यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे आपलं काम आणि भावना अलिप्त ठेवणे

This Institute has a history of making Great doctors! डॉ. अस्थाना कॉलेजमध्ये MBBS ला प्रवेश मिळवलेल्या मुलांना संबोधून बोलत होते. त्यांनी मुलांना विचारलं, “आप में से कौन एक अच्छा डॉक्टर बनना चाहता है?”

मेडिकल कॉलेजच्या मुख्याध्यापक सरांनी हा प्रश्न मुलांना विचारला व प्रचंड अभिमानानी सगळ्या मुलांनी हात वर केले. प्रियानीसुद्धा आत्मविश्वासाने हात वर केला होता. डॉ. अस्थानांना मुलांचा हा प्रतिसाद तसा अपेक्षितच होता. त्यांनी प्रियाकडे बघितलं व तिला पुढे विचारलं, “Yes you! क्यों तुममें ऐसी क्या ख़ास बात है?”

प्रिया मनापासून बोलू लागली, “I love people! मुझे लगता है मैं पेशंट्स के दर्द को खुद महसूस कर सकती हू. मैं डॉक्टर नहीं, एक दोस्त बनकर उनकी मदत करना चाहती हू!”

प्रियाचं हे उत्तर ऐकलं व डॉ. अस्थानांचा चेहरा बदलला. त्यांच्या आवाजाचा पारा चढला व ते बोलू लागले, “We are not here to make friends! मैंने अपने २५ साल के करीयर में कभी किसी पेशंट से दोस्ती नहीं की. उसका दर्द महसूस नहीं किया। बस उस दर्द का इलाज किया! I do not love my patients!”

वर्गात बसलेली सगळी मुलं गडबडून गेली. प्रियापण घाबरली. सगळ्या मुलांचा हा अस्वस्थपणा पाहून डॉ. अस्थाना पुढे बोलू लागले, “Confused? Let me explain.” डॉ अस्थानांनी स्वत:चा हात मुलांसमोर दाखवला व म्हणाले, “इस हात को देखो. Rock Steady! हज़ारो ऑपरेशन किये इन हाथोंने, लेकिन ये हाथ कभी नहीं कांपे! लेकिन अगर इन्ही हातोंसे मैं अपनी बेटी का ऑपरेशन करू तो ये हाथ जरूर कापेंगे!”

मुलांकडे बघत त्यांनी विचारलं, “क्यों?” कोणी उत्तर द्यायच्या आत ते पुढे बोलू लागले, “क्योंकि मैं अपनी बेटी से प्यार करता हू! पेशंट से दोस्ती, हमदर्दी, लगाव एक डॉक्टर की कमजोरी है! अगले पांच साल तुम्हे यही सिखाया जाएगा की डॉक्टर के लिए पेशंट सिर्फ एक बीमार शरीर है और कुछ नहीं!”

रविवारी दुपारी टीव्हीवर ‘मुन्नाभाई MBBS’ चित्रपटातला हा सीन बघितला व सोफ्यावर पडल्या पडल्या माझी एक वेगळीच वैचारिक बैठक सुरू झाली. मी विचार करू लागलो, खरोखर किती कठीण आयुष्य असेल डॉक्टरांचं! किती अवघड आहे जाणीवपूर्वक आपल्या कामापासून हे असं अंतर राखून ठेवणं व काम करणं! पण डॉक्टर के लिए पेशंट सिर्फ एक बीमार शरीर है और कुछ नहीं, हा विचार मात्र अजून पचत नव्हता.

एकीकडे आपण जे काही करतो त्यावर आपले प्रेम, निष्ठा, श्रद्धा वगैरे असेल तरच यश मिळतं, असं सांगणारी यशस्वी आणि आदर्श व्यक्तिमत्त्वं दिसत होती, तर दुसरीकडे डॉ अस्थानांनी एका डॉक्टरच्या आयुष्यातील मांडलेलं हे व्यावहारिक आव्हान! त्यामुळे जरा तात्त्विक गोंधळ होत होता. म्हणजे थोडक्यात काम तर करायचं, तेही उत्तम; पण ते काम करीत असताना जे अनुभव येतील, ज्या व्यक्ती भेटतील त्या सगळ्यापासून आपण अलिप्त राहायचं!

