यशाची सुरुवात होते स्वयंशिस्तीने

२४ जुलै १९८९ रोजी मुसळधार पावसाने आणि १०० ते १५० कि.मी. वेगाने वाहणार्‍या वादळी वार्‍याने मुंबई ते कोकणाला अक्षरश:  झोडपून काढले होते, ज्यात कित्येक लोक मृत्युमुखीदेखील पडले. नवी मुंबईतील अनेक केमिकल कंपन्या असणार्‍या पाताळगंगा परिसरात रात्रभर आठ-दहा तास सतत पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन संपूर्ण विभाग पाण्याखाली गेला होता.

पाताळगंगेतील त्या शंभरेक कंपन्यांमध्ये साधारणपणे दोनशे एकरमध्ये पसरलेला एक युनिट रिलायन्स पेट्रोकेमिकलचासुद्धा होता. अगदी पहाटेच तिथे हालचाली सुरू होऊन अर्ध्या-एक तासातच पूर्ण युनिट बंद करण्यात आले आणि त्यानंतर सूत्रं हलायला लागली आणि ती आणीबाणी हाताळण्यासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा सर्वच प्रकारच्या अधिकार्‍यांचे मिळून एक विशेष पथक तयार करण्यात आले.

पुढील दोन तीन दिवसांतच अशी आपदा हाताळणारे कुशल कामगार जगभरातून अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीसह तिथे पोहोचले. पाहता पाहता पुराच्या दिवसापासून साधारणपणे पंधरा दिवसांतच युनिट पुन्हा एकदा सुरू झाले.

आजूबाजूचे युनिट्स किती दिवसांनी चालू झाले किंवा नुकसान सहन न झाल्याने त्यातले किती कायमचे बंद पडले कुणास ठाऊक; पण ‘रिलायन्स’ने मात्र ही किमया साधली, कारण ही अचानकपणे उद्भवलेली आपत्ती हाताळण्यात ते कुठेही कमी पडले नव्हते.

आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठीदेखील एक यंत्रणा कायम सज्ज असावी लागते आणि जर ती अस्तित्वात नसेल तर ताबडतोब कृती करून ती अस्तित्वात आणावी लागते. तिचे यश पूर्णपणे अवलंबून असते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आणि ती म्हणजे ‘शिस्त’. त्या शिस्तीची सुरुवात त्या कंपनीच्या मुख्य नेतृत्वापासूनच होते.

मी मार्च १९८९ मध्ये कुरिअर कंपनी चालू केली. त्यामुळे त्या २४ जुलैच्या पावसाची झळ ट्रेन वगैरे बंद झाल्यामुळे इतरांना लागते त्यापेक्षा आम्हाला नक्कीच जास्त लागली, कारण पावसाचे कारण देत कुरिअर कंपनीला डिलिव्हरी थांबवता येत नाही, मग ती कंपनी नवीन असो अथवा जुनी! नवीन होतो त्यामुळे विशेष काळजी आणि परिश्रम घ्यावे लागले होते.

मी ऐकलेल्या माहितीप्रमाणे ‘रिलायन्स’चे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी आपल्या मोठ्या मुलावर म्हणजे मुकेशवर ती आपदा हाताळण्याची जबाबदारी सोपवली होती आणि त्यासाठी त्यांनी दहा दिवसांचा कालावधी निश्चित केला होता. दहा दिवसांत तर नाही, पण पंधरा दिवसांत त्या पुराच्या पाण्यात पाय रोवून अथक मेहनतीने तो प्लांट पुन्हा एकदा धडधडू लागला होता.

ती एकमेव आपदा होती असे नाही. अशा किती तरी आपदा त्यांनी हाताळल्या असतील आणि माझ्या माहितीप्रमाणे अशीच आपदा काही वर्षांनंतर गुजरातमधील जामनगरच्या प्लांटमध्ये आली होती आणि त्यांनी ती यशस्वीरीत्या हाताळली होती आणि तीही काही दिवसांतच.

म्हणजेच पूर्वी पाताळगंगा प्लांटमध्ये अनपेक्षितपणे उद्भवलेली आपदा यशस्वीरीत्या हाताळणे हा फक्त नशिबाचा भाग नव्हता; तर एक शिस्तबद्धता त्यात होती आणि ती शिस्तबद्धता कुठेही न हरवता टिकून होती.

