शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कधी आणि कशी करावी?

आपला मुंबई शेअर बाजार हा जगातील सर्वात जुन्या शेअर बाजारात पैकी एक आहे आणि आशिया खंडामधील एक सर्वात जुना आणि नावाजलेला शेअर बाजार आहे ज्याची सुरुवात ९ जुलै १८७५ साली मुंबई येथे झाली. यालाच आजचा दलाल स्ट्रीट असंही बोललं जातं.

सन १८७५ साली काही ब्रोकर लोकांनी एकत्र येऊन नेटिव्ह शेअर आणि ‘शेअर ब्रोकर्स असोसिएशन’ची स्थापना केली. तीच आज एका विस्तृत स्वरूपामध्ये मुंबई शेअर बाजार या नावाने कार्यरत आहे.

याबरोबरच सन १९९२ मध्ये भारत सरकारच्या पाठींब्याने भारतीय वित्तसंस्थांनी राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना केली आणि सन १९९४ पासून पारदर्शकतेने व्यवहार करण्यास सुरुवात केली त्यामुळेच आज आपल्याला दोनही बाजाराचे प्रगतशील रूप पाहावयास मिळत आहे.

याच्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सर्वाधिक शेअर्स भारतीय वित्तसंस्थांच्या मालकीचे आहेत. तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स ब्रोकर्स, देशी विदेशी वित्तसंस्था यांच्याकडे असून सर्वसामान्य जनतेकडेही आहेत. दोन्ही आघाडीचे शेअरबाजार हे कंपनी कायद्याखाली काम करीत आहेत.

याची मालकी आणि नियंत्रण पूर्णपणे वेगवेगळे आहे. आजमितीला देशांमध्ये एकवीस शेअर बाजार असले तरी त्यांची उलाढाल नगण्य आहे. ज्या बाजारात शेअर्स आणि कमोडिटीज यांची देवाण-घेवाण व वायद्यांचे व्यवहार केले जातात.

या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीमार्फत केले जाते, सेबी हे शेअर बाजाराविषयी कायदे आणि नियम बनवते तसेच हे नियम कंपन्यांनी काटेकोरपणे पाळावेत यांची ही खबरदारी घेते आणि जे हे नियम पाळणार नाहीत त्यांना शिक्षा करण्याचे काम करते.

आपण पाहतो की मार्केटमध्ये ‘निफ्टी’ हा एक नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा विविध विभागातील पन्नास निवडक कंपन्या मिळून बनवलेला निर्देशांक आहे, तसेच सेन्सेक्स हा BSE मधील विविध तीस कंपन्यांचा मिळून बनवलेला निर्देशांक आहे. यावरूनच आपल्याला बाजाराची दिशा समजण्यास मदत होते. तसे पाहायला गेले तर आपण भारतीय लोक आणि त्यातल्या त्यात आपला मराठी माणूस हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये खूपच मागे आहे.

आपले भारतीयांचे शेअर बाजारामधील अस्तित्व फक्त सात तेआठ टक्के आहे हेच प्रमाण अमेरिका युरोपीय या पाश्चिमात्य देशांमध्ये ९० टक्क्यांहून जास्त आहे मागील एक ते दोन वर्षांमध्ये आता कोठे लोक पारंपारिक गुंतवणुकीचे पर्याय सोडून म्युचल फंड तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लागले, परंतु आपण अजून खूपच मागे आहोत कारण यामध्ये आपणाला अजून खूप वाव आहे.

यासाठी काटेकोरपणे नियोजन आणि गुंतवणुकीबद्दल स्वतःला ज्ञान असणेही तेवढेच गरजेचे आहे. तरच आपण यातील प्रवाहाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने जाऊन फायदा करून घेऊ शकतो. नाहीतर आपण ऐकतोच की एखाद्याचे एवढे नुकसान झाले. तरी आपण जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा.

