ध्येय गाठण्यासाठी कसा कराल स्वसंवाद


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


या सदरात आपण उद्योजकांच्या दृष्टीने आवश्यक अशा मनाच्या गुणधर्मांचा व सवयींचा विचार करत आहोत. त्यामध्ये आपण स्वभाव, ध्येय म्हणजे काय, त्यासाठी आराखडा कसा तयार करावा, समस्या निवारण कसे करावे, अशा मुद्द्यांचा विचार केला.

आता आपल्या मनाकडून अगदी सहज घडणाऱ्या, पण परिणामकारक व प्रभाव पाडणाऱ्या सवयीचा विचार करू. ती सवय म्हणजे, प्रत्येक क्षणी आपण करत असलेला स्वसंवाद!

आपण निरनिराळ्या प्रसंगी दुसऱ्याशी बोलतो, विचारतो, हे करत असताना किंवा स्वस्थ बसलेले असताना, आपण दहापट स्वत:शी बोलत असतो. अर्थात, या स्वसंवादाचा आपल्यावर जास्त चांगला किंवा वाईट परिणाम होतो. तुम्ही आताच पाच-दहा मिनिटे शांत बसा व पहा मनात काय चाललंय ते? हे करत असताना तुम्हाला मनात जाणीव होईल.

‘तुम्ही’, तुमच्या मनात कोणते विचार येतात त्यावर लक्ष ठेवा. त्या विचारांबरोबर तुमच्या मनात काही सकारात्मक किंवा नकारात्मक भावना उत्पन्न होतात, त्यावर लक्ष ठेवा. या भावना मग मनाचा कब्जा कसा घेतात ते तुम्हाला कळेल व त्यानुसार स्वसंवादाचे महत्त्व तुमच्या लक्षात येईल.

आपण तोंडाने प्रत्यक्ष बोलत असताना तर मनात समांतर स्वसंवाद सुरूच असतो, परंतु त्याहूनही मोठ्या प्रमाणात तो आपण नुसते बसलेले असताना, काम करताना, टी.व्ही., सिनेमा बघताना व इतर सर्व वेळी चालू असतो.

तुमचे ज्याच्याबरोबर चांगले संबंध नाहीत, त्या व्यक्तीची आठवण जरी झाली तरी तुम्ही त्या व्यक्तीसंबंधी बरीच नकारात्मक, राग, तिरस्कार, टीका यावर आधारित वाक्ये मनात तयार करता, स्वत:ला सांगता, पटवता. तुमच्या मनात विचार व भावनांची गर्दी होते व हजारो निरुपयोगी विचारांमध्ये तुमचा बराच वेळ फुकट जातो.

सिनेमातील दृश्ये किंवा टी.व्ही.वरील बातम्यातील माहिती, संवाद, दृश्ये दु:खाची, संकटाची, निराशेची असतील, तरीही ती खोटी असूनही तुम्ही काल्पनिकरीत्या त्यात रममाण होता, असे आपल्या बाबतीत झाले असेल तर स्वसंवादातून पुन्हा ते प्रसंग अनुभवता किंवा भविष्यात असे काही झाले तर?

या विचाराने चिंतायुक्त स्वसंवाद घडवता. कल्पनाचित्रे उभी करता. आता तुम्ही कल्पना व अंदाज बांधू शकाल, स्वसंवादाच्या व्याप्तीचा, प्रभावाचा व आपण तो किती वेळ करतो व त्याचा काय परिणाम होतो त्याचा.

सवयीनुसार आपल्या मनात स्वत:विषयी, कुटुंबीयांविषयी, शेजाऱ्यांविषयी, कामाविषयी, पैसा, व्यवसाय, धर्म, राजकारणाविषयी असे शेकडो विषय मन व्यापून टाकतात. आपला अनुभव, शिक्षण, बालपण, वाचन, निरीक्षण यानुसार आपला हा स्वसंवाद एका पद्धतीने होत जातो व आपली ती पद्धत किंवा दृष्टिकोऩच बनत जातो.