माझ्या लहानपणी जर कुणी मोठमोठ्या फुशारक्या मारत असेल तर त्याला म्हटले जाई की, हो माहिती आहे, खूप मोठा टाटा-बिर्ला आहेस. त्या वेळी अंबानींचे तर कुठे नाव काय तर ओझरता उल्लेखही नव्हता. आतादेखील टाटा-बिर्ला त्यांच्या ठरावीक किंवा पूर्वीपेक्षा जास्त वेगाने अजूनही पुढे जाताहेत, पण त्यांच्यापेक्षा वेगाने जर कुणाची वाढ होत असेल तर ती अंबानीच्या ‘रिलायन्स’ची.

रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्च २०२१ पूर्वी कर्जमुक्त होण्याचे ध्येय ठेवले होते, पण झाले जून २०२० मध्येच आणि जिथे पूर्ण जग कोरोनामुळे धडपडत होते, तिथे रिलायन्स ‘जीओ’ने मोठी गुंतवणूक मिळवून स्वत:ला कर्जमुक्त केले. काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेली कंपनी, पण थोड्याच अवधीत एवढ्या उंचीवर पोहोचते की, जिथे अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठ्या कॉर्पोरेट अक्षरश: रांगा लावताहेत.

कसे शक्य झाले हे सर्व?

रेसकोर्सवर शर्यतीत पळणार्‍या त्याच घोड्यावर लोक पैसे लावतात जो यापूर्वी काही वेळा तरी किंवा सतत जिंकत आला आहे, नाही का? जिंकणार्‍या घोड्याची काळजी घेण्यासाठी आणि शारीरिक मजबुतीसाठी विशेष खाण्यापिण्याचे प्रयोजन असावे लागते आणि त्या सर्वांची वेळही ठरलेली असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट एका ठरावीक नियोजनानुसारच घडत असते.

नियोजन नसेल तर एखादवेळ नशिबाने तो घोडा शर्यत जिंकेलही, पण तीच किमया कायम साधणे त्याला शक्य नसेल. तो घोडा महत्त्वाचा तर आहेच, पण तेवढाच महत्त्वाचा असतो त्या घोड्याला हाताळणारा जॉकी; कारण तो घोडा एकट्याने ठराविक वेळेत स्वत:हून त्या गंतव्यावर पोहोचणे कठीण.

तो तेव्हाच पोहोचू शकेल जेव्हा जॉकी त्याच्यावर स्वार होऊन त्याला योग्य रीतीने हाताळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा त्या दोघांमध्ये एकवाक्यता असेल तेव्हाच. एकवाक्यता नसेल तर जिंकणे फक्त नशिबाचाच भाग असू शकतो आणि अशा घोड्यावर किंवा जॉकीवर कुणी पैसे लावत नाही.

प्रत्येकाला काहीही झाले तरी फक्त आणि फक्त फायदाच हवा असतो; नुकसान नको असते. तुम्हाला हव्या असलेल्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला काय काय करावे लागते त्याचा विचार करून बघा, मग या गोष्टीचे गांभीर्य जाणवेल. गुंतवणूक सोडा, आर्थिक शिस्त नसेल तर बँकाच काय पण वैयक्तिक कर्जही न मिळण्याची नामुष्की येते.

जर का तुम्ही एका शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असाल, तर वर्तमानात जरी नुकसान होत असेल, पण भविष्यात फायदा मिळण्याची शक्यता दिसत असल्यास लोक आणि बँका तुमच्यासाठी उभ्या राहतात. जर शिस्त नसेल तर जेवढे दिवस किंवा वर्ष तुम्ही उद्योगात टिकलेले असाल, तो तुमच्या कर्तृत्वाचा कमी आणि नशिबाचाच भाग जास्त असेल.

बघायला गेले तर घोडा एक मूक प्राणी, ज्याला माणसाच्या दहापट बळ असते. त्यामुळे कुणीही त्याच्यावर स्वार होऊ शकत नाही. जर कुणी जबरदस्ती स्वार झालाच तर तो घोडा त्या माणसाला कुठच्या कुठे फेकून देतो. पण जर का त्याला प्रेमाने गोंजारले आणि भावना जुळल्या तर मात्र तुम्हाला पाठीवर बसवून जिथे जायचे तिथे घेऊन जाईल आणि शर्यत जिंकण्यासाठी महाराणा प्रतापांच्या चेतकप्रमाणे पूर्ण ताकदीनिशी धावेल.

