प्रादेशिक भाषेतून अकाउंटिंग सॉफ्टवेअर निर्माण करणारे मंत्री दाम्पत्य

डॉल्फिन युनिसिस प्रा. लि. या आमच्या कंपनीची स्थापना २३ एप्रिल २०१० रोजी झाली. यापूर्वी ‘डॉल्फिन’ संगणक व्यवस्थापन या कंपनीद्वारे १९९६ पासून आयटी क्षेत्रात काम करीत आहे. संचालक, संस्थापक पुष्कर मंत्री यांनी ‘तंत्रज्ञान सर्वांसाठी’ सहज व किमान किमतीमध्ये उपलब्ध व्हावे या संकल्पनेच्या आधारे संगणक सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करण्याचे ठरवले.

विज्ञान स्नातक (भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र शासनाचा पोस्ट ग्रॅज्युएट ‘अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सिस्टम्स अ‍ॅनालिसिस अँड अ‍ॅप्लिकेशन’ हा अभ्यासक्रम एन.एम.आय.एम.एस., पारले मुंबई येथून यशस्वीरीत्या पूर्ण केला.

यार्न मार्केट, कपडा मार्केट येथील व्यापार्‍यांकरिता सॉफ्टवेअर विकसित करण्याची संधी आली व ते काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. विज्ञान स्नातक असताना अकाऊंटस्संदर्भात काहीच माहिती नसताना तेथील व्यापार्‍यांनी व त्यांच्या कर्मचारी वर्गाने खूप काही शिकवले. कोणत्याही व्यवसायाची इन्व्हेंटरी, अंतर्गत उलाढाल, अंतिम हिशेब, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद यांची कशी सांगड घालायची हे महत्त्वपूर्ण तत्त्व आत्मसात केले.

प्रादेशिक भाषांचे, मराठीचे महत्त्व शाळेपासूनच कळत होते. इंग्रजीचा वाढता वापर, मराठीची गळचेपी इत्यादी अनेक नकारात्मक बाबी अनेक जण बोलत होते. प्रादेशिक भाषेचा, मराठीचा वापर वाढवल्यास जनतेचा जन्मसिद्ध हक्क अबाधित राहणार हे सत्य ओळखून accounting सॉफ्टवेअर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधून विकसित करण्याचे ठरवले.

१९९६ या वर्षी दादर सार्वजनिक वाचनालय व काशिनाथ धुरू हॉल ट्रस्ट्स या संस्थेने ग्रंथालयांकरता मराठीतून सॉफ्टवेअर विकसित करण्याची संधी उपलब्ध केली. त्यानंतर ‘सा. विवेक’, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, लोकमान्य सेवा संघ पारले, नॅशनल लायब्ररी अशा अनेक संस्थांनी हिशेब व अंतर्गत व्यवहार मराठीतून संगणकीकृत करण्याची संधी उपलब्ध केली.

शंभर टक्के यशस्वी प्रस्थापन, अत्युत्कृष्ट ग्राहक नातेसंबंध व सतत नवनवीन सुधारणा हीच डॉल्फिनच्या यशाची त्रिसूत्री ठरली आहे. डॉल्फिन युनिसिस प्रा. लि.च्या संचालिका हंसा पुष्कर मंत्री वर्ष २००४ पासून उद्योगात कार्यरत झाल्या. विज्ञान स्नातक (जीव-रसायनशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी वेब प्रोग्रामिंगचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. डॉल्फिनचे तंत्रज्ञान वेबबेस्ड करण्याची सुरुवात खर्‍या अर्थाने वर्ष २००४ पासून वाढीस लागली.

पती व पत्नी एकाच व्यवसायात असल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे परस्पर सामंजस्य व विश्वास. व्यवसायातील चढउतार, घरच्या अडचणी एकमेकांना पटवून देण्याची गरज नसते, ते दोघांनाही माहीतच असतात. आयटी क्षेत्रात इतर क्षेत्रापेक्षा कर्मचारी वर्गास अनेक संधी सहज व मुबलक उपलब्ध असतात.

यामुळे कर्मचारी टिकविणे फार कठीण काम असते. प्रोजेक्ट पार्टनरशिप, फ्रीलान्सर्स, फोरम इत्यादी तत्त्व अवलंबिल्यामुळे ग्राहकांची मिळवलेली कामे पूर्ण करणे सहज शक्य होते. अनुभवी व फ्रेशर प्रोग्रामर्स कर्मचारी यांच्या मिश्रणामुळे आलेली कामे वेळेत व किमान खर्चात उरकता येतात व त्याचा फायदा ग्राहक समाधानात रूपांतरित होतो.

