धंदा कसा करतात गुजराती?

सत्तरच्या दशकातील ही गोष्ट आहे जेव्हा दलपत भाई पटेलांनी अमेरिकेच्या भूमीत प्रवेश केला होता. आपल्या पत्नी आणि मुलांसोबत अंकल सॅमच्या देशात उभे राहिले होते. बाहेरच्यांना फक्त ऐश्वर्य दिसतं, पण प्रत्यक्षात मात्र जिथले लोक रात्रंदिवस मेहनत करून आपले साम्राज्य निर्माण करतात त्या देशात भारतातून गेलेल्या आणि कृष्णवर्णीय म्हणून हिणवले गेलेल्या व्यक्तीने आपले मॉटेलचे साम्राज्य निर्माण करावं ही निश्चितच साधारण गोष्ट नाही!

एक मोडकळीस आलेलं आठ खोल्यांचं मॉटेल त्यांनी स्थानिक व्यक्तीकडून विकत घेतलं. सर्वात पहिली गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे त्यांनी मॉटेल समोरचा बोर्ड उपटून टाकला. त्या बोर्डवर लिहिलेले ‘रात्री बंद राहील’चे शब्द त्यांना बोचत होते. आता याचा अर्थ होता दलपतभाई ते मॉटेल चोवीस तास उघडे ठेवणार होते.

दिवसभर ते एका स्थानिक कंपनीत नोकरी करायचे आणि त्यांच्या पत्नी त्यावेळी मॉटेलचे व्यवस्थापन सांभाळायच्या. नोकरीहून परतल्यानंतर दलपतभाई स्वतः रात्रभर नोकरीचा फॉर्मल ड्रेस घालूनच मॉटेल सांभाळायचे. हीच ती गोष्ट आहे जी गुजरात्यांना त्यांच्या धंद्याच्या बाबतीत इतरांपेक्षा भिन्न बनवते.

व्यवसायाच्या यशासाठी लागणाऱ्या काही गोष्टी जगात कुठेही गेलात तरी समानच असतात, पण अशा काही मोजक्याच गोष्टी आहेत, ज्या गुजरात्यांना जगातील इतर कुणापेक्षाही वरचढ ठरवतात. अमेरिकेतला तब्बल साठ टक्के अतिथी व्यवसाय गुजराती नियंत्रित करतात, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

असं म्हटलं जातं, की गुजराती व्यापारी मारवाडी व्यापाऱ्याकडून खरेदी करतात आणि सिंधी व्यापाऱ्यांना विकतात आणि तरीसुद्धा फायद्यात राहतात. या वाक्यात वापरलेले ‘तरीसुद्धा’ हे गुजरात्यांचं व्यापारी कौशल्य आणि चातुर्य दर्शवते.

उगीच नाही देशातील पन्नास टक्के अरबपती गुजराती आहेत आणि उरलेले पन्नास टक्के संपूर्ण देशात मिळवून आहेत. ही देशातील स्थिती; तिकडे अमेरिकेमध्ये एका गुजराती व्यक्तीचे सरासरी उत्पन्न स्थानिक गोर्‍या अमेरिकन व्यक्तीच्या तीन पट जास्त आहे!

कुटुंब : कुटुंब हा गुजराती व्यवसायशास्त्राचा कणा आहे. गुजराती समुदायाला धंद्याची जुनी परंपरा आहे. सोळाशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला असल्याने गुजराती जगभरात पोहोचू शकले आणि व्यापार करू शकले. समुद्र किनारा लाभल्याने तुम्ही व्यवसायात यशस्वी व्हालंच असे नाही; अन्यथा इतर राज्ये ज्यांना समुद्रकिनारा आहे ती व्यापारात मागे राहिलीच नसती.

एका गुजराती बालकाला घरातून लहानपणापासूनच व्यवसायाचे शिक्षण मिळायला सुरुवात होते. गुजराती कोठेही नोकरी करत असला तरी आपला स्वतःचा उद्योग-व्यवसाय असावा ही गोष्ट त्याच्या मनात लहानपणापासूनच बिंबवलेली असते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी कुटुंबाकडून त्याला आर्थिक आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मानसिक पाठिंबा दिला जातो जो देशाच्या इतर भागात अभावानेच आढळतो.