शेअर बाजारामधील अपयशाची कारणे

आपण पाहणार आहोत की मराठी माणूस समजून घेण्याऐवजी शेअर मार्केटमध्ये नुकसान करून घेत आहे. यामुळे लोकांचा शेअर मार्केटकडे पाहण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन झाला आहे. यामुळे नवीन व्यक्ती याकडे अधिक संशयाच्या नजरेने किंवा एक जुगार म्हणूनच पाहते. अशा मनोवृत्तीमुळे आपले खूप नुकसान होत आहे आणि आपण गुंतवणुकीच्या चांगल्या संधी सोडत आहोत.

१) शेअर मार्केटबाबत असलेले अपुरे ज्ञान किंवा काहीही माहिती नसताना शेअर मार्केटमध्ये छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे.

२) प्रत्येकाला रातोरात श्रीमंत व्हायचे असते त्यामुळे आपण कोणाचे तरी ऐकलेले असते किंवा पाहिलेले असते आणि त्याचे अनुकरण करायला जातो आणि अवास्तव मोठे मोठे ट्रेड घेऊन बसतो याच्यामुळे खूप मोठे नुकसान होत असते.

३) कोणा एका व्यक्तीला किंवा टीव्ही पाहून आंधळेपणाने त्याला फॉलो करणे आणि त्याची विश्वासाहर्ता न पाराखता खरेदी किंवा विक्री करत राहणे यामुळे शेअर मार्केटमध्ये नुकसान होण्याची शक्यता जास्त असते किंबहुना खूप लोक असेच पैसे गमावतात.

४) शेअर मार्केटमध्ये थोडे दिवस झाले की असं वाटणे की आता मला सर्व काही येते असा फाजील आत्मविश्वास आणि शिकण्याला प्राधान्य न देणे हे शेअर मार्केटमधील होणार्‍या नुकसानीचे सर्वात मोठे कारण आहे. ममाणूस आयुष्यभर एक विद्यार्थी असतोफ ह्या उक्तीप्रमाणे शेअर मार्केटमध्ये आपण जेवढं समजून घेऊ तेवढं कमीच आहे त्यामुळे सतत शिकण्यासाठी प्रयत्नशील राहणं आणि नवनवीन बाबी शिकत तेवढेच गरजेचे आहे.

५) कमी पैसे गुंतवायचे आणि मार्जिन वर ट्रेडिंग करून खूप मोठे मोठे ट्रेड मारायचे याच्यामुळे कधी एकदा मोठा प्रॉफिट झालेला असतो परंतु मार्केटचा अंदाज न आल्यामुळे ह्याचं उत्तरार्ध हा मोठ्या नुकसानी मध्येच होतो त्यामुळे निदान सुरुवातीच्या काळात आपल्याकडे असलेल्या पैशांचा विचार करून गुंतवणूक किंवा ट्रेडिंग केलेलं कधीही चांगलं.

६) स्वस्त शेअर निवडणे लोकांना दहा-वीस किंवा यापेक्षा खालील किमतीचे शेअर घेण्यामध्ये खूप रस असतो आणि असे लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे शेअर्स खरेदी करतात आणि एका सापळ्यात अडकतात. अशा व्यवहारातून क्वचितच फायदा होतो आणि अशा शेअर्समध्ये खूप जास्त नुकसान होण्याची शक्यता असते किंवा आजपर्यंतचा अनुभव तर अशा शेअर्समध्ये पैसे अडकून राहिल्याने नुकसान होते. आपण कुठलीही वस्तू घेताना ज्याप्रमाणे ब्रँड पाहतो त्याप्रमाणे शेअर्स घेतानाही नेहमी चांगल्या कंपन्यांचे घेणे कधीही उत्तम.

