‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ म्हणजे एका शब्दात सांगायचे झाले तर कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य. त्यामागील तत्त्वज्ञान असे आहे की, संपूर्ण विश्वात मनुष्य काही निर्माण करू शकत नाही. ९८.५ टक्के शरीर हे वनस्पतींचे हवा आणि पाण्यापासून बनते. केवळ एक गाय सोबत घेऊन त्याआधारे शेतकरी शेती करू शकतो. हा सिद्धांत आहे पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांचा.
अमरावती जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाळेकरांनी शेतीतच भविष्य करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी शेतीत पदवीही घेतली. १९७२ ते १९८२ रासायनिक शेती केली. सुरुवातीची तीन वर्षे चांगले उत्पादन मिळाले, पण नंतर उत्पादनाचा आलेख खाली तर खर्चाचा वर जाऊ लागला.
असे का होते आहे, याचे समाधानकारक उत्तर ना कृषी संस्थांकडे होते ना कृषितज्ज्ञांकडे. त्यामुळे आपणच याचे उत्तर शोधायचे, असे पाळेकरांनी ठरवले आणि इथेच ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ या क्रांतिकारी प्रयोगाची बीजे रोवली गेली.
कुठल्याही गोष्टीचे यश हे त्याच्या आर्थिक ताळेबंदावर अवलंबून असते. एकदा का ताळेबंद बिघडला की तोटा झालाच. विदर्भासह देशातल्या शेतीचाही अर्थसंकल्प काहीसा बिघडलेला आहे. खर्च वाढलाय आणि उत्पादन घटते आहे. शेतीसाठी येणारा खर्च शून्यावर आला तरच शेती आणि शेतकरीही सुधारेल.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’चा पर्याय नक्की काय? त्यामागील विज्ञान काय? या संकल्पनेला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे शेती करणे म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याची.
डॉ. पाळेकर यांनी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ ही संकल्पना मांडताना म्हटले आहे की, जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात. निसर्गच त्यांना अन्नद्रव्ये पुरवतो. त्यांच्यात कोणत्याही अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत नाहीत.
गव्हाचा दाणा, ज्वारीचा दाणा कारखान्यात तयार होऊ शकत नाही. ते आपले सामर्थ्य नाही. तो केवळ निसर्गाचा एकाधिकार आहे. पीक किंवा फळझाडे ही सर्व अन्नद्रव्ये जमिनीतूनच घेतात. यात मानवाची भूमिका ही केवळ सहायकाची आहे.
मागील काही काळापासून नैसर्गिक शेतीच्या या पद्धतीला बाजूला सारून रासायनिक शेतीकडे शेतकर्यांचा कल वाढला आणि पर्यावरणाचा समतोलच बिघडला. नक्की काय चुकतंय हे आजच्या शेतकर्याने समजून घेण्याची गरज आहे.
बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा ही ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ची चतु:सूत्री. यात देशी गाईचे शेण आणि गोमूत्राला फार महत्त्व आहे. शेतीत शेणाचा वापर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात करायचा, यावर सुभाष पाळेकर यांनी आठ वर्षे संशोधन केले. शाश्वत पीक संरचनेसाठी त्यांनी काही सूत्रे मांडली. त्यातलीच ही चतु:सूत्री.
सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीत अनेक साम्ये असली, तरी सेंद्रिय शेतीत वापरल्या जाणार्या अनेक निविष्टांसाठी पुन्हा बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. शेणखतच टाकायचे म्हटले तरी हेक्टरी १० ते १५ गाड्या शेणखत लागते आणि ते विकत घेण्याशिवाय पर्याय राहात नाही. ते चांगले कुजलेले नसल्यास शेतातील नत्राचे शोषण होते.
रोगांचे, किडींचे प्रमाण वाढते. जैविक खते प्रयोगशाळेत तयार केली जातात. पुन्हा बाजारावर विसंबून राहावे लागते. याउलट झिरो बजेट नैसर्गिक शेतीत आपण जेव्हा एक ग्रॅम शेण शेतात टाकतो, तेव्हा तब्बल ३०० कोटी जिवाणू जमिनीत टाकतो.
एक देशी गाय दिवसाला सरासरी अकरा किलो शेण देते. एका गाईचे एका दिवसाचे शेण एका एकराला महिन्यातून एकदा द्यायचे आहे. म्हणजे तीस दिवसांचे शेण तीस एकराला पुरेसे आहे, तेही विरजण म्हणून, अन्न म्हणून नव्हे.