तुमचा उद्योगधंदा तरी कुठे त्या घोड्यापेक्षा वेगळा असतो? तिथे घोडा नसतो, तर असतात हाडामासांची जिवंत माणसे. ज्याप्रमाणे घोड्याला गोंजारावे लागते आणि वेळप्रसंगी छडी मारावी लागते, तसंच काहीसे पण एक शिस्त लागणे गरजेचे असते.

त्याशिवाय उद्योग प्रगती करू शकत नाही. तुम्ही कितीही मेहनती, कुशल किंवा ज्ञानी असाल, पण एकट्याच्या जिवावर उद्योग एका मर्यादेपर्यंतच वाढवू शकता. या सर्व गुणांचे महत्त्व नक्कीच आहे, पण सर्वात महत्त्वाची असते ‘शिस्त’. ही शिस्त उद्योजकात असावीच लागते, तरच ती त्याच्या हाताखालच्या किंवा संपर्कात येणार्‍या लोकांमध्ये उतरू शकते.

एखादे काम एका शिस्तबद्ध पद्धतीने सातत्याने करत राहिलो तरच त्यात लयबद्धता येते. फक्त एकदाच किंवा जेव्हा मन करेल तेव्हाच केल्याने ती येण्याची सुतराम शक्यता नसते. शिस्त एका दिवसात लावता येत नाही, तर त्यासाठी सातत्य गरजेचे आहे.

नाही तर महिन्यातून एकदा व्यायाम कराल आणि तरीही वाढलेले पोट कमी होत नाही, अशी तक्रार करत बसाल. तसं पाहिले तर तक्रार करणे खूप सोपे असते, पण शिस्तबद्ध पद्धतीने एखादे काम सातत्याने वर्षानुवर्षे करत राहणे खूप कंटाळवाणे आहे. जे हे कंटाळवाणे काम विनातक्रार वर्षानुवर्षे करत राहतात त्यांच्या पायाशी यश लोटांगण घालते.

टाटा-बिर्ला असो वा अंबानी किंवा अगदी छोटासा उद्योजक, त्यांना यश मिळवण्यासाठी हे कंटाळवाणे काम कायमच करावे लागते. मग ते त्यांना आवडत असो वा नसो, पण जर दीर्घकालीन यश हवे असेल आणि तेही पहिल्यापेक्षा किती तरी अधिक पटीने, तर मग शिस्तबद्धपणे काम करण्याला दुसरा पर्याय नाही.

तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही भाराभर माणसे कामाला ठेवली म्हणजे टीम झाली आणि त्यांच्याकडून काम मिळाले असे नसते. तर जेवढी गरज आहे तेवढीच माणसे ठेवून त्यांची कुवत पूर्णपणे वापरता येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या कुवतीचे ज्ञान तुम्हाला तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही स्वत: एका शिस्तीत काम करता आणि तुमच्या हाताखालील लोकांना त्यासाठी प्रवृत्त करून त्यांना प्रशिक्षित करता.

हे आम्हालाही पक्के ठाऊक असते की, आयुष्यात पुढे जायचे असेल आणि संपादन केलेले यश टिकवायचे असेल तर शिस्त हवीच. जाणतो आम्ही हे सर्व आणि हे ज्ञान काय नवीन नाही आहे आमच्यासाठी, पण हे माहीत असतानाही किती जण एका शिस्तीत सतत कार्यरत असतात?

शिस्त शिस्त शिस्त, काही तरीच काय? नेहमीच काय त्याचे तुणतुणे वाजवायचे? आणि कोण म्हणतो की, आम्ही शिस्तीत काम करत नाही? व्यवसायात यश-अपयश तर येत-जातच असते. मग त्याचा का म्हणून एवढा बाऊ करायचा? तसेही शिस्त फक्त आणि फक्त हाताखालील कामगारांसाठी आणि आमच्याव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी असते; उद्योजकासाठी तर नक्कीच नसते.

आम्हाला शिस्तीचे वावडे असते. कित्येकांचे नोकरीतून उद्योगात येण्याचे प्रमुख कारण बहुतांशी हेच तर असते, की त्यांना कोणत्याही बंधनात अडकून राहायचे नव्हते आणि म्हणूनच तर ते उद्योगात उतरले. शिस्त म्हणजे बंधनच आणि आम्हाला तर आपल्या मनाप्रमाणेच सर्व काही करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य हवे असते. ज्या वेळी वाटेल त्या वेळी करायचे नाही तर नंतर केले तरी काय फरक पडणार. शेवटी उद्योजक म्हणजे आम्ही आमच्या मनाचे राजे.