असं का? तर ज्या क्षणी त्या कामाबद्दल, व्यक्तीबद्दल अथवा अनुभवांबद्दल आपुलकी किंवा प्रेम निर्माण होईल त्या क्षणी ते काम परिपूर्णतेकडे नेणं कठीण होऊन जाईल. मला काही केल्या हा विचार पूर्णपणे पचवता येत नव्हता. व्यवसायात रोज दहा प्रकारची माणसं भेटतात. आपल्याला थोडीच सगळ्यांचं सगळं पटतं. आपल्याला शिकण्यासारखं आहे ते आपण घ्यायचं आणि बाकीचं सोडून देऊन पुढे चालायचं. त्याच नियमाने शेवटी ‘असो’ असं म्हणालो आणि मी डॉ. अस्थानांचा विषय त्या वेळेला सोडून दिला.

विषय सोडला तरी संगीताच्या मैफलींमध्ये जसा मागे तानपुरा अखंड लहान आवाजात चालू असतो त्याप्रमाणे कुठे तरी माझ्या मनामध्ये हा विचार बरेच दिवस सुरू होता. हळूहळू काही बाबतीत मला त्यांचं म्हणणं पटतही होतं, पण पचत मात्र नव्हतं त्यामुळे त्या विचाराचा रूपकात्मक शोध घ्यायला मी सुरुवात केली.

अगदी वैयक्तिक जीवनापासून ते व्यावसायिक जीवनापर्यंत सगळीकडे मी त्या वाक्याच्या अर्थाचा व गाभ्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करत होतो. याच प्रवासात काही महिने गेले. पुढे एका कंपनीमध्ये ‘लीडरशिप स्किल्स’ या विषयावर कीर्तन करायचं होतं, त्यामुळे त्याचा अभ्यास सुरू होता.

व्यवस्थापकीय विषयावर कीर्तन असल्यामुळे सायमन सिनेक, जॉन मॅक्सवेल, जिम कॉलिन्स, अब्राहाम मास्लोव, केन ब्लांचार्ड यांच्या बरोबरीनं माउली, तुकोबा, समर्थ रामदास, भगवद‍्गीता, कबीर असादेखील अभ्यास सुरू होता. हा अभ्यास करीत असतानाच भगवद‍्गीतेमधल्या दुसर्‍या अध्यायातला पंचविसावा श्‍लोक माझ्या वाचनात आला. त्यामध्ये भगवान गोपालकृष्ण सांगतात,

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत।
कुर्याद्विद्वास्तथासक्तश्रि्वकिर्षूर्लोकसंघ्रहं ॥

अर्थ : ज्याप्रमाणे अज्ञानी लोक आसक्त होऊन काम करतात, अगदी त्याचप्रमाणे ज्ञानी लोकांनी आसक्तिरहित होऊन लोककल्याणाच्या इच्छेने काम केले पाहिजे.

या श्‍लोकामधून कृष्णाला नक्की काय सांगायचं असेल? म्हणजे आसक्ती व आस्थेने तर ज्ञानी व अज्ञानी दोघेही काम करत आहेत. फरक इतकाच की, ज्ञानी लोकांची आस्था ही लोककल्याणाच्या अनुषंगाने काम करण्याकडे आहे.

बर्‍याच वेळा जेव्हा करीयर काऊन्सेलिंगसाठी मला कॉलेजची मुलं भेटायला येतात व सांगतात की, मला देशासाठी, लोकांसाठी काही काम करायची इच्छा आहे. अशा वेळेला मी त्यांना विचारतो की, व्यवसाय करण्याचा विचार आहे का मनात? मुले गडबडून जातात. त्यांचे म्हणणे असते की, देशासाठी काही करायचे म्हणतोय व व्यवसायाबद्दल काय विचारताय.

मग त्यांना समजावून सांगावे लागते की, देशाची व लोकांची सेवा केवळ लष्करीय किंवा प्रशासकीय कामांमधूनच होते असे नव्हे, तर व्यवसाय करूनसुद्धा आपण आपल्या लोकांच्या कल्याणाचेच काम करीत असतो. जगातला कुठलाही व्यवसाय हा लोकांचे आयुष्य सुखाचे व सोयीचे करण्याचा प्रयत्न करीत असतो.

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पद्धतीने लोकांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करीत असतो; पण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण लोकांचे कल्याण करतो आहोत की नाही या गोष्टीची किती जाण ठेवायची, हा त्या त्या व्यावसायिकाच्या मूल्यांचा व वैयक्तिक दृष्टिकोनाचा भाग असतो.

