वीस वर्षे, अठरा धंदे…

1) तयार कपडे 2) स्टीलची भांडी 3) इलेक्ट्रिकल वस्तू, 4) किराणा माल 5) चॉकलेट्स 6) पेंट 7) टी-शर्ट्स 8) नेल्टस 9) शोभेचे दागिने 10) भेटवस्तू 11) ग्रीटिंग कार्ड्स 12) प्लॅस्टिक वस्तू 13) खेळणी 14) स्टेशनरी 15) व्हिडीओ लायब्ररी 16) ‘डेकोरेशन’च्या वस्तू 17) कटलरी 18) काचेच्या वस्तू.

ही यादी मला देत होता एक मध्यमवयीन गृहस्थ…

गेल्या वीस वर्षांत या सगळ्या धंद्यांमध्ये तो अक्षरश: पडला होता. साफ उताणा झाला होता. प्रत्येक धंदा त्याने नुकसानीत बंद केला होता. त्याचा प्रश्‍न काहीसा असा होता- “मी व्यापारी  समाजातला आहे, त्यामुळे नोकरी हा पर्यायच माझ्याकडे नाहीय.

मला धंदाच करायचा आहे; परंतु जवळजवळ प्रत्येक धंदा मी करून झालोय. प्रत्येकात मी मार खाल्लेला आहे. अजूनही माझ्यात  उमेद आहे, पण मार्ग मिळत नाही. तुम्ही मला मार्ग दाखवा. कसला धंदा करू ते सांगा.”

मी त्याची पत्रिका अभ्यासली, त्यामध्ये सप्तम स्थान (पत्नी आणि द्वितीय स्थान पैसा) याचा संबंध प्रस्थापित होत होता. मी त्याला विचारले, या तुझ्या व्यवसायांमध्ये तुझ्या पत्नीचा काय सहभाग असतो? “अहो, तिच्याच तर घरच्यांनी मला आतापर्यंत मदत केली आहे प्रत्येक वेळी!

माझ्या भावांबरोबर आणि वडिलांबरोबर माझं पटत नाही. म्हणून मला वेगळा धंदा काढण्यास त्यांनीच उद्युक्त केले; परंतु दोन धंदे गाळात गेल्यावर त्यांनी हात वर केले व मला, तुझे तू पहा, असे सांगितले. तेव्हापासून आतापर्यंत बायकोच्या माहेरच्यांनीच माझी पाठराखण केली आहे; परंतु आता त्यांचादेखील धीर खचत चालला आहे.

त्यांनी मला निर्वाणीचा इशारा दिला आहे, पूर्ण विचार करून, सल्ला घेऊन आता धंदा चालू कर. आम्ही तुला पाहिजे तेवढी मदत करू; परंतु धंदा बसला तर परत आमच्याकडे हात पसरायचे नाहीत. माझ्या सासरचीं लोक तशी श्रीमंत आणि दिलदारही आहेत. माझी हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी माझ्या पत्नीस व मुलांना काही कमी पडू दिलं नाही.” त्या गृहस्थास आठवणींनी गदगदून आले.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, अशी वाक्ये ऐकण्यास बरी वाटतात आणि भाषणातही बर्‍यापैकी टाळ्या खेचतात, परंतु अपयश पचवणं काही सोपं नसतं. एखादं दुसरी पायरी आपण सहज करतो;

परंतु 18 पायर्‍या?

अर्थात प्रत्येक वेळी अपयशास आपणच कारणीभूत असतो असेही नाही.

प्रसिद्ध योद्धा नेपोलियन आपला सेनाधिकारी नेमण्यापूर्वी त्याचा इतिहास, त्याने लढलेल्या लढाया, त्याचे यश/अपयश, त्याचे व्यक्तिमत्त्व इत्यादींचा अभ्यास करायचाच, परंतु हेदेखील विचारायचा, ‘‘Is he Lucky?” एवढं अपयश येऊन-देखील खचून न जाणार्‍या या गृहस्थास मी मनातल्या मनात मानाचा मुजरा केला. या कुंडलीस बर्‍यापैकी सखोल विचार व analysis ची गरज होती.

येथे Elimination of Veriables ही पद्धती चांगल्या प्रकारे वापरली जाऊ शकते. यामध्ये गेल्या वीस वर्षांतील दशा, आंतरदशा, शनिभ्रमण, Transacts यांचा साकल्याने विचार करून त्याची जातकाच्या जीवनातील घडामोडींशी सांगड घातली जाते, त्यामुळे सामान्य गोष्टी आणि असामान्य स्थिती वेगवेगळी अभ्यासता येते.

