अनेक तरुणांना आज नोकरी पत्करायची नसून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण व्यवसाय म्हटलं की भांडवल हे आलंच! हे भांडवल आणायचं कुठून? कारण एखादा छोटासा कारखाना जरी टाकायचा म्हटला तरी लाखोंची गुंतवणूक आली.
दुसऱ्या बाजूला आपल्या देशात गुंतवणूक ही इतक्या सहजही उपलब्ध होत नाही. भले एखाद्याने सर्व प्रकारचे प्रयत्न करून बँकेतून किंवा एखाद्या सरकारी योजनेतून वगैरे लाभ घेऊन काही गुंतवणूक मिळवली जरी, तरी मग त्याच्यावर पहिल्या दिवसापासून कर्जाचा बोजा पडतो.
मराठी माणूस हा एकवेळ अर्धपोटी राहू, पण ते कर्जाचे डोंगर नको रे बाबा, अशा मानसिकतेत जगला, वाढला आहे. त्यामुळे त्याला डोक्यावर कर्ज असलं की झोपही येत नाही, मग धंदा चालवणार कसा आणि वाढवणार कसा?
असा सर्व विचार करून आजच्या तरुणांना शून्य गुंतवणूक असलेले किंवा अत्यल्प गुंतवणूक, जेवढी ते घरातून किंवा मित्रांकडून वगैरे उभी करू शकतील, असे व्यवसाय हवे असतात.
अशा सर्व मित्रांना मी सांगू इच्छितो की मित्रांनो गुंतवणूक ही फक्त पैशांत नसते तर तन, मन आणि धन अशा तिन्हींची असते. तन-मन-धन यांमध्ये धन हे तिसरे म्हणजे शेवटी येते. त्यामुळे ते तुमच्याकडे नाही किंवा पुरेसं नाही तरी काही अडचण नाही.
तुम्हाला करता येण्यासारखे अनेक व्यवसाय उपलब्ध आहेत. परंतु यातील तन आणि मन याची गुंतवणूक मात्र तसूभरही कमी असून चालत नाही. त्यामुळे तुम्ही सुरू करत असलेल्या व्यवसायात तुम्ही तनाने आणि मनाने शंभर टक्के उतरणार असाल तरच तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करा.
व्यवसाय म्हणजे फक्त उत्पादन नव्हे!
आपल्याकडे व्यवसाय म्हणजे फक्त कारखानदारी, असा समज आहे. एकविसाव्या शतकात हा समज पूर्ण मागे पडत चालला आहे. गेल्या दोन दशकांत उभे राहिलेले आणि मोठे झालेले व्यवसाय पाहा. अमेझॉन, फ्लिपकार्ट, अलिबाबा, पेटीएम, स्वीगी असे किती तरी व्यवसाय जे आपण मोठे झालेले पाहतो यांचा एकही कारखाना नाही.
ते काहीही उत्पादन करत नाहीत, तर ते फक्त विकतात; म्हणजेच व्यापार करतात. मराठी समाजात व्यापार हा तितकासा व्यवसाय म्हणून प्रचलित नाही.
एखादा उत्पादक किंवा सेवापुरवठादार खूप उत्तम माल बनवू शकतो किंवा उत्तम सेवा तयार करू शकतो, परंतु त्याला जर का ते नीट, पद्धतशीरपणे विकता आले नाही तर लवकरच त्याच्या व्यवसायाला टाळ लागणार हे नक्की!
दुसरीकडे असे उत्पादन किंवा सेवापुरावठादार बरेच आहेत की ज्यांना उत्तम माल बनवता येतो, पण हवा तसा विकता येत नाही. त्यांचा विक्रीचा आकडा कमी असल्यामुळे त्यांचे उत्पादनही कमी आणि उलाढालही कमी होते.
तुम्ही स्वतःचा कमीत कमी गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर असे उत्पादक व सेवापुरावठादार बाजारात हजारोंनी आहेत, त्यांना मदत होऊ शकेल, म्हणजे तुम्ही त्यांचा माल विकू शकाल म्हणजेच ग्राहक आणि उत्पादक यातील दुवा होऊ शकत असाल तर अशा व्यवसायाला खूप मोठी संधी आहे.
एकविसाव्या शतकात सुरू झालेले आणि मोठे झालेले बहुतांश व्यवसाय हे याच पद्धतीचे म्हणजे उत्पादक आणि ग्राहक यातील दुवा होणारे आहेत. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात याचा वापरही आवर्जून करू शकता. उदाहरण म्हणून एका व्यवसायाचा विचार करू.
समजा तुम्ही मुंबई किंवा पुण्यात राहता. तुम्हाला अशाप्रकारे कमीत कमी गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू करायचा आहे. तुमचा मामा किंवा काका कोकणात आंबा उत्पादक आहे. तो तिथे आंब्याची शेती करतो पण त्याच्या आंब्याला त्याला हवा तसा भाव मिळत नाही, दुसरीकडे मुंबई-पुण्यात तुम्हाला ६००-८०० रुपयांच्या खाली चांगले आंबे मिळत नाहीत.
ग्राहकाला स्वस्त आणि चांगले आंबे हवेत ही त्याची गरज आणि उत्पादकाला चांगला भाव हवाय ही त्याची गरज अशा दोन्ही गरजांचा मेळ घालून तुम्ही राहत्या ठिकाणी ऑनलाईन आंबे विकण्याचा व्यवसाय सुरू केला तर!!
ऑनलाइन विकणं म्हणजे एखादी वेबसाईट किंवा app वगैरेच तयार करायला हवं असं काही नाही. साधेसोपे apps जे प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये असतात, जसे की व्हॉट्सऍप, फेसबुक यांचा वापर करूनही तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता.
फेसबुक किंवा व्हॉट्सऍपवर संभाव्य ग्राहकांचे ग्रुप तयार करून त्यांना तुम्ही आंबे विकताय याची माहिती दिलीत तर ते तुमच्याकडून बाजारभावापेक्षा स्वस्त आणि चांगले आंबे नक्की खरेदी करतील. इथे तुमचे डिजिटल मार्केटिंग व विक्री कौशल्य याची कसोटी आहे.
सुरुवातीलाच जे म्हटलं की व्यवसायात पैसा कमी लावला तरीही चालेल पण तन आणि मन शंभर टक्के द्यावे लागेल. डिजिटल मार्केटिंग किंवा विक्री वाढवण्यासाठी इंटरनेटवर अनेक मोफत कोर्स उपलब्ध आहेत. तुम्ही ते केलेत तर तुमची ऑनलाईन विक्री आणखी वाढू शकेल. शिवाय आंबा हा एका सिझनचा व्यवसाय आहे.
एकदा त्यातून विक्री आणि व्यापाराचा अनुभव आला की वेगवेगळ्या सिझनला वेगवेगळे व्यवसाय करू शकता. आंबा विक्री हे केवळ एक वानगीदाखल उदाहरण दिले. असे अगणित व्यवसाय तुम्ही स्वतः शोधून काढू शकता. व्यवसाय म्हणून व्यापारात याल तर नक्कीच उद्याचे यशस्वी उद्योजक व्हाल.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.