बालपण तसं कष्टातच गेलेलं आहे. वडील माझे BEST मध्ये होते. आम्ही परळमध्ये बेस्ट क्वार्टर्समध्ये राहत होतो. पुढे त्यांनी लवकरच नोकरी सोडली. नोकरी सोडल्यामुळे क्वार्टर्सही सोडावी लागली. मग आम्ही विक्रोळीला एक पडीक जागा घेऊन तिथे राहू लागतो. नोकरीला कोणी नसल्यामुळे घराची स्थिती हलाखीची होती.
आईने बरीचशी कामं केली. भाजीचा व्यवसाय करत होती. इतर कामे चालू होती. आम्ही भावंडं जाणत्या वयात आलो तसे इंडस्ट्रियल एरियामध्ये मिळेल ती छोटी-मोठी कामं करू लागलो. तीन बहिणी आणि तीन भाऊ अशी आम्ही भावंडं. पुढे भावाला नोकरी लागली आणि आम्ही थोडे थोडे स्थिरस्थावर होत गेलो. त्यानेच आमचं शिक्षण आणि लग्नकार्य केलं.
अनुराधा माने पुढे मला सरकारी नोकरी लागली. माझे पतीसुद्धा बेस्टमध्येच असल्याने परळमध्येच बेस्ट क्वार्टर्स राहायला मिळाल्या. घरात व्यवसायाची पार्श्वभूमी अजिबात नव्हती, पण आर्थिक गरजेपोटी नोकरीसोबत काही ना काही व्यवसाय करायला सुरुवात केली. भाड्याने दुकान घेऊन आपल्याला चालवता येतं का हे पाहावं, असा विचार केला. एक गरजवंत बाई भेटली. तिला दुकानाची डागडुजी करायला पैशांची गरज होती. मी तिला ते दिले.
त्या मोबदल्यात तिने मला वर्षभर ते दुकान चालवायला दिलं. वर्षभर नोकरीसोबत मी दुकान चालवून पाहिलं. दुकानात टिकल्या, बांगड्या, मोत्याचे दागिने वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी विकायला सुरुवात केली. मला नोकरीसोबत व्यावसायिक शिक्षण घेण्याचीही आवड होती. मोत्यांचे दागिने करायला शिकले. दुकान चालवायला घेतलं तेव्हा दुकानात आणि घरीसुद्धा मुलांना मोत्यांचे दागिनेही शिकवायला सुरुवात केली.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
हळूहळू मुलं वाढत गेली. मोत्यांच्या दागिन्यांसोबत ग्लास पेंटिंग, स्वॉफ्ट टॉइज, फॅब्रिक पेंटिंग्स, पर्सेस, जरदोसी वर्क, शोभेची विविध फुले अशा वेगवेगळ्या गोष्टी मी शिकले आणि गरजू होतकरू महिलांना शिकवू लागले, जेणेकरून त्यादेखील स्वत:च्या घराला आर्थिक हातभार लावू शकल्या. यासाठी लागणारा कच्चा माल माझ्या दुकानातच विकायला ठेवला.
एकूणच वाढत्या व्यापामुळे दुकान कमी पडू लागलं. मग दुसरं दुकान भाड्याने घेतलं. मोठा गाळा भाड्याने घेता घेता छोटा गाळा मी स्वत: विकत घेतला आणि मग छोट्या गाळ्यामध्ये मी माझा स्वत:चा व्यवसाय पुन्हा नव्या दमाने सुरू केला.
पुढे महापालिकेच्या धोरणानुसार गाळे तुटणार असे कानावर आले. एकदा गाळा तुटला की, नवीन कधी मिळेल याची खात्री नाही. त्याच दरम्यान मुलीच्या शिक्षणासाठीही पैशांची गरज होती. त्यामुळे तो गाळा विकण्याचा निर्णय घेतला.
गाळ्याचे आलेले पैसे मुलीच्या शिक्षणात खर्च झाले आणि उरलेले जमिनीत गुंतवले. सन २०१३ मध्ये काही महिलांना एकत्र करून आम्ही ‘अविरत महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था’ स्थापन करून संस्थेच्या माध्यमातून ‘अविरत रूचकर मसाले’ या नावाने मसाले आणि दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात केली. विविध प्रदर्शनांमध्ये आम्ही भाग घेऊ लागलो. त्यातून आमचा ‘अविरत रुचकर मसाले’ हा ब्रॅण्ड लोकांपर्यंत पोहोचू लागला.
