बोहनी अर्थात चेष्टा मुहूर्त

आपल्या सगळ्यांना बोहनी म्हणजे काय हे माहित आहे. व्यापारी मित्रांना विशेषतः बोहनी म्हणजे दिवसाचा पहिला व्यवहार. पहिला ग्राहक, पहिली विक्री, पहिली आवक. ही विक्री विनासायास व्हावी, विक्रीची किंमत जास्तीत जास्त असावी आणि त्यातून आपणास चांगला फायदा मिळावा अशी उद्योजकाची मानसिकता असते.

त्यापुढे जाऊन, जर पहिला व्यवहार चांगला झाला तर नंतरचा दिवसदेखील चांगला जाईल. दिवसभरात विक्री चांगली होईल असा विश्वासदेखील असतो. या सगळ्यांना म्हणतात बोहनी. बोहनी चांगली तर दिवस उत्तम अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळे व्यापारी बोहनी लवकरात लवकर व्हावी. चांगल्यात चांगली व्हावी आणि उत्तम नफा व्हावा असा विचार करतात.

सर्वच वेळा या तिन्ही गोष्टी एकत्र जमत नाहीत तेव्हा व्यापारी, व्यापार्‍यासारखाच विचार करून एखादी गोष्ट कमी करून दुसर्‍या दोन साधावयाचा प्रयत्न करतो. जसे किमतीत थोडी सवलत देऊन लवकर व्यवहार करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात हा व्यवहार रोखीने करण्यावर त्यांचा टभर असतो. सहसा बोहनी उधारीवर केली जात नाही नाही तर दिवसभर उधारीच करावी लागू शकेल.

आताच्या कॅशलेसच्या जगामध्ये पेटीएम, फोनपे, क्रेडिट कार्ड यासगळ्या गोष्टी रोख किंवा कॅशच मानल्या जातात. पहिली विक्री, उत्तम विक्री, दिवसभराची उत्तम विक्री असा यामागचा तर्क आहे आणि हे फक्त भारतात आहे अस नाही. सगळ्या जगभरात वेगवेगळ्याप्रकारे, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये हा विश्वास कायम आहे.आणि तो अनेक प्रकारे प्रतीत होतो.

उदाहरणार्थ ही म्हण बघा Well Begun is Half Done – Aristotle (ग्रीस) चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाले समजा. मध्य पूर्वेत याला सिफ्ता म्हणतात. तर अमेरिकेत हानसेल, स्कॉटलंडमध्ये फर्स्टफूट आणि जपानमध्ये सोनोही. उद्योगाची सुरुवात चांगली व्हावी, सुरळीत व्हावी म्हणून तर आपण भूमिपूजन करतो ना? सभासमारंभात दीपप्रज्वलन, पूजेत गणेशपूजा आणि लग्नात गृहप्रवेश महत्त्वाचा असतो तो यासाठीच. यालाच म्हणतात चेष्टा मुहूर्त.

मुहूर्त म्हणजे चांगली आणि अनुरूप परिस्थिती. यात काय, कुठे, कधी आणि कसे अशा चार प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. यालाच काळ मुहूर्त, स्थळ मुहूर्त आणि चेष्टा मुहूर्त असे म्हणतात. यात चेष्टा या शब्दाचा अर्थ कृती असा घेतला जातो. विनोद किंवा थट्टा असा नव्हे. चांगला मुहूर्त घेतला तर आपले काम सुरळीत व्हावयास मदत होते असा याचा अर्थ.

पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोधमे।
साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्॥१८-१३॥
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्॥१८-१४॥      (श्रीमद भगवत गीता)

कोणत्याही प्रकल्पात यश मिळवण्यासाठी पाच गोष्टींची अनुकूलता आवश्यक असते. अधिष्ठान, कर्ता, साधने, वेगवेगळ्या क्रिया आणि दैव या आहेत त्या पाच गोष्टी. आता मग बोहनी चांगली व्हावी यासाठी उद्योजकाने काय काय करावयास हवे? ते असे.