समाधानी ग्राहकांमुळे नवीन कामे, नवनवीन संधी, प्रकल्प, संदर्भ, सहकार्य सहज साध्य होते. डॉल्फिन युनिसिस प्रा. लि.च्या कर्मचारी संख्येत प्रोजेक्टनुसार वाढ होत असते. सध्या डॉल्फिन युनिसिस प्रा.लि.मध्ये आठ नियमित कर्मचारी व पन्नासपेक्षा जास्त फ्री-लान्सर्स कार्यरत आहेत. नियमित कर्मचारी किमान ठेवून प्रोजेक्ट रिलेटेड एम्प्ल़ॉयमेंट, फ्रीलान्सर्स यांची मदत जास्त घेतली जाते.

इंटरनेट-डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, मराठी व्यापारी मित्रमंडळ, एमआयसी यांसारख्या व्यापारी एकत्र आणणार्‍या संस्था, इतर सॉफ्टवेअर कंपन्यांबरोबर मार्केटिंग सामंजस्य इत्यादीमुळे मार्केटिंगची वेगळी टीम अजून अस्तित्वात नाही; परंतु व्यवसायवृद्धीकरिता आता मार्केटिंगची विशेष टीम विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. कर्मचारी ट्रेनिंग टेक्स्ट व व्हिडीओ मॅन्युअल्समुळे नवीन कर्मचार्‍याचे आऊटपूट दुसर्‍या दिवसापासून सुरू होते.

वेब तंत्रज्ञानात सतत सुधारणा होत असतात. आपल्याला काळापुढे जायचे असेल तर सतत ज्ञानार्जन व त्यानुसार ज्ञानोपयोग आयुष्यात, व्यवसायात करणे अपरिहार्य आहे. फक्त सॉफ्टवेअर देण्याबरोबरच ग्राहकांच्या सिस्टम्सचा अभ्यास करून त्यातील लूपहोल्स नमूद करून दूर करणे व ऑटोमाइज करणे हा छंद जडला. सिक्स सिग्मा हा अभ्यासक्रम पुष्कर व हंसा यांनी यशस्वीरीत्या ‘ब्लॅक बेल्ट’च्या डिग्रीसह पूर्ण केला.

एस.सी.एफ. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, बॉर्न टू विन, लँडमार्क अशा प्रशिक्षण देणार्‍या संस्थांमधून खूप काही शिकलो. सर्वधर्मीय/प्रांतीय ग्राहक, मित्रमंडळींमुळे व्यवसायात प्रत्यक्ष येणार्‍या अडथळ्यांवर चर्चा व उपाययोजना करता आल्या. व्यवसायास उच्च पातळीवर नेण्याकरता बॉर्न टू विनचे अतुल राजोळी व अमेय आमरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन प्राप्त झाले.

व्यवसायवाढीकरिता आजपर्यंत बँका, हितचिंतक यांच्याकडून सढळ व आश्वासक अर्थसाहाय्य लाभले. याच सहकार्याने डॉल्फिनचे स्वत:चे ४०० स्क्वे फूट क्षेत्रफळाचे कॉर्पोरेट कार्यालय उभे राहू शकले त्याबद्दल सर्वांचे आभार.

व्यवसायात डेलिगेशन व कंट्रोलिंग सिस्टम तगडी असावी लागते. की-इंडिकेटर्स व डॅशबोर्ड अद्ययावत ठेवल्यामुळे नियंत्रण, विश्लेषण सहज शक्य होते. डॉक्युमेंटेशन, एस.ओ.पी.ज् (सिस्टम ऑपरेशनल प्रोसीजर्स) यामुळे कारभारात सुसूत्रता आपोआप येते. संस्थेच्या प्रत्येक स्रोताचा अधिकतम वापर ईआरपी सॉफ्टवेअर्समुळे शक्य होतो.

‘एम.एस. डॉस’ या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे फॉक्स-प्रो हे तंत्रज्ञान वापरून १९९६ पासून विकसित केलेली सॉफ्टवेअर्स आजही ‘डॉल्फिन’चे ग्राहक यशस्वीपणे वापरत आहेत. तंत्रज्ञान विकसित झाले तरी जुन्या ग्राहकांना अजूनही ‘डॉल्फिन’ सेवा पुरवते. ‘संस्था ईआरपी’ हे डॉल्फिन युनिसिस प्रा. लि.ने विकसित केलेले मोबाइल, वेब अ‍ॅप्लिकेशन आहे.