स्टीव्ह जॉब्स व बिल गेट्स दोघांनीही ‘अ‍ॅपल’ व ‘मायक्रोसॉफ्ट’च्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी कामगिरी केली. तसे बघायला गेले तर जवळजवळ प्रत्येक देशामध्ये दोन्ही कंपन्या पोहोचल्या. दोन्हीही कंपन्यांनी आपापली एक वेगळी ओळख निर्माण केली. नुसतेच ग्राहक निर्माण न करता आपापल्या ब्रँडला धरून चालणारा समाज उभा केला. मायक्रोसॉफ्ट घराघरांत पोहोचले तर अ‍ॅपलनी आपली ओळख केवळ पर्फेक्शनच्या बाजूने उभी केली.

कुठे तरी या दोन्ही व्यवसायांचे ग्राहक, ब्रँड, जाहिराती, कर्मचारी व इतर उत्पादने त्यांच्या डिझाईनपासून ते गुणवत्तेपर्यंत प्रकर्षाने वेगळी जाणवू लागली. हा सगळा परिणाम त्या त्या व्यवसायांच्या नेतृत्वामध्ये असणारी मूल्ये व दृष्टिकोन यांच्या भिन्नतेमुळे झाला होता.

आज कदाचित ८० हजार रुपयांचा फोन मायक्रोसॉफ्टनी काढला तर तो घ्यायच्या आधी लोक विचार करतील; पण ‘अ‍ॅपल’चा फोन सहज खपेल व तेच घरामध्ये जर कॉलेजला शिकणार्‍या मुलाला लॅपटॉप घ्यायचा झाला तर पालक ‘मायक्रोसॉफ्ट’चा विचार आधी करतील. कदाचित ‘अ‍ॅपल’चा विचारसुद्धा त्यांच्या मनात येणार नाही.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधल्या या दोन्ही महान नेतृत्वांचे हे यश आहे व हे यश त्यांना यामुळेच मिळाले, कारण कुठे तरी त्यांनी आपापले ग्राहक ओळखले व आपापल्या गुणवत्तेनुसार त्या माध्यमातून त्या लोकांचे आयुष्य सुखाचे व सोयीचे करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळेच त्यांच्या कष्टांना ही सुंदर फळे मिळाली. त्यामुळे या फळांचा अधिकार केवळ त्या व्यावसायिक नेतृत्वांनाच द्यायला हवा. परंतु या विषयाचे चिंतन करताना माझ्या लक्षात आले की त्याच भगवद‍्गीतेमध्ये भगवान गोपालकृष्ण असेदेखील सांगतात की,

कर्मणये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।
मां कर्मफलहेतुर्भू: मांते संङगोस्त्वकर्मणि॥

अर्थ : आपला अधिकार केवळ कर्म करण्यापर्यंतच असतो. त्या कर्मांमधून काय फळे मिळतील या गोष्टीवर मात्र कोणाचाच अधिकार नाही; पण फळांवर आपला अधिकार नाही, म्हणून कर्मेच करायची नाहीत हे करणे योग्य नाही.

काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राच्या वडिलांचा खूप गंभीर अपघात झाला. त्या गंभीर अपघातामध्ये त्यांच्या दोन्ही पायांच्या हाडांना खूप गंभीर जखमा झाल्या. डॉक्टरांनी सांगितले की, जखम खूपच गंभीर आहे व आपल्याला त्यांच्यावर काही उपचार करावे लागतील.

७-८ टेस्ट व ३-४ ऑपरेशन्सची यादी डॉक्टरांनी वाचून दाखवली व पुढे म्हणाले की, आपण जरी ही ऑपरेशन्स केली तरी त्यांच्या वयोमानानुसार ते कसे रिस्पॉन्ड करतात त्याप्रमाणे आपण यशस्वी होतो का नाही हे ठरेल. त्यामुळे तुम्ही विचार करा व तुमचा निर्णय कळवा.

त्यावर आम्ही विचारले की, हे जरी खरे असले तरी ते पूर्णपणे बरे होण्याची शक्यता किती आहे? ‘फिफ्टी-फिफ्टी’ असे उत्तर देत डॉक्टर निघून गेले. पुढे सगळ्यांची चर्चा झाली व ऑपरेशन करायचे ठरले. ऑपरेशन्स सगळी यशस्वी झाली. पुढे झाले असे की, त्यांचा एक पाय पूर्णपणे बरा झाला, पण दुसर्‍या पायाला थोडा लंगडेपणा येऊन त्याच्या संवेदना पूर्णपणे कमी झाल्या.

