आयुर्वेदिक मुखवास एक वेगळा स्टार्टअप. ‘गायत्री मुखवास’ या नावाने २०१३ साली उद्योग सुरू झाला. लग्नानंतर बारा वर्षांनी नोकरी करणे अशक्य होते.
काही तरी सुरुवात करायची होती. शिवाय घरातून नोकरी करण्यास विरोध होता व व्यवसाय करण्यासाठीही विरोध होता, परंतु मुलं आणि घर सांभाळून उद्योग करेन, असे घरच्यांना आश्वासन देऊन घरूनच छोटी सुरुवात केली.
सुरुवातीला घरच्यांसाठी विविध प्रकारचे मुखवास बनवायचे. ते आम्ही घरात खात असताना पोटासाठी खूप फायदेशीर आहेत हे जाणवले म्हणून मी माझ्या नातेवाईकांना, मैत्रिणींनाही बनवून दिला. त्यांना ते खूप आवडले.
मुख्य म्हणजे त्यांच्या पोटाचे विकार, अॅसिडिटी, अपचन, मूळव्याध असे त्रास बंद झाले. हळूहळू याचा फायदा घेणारे प्रत्येक जण वेगवेगळा फायदा सांगायला लागले. यातूनच मला दिशा मिळाली. मी नेहमी म्हणायचे, मला सर्वांपेक्षा वेगळं काही तरी करायचं आहे. मला मात्र ते कळत नव्हते, नक्की काय करायचं आहे.
मी माझ्या उद्योगाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात दोन वर्षे मी साध्या पिशवीतून पॅकिंग करून मुखवास देत होते. चांगल्या दर्जामुळे एकदा खाणारा माझा कायमस्वरूपी ग्राहक म्हणून बांधला जात होता. यातूनच मी माझे मुखवासाचे प्रकार विविध दुकांनात ठेवतील का याची चौकशी केली.
काही दुकानदारांनी याला पसंती दिली आणि माझे मुखवास दुकानात ठेवले गेले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. तोपर्यंत मी हे सर्व घरूनच करत होते.
मुखवास सुरुवातीला मी लहान दुकानांतून ठेवले होते. जेव्हा मी त्यापुढे जाऊन जरा मोठ्या दुकानांमध्ये मुखवास ठेवण्यासाठी विचारले असता मुखवासाचा दर्जा आवडला, परंतु पॅकेजिंग कमर्शिअल हवे. मग मी ठरवले आता आपण आपला ब्रँड तयार करावा.
मी ब्रँड बनवला. नवर्याचा विरोध झाला. मग मी ठरवले मी चुकीचे काही करत नाही, त्यामुळे विरोध मनात धरून कुढत बसण्यापेक्षा काही तरी मार्ग काढावा. मुखवास खाणारा प्रत्येक जण मला बोलला, तू हे चांगलं काम करते आहेत ते तू थांबवू नकोस.
मी २०१५ डिसेंबरला मशीन घेऊन आले व प्रिटेड, पॅकेट हे सर्व जुळवून दोन दिवसांत घरात आले. मिस्टरांना मी सरप्राइज देणार असे सांगून ठेवले होते. मी पोस्टात पाच वर्षे टाकलेले पैसे मला त्या वेळी मिळाले १ लाख १० हजार व मैत्रिणींनी १ लाख ५० हजार दिले.
त्यानंतर सर्व बघून मग मिस्टरांनीसुद्धा मदत केली; पण आज मी त्यांचे आभार मानते त्यांनी विरोध केला, मदत केली नाही म्हणून मला माझी ताकद समजली. घर, मुलं बघून व्यवसाय करू शकले. मी सुरुवात घरातूनच केली, पण आज खूप समाधानी आहे.
बी.ए.पर्यंत माझे शिक्षण सातार्यात झाले. लग्नानंतर एक वर्षानी मुंबईत आले. कॉलेजमध्ये शिकताना हॉस्टेलवर असताना भविष्याबद्दल पाहिलेली स्वप्नं मला स्वस्थ बसू देईना, पण मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुलं झाली आणि पुढे एक वर्ष काहीच करता आले नाही.
आणखी वीस वर्षांनी मी काहीच केले नाही, हा मनस्ताप व्हायला नको म्हणून चूक असो की बरोबर, पण धडपडत राहायचे ठरवले. त्या दहा वर्षांत डोके कधीच शांत नव्हते म्हणून चांगला मार्ग मिळाला.
व्यवसायाची नोंदणी २०१३ साली केली ती ‘मे. पॉझिटिव्ह लाइफ’ या नावाने. प्रॉडक्टला नाव दिले ‘गायत्री’ आयुर्वेदिक मुखवास. मुलं शाळेत गेली की, घरातली सर्व कामे आवरून वेळेत पूर्ण करते. मुलं एकाच वयाची असल्यामुळे त्याच्या सर्व अॅेक्टिव्हिटीज, अभ्यास, शाळा हे सांभाळायला सोपं जातं. मग ११ ते ६ या वेळेत माझं मुखवासाचं काम करते.
व्यवसायवाढीसाठी मी विक्रेते मिळवत आहे. माझ्याकडे ग्राइंडर, पॅकिंग मशीन, वजनकाटा यांचा वापर करून एक तासाला सध्या तरी तीस किलो मुखवास बनवला आहे. पॅकेट पॅकिंग मशिन पाचशे पॅकेट्स बनवू शकते. फंडिंगच्या दृष्टीने नवीन मशीन घेण्यासाठी मी कर्जाचा विचार सध्या करत आहे.
पाच वर्षांत मला १ हजार लोकांना रोजगार द्यायचा आहे व अपचनाच्या त्रासापासून लाखो-करोडो लोकांना मुक्ती द्यायची आहे. सर्व आजार पोटातून होतात. पोट व्यवस्थित साफ होत असेल, तर आजारपण कमी होईल. कंपनी मोठी करण्यासाठी जागेची व्यवस्था गावी केली आहे.
– सानिका गोळे
९०२९४८८४८८
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.