मात्र दुर्दैवाने महिलांचा यातला सहभाग दिवसेंदिवस कमी कमी होऊ लागला आणि एक दिवस आमचं उत्पादन आम्हाला बंद करावं लागलं. पुढे २००६ साली माझे पती वारले. त्यांच्यामागे सगळा डोलारा माझ्यावर आला. बेस्टच्या क्वार्टर्समध्ये राहत असल्यामुळे हक्काचं असं डोक्यावर छप्परही नव्हतं. माझ्या सर्व्हिस आणि फंडाव्यतिरिक्त थोडं कर्ज काढून परळ भागातच स्वत:चं घर घेतलं.
निवृत्तीनंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, कारण सुरुवातीपासून उद्योजकतेची ऊर्मी मनात होतीच, पण परिस्थितीच्या दोलायमान स्थितीमुळे त्याकडे कधीच पूर्ण लक्ष देता आलेलं नव्हतं. आता मुलांची शिक्षणं होऊन ती आपापल्या करीअरमध्ये स्थिरस्थावर होत होती. त्यामुळे मी पुन्हा माझ्या उद्योजकीय जीवनाला सुरुवात करण्यात काहीच अडचण नव्हती.
‘अविरत मसाले’ लोगो काय सुरू करावे, असा विचार करताना मनात आले ते मसालेच. मात्र या वेळी मला व्यवसायाला छोटेखानी न ठेवता एका मोठ्या स्तरावर न्यायचे होते. मुलाला सोबत घेऊन ‘निर्मिती इन्होव्हेंचर्स’ नावाने एल.एल.पी. कंपनी स्थापन केली. ब्रॅण्डच्या नावाचा विचार करता मनात तेच नाव आलं जे या आधी लोकांच्या मनात बसलेलं – अविरत मसाले.
मसाल्यांचे उद्योग बरेच जण करतात. यामध्ये ब्रॅण्डही नावारूपाला आले आहेत. त्यामुळे आपल्या मसाल्यांमध्ये काही तरी वेगळं असावं, ज्यासाठी लोकांच्या मनात ‘अविरत’ हे नाव कायम घर करून राहील. आमच्या मसाल्यांमध्ये आम्ही ‘घाटी मसाला’ यावर अधिक संशोधन केले. मी जन्माने घाटावरची नसले तरी सासर घाटावरचे. घरात घाटी मसालाच तयार व्हायचा, त्यामुळे आपसूकच सासूबाईंकडून घाटी मसाला शिकला जाई.
पुढे माझे स्वत:चे काही कसब लावून अधिक रूचकर घाटी मसाला तयार केला, जेणेकरून हा मसाला फक्त प्रादेशिक न राहता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात वापरला जाऊ शकेल. कांदा, खोबरे, लसणाचा वापर करून बनवलेला हा मसाला लोकांना खूप आवडू लागला. मालवणी किंवा अन्य मसाले वापरणार्या आमच्या ग्राहकांना आम्ही तयार केलेला हा वैशिष्ट्यपूर्ण घाटी मसाला आवडू लागला.
रोजच्या मसाल्यांसोबत ते या मसाल्याचाही वापर करू लागले. ‘झी मराठी’च्या ‘आम्ही सारे खवैय्ये’ कार्यक्रमात अनुराधा माने घाटी मसाल्यापासून ‘अविरत मसाले’ची घोडदौड पुन्हा सुरू झाली. पुढे निरनिराळे मसाले आणि पिठं यांची वाढ करत गेले. आज परळमध्येच भाड्याच्या जागेत माझा उद्योग सुरू आहे. मसाल्यांच्या क्षेत्रात स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेे; पण मला ‘अविरत’चे वैशिष्ट्यपूर्ण मसाले महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवायचे आहेत.
या कामात मी नियमित वितरणासह अनेक गरजू महिलांना जोडणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही कोपर्यातील गरजू महिलेने मला संपर्क केला, तर तिला घरबसल्या हा व्यवसाय सुरू करून देण्याला मी सहकार्य करणार आहे. ई-कॉमर्ससारख्या अत्याधुनिक माध्यमातूनही मी मसाले विकणार आहे. उत्तरायुष्यात सुरू केलेला हा व्यवसाय उत्तरोत्तर खूप मोठा करण्याचे माझे मनापासून प्रयत्न आहेत.
– अनुराधा माने
९८६९९८९६६१
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.