‘इनबाउंड मार्केटिंग’ का जास्त उपयोगी आहे?
उद्योगोपयोगी

‘इनबाउंड मार्केटिंग’ का जास्त उपयोगी आहे?

स्मार्ट उद्योजक मासिक प्रिंट आवृत्ती वर्षभर घरपोच मिळवा फक्त रु. ५०० मध्ये! नोंदणीसाठी : https://imjo.in/Xx7Uq6

आपण कधी इनबाउंड आणि आउटबाउंड मार्केटिंग बद्दल ऐकलं आहे का?
इनबाउंड मार्केटिंग म्हणजे…

आपल्या ग्राहकांशी किंवा लोकांशी जास्तीत जास्त चांगले संबंध निर्माण करणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, त्यांच्याशी संवाद साधणे, इ. तसेच आउटबाउंड मार्केटिंग म्हणजे कोणतीही व्यक्ती असो, तिला आपले उत्पादन विकण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच आज आपली जास्तीत जास्त विक्री कशी होईल यावर लक्ष केंद्रित करणे. वर वर पहाता आपल्या सर्वांनाच आउटबाउंड मार्केटिंग जास्त फायदेशीर वाटेल कारण त्याने आपली आज विक्री जास्त होते आहे. परंतु इथेच बऱ्याच जणांची चूक होते.

लोकांना परत परत त्यांच्या गरजांची किंवा कमतरतांची जाणीव करून देण्याची किंवा एखादे उत्पादन किती चांगले आहे आणि तुमचा प्रश्न ते किती उत्तम प्रकारे सोडवून देईल हेसुद्धा लोकांना सांगत राहण्याची गरज नसते. आपले उत्पादन वापरून ते किती सुंदर, आकर्षक, हुशार, कामसू किंवा आनंदी होतील हेसुद्धा ऐकण्यात खरेतर लोकांना रस नसतो. दुर्दैवाने ह्याच सर्व गोष्टी आउटबाउंड मार्केटर्स कळात नकळत करत असतात आणि खरे पाहता लोक या सर्वाला प्रचंड कंटाळलेले असतात.

त्यांना एकाच गोष्टीची गरज असते आणि ते म्हणजे त्यांच्या गरजांवरील उपाय. लोकांसाठी काय चांगले आहे आणि काय वाईट हे त्यांना सांगण्यापेक्षा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याबद्दल मार्केटर्सनी त्यांना माहिती पुरवावी अशी लोकांची इच्छा असते. त्यामुळे आजच्या काळात इनबाउंड मार्केटिंग हे आउटबाउंड मार्केटिंगपेक्षा उत्तम पर्याय ठरत आहे. कारण, इनबाउंड मार्केटर्सना आपले उत्पादन विकत घ्या हे लोकांना पटवून देण्यात फार वेळ घालवावाच लागत नाही.

Advertisement
इनबाउंड मार्केटर्स लोकांना प्रेरणा देतात.

तुमच्यात काहीतरी कमी आहे असे ते लोकांना आजिबात भासू देत नाहीत तर तुमची ही गरज आहे आणि त्यावरील उत्तर म्हणजे हे उत्पादन आहे इतकीच माहिती ते लोकांना पुरवतात. यापुढे आपली गरज भागवायची की नाही हे पूर्णपणे लोकांच्या हाती सोपवतात. हे उत्पादन तुम्ही वापरले नाहीत तर असे होईल, तसे होईल असे काहीच ते लोकांना सांगत बसत नाहीत. त्यामुळे लोकांच्या मानत न्यूनगंड निर्माण होण्याऐवजी आपण आहोत ते चांगले आहोत पण हे उत्पादन वापरून आपण उत्तम बनू शकतो असे त्यांना वाटते. त्यामुळे या उत्पादनात आपल्याला काहीतरी नवीन, काहीतरी उपयुक्त मिळेल असे वाटून लोक हे उत्पादन खरेदी करण्यास प्रवृत्त होतात.

‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे आजच वर्गणीदार व्हा!

माया अंगेलो यांनी असे म्हटले आहे, “तुम्ही काय बोलला होतात हे लोक विसरतील, तुम्ही काय केलेलंत हे सुद्धा लोक कदाचित विसरतील पण तुम्ही लोकांना कशाप्रकारे वागवले होते हे लोक कधीच विसरणार नाहीत!”

आउटबाउंड मार्केटिंग बऱ्याचदा आकर्षक, सुंदर, आनंदी, देखण्या आणि अतिश्रीमंत मॉडेल्सचा वापर करून लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करते. यावर लोकांच्या दोन प्रतिक्रिया असतात, एक म्हणजे नैराश्य (मी हे उत्पादन घेतले काय आणि नाही घेतले काय, मी कधीच त्या मॉडेल्स जितका उत्तम होऊ शकणार नाही) आणि दुसरी म्हणजे काय फरक पडतो? ते कोण आले मला सांगणारे? मला त्या मॉडेल्स सारखे होण्यात काहीच रस नाही.

तसेच इनबाउंड मार्केटर्स लोकांना आपलेसे करतात. जसे आपल्याला काही माहिती हवी आहे का? किंवा आम्ही आपल्याला कोणकोणत्या सुविधा पुरवतो हे मी आपल्याला सांगू का? वगैरे. यामुळे तो व्यवहार कंपनीच्या फायद्या ऐवजी ग्राहककेंद्रित होतो.

आउटबाऊंड मार्केटिंग मध्ये बऱ्याचदा कंपन्यांकडून लोकांवर टीका केली जाते जसे हे उत्पादन तुम्ही वापरले नाहीत तर इतर लोक आपल्या पुढे निघून जातील, वगैरे. इनबाउंड मार्केटिंग मध्ये आपण लोकांना आपल्या उत्पादनाचे फायदे तर सांगतोच पण ते त्यांच्यातील कमतरता भरून काढतील अश्या दृष्टीने नाही तर त्यांच्या प्रगतीमध्ये हातभार लावतील या दृष्टीने सांगतो.

डेल कार्निगी यांनी त्यांच्या ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पिपल’ या पुस्तकातसुद्धा हेच सांगितले आहे, की आपण कधीच कुणावर उगाचच टीका किंवा तक्रार करू नये. हे पुस्तक जरी दहा बारा वर्षे जुनं असलं तरी लोकांशी कसं वागावं हे तर कायम सारखंच राहणार आहे.

आउटबाऊंड असो वा इनबाउंड मार्केटिंग द्वारे आपण लोकांना एखादी गोष्ट पटवून देत असतो. त्यामुळे लोकांना छान, चांगले वाटेल असा मार्ग निवडणे कधीही उपयुक्तच ठरते आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला जे हवे आहे तेच लोक करू लागतात. जसे शिक्षा करण्यापेक्षा बक्षिसांमधून जास्त शिकता येते, त्याप्रमाणे आऊटबाऊंड मार्केटिंग पेक्षा इनबाउंड मार्केटिंग जास्त योग्य ठरते.

– शैवाली बर्वे 


Free Newsletter on WhatsApp

उद्योजकता आणि व्यवसायविषयक माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी ९८३३३१२७६९ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये save करा आणि त्यावर आपले नाव, जिल्हा व तालुका पाठवा.