Advertisement
कॉलेजमध्ये शिकत असताना सुरू करू शकता हे १० व्यवसाय
उद्योगसंधी

कॉलेजमध्ये शिकत असताना सुरू करू शकता हे १० व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


१. भेटवस्तू बनवणे

गणपती असो वा दिवाळी, बारसं असो वा वाढदिवस विविध प्रकारच्या भेटवस्तू लोक एकमेकांना देतच असतात. यात सध्या कस्टमाइज्ड गिफ्ट्सचे प्रस्थही बरेच वाढले आहे. याला संधी मानून कॉलेजमधील विद्यार्थी आपल्या फावल्या वेळेचा उपयोग पैसे कमविण्यासाठी व त्यासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी करू शकतात.

सुरुवात कशी करावी? : विविध वेबसाइट्स तसेच यूट्यूबवर अनेकविध भेटवस्तू कशा तयार कराव्यात याच्या कृती, व्हिडीओज् उपलब्ध आहेत. ते पाहून विविध वस्तू कशा बनवायच्या, त्या बनवण्याचा खर्च किती येईल हे काढावे. त्यानंतर इन्स्टाग्राम किंवा फेसबुकमार्फत मोफत प्रमोशन करून उत्पादनांसाठी मागणी निर्माण करावी.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

किंमत कशी ठरवाल? : आपण कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवणार आहोत हे प्रथम ठरवावे. त्या बनवण्यासाठी किती खर्च येतो व किती वेळ लागतो हेसुद्धा काढावे. यानुसार आपल्या उत्पादनांच्या किमती काढाव्यात व आपल्या स्पर्धकांच्या किमती साधारण सारख्या आहेत ना याची खात्री करावी.

२. प्रेझेन्टेशन्स तयार करणे

वेगवेगळी ऑफिसेस, कॉलेजचे प्रोजेक्ट्स, रिसर्च अशा अनेक गोष्टींसाठी प्रेझेन्टेशन्सची गरज असते. अगदी पाच स्लाइड्सपासून सुरुवात करून पन्नास-साठ स्लाइड्सची प्रेझेन्टेशन्स बनवण्याची कामे आपण घेऊ शकतो. कोणत्या प्रकारची प्रेझेन्टेशन्स आपण बनवणार आहोत, किती काळात ती ग्राहकांना देणार आहोत, कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना आपण टार्गेट धरणार आहोत या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे.

सुरुवात कशी करावी? : आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या नवीन उद्योगाबद्दल माहिती द्यावी. ओळखीतून आधी एक-दोन कामे केली की ती कामे नमुना म्हणून दाखवून नवीन ग्राहक मिळवता येतील. फ्रीलांसिंग वेबसाइट्सवर जर आपली सर्व्हिस पोस्ट केली तर त्यातूनही उत्तम मागणी मिळू शकते.

किंमत कशी ठरवाल? : आपण दोन प्रकारे किंमत ठरवू शकतो. क्वालिटी आणि क्वांटिटी अर्थात गुणवत्ता आणि प्रमाण. जर आपण आपल्या कामाच्या गुणवत्तेनुसार किंमत ठरवत असू तर शाळा पातळीवरील प्रेझेन्टेशन्ससाठी एक रक्कम, कॉलेजसाठी त्याहून जरा अधिक व रिसर्च किंवा कंपन्यांच्या कामांसाठी त्याहून अधिक अशी ठेवू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे प्रमाण. आपण किती स्लाइड्सचे प्रेझेन्टेशन बनवत आहोत त्यानुसारही किंमत ठरवू शकतो. उदा. :

▪️ पाच स्लाइड्सपर्यंत : 300

▪️ पाच ते दहा स्लाइड्स : 500

▪️ दहा ते वीस स्लाइड्स : 900

▪️ वीसपासून पुढे : 1,500

(या किमती केवळ उदाहरणापुरत्या दिल्या आहेत.)

किंमत ठरवण्यात आणखी दोन महत्त्वाचे भाग म्हणजे वेळ आणि कष्ट. म्हणजेच आपण सांगितलेल्या वेळेपेक्षा कुणाला लवकर प्रेझेन्टेशन बनवून हवे असल्यास आपण त्यावर चार्ज लावू शकतो, कारण आपण इतरांपेक्षा त्यांना जास्त प्राधान्य देत आहोत.