  • तुमच्या दुकानात माल पुरेपूर भरलेला ठेवा.
  • संपत आलेल्या गोष्टी लगेच मागवून घ्या. उद्या काय विकले जाऊ शकेल याचा पूर्व विचार करा.
  • पर्यायी वस्तू ठेवा म्हणजे आलेला ग्राहक काहीन घेता जाणार नाही.
  • दुकानातली ऊर्जा आणि स्पंदने चांगली आणि आपल्या दुकानास पूरक अशी ठेवा. याबाबत आपण आधीच्या लेखांमध्ये उहापोह केला आहे.

  • सकाळी पूजा करताना देव, पालक, आप्त यांच्याबरोबरच कुटुंबीय, नोकर, ग्राहक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा.
  • उत्तम विक्री, उत्तम ग्राहक यांचे visualization करा.
  • तुमच्या दुकानातील वस्तूंकडेदेखील आप्तदृष्टीने पाहण्याची सवय करा.
  • दुकानामध्ये क्षुब्ध, कर्कश, कर्णकटू भाषा वापरू नका.
  • उत्तम प्रतीच्या, न विक्रीच्या, शोभेच्या वस्तू दुकानात ठेवा. त्या ग्राहकाचे लक्ष वेधून घेतात.
  • आरसे ठेऊन आपल्या दुकानाचा उठाव वाढवा. यामुळे ऊर्जादेखील वाढते.

 

  • क्रिस्टल्स, बेल्स, इम्स याचा योग्य सल्ल्यानुसार वापर करा.
  • दुकानाचा दरवाजा चांगल्या प्रकारे सजवा.दरवाज्याजवळ आकर्षक गोष्टी ठेवा. इम्पल्स गुड्स.
  • दुकान चालू करताना रोखीचे कपाट भरलेले ठेवा.

समजा बोहनी चांगली नाही झाली. पहिलाच ग्राहक खूप किटकिट्या, खरखर मुंड्या निघाला आणि भरपूर वेळ घेऊन, तुमची दमणूक करून, खूप सवलत मागून, वस्तू विकत न घेताच तणतणत गेला तर? वाईट बोहनीचे नुकसान खालील उपाय करून भरून काढा.

  • शांतपणे बसा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. स्वतःची मनस्थिती बिघडू देऊ नका.
  • शनी संबंधित क्रिया करू नका. जसे श्वासाखाली पुटपुटणे, बोटे मोडणे, काउंटर तापपिंग करणे इत्यादी.
  • शुक्र, गुरु, आणि बुध यांच्यासंबंधातील क्रिया करा. किणकिणणारी घंटी वाजवा, कॅश ड्रॉवरमध्ये बघा, पैशांमधून हात फिरवा, चहा मागवा आणि आलेल्या नवीन ग्राहकांबरोबर वाटून घ्या, तुमचे रजिस्टर चेक करा आणि त्यामध्ये आता पर्यंतचा सगळ्यात चांगला दिवस बघा.
  • एखादे गाणे गुणगुणा. हास्यरसातले असु द्या, करुण रसातले नको.
  • स्मितहास्य करा. रेन मेकरचा वापर करा.
  • गेलेल्या ग्राहकांबद्दल शुभचिंतन करा. जो देगा उस्का भला, जो ना देगा उसका भी भला !
  • खुर्चीवर व्यवस्थित बसा, दोन्ही पंजे माने मागे न्या आणि २० सेकंडवर सी लिंग फॅनकडे बघा. (हसू नका, ही अतिशय शास्त्रीय पद्धत आहे. यामुळे तुमचा उत्साह नक्कीच वाढतो. जास्त माहिती पाहिजे असल्यास गूगल करा. Dr. Ami Cuddy, Harvard Researcher, Tedtalk)

जाता जाता एक सावधानीचा इशारा. काही ग्राहक मुद्दाम सकाळी सकाळी येतात आणि बोहनीच्या संकल्पनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. ते वस्तू अगदी पडत्या भावात लाटण्याचा प्रयत्न करतात. किंवा सतरा चौकशा करून तुमचा मानभंग करतात. अशा लोकांना तुमचा फायदा घेऊ देऊ नका. शांतपणे एक चहा पाजा आणि या म्हणून सांगा. त्यांच्या बडबडीकडे लक्ष देऊ नका. शेवटी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.

– आनंद घुर्ये
९८२०४८९४१६

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?