त्याच वेळी External Situation चादेखील सम्यक अभ्यास करून या दोन्हीमध्ये मेळ बसवायचा असतो. यालाच Analysis by Synthesis असेदेखील नाव आहे.

या कालखंडात प्रथम मंगळ व नंतर राहू महादशा होती. इतर ग्रहमानदेखील बर्‍यापैकी (More or Less) अनुकूल होते. याचा अर्थ या जातकातच किंवा पत्रिकेत असा काही फॅक्टर होता जो व्यवसायवृद्धीस अडसर ठरत होता किंवा विरोध करत होता.

त्यांनी केलेले व्यवसाय हे वेगवेगळ्या जागी होते. वेगवेगळ्या नावांखाली होते आणि वेगवेगळ्या वेळी होते. त्यामुळे अपयशाची कारणेदेखील वेगवेगळी असू शकली असती. म्हणूनच साम्यस्थळे सापडणे महत्त्वाचे होते.

त्याच्या वेगवेगळ्या व्यवसायांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, ही सगळी FMCG (Fast Moving Consumer Goods) Non Perishable अशा प्रकारची उत्पादने होती. त्यातही विशेष म्हणजे या सगळ्या उत्पादनांत Processing शून्य होते.

होलसेलरकडून वस्तू घ्यायची व ती तशीच ग्राहकापर्यंत पोहोचवायची असे व्यवसायाचे स्वरूप होते. याउपरांत ही सगळी उत्पादने व्यवहारात सोपी (Easy to use) असल्यामुळे विक्रेत्यांची भूमिका अतिशय लिमिटेड होती. म्हणजेच एकदा दुकान टाकले व माल भरला की, फक्त गिर्‍हाईकाची वाट बघायची. गिर्‍हाईक आल्यास त्याला पाहिजे ती वस्तू काढून द्यायची.

आता परत पत्रिकेकडे मोर्चा वळवला. अष्टक वर्गाप्रमाणे जातकाचे तृतीय स्थान अतिशय बलवान होते. याचा अर्थ गृहस्थ प्रचंड लटपट्या, खटपट्या होता; परंतु त्याच वेळी तृतीयातील ग्रहांचा अष्टमाशी थेट संबंध होत होता. याचा अर्थ हा की, याची अ‍ॅक्टिव्हिटी किंवा उत्साह हा स्वल्पजीवी असणे हा स्थायिभाव असणे साहजिक आहे.

मी त्याला विस्ताराने त्याची कथा व व्यथा मांडण्यास सांगितली.

त्याप्रमाणे सर्वसाधारण नकाशा तयार झाला. तो असा- रात्रंदिवस खपायचा, जागा शोधायची, फर्निचर करून घ्यायचे, सप्लायर्स बांधायचे, जाहिरात करायची, माल भरायचा;  या सगळ्या चॅलेंजिंग गोष्टी हे महाशय चांगल्या प्रकारे करत; परंतु एकदा दुकान चालू झाले की, याला करण्यास काही शिल्लक नसे.

मग फक्त कपाटातील प्रॉडक्ट काढून गिर्‍हाईकास द्यायचे एवढेच. इथे याचे दुर्लक्ष व्हायचे. एकसुरी आणि कंटाळवाणे रटाळ काम आणि येथेच याच्या व्यवसायाची गळती चालू व्हायची.

तृतीयाचा अष्टमाशी असलेला संबंध येथे स्पष्ट होतो. धंदा घसरणीला लागायचा, गिर्‍हाईक इतर जागी जायचे, नोकरदेखील मालावर हात मारायचे, हादेखील दुकानातून दिवसातील बराच वेळ गायब असायचा. असेच, प्रत्येक वेळी हाच इतिहास. आता पूर्ण घटनापट उघडला आणि त्याच्या पत्रिकेशी तंतोतंत जुळलादेखील. आता पुढचे पाऊल.

आता गुरूची दशा सुरू असल्यामुळे जातकाचा स्वभाव बर्‍यापैकी सौम्य झाला होता. त्याला मी समजावून सांगितले की, तो धंदेवाल्यांचा धंदेवाला होऊ शकतो. कसे? तर त्याने तरुण पार्टनर घेऊन नवीन धंदा उघडायचा, त्याने आधी केलेल्या धंद्यांपैकीदेखील चालेल. त्याचा पार्टनर हा पत्नीसारखा असला पाहिजे. त्याच्या पार्टनरने दुकान सांभाळायचे.