सुरुवातीला अमेरिकेत गेलेल्या गुजराती व्यवसायिकांनी आपल्या परिवारातील इतर व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मदत केली आहे. कुटुंबाचे आर्थिक बाबतीत साक्षर होणे त्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी

व्यवसायामध्ये व्यापारी समाजाच्या सिंडीकेट्स असतात, ही गोष्ट खरी, परंतु त्यांच्याच जीवावर व्यवसाय करणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्याच समुदायाकडून खरेदी आणि विक्री करून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. गुजरातींनी स्वतःचं व्यवसायक्षेत्र इतर लोकांच्या द्वारेच पसरवलं आहे. आर्थिक पाठबळ पूरवून व्यवसाय सुरू करण्यापर्यंत सिंडीकेट्स कामी येतात, परंतु त्यानंतर तुम्हाला स्वतःच्याच जीवावर धंदा करायचा असतो.

गुंतवणुकीची समज

धंदा करणारे लोक विशेषतः मारवाडी कंजूष असतात हा देशातील इतर लोकांचा शुद्ध गैरसमज आहे. कॉस्ट ऑप्टिमायझेशनला कंजुषी सोबत जोडून ते मोठी चूक करतात. वस्तुस्थिती ही आहे की त्यांना खर्च आणि गुंतवणूक कोठे करावी याची चांगली समज असते.

वायफळ खर्च करण्यापासून ती चार हात दूर राहतात; या पैशांचा वापर करून अधिक पैसा कसा निर्माण करता येईल? हा त्यांचा दृष्टीकोन असतो. जिभेचे चोचले आणि परस्त्रीगमन या गोष्टींच्या बाबतीत ते सजग असतात. मांसाहार आणि मद्यपान या गोष्टी व्यापारी समुदायात खूप विरळ असतात, इतर लोकांची या क्षेत्रातील स्थिती अत्यंत दयनीय आहे.

व्यवसाय, पैसा कमावण्याचे मार्ग या गोष्टीत वेळ आणि पैसा गुंतवतात. वेगवेगळ्या व्यापारी युक्त्या, नवनवीन व्यवसायिक संधींचा शोध आणि त्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यात ते वेळ खर्ची करतात. गुजराती कसा विचार करतात हे या कथेवरून लक्षात येईल.

एकदा एका ट्रेनमध्ये एक गुजराती व्यापारी आणि एक बुद्धिवंत बंगाली व्यक्ती प्रवास करत होते. वेळ काढण्यासाठी बंगाली विचारवंताने प्रश्नमंजुषा खेळण्याचे आव्हान गुजराती व्यापाऱ्याला दिले. दोघेही एकमेकांना कोणतेही प्रश्न विचारू शकणार होते.

गुजरात्याला प्रश्नाचे उत्तर देता न आल्यास तो बंगालीला दहा रुपये देणार होता आणि बंगालीला उत्तर न आल्यास तो गुजराती ला शंभर रुपये देणार होता. सुरुवातीला बंगालीने गुजराती व्यापाऱ्याला एक अवघड प्रश्न विचारला आणि उत्तर न देता आल्याने तो व्यापाऱ्याकडून दहा रूपये जिंकला.

आता प्रश्न विचारण्याची व्यापाऱ्याची वेळ होती. त्यांने प्रश्न विचारला, ‘असा कोणता प्राणी आहे जो चार पायाने पर्वत चढतो आणि तीन पायाने उतरतो?’ विचारवंताने खूप विचार केला परंतु त्याला काही केल्या उत्तर सापडले नाही. त्यांने शंभर रुपये त्याला टेकवले आणि पराभव मान्य केला. त्याने व्यापाऱ्याला त्याचे उत्तर सांगण्यास सांगितले आणि उत्तर ऐकून तो अवाक् झाला,’ हे घे दहा रुपये, मलाही याचे उत्तर माहीत नाही!

 

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?