कथा उद्योजकांच्या

कृषी विद्यापीठ ते स्वत:ची आयएसओ प्रमाणित कंपनी

Advertisement

शाळेत असताना काहीसा ‘ढ’ असलेला, इंग्रजीची भयामुळे कायम मागे-मागे राहणारा सुनील शाळेच्या सहलीसाठी एकदा दापोलीच्या कृषी महाविद्यालयात गेला. कोकणातल्या गुहागर तालुक्यातल्या चिखली या खेडेगावात वाढलेला सुनील कानसेने त्या वयात जेव्हा करिअर वगैरे कशाचाही विचार नव्हता, त्याने आपणही याच महाविद्यालयात शिकायचं असं स्वप्न पाहिलं.

सहलीवरून घरी परतल्यावर आपल्या बाबांना ते स्वप्न सांगितलं…

बाबा मुंबईला ‘शुश्रूषा’मध्ये नोकरी करत होते. मुलाचं दापोली कृषी महाविद्यालयात शिकण्याचं स्वप्न सत्यात उतरवायचं असा बाबांनीही निश्चय केला. कोकणातून येणार्‍या प्रत्येक रुग्णाकडे ते चौकशी करू लागले.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://rzp.io/l/smartudyojak


दापोलीच्या त्या महाविद्यालयातले एक प्राध्यापक ‘शुश्रूषा’मध्ये औषधोपचारासाठी आले असताना सुनीलच्या वडिलांनी आपल्या मुलाची ईच्छा त्यांना सांगितली. त्यांनीही सहकार्य करण्याची तयारी दाखवली. पुढे त्यांना भेटून त्यांच्याकडून महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याची सगळी प्रक्रिया समजून घेतली. सुनीलने हा प्रवेश मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि अखेर कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवला.

इंग्रजीची अडचणीमुळे सुनीलला सुरुवातीला सगळं अवघड जाऊ लागलं, पण यामुळे त्याची गती मंदावली नाही. जे इतरांना एकदा वाचून कळत, ते कळायला सुनीलला ते दोन-तीन वेळा वाचावे लागे. पण सुनीलने हार मानली नाही. इतरांपेक्षा जास्त मेहनत करून त्याने फार लवकरच इंग्रजीच्या समस्येवर मात केली.

शिक्षण पूर्ण करून पनवेलजवळ एका मळ्यावर सुनील परीक्षक म्हणून नोकरीवर लागला.

ओसाड पडलेल्या त्या मळ्याला सुनीलने कष्टाने बहारदार केले. त्याचा मालकही त्याच्यावर खुश होता. एक दिवस त्या मालकाचा एक मित्र काही कामानिमित्त त्या मळ्यावर आला होता. सुनीलने कष्टाने उभे केलेले ते नंदनवन पाहून तोही खूप खुश झाला. त्याने सुनीलला मुंबईला आपल्याकडे एका प्रकल्पावर नोकरीसाठी मोठ्या पगाराची ऑफर दिली. सुनीलचे सध्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले होते. एका पडीक जमिनीला नंदनवनात त्याने परावर्तीत केले होते. त्याने धाडस करून ही संधी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मुंबईला वडिलांची छोटी झोपडी होतीच. तिथे सुनील आला.

दुसर्‍या दिवशी त्या माणसाच्या कार्डवरील पत्त्यावर जाऊन सुनील त्याला भेटला, पण आता परिस्थिती बदलली होती. ज्या कामासाठी त्याने सुनीलला मुंबईला बोलवले होते. ते काम तो सुनीलला देऊ शकत नव्हता. सुनील रोज त्याच्या कार्यालयात जाऊन बसून राही. घरी सत्य सांगण्याची त्याला हिंमत होत नव्हती. सुनील निराशेच्या गर्तेत जाऊ लागला. सुनीलचा एक मित्र पेस्ट कंट्रोल कंपनीमध्ये टेक्निशन म्हणून काम करत होता. त्याने सुनीलला आपल्याकडे टेक्निशन म्हणून नोकरीवर यायला सांगितले.

सुनीलकडे काहीच पर्याय नव्हता आणि अशाप्रकारे अपघाताने पेस्ट कंट्रोल या क्षेत्रात सुनीलचे पदार्पण झाले. कदाचीत यालाच नियती म्हणत असावे, कारण त्याने अपघाताने उचललेल्या या एका पाऊलामुळेच तो आज पेस्ट कंट्रोल क्षेत्रात एका आयएसओ मानांकित प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मालक आहे.

सुनील मित्रासोबत पेस्ट कंट्रोल कंपनीत नोकरीवर रुजू झाला.

टेक्निशन म्हणून सुरुवात केली तरी सुनील त्या क्षेत्रातील सगळी कामे शिकला. पुढे एका व्यक्तीने पेस्ट कंट्रोल क्षेत्रातच नवी कंपनी सुरू केली. त्याने सुनील व दुसर्‍या एकाला नव्या कंपनीचा संपूर्ण रचना व व्यवस्था लावण्यासाठी बोलावले. सुनीललाही सुरू असलेल्या नोकरीपेक्षा हे नवीन व कसोटीचे वाटले. सुनीलने त्याचे निमंत्रण स्वीकारले.

‘लोटस पेस्ट कंट्रोल’ नावाने स्थापन केलेल्या त्यांच्या या नव्या फर्मने अल्पावधीतच धंद्यात चांगला जमवला. ठाणे व अंधेरी अशा दोन शाखा सुरू झाल्या. ग्राहकसंख्याही वाढत गेली. ‘अर्थसंकेत’ या संकेतस्थळातर्फे देण्यात येणारा स्टार्टअप पुरस्कारही या संस्थापक द्वयीला मिळाला. पण पुढे काही कारणांमुळे ही भागीदारी संपुष्टात आली.

सुनीलने आता एकट्याने प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सतीश रानडे यांनी त्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले त्यामुळे या कठीण प्रसंगी तो शांतपणे ठोस निर्णय घेऊ शकला, हे सुनील आवर्जून सांगतो. सुनीलने ‘शिल्ड इंडिया’ नावाने स्वतःची एकल मालकी तत्त्वावरील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. या कंपनीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. मुंबईत अंधेरी व बोरिवली या ठिकाणी कंपनीच्या दोन शाखा आहेत. ‘कार्निव्हल सिनेमा’ची मुंबईतील सर्व चित्रपटगृहे, एस.एम.इ. क्षेत्रातील कंपन्या व अनेक कुटुंबे आज सुनील कानसेच्या ‘शिल्ड इंडिया’ची सेवा घेत आहेत.

कृषी महाविद्यालयातील शिक्षण ते स्वतःची आयएसओ मानांकित कंपनी असा यशस्वी प्रवास 35 वर्षांच्या सुनीलने आतापर्यंत केला आहे. कोकणातील एका खेडेगावातून आलेल्या सुनील कानसे (8451047073) या मराठी उद्योजकाचे नाव पुढील बारा ते पंधरा वर्षांत पेस्ट कंट्रोल क्षेत्रातील अग्रगण्य नावांमध्ये घेतले जाईल यात शंका नाही.

– शैलेश राजपूत
(लेखक स्मार्ट उद्योजक मासिकाचे संपादक आहेत)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!