७) कोठून तरी टिप्स वगैरे घेणे आणि त्यानुसार ट्रेड करणे किंवा आपलं अकाऊंट स्वतःला जमत नाही म्हणून दुसर्या कोणालातरी वापरावयास देणे ही सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे कारण असं करणार्‍या 90 टक्केपेक्षा जास्त व्यक्ती या आपले भांडवल गमावून बसतात. तरी ही गोष्ट नेहमी डोक्यातून काढून टाका आणि शिकण्याला भर द्या कारण आपला पैसा हा आपणच व्यवस्थित गुंतवू शकतो. आपल्या पैशाची तेवढी जाणीव दुसर्‍या व्यक्तीस कधीच नसते.

८) जास्त नफा आणि पैशाचे हव्यासापोटी फ्यूचर आणि ऑप्शन मध्ये ट्रेड मारणे आणि इथूनच शेअर मार्केटची सुरुवात करणे, परंतू हा एक शेवटचा भाग आहे हे फक्त अनुभवी व्यक्ती व्यवस्थित करू शकतात नवीन लोकांनी ह्याकडे सुरुवातीला पाहणे टाळावे कारण ह्याच्या मध्ये पैसे मिळवणं एवढं सोपं नसतं. यासाठी व्यवस्थित माहिती आणि काटेकोर पैशाचे नियोजन हे महत्वाचे आहे.

गुंतवणूक करताना कधीही कुठल्या एका शेअर्समध्ये सर्व पैसे न गुंतवता विविध सेक्टरमधील विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवावेत.

शेअर बाजारावर परिणाम करणारे घटक

आपण पाहतो की शेअर बाजार हा नेहमी वर-खाली होत असतो किंवा तो कधीच एका दिशेने जात नाही त्याच्यामध्ये सतत चढ-उतार होत असतात कधी हे खूप मोठे असतात तर कधी हे चढ-उतार अगदी छोटे असतात तरी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना आपले काही गोष्टींकडे लक्ष असणे पण तेवढेच गरजेचे आहे.

जसे की जागतिक इतर प्रमुख देशांचे शेअर बाजार त्यांची सध्याची स्थिती, ट्रेड-वार आणि यामध्ये भरडणार्‍या वस्तू, जागतिक छोटे-मोठे युद्धे, तसेच रुपया आणि डॉलरचा असलेला भाव, क्रूड ऑईलचे दर, सोने-चांदीची जागतिक स्थिती, आंतरराष्ट्रीय पॉलिसी तसेच आपल्या देशांतर्गत निवडणुका, सरकारने जाहीर केलेले नवीन कायदे किंवा कंपन्यांसाठीच्या पॉलिसी, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पतधोरण, कंपन्यांचे निकाल, बँकांची स्थिती, कंपन्यांमधील घोटाळे आणि त्यांचे मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टी या शेअर बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असतात.

त्यानुसार आपल्या शेअर्स निवडणे कधीही उत्तम. जेणेकरून आपण ह्या दृष्टचक्र मध्ये अडकणार नाही तसेच या सर्व गोष्टींकडे लक्ष असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे यासाठी आपले वाचन आणि अनुभव खूप महत्त्वाचा आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कधी आणि कशी करावी?

शेअर मार्केटमध्ये आपण अगदी वयाच्या अठराव्या वर्षापासून स्वतःच्या नावाने गुंतवणूक करू शकतो किंवा त्याच्या आधी काही कायदेशीर बाबींची पूर्तता करून आपण गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो यासाठी वयाचे बंधन नाही जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वारेन बफेट नेहमी सांगतात, की मी वयाच्या बाराव्या वर्षी माझा पहिला शेअर्स घेतला होता, परंतु ही माझ्या आयुष्यातील एक उशीर झाला पहिला शेअर घेण्यासाठी.

‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे आपण शेअर बाजारांमध्ये किंवा म्युचल फंड, एसआयपी यासारख्या त्याच्या प्रकारांमध्ये छोटीछोटी गुंतवणूक करून सुरुवात करू शकतो, तसेच आपण आपल्या बरोबरच आपल्या मुलांनाही या गोष्टी शिकवून त्याची सवय लावणे हे कधीही उत्तम आणि आपल्या बरोबरच ते ज्ञान आपल्या मुलांनाही लहान वयापासूनच द्यावे जेणेकरून आपल्याबरोबर ते ही त्यांच्या आयुष्यामध्ये एक यशस्वी गुंतवणूकदार होतील आणि एक चांगली संपत्ती निर्माण करतील.