पीक कोणतेही असो, कोरडवाहू असो किंवा ओलिताचे, हंगामी पिके असो किंवा बारमाही फळबागा, एका एकराला दहा किलो शेण वापरायचे, परंतु हे वापरल्याने आपण एक एकर जमिनीत ३० लाख कोटी सूक्ष्म जिवाणू सोडून जमीन सजीव करू, पण संपूर्ण जमीन सजीव झाल्याशिवाय झिरो बजेट नैसर्गिक शेतीत निसर्गाच्या सर्व यंत्रणा संपूर्ण कार्यक्षमतेने कामी लावता येणार नाही.
त्यासाठी जिवाणूंची संख्या अनेक पटींनी वाढवावी लागणार, हे पाळेकरांच्या लक्षात आले. मग त्यासाठी किण्वन क्रिया (फर्मेंटेशन) करण्याचा पर्याय त्यांनी शोधला.
ट्रॅक्टरने शेणखत विकत घेऊन टाकण्याचीही गरज नाही. रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खते किंवा गांडूळ खत, विषारी कीटकनाशके, संकरित बियाणे वापरण्याची गरज नाही. या पद्धतीत ओलिताच्या शेतीत जेवढे पाणी लागते, त्याच्या केवळ दहा टक्के पाणी आणि दहा टक्के वीज लागते.
उत्पादन कमी नाही. मात्र जे उत्पादन मिळेल ते विषमुक्त, पौष्टिक आणि उत्कृष्ट चवीचे मिळते. या नैसर्गिक शेतमालाला बाजारात प्रचंड मागणी आहे आणि दीडपट ते दुप्पट भाव मिळतात.

जमीन सुपीक व समृद्ध बनते. नैसर्गिक शेती ‘ग्लोबल वॉर्मिंग’ रोखण्यास मदत करते. हवेतील अधिकाधिक कार्बन हे काष्ट आच्छादनात बंदिस्त करण्याची आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून हवेतील जास्तीत जास्त कार्बनडाय ऑक्साइड बंदिस्त करण्याची किमया फक्त ‘झिरो बजेट’ शेती करते, असे डॉ. सुभाष पाळेकर सांगतात.
याउलट जेव्हा आपण रासायनिक पद्धतीने शेती करतो, तेव्हा अनेक प्रकारच्या कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे का व्हावे? याचा विचार महत्त्वाचा ठरतो. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी मानवाने शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले.
माती आणि इतर सर्व संसाधनांकडून अधिक ओरबाडून घेण्याचे प्रमाण वाढले. गरजा अधिक म्हणून अधिक उत्पन्नाची गरज, पण यातून जे साध्य करायचे ते झालेच नाही. निसर्गाचे मात्र शोषण झाले.
४० ते ५० लाख शेतकरी पाळेकर यांच्या माहितीनुसार झिरो बजेट नैसर्गिक शेती करतात. हा अधिकृत आकडा आहे. याव्यतिरिक्त त्यांना माहिती नसलेला आकडा याहूनही अधिक असू शकतो, असे पाळेकर म्हणतात. हा शेतकरी आत्महत्या करत नाहीत.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांत झिरो बजेट नैसर्गिक शेती करणारे जास्त शेतकरी आहेत. ज्या महाराष्ट्रात या झिरो बजेट शेतीचा जन्म झाला त्याच राज्यात ‘डॉ. पाळेकर तंत्र’ उपेक्षित राहिले आहे.
शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी थातूरमातूर उपाययोजना करण्यापेक्षा समस्येच्या मुळापर्यंत सरकारने पोहोचले पाहिजे. शेतीवरील खर्च कमी करणे हा एक उपाय आहे. नैसर्गिक शेतीत तर खर्चच नाही. शेतकर्यांना सहजपणे हे तंत्र स्वीकारता येऊ शकते. अधिकाधिक शेतकर्यांनी या तंत्राचा वापर करावा, अशी अपेक्षा पाळेकर व्यक्त करतात.
आजवर देशभरातील लाखो शेतकर्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून आर्थिक विकास साधण्यासोबतच पर्यावरणाची हानीदेखील थांबवली आहे. रासायनिक आणि सेंद्रिय या दोन्ही पद्धतींच्या शेतीला छेद देत सुभाष पाळेकर यांनी सांगितलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीला सरकारकडून किती प्रोत्साहन मिळते, याचीच आता उत्सुकता आहे.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.