याने अनेक पार्टनर्स किंवा अनेक व्यवसायदेखील करण्यास अडचण नाही; परंतु प्रत्येक भागीदार आपापला किल्ला सांभाळणारा असला पाहिजे. त्याला मी त्याची पत्रिका आणि त्याचा आयुष्यक्रम यांची सांगड व्यवस्थितपणे उलगडून दाखवली. त्याला ते बरोबर पटले. त्यानंतर त्याने अनेक वेळा माझा सल्ला घेतला.

होणार्‍या भागीदाराची पत्रिका जुळवल्याशिवाय त्याने भागीदारी केली नाही. आता त्याचे तीन वेगवेगळे व्यवसाय उत्तम प्रकारे चालले आहेत आणि स्वत: हे गृहस्थ व्यवसाय कसा करावा याबद्दल त्यांच्या समाजाच्या विविध व्यासपीठांवरून तरुणांना मार्गदर्शन करीत असतात.

व्यवसायामध्ये स्ट्रार्टर्स आणि मेंटेनर्स असे दोन मुख्य प्रकार असतात. स्टार्टर्स हा बिझनेस चालू करू शकतो, पण चालवू शकेलच असे नाही. मेंटेनर हा चालू बिझनेस चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. नवीन बिझनेस चालू करणे त्यास झेपेलच असे नाही. या दोघांची आपण सांगड घातल्यास आपल्या व्यवसायास वेगळीच झळाळी प्राप्त होते.

एक ऐतिहासिक उदाहरण येथे चपखल बसते. राघोबादादा अथवा राघोभरारी हा मराठ्यांचा अतिशय यशस्वी सेनापती. विद्युतवेगाने सैन्याच्या हालचाली करणे, धडाकेबाज पद्धतीने हल्ला करणे व शत्रूच्या मोठ्या सैन्याचा बीमोड करणे यासाठी राघोबा प्रसिद्ध होता. त्याच्या झंझावाती चढायांमुळे त्यास राघो-भरारी म्हटले जायचे.

त्याने मराठ्यांचे साम्राज्य कटकपासून अटकपर्यंत पसरवले; परंतु राघोबादादा जेवढा अधीर सेनापती तेवढाच अधीर तहकर्ता. युद्ध जिंकल्यावर त्याला एवढा आनंद व्हायचा की, तो शत्रूशी अगदी मामुली अटी घालून तह करायचा. त्यामुळे जरी युद्ध जिंकले तरी मराठेशाहीवरचा कर्जाचा डोंगर वाढतच जायचा. म्हणून तर ‘युद्धात जिंकले आणि तहात हरले’ अशी म्हण रुजू झाली.

तशीच स्थिती या गृहस्थांची होती. त्याच्या अधीरपणामुळे तो धंदा सुरू करण्यासाठी लागणार्‍या हालचाली अगदी पटापट करायचा, परंतु नंतर हाच अधीरपणा त्याला नडायचा. वरती तो अशा प्रकारच्या उत्पादनांचा व्यापार करायचा ज्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात कौशल्यांची गरज असते.

गिर्‍हाईकांची वाट पाहत दुकानात बसणे म्हणजे याला शिक्षाच. अशी दुकाने चालतात ती निव्वळ तिथे असतात आणि उघडी असतात म्हणून. तेच याला नेमके जमायचे नाही. नोकरांवर धंदा होत नाही. मालकाने तेथे असावेच लागते. त्यामुळे हळूहळू धंदा बसत जायचा आणि नुकसानीत धंदा बंद करण्याची पाळी यायची.

‘उद्योग ज्योतिष’मध्ये आपण प्रश्‍नाचा साकल्याने अभ्यास केला. केलेले व्यवसाय, त्यांची वैशिष्ट्ये, जावकाची पत्रिका, त्याची भक्तिस्थळे, त्याची टाइमलाइन, त्या भक्तिस्थळात लपून असलेली कमजोरी आणि सद्य परिस्थितीची सांगड घातल्यावर आपोआपच प्रश्‍नाचे उत्तरात रूपांतर झाले.

आनंद घुर्ये
(लेखक ‘प्राचीन भारतीय ज्ञान’ या विषयातले अभ्यासक आहेत)

संपर्क : 9820489416

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?