आपला पोर्टफोलिओ आणि त्यामधील कंपन्या

एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्याला एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर आपले घोडे अथवा आपले वाहन पण त्या क्षमतेचे हवे तर रेस आपण जिंकू शकतो त्याच प्रमाणे शेअर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असतील तर आपले शेअर निवड पण अगदी योग्य आणि चांगली असणे गरजेचे आहे.

जसे की आपण उत्तम प्रकारचे कपडे किंवा वस्तू घेतो त्याप्रमाणे शेअर्स निवडताना पण ते महाग असले तरी चालतील, परंतु चांगले उत्तम क्वालिटी चे शेअर निवडावेत यामध्ये आपल्याला कॉन्टिटी कमी मिळू शकते, परंतु कॉलिटी नक्कीच मिळेल.

तसेच गुंतवणूक करताना कधीही कुठल्या एका शेअर्समध्ये सर्व पैसे न गुंतवता विविध सेक्टरमधील विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवावेत किंवा सरासरी प्रत्येक सेक्टरमधील पहिल्या दहा कंपन्यांपैकी निवडलेल्या चांगल्या कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक असणे कधीही चांगले.

तेही या कंपन्यांचे टेक्निकल आणि फंडामेंटल अभ्यास करूनच निवडणे अति उत्तम, तसेच आपल्या पोर्टफोलिओमध्ये सर्व मिळून बारा ते पंधरापेक्षा जास्त शेअर्स नसणे कधीही उत्तम कारण जेवढे कमी शेअर्स असतील तेवढे त्यांचा अभ्यास नियमित करण्यास सोपे जाते, कारण आपण कितीही चांगले शेअर्स घेतले तरी त्याचा वेळोवेळी आढावा घेणे ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे.

आपलं त्या शेअर्सवर लक्षही राहतो तसेच या शेअर मधून वेळचे वेळी आपला नफाही घेत जाणे महत्त्वाचे आहे सरासरी कंपन्या निवडताना ज्या कंपन्यांचा आलेख हा ४५ ते ५५ डिग्रीमध्ये वाढताना दिसतो या कंपन्या कधीही उत्तमच असतात तसेच तुमच्या पोर्टफोलिओमधील एखादा शेअर एखादा दिवशी कोणत्याही कारणाने ३० ते ४० टक्क्यांनी जर पडला तर अशावेळी आपण त्वरित याच्यामधून निघून जाणे कधीही उत्तम मग अशावेळी जो काही प्रॉफिट किंवा लॉस होत असेल तो बुक करून बाहेर पडावे.

काही उत्तम कंपन्या ज्यांनी आजपर्यंत त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे अशांची काही नावे पाहू उदा. इन्फोसिस, टीसीएस ,मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, डी-मार्ट, पिडिलाइट, कोलगेट यासारखी असंख्य उदाहरणे देता येतील (वरील शेअर्स कोणतीही अभ्यास करता घेऊ नका)

आणखी एक गोष्ट वरील शेअर्स थोडे अधिक किंमत असलेले आहेत त्याचे मूल्य मोठे असल्याने त्यांनी सातत्याने अधिक परतावा पण त्याच प्रमाणामध्ये त्यांनी दिला आहे सांगण्याचा उद्देश हाच की कमी किंमतींच्या शेअरच्या मागे न लागता चांगले शेअर घेत राहणे आपण क्वालिटी शेअर्स बोलतो असे शेअर्स घ्या आणि अगदी आपल्याला खूप जास्त संख्या घेणे जमले नाही तरी प्रत्येक महिन्याला आपण थोड्या-थोड्या संख्येने घेत राहू शकतो. जशी आपली कमाई असेल त्याप्रमाणेच घेत राहा यासाठी कुठलेही प्रकारचे कर्जाऊ रक्कम किंवा उसनवारीने पैसे कधीही मार्केटमध्ये गुंतवू नका.

