शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत रूजलीत अंकिताच्या ‘स्वरांकित’ची बीजं

मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल उचलणार नाही, हा अगदी सीनिअर असताना मोठ्या वर्गातल्या मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा ऐकताना खूप छान वाटायचं. एखादी गोष्ट इतक्या सूत्रबद्धपणे सांगता येऊ शकते हे खूप छान वाटायचं.

कसं कोणास ठाऊक, आता आठवतही नाही, पण तिसर्‍या इयत्तेपासून माझंपण, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असो किंवा ‘भगतसिंगची, चापेकर बंधूंची किंवा बाबू गेनूची कामगिरी असो, सावरकरांची काळ्या पाण्याची शिक्षा असू दे, की अगदी द.मा. मिरासदारांचा ‘माझा पहिला विमान प्रवास’ असू दे, माझाही प्रवास सुरू झाला, तो अगदी कॉलेजच्या शेवटच्या दिवसापर्यंत.

याच सांस्कृतिक वाटचालीने दहावीला शाळेतून बाहेर पडताना उत्कृष्ट विद्यार्थिनी-सांस्कृतिक विभाग हे पारितोषिकही मिळवून दिलं याचा अभिमान वाटला.

इतक्या लोकांसमोर बोलायचा आत्मविश्‍वास कुठून आला ते माहीत नाही; पण या आत्मविश्‍वासाला आई-बाबांनी खतपाणी घातलं आणि योग्य शिस्तीने फुलवलं.

हा वक्तृत्व स्पर्धांचा प्रवास सुरू झाल्यावर गायन म्हणजे काय, निवेदन म्हणजे काय हे कळतही नसेल अशा वयात म्हणजे अगदी चौथ्या इयत्तेत असताना माझ्याच शाळेच्या सभागृहात अरूण दातेंचा ‘शुक्रतारा’ हा कार्यक्रम होता. आमच्या अख्ख्या ग्रुपला आमचे पालक बरोबर घेऊनही गेले. माझ्यासाठी हे सुदैवच म्हणावं लागेल.

मुळातच खेळण्याचं वय, त्यात कोणी शांत बसून ऐका म्हटलं, की दंगा करायला अजूनच चेव चढतो. आई बिचारी कितीदा धरून बसवत होती; पण खो कसा द्यायचा आणि कधी द्यायचा हे नेमकं हेरून ठेवलेलं होतं. अख्ख्या वाद्यवृंद रंगमंचावर आणि आम्ही मुलं सभागृहात इकडून-तिकडे धावतोय हे बघून भाऊ मराठे ओरडले.

पुन्हा एकदा माझ्या सुदैवाने निवेदक भाऊ मराठे होते. ते म्हणाले, एका ठिकाणी शांत बसा आणि ऐका. पालकांचंही न ऐकता मस्ती करणारे आम्ही आईजवळ जाऊन गुपचूप बसलो आणि ऐकू लागलो. त्या ऐकण्याचा माझ्या मनावर एक वेगळाच परिणाम झाला.

पुढे आपण काय करायचं ह्या प्रश्‍नाचं उत्तरं मला न मागताच मिळालं, किंबहुन प्रश्‍न पडायच्या आधीच मिळालं. त्या दिवशी भाऊंना ऐकून हे असं काही तरी आपण करायचं, असं छान बोलायला शिकायचं हे त्या नकळत्या वयातच मनाने पक्कं केलं.

शाळा संपली तरी कॉलेजमध्ये या माझ्याच शाळेच्या सभागृहात स्पर्धांचा आणि आता त्या जोडीला नाटकांचा सिलसिला चालूच राहिला. त्यातूनच विचारांना योग्य दिशा मिळत गेली आणि हळूहळू निवेदन क्षेत्रात प्रवेश झाला. त्यानिमित्ताने बरीच वेगवेगळी आणि सुंदर व्यक्तिमत्त्वं भेटत गेली. त्यांना बघत, ऐकत स्वत:ला तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला.

हे सगळे कार्यक्रम फक्त निवेदक म्हणून करत असताना, आपल्या ओळखीच्या कलाकारांना सोबत घेऊन आपणही असं कार्यक्रमांचं आयोजन केलं तर, हा विचार मनात सुरू झाला; पण फक्त तो मनातच होता. त्यासाठी काय करायचं, कसं करायचं याचा काहीच अंदाज नव्हता, काही काळ असाच गेला; पण पुन्हा एकदा या विचाराने मनात जागा घेतली आणि त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली.

महत्त्वाचा मुद्दा होता कार्यक्रम तर करायचे, पण कोणत्या नावाने? काही तरी नाव हवेच. मग त्यादृष्टीने विचार सुरू झाला. सगळ्यांच्या मते ‘स्वरांकित’ हे नाव नक्की केलं. हा विचार स्वरूप नावाच्या मित्राला बोलून दाखवला. त्याने सुचवलं नावाबरोबर एक छान लोगोपण कर, तो मी तुला करून देतो. इथेच माझं अर्ध काम झालं. पुढे प्रश्‍न होता रजिस्ट्रेशनचा. हा उद्योग कुठे रजिस्टर करायचा?

तो प्रश्‍नही शैलेशदादाने सोडवला आणि गणपती बाप्पाच्या कृपेने गणेशोत्सवातच ‘स्वरांकित’चा पहिला कार्यक्रम यशस्वी झाला आणि त्यातूनच पुढचे कार्यक्रम मिळत गेले. याच निमित्ताने अनेक बरे-वाईट अनुभवही गाठीशी बांधून घेतले.

लोकांना संगीताचा आनंद द्यायचा आणि त्याच माध्यमातून त्याचा आनंद द्विगुणित करायचा प्रयत्न करायचा हाच ‘स्वरांकित’चा मूळ उद्देश आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल सुरू केली आहे.

– अंकिता सोवनी
९८१९००६०२३


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?