अवघ्या ४ वर्षात कुल्फीचे २२५ आऊटलेट उभे करणारा उद्योजक

आपण जेव्हा सुखी, समाधानी आणि उत्साही असतो तेव्हा थंडगार आईस्क्रीम, कुल्फीची चव चाखून आपला हा आनंद आणखी द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपण जेव्हा दु:खी, निराश असतो तेव्हा कधी आईस्क्रीम, कुल्फी खात नाही.

मी हाच विचार डोळ्यासमोर ठेवला आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद निर्माण व्हावा म्हणून ‘लाडाची कुल्फी’ या नावाने माझ्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला, असे राहुल शिवाजी पापळ हा उत्साही तरुण उद्योजक मला सांगत होता. त्याचा हा विचार मला खूपच भावला आणि आमच्या गप्पा रंगल्या.

निराशेवर मात

गेली दोन वर्षं कोरोनारूपी निराशेच्या ढगांनी सारा आसमंत व्यापून गेला होता. मात्र या निराशेला मी माझ्या जवळ येऊ दिले नाही. याच काळात आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर काम केले. सन २०१८ पासून आजपर्यंत ‘लाडाच्या कुल्फी’च्या २२५ शाखा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आम्ही चालू केल्या.

ज माझ्याकडे शेकडो व्यावसायिक आम्हाला तुमची फ्रँचायजी द्या, अशी मागणी करीत आहेत. हे सांगताना राहुलच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. ‘लाडाची कुल्फी’ या त्याच्या व्यवसायाबाबत मोकळेपणाने बोलताना राहुल म्हणाला, ७ एप्रिल २०१८ ला पुण्यातील गरवारे महाविद्यालयाजवळ माझे पहिले आऊटलेट चालू झाले.

यानंतर मी कधी मागे वळून बघितलेच नाही. पुण्यात सध्या माझे ३२ आऊटलेट आहेत. कोल्हापूर परिसरात २६ त्याचबरोबर सातारा, सांगली, बेळगाव आणि महाराष्ट्रातील लहान, मोठ्या शहरात मिळून २२५ आऊटलेट आज प्रत्यक्ष चालू आहेत.

आमच्या कुल्फीची आऊटलेट वातानुकूलित आहेत. आज भारतात सर्वात मोठ्या कुल्फी चैनमध्ये आमचा पहिला नंबर लागतो याचा आम्हाला अभिमान आहे. काही आऊटलेट फिरती आहेत त्यांना आम्ही फूड ट्रक असे म्हणतो. या गाड्या शहराच्या विविध भागात फिरत असतात.

कोल्हापूर, मुंबई, बार्शी, पिंपरी-चिंचवड उस्मानाबाद अशा विविध ठिकाणी आमचे वितरक आहेत. तेथे आम्ही रोज मागणीनुसार आमची उत्पादने पाठवतो. तेथून ती जवळपासच्या शाखांमध्ये पाठवली जातात. फ्रँचायजी देताना आम्ही ठिकाण (स्पॉट), पार्किंग व्यवस्था याला महत्त्व देतो.

जी व्यक्ती गरजू आहे आणि स्वत: व्यवसाय करणार आहे त्यांना आमचे प्राधान्य असते. ‘लाडाची कुल्फी’ची सध्या ५४ पेक्षा अधिक निरनिराळी उत्पादने आहेत. त्यामध्ये कुल्फीचे विविध प्रकार, आईस्क्रीमचे बारा प्रकार, पाच प्रकारच्या मस्तानी, फालुदा यांचा समावेश आहे.

दररोज आम्हाला दोन हजार लिटर म्हशीचे दूध लागते. नोव्हेंबर ते जून या सिझनच्या काळात हे प्रमाण चार, पाच हजार लिटरपर्यंत जाते. हे सगळे दूध आम्ही पुण्याच्या ग्रामीण भागातून थेट गवळ्यांकडून खरेदी करतो. याचे कारण यामध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते.

आईस्क्रीम हे भारतीय नाही. कुल्फी अस्सल देशी आहे. कुल्फी ही घट्ट असते. आईस्क्रीममध्ये हवा आणि इसेन्सचे प्रमाण अधिक असते. कुल्फी ही तब्येतीला चांगली ती बाधत नाही.

कात्रजला आमचा उत्पादन प्रकल्प आहे. तो सेमी ऑटोमॅटीक आहे. आमच्या व्यवसायात आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे त्यामुळे बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवणे सोपे जाते. उत्पादनांचा दर्जा आणि स्पर्धात्मक दर यावर आमचे बारीक लक्ष असते. यामध्ये आम्ही कधी तडजोड करत नाही. म्हणूनच ‘लाडाची कुल्फी’ला ग्राहकांनी आपली पसंती दिली आहे.