तसेच प्रेझेन्टेशनला लागणारी माहिती, फोटोज, आकृत्या वगैरे ग्राहक आपल्याला देणार असतील तर त्यासाठी एक किंमत ठरवावी व जर हे आपल्याला शोधायचे असेल तर त्यासाठी आपण जास्त रक्कम आकारावी. कारण यात मॅन अवर्स अर्थात आपले श्रम जास्त आहेत.

३. कॉपीरायटिंग व भाषांतर

आज ई-कॉमर्सचे प्रमाण खूप वाढले आहे. स्टार्टअप असो वा मोठा उद्योग, आज जवळपास सर्वच व्यक्ती आपली उत्पादने ऑनलाइनसुद्धा विकण्याला प्राधान्य देत आहेत. अशा वेळी त्यांना मोठ्या प्रमाणावर कॉपीराइटर्स व भाषांतर करणार्‍यांची गरज असते. त्यामुळे ही एक उत्तम उद्योगसंधी ठरू शकते.

सुरुवात कशी कराल? : आपल्या ओळखीत कुणी नवीन उद्योग सुरू करत असेल तर त्यांना भेटावे. सुरुवातीला केवळ उत्पादनांचे तपशील (प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन) लिहिण्याचे काम मिळाले तरी हरकत नाही. आपले आधीचे काम व त्याचा दर्जा पाहून आपल्याला पुढे कामे मिळवणे सोपे जाईल. लगेचच आपल्याला कोणते मोठे काम मिळेल अशी अपेक्षा ठेवणे योग्य ठरणार नाही.

किंमत कशी ठरवाल? : साधारणत: या प्रकारच्या कामांत कमिशनवर आधारित पैसे मिळतात. अर्थात इतक्या उत्पादनांचा तपशील इतक्या काळात लिहिला तर इतके पैसे. तसेच भाषांतरात प्रति शब्द, प्रति परिच्छेद, प्रति पान इतकी रक्कम अशी रचना असते. आपल्याला एकदा अनुभव आला व आपल्या कामाचा दर्जा वाढला, की त्यानुसार आपण आपल्या कामाची किंमत ठरवून समोरच्याला सांगू शकाल.

४. अ‍ॅफिलेट मार्केटिंग व चॅनेल पार्टनरशिप

चॅनेल पार्टनरशिप अर्थात एखाद्या उद्योगाची उत्पादने विकून त्यांवर कमिशन मिळवणे. तसेच आज-काल फ्लिपकार्ट-अ‍ॅमेझॉनसारख्या अगदी मोठमोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट्सपासून लहानातल्या लहान वेबसाइटवर अ‍ॅफिलेट मार्केटिंग हा पर्याय उपलब्ध असतो.

अ‍ॅफिलेट मार्केटिंग व चॅनेल पार्टनरशिप साधारण सारखेच आहेत. अ‍ॅफिलेट मार्केटिंगमध्ये आपण एखाद्या ई-कॉमर्स पोर्टलवरील उत्पादने विविध मार्गांनी विकायची असतात व त्यावर आपल्याला कमिशन मिळते. आपल्याला जी उत्पादने विकायची असतील त्यांची आपल्याला लिंक (यू.आर.एल.) मिळते.

सुरुवात कशी कराल? : कोणकोणत्या वेब पोर्टल्सवर ही सुविधा उपलब्ध आहे हे तपासून व त्यावर मिळणार्‍या कमिशन्सचे विश्‍लेषण करून उत्पादने विकण्यास सुरुवात करू शकतो. आपली स्वतःची वेबसाइट किंवा ब्लॉग असेल तर त्यावर हे प्रमोट करू शकतो किंवा आपल्या सोशल मीडिया प्रोफाइल्स जसे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरूनही हे प्रमोशन करू शकतो.

उत्पादनांवर मिळणारे कमिशन हे समोरची कंपनी ठरवत असल्याने आपल्याला उत्पादनांच्या किमती ठरवण्याची आवश्यकता भासत नाही; परंतु आपल्या प्रगतीसाठी स्वतःची टार्गेट्स मात्र जरूर ठरवावी.