आता या मिळालेल्या फळावर अधिकार नक्की कोणाचा होता? निर्णय घेतलेल्या नातेवाईकांचा? ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांचा? खुद्द अपघात झालेल्या व्यक्तीचा? का त्या व्यक्तीच्या शरीराचा?

या सगळ्यांचा अधिकार केवळ त्या परिस्थितीमध्ये कराव्या लागणार्‍या कर्मांवर होता. फळांवर ना कोणाचा ताबा होता ना अधिकार. हेच या श्‍लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्नं झाला आहे.

व्यवसायामध्येसुद्धा असे अनेक प्रसंग येतात. व्यवसाय करायचा आपण विचार करतो त्या दिवसापासून अशा आव्हानांना सुरुवात होते. सुरुवातीला मनात अनेक कल्पना येऊन जातात. आपण अमुक करू शकतो, तमुक करू शकतो. पैसे अमुक पद्धतीने उभे करून पुढे तमुक पद्धतीने ते वापरून व्यवसाय यशस्वी करू शकतो वगैरे.

पैसे उभे करण्यासाठीदेखील प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, अनेक लोकांना भेटावे लागते, पटवून द्यावे लागते. तरीसुद्धा मदत होतेच असे नाही; परंतु मदतच होणार नाही म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत असे मात्र करून चालत नाही. ज्या दिवशी मदत होते व पैसे उभे राहतात त्या दिवशी मात्र मिळालेल्या त्या फळावर अधिकार गाजवण्यात काहीच अर्थ नसतो, कारण तयारी पुढच्या कर्माची करायची असते. जर ती केली नाही, तर त्याचा परिणाम पुढे मिळणार्‍या फळांवर होणार असतो.

कालांतरानी पैसे उभे राहतात व आपला व्यवसाय सुरू होतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला बर्‍याच आव्हानात्मक परिस्थितीतून जावे लागते, काही गंभीर निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक वेळेला ते निर्णय बरोबर ठरतीलच याची काहीच शाश्वती नसते; पण म्हणून निर्णयच घेतले नाहीत अथवा त्या परिस्थितीला सामोरेच गेले नाही असे करून चालत नाही. तसे केले तर अजून गंभीर आणि विचित्र परिस्थिती उभी होऊ शकते.

मग अशा वेळेला आपले हे निर्णय चुकणार नाहीत याची काळजी आपण कोणत्या प्रकारे घेऊ शकतो? त्या दृष्टीने आपल्याला कसा विचार करता येऊ शकतो?

जवळजवळ आठ वर्षांनंतर व तीन मुलींमागे जाधवांच्या घरात चौथ्या प्रयत्नाला यश आले. पुत्रप्राप्ती झाली. साक्षात कुलदीपक जन्माला आल्यामुळे वडील आणि सासरची मंडळी खूपच आनंदात होती. मुलगा तत्त्वनिष्ठ पद्धतीने सगळ्यांची काळजी घेईल म्हणून मुलाचे नाव राम ठेवण्यात आले. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनंतर या वंशाच्या दिव्याचे आगमन झाल्यामुळे साहजिकच मुलींपेक्षा मुलाचे खूपच लाड व्हायला सुरुवात झाली.

कुठलीही गोष्ट मागायच्या आत हातामध्ये येऊ लागली. बाळाला कोणीही रागवायचे नाही, ओरडायचे नाही. बाळ म्हणेल ती पूर्व दिशा. हळूहळू बाळावर आपण हवे तसे वागू शकतो, घेऊ शकतो व मागू शकतो असे संस्कार होत गेले, कारण बाळावर सगळ्यांचे प्रेमच होते आणि त्यात आम्हाला मिळाले नाही ते सगळे आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करणार असा कौटुंबिक थाट. त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी ना नाहीच!

यामुळे दुर्दैवाने झाले असे की, आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ती घरी मागितली की सहज मिळते व त्यासाठी आपल्याला काही तरी करावे लागते हे विचारांचे संस्कारच बाळावर कधी झाले नाहीत. वेगळे सांगण्याची काय गरज. पुढे मोठे झाल्यावर जो राम सगळ्यांना सांभाळणार होता त्या रामालाच त्याच्या चाळिशीपर्यंत आईवडिलांना सांभाळायची वेळ आली.