हुतांश वेळी वाईट, आपत्तीजनक, दु:खी विचारच मनात घर करून राहतात. ही पद्धत जर सकारात्मक नसेल तर मात्र संपूर्ण जीवनाला वेगळीच कलाटणी मिळते. मग निराशा, राग, अपयश, दु:ख अशा गर्तेत माणूस अडकतो. पण, चांगली गोष्ट अशी की, आपण ही गोष्ट व पद्धत वा सवय बदलू शकतो व या स्वसंवादाला सकारात्मक बनवून त्यातून प्रेम, आनंद, उत्साह, आरोग्य, यश असे परिणाम साधू शकतो.

आपोआप मनात उमटणाऱ्या विचार व भावनांना आपण प्रतिबंध करू शकत नाही; पण सवयीने, प्रयत्नाने, निर्धाराने काही वेगळे सकारात्मक, विधायक, उपयोगी विचार परत-परत मनात आणणे व रुजविणे हा यावर उपाय आहे. जशी तुम्ही मुद्दाम करत असलेल्या विचारांची तीव्रता व संख्या वाढेल, तसा आपोआप निर्माण होणाऱ्या विचारांचा पगडा कमी होईल.

असे करण्यासाठी स्वसंवादाची भाषा, विषय, विचार, वाक्ये व शब्द निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक क्षणाला आपण कुठल्या बाजूचा, प्रकारचा विचार व संवाद करायचा, हे मनाला सांगू शकतो. सकारात्मक की नकारात्मक?

तर मित्रांनो, जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत व प्रसंगांत मनाच्या मनाशी होणाऱ्या संवादात कोणते विचार व कोणता शब्दसंग्रह वापरायचा तेच पाहू.

ध्येय गाठण्याच्या बाबतीत आत्मविश्वासपूर्ण शब्द वापरायला हवेत. मी अमुक गोष्ट करू शकतो, माझी प्रगती होत आहे, सर्व आवश्यक सुधारणा मी करू शकतो, मला अनेक जण मदत करतात, अशा अर्थाची वाक्ये स्वत:शी बोलायला हवीत.

ध्येय गाठण्याच्या प्रवासातील टप्पे, काही संख्या, रक्कमा, तारखा, मोठे ग्राहक, मोठी ऑर्डर यांचे स्मरण व विचार मुद्दाम वारंवार करायला हवा. यश मिळाल्यावर हुरळून न जाता, ज्यांनी त्यात मदत केली त्या सर्वांसंबंधी कृतज्ञतेचा भाव ठेवून सर्वांना श्रेय वाटून दयायला हवे, त्यांचे आभार मानायला हवेत.

पुढील ध्येय आत्मविश्वासाने ठरवून त्याचा आराखडा तयार करायला हवा. आपण समाजाच्या व गरजूंच्या मदतीसाठी काय करू शकतो तेही ठरवायला हवे. जेव्हा तुम्ही जास्त यशस्वी होता तेव्हा अधिकाधिक नम्र व्हायला हवे.

आपले कौतुक होत असताना आपण केलेले श्रम महत्वाचे असले तरी हजारो-लाखो लोकांमधून आपल्याला ही संधी मिळाली, तसेच इतरांचे सहकार्य मिळाले, हे मनात ठेवावे. इतरांविषयी मनात कौतुक व प्रेमाची भावना ठेवावी, त्यांचेही यथोचित कौतुक व सत्कार करावेत.

स्पर्धा, ईर्षा, द्वेष अशा भावनांना थारा देऊ नये. आपण जे काम करत आहोत ते बरोबर असल्याची ही पावती आहे, म्हणून आपण हे काम अधिक चांगल्या रीतीने केले पाहिजे, असा विचार करावा. नवीन विषय, ग्राहक, बाजार, व्यवस्था, उत्पादन, पद्धती यांचा अभ्यास करत असताना ह्यामागील उद्देश, आपले ध्येय व आपल्याबरोबरच्या सर्वांची प्रगती हे विचार मनात करावेत.

उद्देश सकारात्मक व विधायक असेल तर मनाची एकाग्रता लवकर साधते व त्यामुळे कल्पनाशक्तीलाही प्रचंड वाव मिळतो. त्यामुळे नवीन कार्यनिर्मिती व समस्या निवारण त्वरित होते. ज्ञान मिळविण्यासाठी प्रेम, नम्रता, कृतज्ञता, सहकार्याची भावना मनात रुजविणे गरजेचे आहे. मला हवी असलेली सर्व माहिती, मदत मला उपलब्ध आहे, हे विश्वासाने मनात ठसवावे.