५. इव्हेंट मॅनेजमेंट

लोकांना आजकाल सर्व कामे अगदी जलद गतीत पण कमीत कमी कष्टात करायची असतात. यामुळे विविध कार्यक्रम जसे वाढदिवस, प्रॉडक्ट लाँच, बारसं आदींचे प्लॅनिंग करणं व तो कार्यक्रम पार पडेपर्यंत ज्या कोणत्या सेवा/वस्तू लागतील त्या मॅनेज करणं हासुद्धा एक उत्तम उद्योग ठरत आहे. यामुळे केवळ अर्थार्जनच होणार नाही, तर वस्तू, माणसं, कामं मॅनेज करण्याचं उत्तम ट्रेनिंगही आपल्याला मिळते.

सुरुवात कशी करावी? : सुरुवातीला लहान ऑर्डर्सपासून सुरुवात करावी. त्यात फार नफा नाही मिळाला तरी काही हरकत नाही. या सुरुवातीच्या कामांचा वापर अधिकाधिक अनुभव घेण्यासाठी तसेच आपल्या कामाचा दर्जा दाखवून देण्यासाठी करावा. यामुळे पुढील मोठी कामे मिळवणे व करणे सोपे जाईल.

किंमत कशी ठरवाल : सुरुवातीला लोकांना परवडेल व आपल्याला नुकसान होणार नाही अशी किंमत ठरवावी. पुढे आपल्या कामाचा दर्जा वाढवल्यावर स्पर्धकांच्या किमतीचा अभ्यास करून व आपल्या खर्चाचे विश्‍लेषण करून किंमत ठरवावी.

६. केक बनवणे

सध्या घरच्या घरी केक, माफिन (मावा केक), पॉपस्टिक्स बनवणे हा एक उत्तम उद्योग ठरत आहे. अगदी बेसिक केक बनवण्यापासून कस्टमाइज्ड केक आपण बनवू शकतो.

पूर्वी फक्त वाढदिवसांच्या केकची मागणी असे; परंतु आता वाढदिवसांसोबत लग्न, नवीन वर्ष, उद्घाटन समारंभ यांपासून अगदी होळीला किंवा भारत-पाकिस्तान मॅचमधील भारताच्या विजयानंतरही लोक केक कापू लागले आहेत. तसेच होम-मेड केकची मागणीसुद्धा वाढत आहे.

सुरुवात कशी करावी? : सर्वात आधी केक बनवण्याचे सामान स्वस्तात स्वस्त तसेच उत्तम दर्जाचे कुठे मिळेल याबद्दल माहिती मिळवावी. तसेच विविध प्रकारचे केक कसे बनवावे व त्यांना किती खर्च येणार आहे हेसुद्धा काढावे. सर्वात आधी आपल्या मित्र-परिवारांच्या कार्यक्रमांसाठी केक बनवणे सुरू करू शकतो व त्यांकडून त्यांचे अभिप्राय मागून त्यानुसार आपल्या केकच्या चवीत बदल किंवा दर्जात काही कमीजास्त असेल तर ते आपण करू शकतो.

किंमत कशी ठरवाल? : आपण कोणकोणत्या प्रकारच्या केकनी सुरुवात करणार आहोत हे आधी ठरवावे. जर डिझायनर केक करणार असू तर सध्याच्या केक शॉप्समध्ये जाऊन त्याची माहिती काढावी.

७. दागिने घडवणे व विकणे

सध्या बहुतांश महिलांचा कल खरे दागिने घालण्यासोबत कॅज्युअल किंवा इमिटेशन ज्वेलरी वापरण्याकडेसुद्धा आहे. त्यामुळे ट्रेंडिंग दागिने बनवणे व विकणे ही एक उत्तम उद्योगसंधी आहे. यात आपल्याला आपले दुकान उघडण्याचीही गरज नाही.

सुरुवात कशी करावी? : आपली ई-कॉमर्स वेबसाइट तयार करून त्यावर आपली उत्पादने उत्तमरीत्या दर्शवावी. या उत्पादनांचे फोटो व लिंक्सचे विविध सोशल मीडिया स्थळांवरून प्रमोशन करावे. यामुळे सुरुवातीला उद्योग चालू करण्यासाठी जो खर्च येतो तो कमीत कमी येईल.

किंमत कशी ठरवाल? : आपण ज्या प्रकारचे दागिने तयार करत आहात त्यानुसार किंमत ठरवावी. ही किंमत ठरविताना उत्पादने लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जो खर्च येणार आहे अर्थात शिपिंग चार्ज तो उत्पादनांच्या किमतींमध्येच समाविष्ट करायचा आहे की वेगळा दाखवायचा आहे, कोणत्या माध्यमांतून उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवू, अशा सर्व बाबींचा विचार करणे अनिवार्य आहे.