लवकरच देशात परदेशात आम्हाला विस्तार करायचा आहे. सन २०२३-२४ मध्ये ‘लाडाची कुल्फी’ परदेशात जाईल. तर सन २०२५ व २०२६ मध्ये आम्हाला शेअर बाजारात आमची नोंदणी (आयपीओ) करायची आहे.

‘आर. एस. पापळ मार्केटिंग प्रा. लि.’ या नावाने आमचा व्यवसाय सुरू आहे. मी स्वत:, माझी आई, पत्नी अक्षदा कंपनीचे कामकाज पाहतो. माझी लहान मुलगी ‘लाडाची कुल्फी’ची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर आहे.

राहुल हा अस्सल पुणेकर. पुण्यात बिबवेवाडीमध्ये त्याचे बालपण गेले. लहानपणापासून अभ्यासात तो फारसा रमला नाही. सिताराम आबाजी बिबवे या गावातील शाळेत त्याचे सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. इयत्ता आठवीच्या त्याने दोन, तीन वार्‍या केल्या, पणं त्याला यश आले नाही. मग त्याने शिक्षणाचा नाद सोडून दिला.

घरची आर्थिक परिस्थिती बेतासबात असल्याने राहुलच्या आईने घरीच फुलांचे हार करणे, धुणंभांडी अशी अनेक कष्टाची कामे करून आपल्या घराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला. मदतीचा हात दिला. दोन्ही मुलांवर चांगले संस्कार केले.

अभ्यासात न रमलेल्या राहुलने काही काळ आईस्क्रीमच्या दुकानात तसेच औषधाच्या देवाणघेवाणीचे काम केले. यात मन रमेना म्हणून मग स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आईस्क्रीमच्या दुकानातील अनुभव पाठीशी होताच.

या व्यवसायातील खाचाखोचा त्याने समजून घेतल्या. पाचशे रुपये भांडवलावर त्याने आईस्क्रीम व्यवसायात पदार्पण केले. या व्यवसायात काहीतरी नवीन करायला हवे, हा विचार त्याला स्वस्थ बसून देत नव्हता. यामध्ये चार वर्षे गेली.

अखेर २०१८ मध्ये त्याला मार्ग सापडला आणि ‘लाडाची कुल्फी’ या नव्या ब्रॅण्डचा जन्म झाला. महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे प्रेरणास्थान. त्यामुळे लहानपणापासून गडकिल्ल्यांवर भटकंती करण्याची त्याला मनापासून आवड.

या भटकंतीमधूनच तो खूप काही शिकला. महाराजांच्या या सच्च्या मावळ्याला गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याची मनापासून इच्छा आहे. भविष्यात काही गडकिल्ले दत्तक घेण्याचा त्याचा मानस आहे. यासाठी तो व्यवसायातील काही रक्कम आतापासून (सीएसआर फंड) बाजूला ठेवत आहे. त्याचा हा आगळावेगळा विचार मला खूपच आवडला.

कोणीतरी मिसळ, चहाचे दुकान सुरू केले म्हणून आपण तसे करू नये. कोणताही उद्योग, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करायला हवा. त्यामधील खाचखळगे समजून घ्यायला हवेत. कष्ट करण्याची तयारी हवी.

कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा म्हणजे अपयश, निराशा आपल्या आजूबाजूला फिरकत नाही असे सांगत राहुल म्हणाला, मी नेहमी विचार करतो आपण लहानपणी कोठे होतो आणि आज कोठे पोहोचलो आहोत.

पैशाच्या मागे मी कधीच धावत नाही. ‘समाधान’ या चार शब्दांना मी नेहमी महत्त्व देतो. दैनंदिन उद्योग, व्यवसायातून वेळ काढून मी गड, किल्ल्यांवर भटकंती करायला नेहमी जातो. ही माझी आवड आवर्जून जपतो.

राहुल हा फार शिकलेला नाही, पण त्याचे विचार आणि कृती ही एखाद्या उच्चशिक्षितालादेखील लाजवणारी आहे. राहुलसारख्या गुणी आणि उत्साही तरुण उद्योजकाला बघितले की आगामी काळात मराठी माणूस उद्योग व्यवसायात नक्कीच आपले वेगळे स्थान निर्माण करील असा विश्वास वाटतो.

प्रतिकुल परिस्थितीतदेखील न डगमगता आपल्या उद्योग, व्यवसायाची पताका महाराष्ट्रात फडकवणार्‍या राहुल पापळ या अस्सल मावळ्याला मन:पूर्वक शुभेच्छा.

– प्रसाद घारे

संपर्क : राहुल पापळ – rahulpapal@yahoo.com

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?