कंपन्या त्यांचे सेक्टर आणि त्यांच्या मुल्यानुसार निवड

कंपन्यांची प्रतवारी सरासरी चार भागांमध्ये केली जाते यामध्ये लार्ज कॅप किंवा ब्लूचिप कंपन्या यांचे भाग भांडवल मूल्य जास्त असते जसे की या पहिल्या शंभर कंपन्यात आहे. यापुढेही १५० म्हणजे १०१ ते २५० क्रमांकाच्या कंपन्या म्हणजे मिडकॅप कंपन्या ज्यांचे भांडवल मूल्य याहून कमी असते, याहूनही कमी भांडवल असलेल्या ज्या कंपन्या असतात त्यास्मॉल कॅप कंपन्या आहेत.

याशिवाय दर्शनी मूल्याहून कमी असलेल्या इतर कंपन्या म्हणजे पेनि स्टॉक त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसते. तसेच या सर्व प्रकार मधील कंपन्या ह्या त्यांचे होणारे प्रॉफिट लॉस व्यवसायामधील चढ-उतार कंपनीचं मॅनेजमेंट त्यांच्या स्ट्रॅटजी सरकारी नियम यानुसार वर-खाली होत असते यावरही आपली नजर असणार तेवढाच महत्त्वाचा आहे.

तसेच मार्केटमध्ये कंपन्यांची विभागणी त्यांच्या सेक्टर नुसार केली जाते म्हणजे सर्व बँका ह्या बँकिंग सेक्टर मध्ये येतात याप्रमाणेच आपण ऑटो सेक्टर, एफएमसीजी सेक्टर, आयटी सेक्टर, मेडिया, मेटल या सारखे अनेक प्रकारांमध्ये कंपन्यांची वर्गवारी केली जाते आपल्या पोर्टफोलिओमध्ये कंपन्या निवडताना पण या सेक्टर नुसारच निवडाव्या जेणेकरून आपण जे शेअर निवडणार आहोत त्यांना भविष्यामध्ये चांगली मागणी असणारे आणि व्यवसायाची उत्तम संधी असलेले सेक्टर आणि त्यामधील कंपन्या निवडू शकतो.

शेअर मार्केटमधील काही यशस्वी व्यक्तिमत्व

आपण ऐकतो की आज मितीला मुकेश अंबानी हे देशामधील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व आहेत, परंतु ते श्रीमंत हे त्यांच्या कंपनीच्या शेअरची प्राईज आणि त्यांच्याजवळ असलेल्या त्या शेअरची संख्या यामुळेच ते श्रीमंत आहेत कारण हे पैसे कधीच त्यांच्याकडे कॅशमध्ये नसतात जे त्यांचे श्रीमंतीचे आकडे सांगताना सांगितले जातात ती त्यांच्याजवळ असलेल्या शेअर्स बाजारभावानुसार केलेली किंमत असते.

यासारखेच वारेन बफेट, राकेश झुंझुंवाला, विजय केडिया, राधाकृष्ण दमानी, रमेश अग्रवाल यासारख्या खूप लोकांची यादी आपण पाहू शकतो की ज्यांनी आजमितीला अब्जावधी रुपये हे शेअर मार्केटमधून कमावलेले आहेत.

लक्ष देण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व पैसे त्यांनी एका रात्रीत कमाई करून श्रीमंत नाही झालेले यासाठी त्यांनी योग्य गुंतवणूक केली आणि वेळ ही दिलेला आहे यासाठीच आपल्याला ज्ञान आणि पेशन्स असणं खूप गरजेचे आहे तरच वरील यादीत तुमचे नाव येण्यास वेळ लागणार नाही आणि नक्कीच तुमचे नाव यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये यावे हीच सदिच्छा.

– शंभूराज खामकर
9822500374 / 8802809090

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?