८. यूट्यूब चॅनेल

एखादे कठीण गणित कसे सोडवावे? एखादा कठीण पदार्थ कसा तयार करायचा? कमी वेळेत आपली झोप कशी पूर्ण करावी? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न आज लोक यूट्यूबला विचारतात.

या सर्व सर्चिंग आणि सर्फिंगमध्ये सर्वात जास्त यशस्वी ठरतात ते म्हणजे यूट्यूबवरील व्हिडीओज, कारण लोकांना केवळ पाहण्या किंवा ऐकण्याऐवजी पाहणे व ऐकणे हे दोन्ही एकत्र करायला आवडते. त्यामुळे एखाद्या खमंग विषयावर यूट्यूब चॅनेल उघडणे व त्यातून नफा कमविणे हीसुद्धा एक उत्तम उद्योगसंधी ठरत आहे.

सुरुवात कशी कराल? : एखादा विषय निवडावा ज्यावर अ‍ॅनिमेटेड किंवा प्रत्यक्ष व्हिडीओ बनवता येतील. हा विषय लोकांच्या पसंतीचा हवा; ज्याने आपल्या व्हिडीओज ना जास्तीत जास्त लोकं भेट देतील. आपल्या व्हिडीओजना जितके जास्त लोक भेट देतील त्यानुसार आपल्याला त्यातून पैसे मिळत जातात. त्यामुळे यात आपल्याला किंमत ठरवण्याची गरज भासत नाही. आपल्या यूट्यूब चॅनेलचे फॉलोवर्स वाढवणे मात्र अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय आपल्या व्हिडीओजमध्ये इतर उद्योजकांची उत्पादने प्रमोट करून त्यातूनही नफा कमावू शकतो.

९. छंद वर्ग

आपल्यापैकी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विषयात पारंगत असतो. एखादा अभ्यासात हुशार असेल, कुणाला पोहणे उत्तम येत असेल, कुणाच्या हातात कला असेल, तर कुणाला उत्तम नृत्य येत असेल. याच आपल्या आवडीचे रूपांतर आपण उद्योगसंधीत करू शकतो. कसे.. तर आपली ही आवड इतरांना शिकवून. जसे योगवर्ग, जिम ट्रेनर, गाण्याचे वर्ग इ. घेऊन. दिवसभरातील आपला मोकळा वेळ ओळखून त्या वेळेत आपण हे नक्कीच करू शकतो.

सुरुवात कशी करावी? : आपल्याकडे जर जागा व साहित्य उपलब्ध असेल तर आपण लगेच वर्ग सुरू करू शकतो; परंतु आपल्याजवळ हे नसेल तर एकतर आपण कुणा दुसर्‍याच्या वर्गांमध्ये शिकवू शकतो किंवा एखादी जागा त्या वेळेपुरती भाड्यावर घेऊन तिथून सुरुवात करू शकतो. आपण काय शिकवत आहोत व किती वेळ शिकवत आहोत यावरून आपण आपल्या वर्गांची फी ठरवावी.

१०. सीझनल उत्पादने विकून आवड ओळखणे

आपल्यापैकी बर्‍याच जणांना असं वाटत असेल की, माझी आवड कशात आहे, हे मला अजून समजलेच नाहीये. तर मी नेमका उद्योग करू कशाचा? या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ट्राय अँड टेस्ट अर्थात विविध उद्योग करून पहा व आपली आवड ओळखा.

वर्षभरात विविध वस्तूंचा सीझन सुरू असतो. कसे जानेवारीत पतंग, उन्हाळ्यात आइस्क्रीम, गणपतीत सजावट, दिवाळीत फटाके तर डिसेंबरमध्ये नाताळ व नवीन वर्षासाठी चॉकलेट्स, असे विविध सीझन ओळखून त्यानुसारही आपण उद्योग करू शकतो. यामुळे आपल्याला आपली आवड कळेल, शिवाय विविध उद्योगांचा अनुभवही मिळेल.

आपण जर बारकाईने पाहिले तर अशा असंख्य उद्योगसंधी आपल्याला दिसतील. गरज आहे ती केवळ आपली आवड व लोकांची गरज ओळखून तिला उद्योगसंधीत रूपांतरित करण्याची.

– शैवाली बर्वे


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!