हो नक्कीच! तुम्ही राजे, पण कशीही मनमानी केली तर त्या राजाचा रंक किंवा मांडलिक राजा व्हायला जास्त वेळ लागत नाही. त्या राजाचे साम्राज्य सर्वदूर पसरून त्या राजाचा सम्राट व्हायला मात्र खूप वेळ लागतो आणि ते शक्य होते उद्योगात उतरल्यापासून एका शिस्तबद्ध प्रवासानेच.

एकदा मागे भूतकाळात जाऊन विचार करून बघा, की ज्या ज्या वेळी तुम्हाला यशप्राप्ती झाली होती, ती तुमच्या मनमानी कारभाराचे फलित होते की तुमच्या तशा कर्मांमुळे त्या वेळी मिळालेल्या फटक्यांनी काही काळाकरिता तुम्ही सुतासारखे सरळ झाला होतात आणि यश संपादन केल्यावर पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या.

आयुष्य जर नियोजनबद्ध नसेल आणि मेहनतीत सातत्य नसेल तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला नकोसे आहे. फक्त स्वप्ने पाहून किंवा ‘मला जे हवं ते मी कधीच प्राप्त केले आहे’, अशा फक्त कल्पनेच्या जगात वावरून हवे ते प्राप्त करता येत नाही. तसे असते तर दिवास्वप्ने पाहणारी प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश असती.

आमची समस्या अशी आहे की, आम्हाला सर्व काही लगेच हवे असते, अगदी कोणत्याही नियोजनाशिवाय. जणू काही आम्ही उद्योगात उतरल्याबरोबरच यश आमच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे. एखाद-दुसर्‍याच्या बाबतीत हे खरे असूही शकते, पण बहुतेकांच्या बाबतीत तुमच्या कितीही ओळखी असल्या आणि तुम्ही त्याच क्षेत्रात जाणकार असलात आणि कितीही वर्षांचा अनुभव असला तरीही जोपर्यंत तुम्ही स्थिरस्थावर होत नाही, तोपर्यंत लोक तुमच्यासोबत धंदा करायला धजावत नाहीत; कारण तुमच्या कामाचा अनुभव वेगळा आणि उद्योग हाताळण्याचा अनुभव वेगळा असतो.

नोकरीत कुणी तरी तुमच्याकडून काम करून घेत होते किंवा तुम्हाला कुणाला तरी उत्तरे देणे बंधनकारक होते. त्यामुळे एक शिस्त कायम होती, पण तुम्ही स्वत:च उद्योजक झाल्यावर तुमची नवीन कार्यपद्धती आणि एकंदरीत शिस्तबद्धता जाणणे क्रमप्राप्त असते.

तुम्हाला उद्योगात किती तरी वर्षे झाल्यानंतरही जर काही लोक तुम्हाला धंदा द्यायला कचरत असतील, तर समजून चाला की, त्यांचा अजूनही तुमच्यावर विश्वास बसलेला नाही. प्रत्येक वेळी त्यांच्याप्रमाणे तुम्हाला स्वत:ला जुळवून घ्यायचे असे नाही; तसे कराल तर प्रत्येकाला खूश करण्यातच आयुष्य खर्ची पडेल. फक्त एकाच गोष्टीची गरज असते ती म्हणजे ध्येयनिश्चिती आणि त्यानुसार स्वत:ला शिस्त लावून घेण्याची.

मी सुरुवातीलाच ‘रिलायन्स’ने ज्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती हाताळली त्याचे उदाहरण दिले आहे आणि त्यात हेही नमूद केले होते की, त्या आपत्तीत कित्येक कंपन्या कायमच्या बंददेखील पडल्या; पण ‘रिलायन्स’ नुसती तरलीच नाही, तर जागतिक स्तरावरील ‘फॉर्च्युन-१००’ उद्योगात समाविष्टही झाली.

त्यांच्या कार्यप्रणालीवर मतमतांतरे असतील, पण कमी कालावधीत तो पल्ला गाठणारी ती एकमेव भारतीय कंपनी आहे हेदेखील तेवढेच खरे. कोणतीही कंपनी फक्त नशिबाच्या जिवावर किंवा कुणाला फसवून एवढा लांबचा पल्ला गाठू शकत नाही. ते शक्य होते फक्त आणि फक्त ध्येय निश्चित करून त्यावर शिस्तबद्ध पद्धतीने स्वत:ला झोकून दिल्यामुळेच.

– शैलेश तांडेल
७२०८११२३३१

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?