क्लाऊड तंत्रज्ञानाधारित ‘संस्था ईआरपी’ २४ X ७ इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध आहे. ‘संस्था ईआरपी’ पुढील मॉड्यूल्समध्ये उपलब्ध आहे. हिशेब, फायनान्स मॅनेजमेंट, ग्राहक नातेसंबंध (सीआरएम), मनुष्यबळ विकास (एच.आर.), ग्रंथालय व्यवस्थापन, सभागृह आरक्षण व्यवस्थापन, सहकारी गृहनिर्माण संस्था, शाळा-महाविद्यालय व्यवस्थापन, प्रकाशनगृहसंबंधित व्यवहार इ. वेबसाइट केवळ इन्फॉर्मेटिव्ह असून काय उपयोग? ती रिस्पॉन्सिव्ह, इंटरअ‍ॅक्टिव्ह, ई-कॉमर्स, एस.ई.ओ. फ्रेंड्ली असली पाहिजेत हे लक्षात घेऊन सुरुवातीस डॉल्फिनच्या ग्राहकांनाच सवलतीच्या दरात त्याच्या संकेतस्थळांचे नूतनीकरण केले.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


हे सर्व पायलट प्रोजेक्ट्स इतरांना दाखवून नवीन कामे घेणे सहज शक्य झाले. नवीन तंत्रज्ञानाच्या ऑफर्स आपल्याच ग्राहकांच्या वृद्धीकरिता सर्वप्रथम दिल्यामुळे आपल्या गाडीचा फर्स्ट गीअर पडणे सहज शक्य होते. ‘तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, ‘डॉल्फिन जे देणार ते बेस्टच असणार’ अशी प्रशंसा घरच्या ग्राहकांकडून जेव्हा मिळते तेव्हा त्याची किंमत रुपयांमध्ये मोजूच शकत नाही.

हॉस्पिटल व हॉटेल इंडस्ट्री लक्षणीयरीत्या वाढत आहे. हॉटेल मॅनेजमेंटकरता मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आलेले असून यामुळे ग्राहक, वेटर, किचन कूक, बार टेंडर सर्व्हिस इत्यादी कॉर्डिनेशन सुलभ होत आहे. हातात टॅब घेतलेला वेटर व टॅबवरूनच किचनमधील प्रिंटरवर फायर होणारी ग्राहकाची ऑर्डर यामुळे आता वेटरना किचनच्या खिडकीवर ‘दो मसाला ढोसा’, ‘एक प्लेट कोथिंबीर वडी’ असे घसा फोडून ओरडायची गरज नाही.

हॉस्पिटलकरिता ईआरपी सॉफ्टवेअर बीटा टेस्टिंग फेजमध्ये आहे. जानेवारी २०१७ पासून हॉटेल व हॉस्पिटल अशा दोन्ही क्षेत्रांत ग्राहकसेवा व वृद्धी प्रस्तावित आहे.

आपल्याकडे अशी एखादी गोष्ट असावी, की ज्यामुळे तुमच्या मागे लोक लागतील. अशी गोष्ट निर्माण करावी लागते. जे इतर देतात त्यापेक्षा अधिक व नावीन्यपूर्ण देणे हा ‘डॉल्फिन’चा ध्यास आहे. बाजारात उपलब्ध सॉफ्टवेअर्समध्ये तुम्हाला तुमच्या गरजा बसवाव्या लागतात. तुम्हाला अ‍ॅडजेस्टमेंट करावी लागते.

‘डॉल्फिन’ आपल्या व्यवसायानुरूप सॉफ्टवेअर बनविते. ग्राहकांचा व्यवसाय ‘ऑटोपायलट मोड’वर नेण्याकरिता ‘डॉल्फिन’ बांधील आहे. कोणतीही संस्था ‘माणसां’मुळे न चालता ‘सिस्टम’मुळे चालली पाहिजे, हे ‘डॉल्फिन’चे तत्त्व आहे.

पुष्कर व हंसा फक्त दोघे व त्यांची टीम किती ग्राहकांपर्यंत सेवा पुरवू शकणार? म्हणूनच ‘सर्व्हिस पॅटर्न’ बदलण्यात आला. क्लाऊड बेस्ड संस्था ईआरपी, प्रशिक्षणाकरिता ऑडिओ/व्हिडीओ मॅन्युअल्स, ऑटोमेटेड हेल्प डेस्क, रिमोट डेस्कटॉप कंट्रोल, वेब मीटिंग्ज, वेबिनार अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आज ‘डॉल्फिन’ पाचशेहून जास्त ग्राहकांना सहज सेवा पुरवते.

‘डॉल्फिन’च्या ग्राहकांची संख्या वर्ष २०२० पर्यंत ५ लाखांहून जास्त असेल व कर्मचारी, फ्रीलान्सर्स, असोसिएट्स यांची संख्या ५ हजरांपेक्षा जास्त असेल. वर्ष २०२० मध्ये डॉल्फिन युनिसिस प्रा. लि. ही आमची कंपनी शेअर बाजारात लिस्टेड करणार आहोत. ग्राहक संस्थेची व तेथील कर्मचारी वर्गाची सर्वांगीण प्रगती करण्यावर डॉल्फिन टीम बांधील आहे. Know us for your growth हे ‘डॉल्फिन’चे ब्रीदवाक्य खर्‍या अर्थाने साध्य करण्याकरता आपणा सर्वांची मदत आवश्यक आहे.

संपर्क : ९८६९०३३५६०


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?