवू शकतो अशाच विश्वात आपण वावरत आहोत. पुरावा हवाय का? आपला देश ज्यांनी घडविला आहे त्या राष्ट्राच्या शिल्पकारांकडे पाहा.
आपले वडील, आजोबा, काका, आत्या… एका चमकदार कल्पनेच्या पलीकडे त्यांच्याकडे बहुधा काहीच नव्हते. हे लोक विचारवंत, कार्यकुशल, कल्पक होते. उद्योजक असे त्यांना संबोधले जाणे बाकी होते. त्यांनी आपली विचार करण्याची मानसिकता बदलून टाकली.
आपले जीवन अधिक चांगले कसे होईल याची त्यांना सुस्पष्ट कल्पना होती. आपल्या सगळ्यांच्या बाबतीत जेव्हा बाका प्रसंग ओढवतो, सर्व अवघड वाटते. अनेक अडचणी येतात, पण आव्हानेच संधीला जन्म देतात. यशाकडे आणि सफलतेकडे आपल्याला घेऊन जातात.
एखादी गोष्ट करण्याचे नवनवीन मार्ग आपल्यासमोर येतात. धोका पत्करणे म्हणजे बक्षीस नव्हे! बक्षीस आपल्याला प्रेरक कल्पकतेकडे घेऊन जाते, माणसांच्या जीवनात परिवर्तन घडवते. रोजगार निर्माण होतात. वाढीला प्रेरणा मिळते. एक चांगले जग साकारते. या सर्व ठिकाणी उद्योजकाचेच अस्तित्व असते. ते लहान लहान व्यवसाय चालवितात आणि आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात.
आपल्या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नवनवीन मार्ग शोधून काढतात. उद्योजक म्हणजे कोण? उद्योजक कोणीही होऊ शकतो, अगदी तुम्हीसुद्धा! संधीचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला हवे आहे ते मिळविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी! वेगळे बना.
आपल्या व्यवसायाची नवी क्षितिजे शोधा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे लक्षात ठेवा की, जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी शक्य होते. तुम्ही स्वतःशी ठामपणे ते बोलून दाखवत होता. ते आजही होऊ शकते.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.