आईवडील देवाघरी गेले. मग त्यांच्या पश्चात कोणीही हे चाळीशीतले बाळ सांभाळेनात. कसेबसे आयुष्य ढकलत बाळाने वर्ष काढले व पुढच्या काही दिवसांत नैराश्याने आत्महत्या केली. ही एक खरी गोष्ट आहे. नक्की काय व कुठे चुकले हो आईवडिलांचे? प्रेम कमी केले का बाळावर? बाळ मागेल ती वस्तू दिली तरी बाळाने नैराश्यात आत्महत्या का करावी?

आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे नक्की काय व कुठे चुकले. आपले बाळ जर यशस्वी व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर त्यावर प्रेम तर केलेच पाहिजे; पण जेव्हा त्या बाळावर संस्कार करण्याची वेळ असते व वाढत्या वयात व्यावहारिक जाणीव करून देण्याची वेळ असते, तेव्हा कधीच भावनांना प्राधान्य देऊन चालत नाही.

काही बाबतीत जरा कठोर व्हावेच लागते. बाळ रडायला लागले तरी बाळाला आपल्या चुकीची जाणीव होईपर्यंत त्याला रडू द्यावेच लागते. सगळ्यांसाठीच खरोखर कठीण असते हो ते; पण बाळ मोठे झाल्यावर त्याला जर स्वतंत्रपणे यशस्वी कार्य करण्यासाठी सक्षम करायचे असेल तर कोणाला तरी ही अलिप्तता बाळगावीच लागते.

आपला व्यवसायदेखील आपल्या बाळाप्रमाणेच असतो. त्यावर प्रेम केल्याशिवाय तो कधीच मोठा होऊ शकत नाही; पण व्यवसायामधले निर्णय हे संवेदनशील भावनेने घेऊन कधीच चालत नाहीत. संवेदनशीलता ही लोककल्याणाच्या हेतूने कार्य करण्याकडे असायला हवी; परंतु कार्य करीत असताना लागणारा दृष्टिकोन व निर्णय हे अत्यंत शांतपणे, जाणीवपूर्वक, तर्कबुद्धीने व विवेक बाळगूनच घ्यावे लागतात.

त्या वेळेला त्या कामामध्ये व निर्णयांमध्ये आपले प्रेम आडवे येऊन चालत नाही. तिथे कामी येते ती आपल्या भावनांपासून असलेली आपली अलिप्तता. त्या दिवशी काय आनंद झाला म्हणून सांगू तुम्हाला. जवळ जवळ सहा महिने लागले उत्तर सापडायला. हा विचार ज्या क्षणाला डोक्यात आला त्या क्षणी मला डॉ. अस्थानांचे म्हणणे पूर्णपणे पटले!

खरोखर किती तथ्य होते हो त्यांच्या त्या ‘डॉक्टर के लिए पेशंट सिर्फ एक बीमार शरीर है और कुछ नहीं’ व ‘I do not love my patients!’वाल्या वाक्यांमध्ये. व्यावहारिक जीवनात यशस्वी होण्यासाठी लोककल्याणाचा हेतू जरी मनात बाळगणे गरजेचे असले तरी त्यामध्ये दडलेल्या संवेदनशील भावना आपल्या कार्यासाठी लागणार्‍या विवेकाच्या आड येऊन चालत नाहीत.

कुठे तरी त्या भावना आपल्याला त्या कर्मामधून निष्पन्न होणार्‍या फळांच्या बंधनात अडकवतात व त्याचा परिणाम आपल्या तर्कबुद्धीवर होतो व अशा मानसिक अवस्थेमध्ये कोणतेही कार्य परिपूर्णतेकडे नेणे कठीण होऊन जाते. कदाचित त्या वेळेला वर्गात बसलेल्या सगळ्या मुलांना पचायला खूपच जड गेला असेल तो डॉ. अस्थानांचा विचार, पण अनुभवामध्ये मुरल्यावर एखाद्या व्यावसायिकाला मिळणार्‍या ज्ञानाचा गाभाच त्या दिवशी डॉ. अस्थाना सांगून गेले होते.

पुष्कर औरंगाबादकर
९९७५५८८०२५

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?