मेहनत व कष्ट करत असताना चिडचिड, राग, भांडणे टाळावीत. त्याने मानसिक ऊर्जेचा अपव्यय होतो. त्याऐवजी मनात आपल्या धेयाचे विचार असावेत. आपली मेहनत आपल्याला ध्येयपूर्तीच्या जवळ नेत असल्याचा विश्वास बाळगावा. कष्ट करत असताना काही कामे झाल्यावर स्वत:ला शाबासकी द्यावी, आनंद साजरा करावा, संबंधित इतरांना तुमच्या कामगिरीविषयी व ध्येयाविषयी सांगावे, त्यांचे मार्गदर्शन व मदत घ्यावी.

आपल्याबरोबर काम करणाऱ्यास सहकाऱ्यांचेही कौतुक करून विचारपूस करावी. त्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे. एखाद्या वेळी निराशा येत असेल तर त्याचे कारण शोधून त्याची जबाबदारी स्वत: घेऊन आवश्यक विचार-विश्लेणषण करावे. सर्व व्यक्तींना कधी तरी अपयश येऊ शकते; पण आपण त्याचा बाऊ न करता ठामपणे त्याचा मुकाबला करणे गरजेचे व शक्य असते.

ध्येयाचे चित्र नजरेसमोर आणून आपल्या ध्येयाचाच जप करावा. निराशा आल्याने कोणतीही समस्या सुटणार नाही, उलट उत्साहाने, नवीन उमेदीने कामाला लागल्यासच काही मार्ग सापडू शकेल हे मनाला पटवावे. जवळच्या लोकांशी बोलून ताण हलका करावा. आवश्यक अभ्यास करून गरज वाटेल तिथे मदत घ्यावी.

अपमान व रागाचे प्रसंग आले असता त्वरित त्या व्यक्तीला माफ करून आपल्या मनातून तो प्रसंग काढून टाकावा. एखाद्या प्रसंगासाठी कायमचे त्या व्यक्तीला दोषी धरू नये, तर फक्त आवश्यक तो बोध घ्यावा, सुधारणा करावी, परत तसे होणार नाही याची काळजी घ्यावी.

तुम्ही रागावून व चिडून समोरचा माणूस बदलत नाही, तुमचेच नुकसान होते, हे जेवढे लवकर मनात ठसेल, तेवढे लवकर आपण यशाच्या जवळ पोहोचू. अपयश व संकट आले असता, असे मलाच का झाले, कोणामुळे झाले, किती मोठी समस्या आहे, आता काही खरे नाही, मी संपलो असे विचार करण्याऐवजी, विचार करून अपयशाची कारणे शोधावीत व त्यावर उपाययोजना करावी. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

अपराधीपणाची व हरल्याची भावना ठेवू नये. ध्येयाचा पुढील प्रवास कसा करायचा त्याचा आराखडा पुन्हा बनवावा. सहकाऱ्यांना, ग्राहकांना, पुरवठादारांना, कुटुंबीयांना, मित्रांना विश्वासात घेऊन परिस्थिती सांगावी व पुढील योजनेसाठी त्यांचे सहकार्य घ्यावे.

जगात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, जसे की जागा, कच्चा माल, ऊर्जा, पैसा, मदत करणारी माणसं, कल्पना, सल्ला, वगैरे. तर, कोणत्याही कमतरतेचे वा चणचणीचे विचार मनात आणण्याऐवजी, सर्वत्र सुबत्ता आहे व मला काय हवे ते नक्की ठरवण्याचीच फक्त गरज आहे, हे सत्य मनात बिंबवावे.

आपली योजना तयार असेल, तर त्यानुसार काम केले असता, यश नक्की मिळते, ध्येयपूर्ती नक्की होते. कमी-अधिक वेळ लागला तरी आपण आपले ध्येय व काम मध्येच सोडून देता कामा नये. हा लेख वाचत असताना, तुमचा कुठला स्वसंवाद चालू होता? करताय ना विचार? लेख परत वाचा आणि तुमचं मन पहा तपासून!

– सतीश रानडे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?