श्रीरामांचे एकपत्नीत्व हवे धंद्यात

आपण प्रभु रामचंद्रांचे स्मरण करतो, पूजन करतो; एक उद्योजक म्हणून आपल्याला श्रीरामाचे काही गुण आपल्यात कटाक्षाने बाणवायला हवेत. प्रभू रामचंद्र हे एकपत्नीव्रती होते, हे आपण सगळे जाणतोच. सीतामैय्या जेव्हा त्यांना सोडून गेल्या, तेव्हाही त्यांनी दुसऱ्या कोणा स्त्रीचा विचार केला नाही.

थोडक्यात प्रभूंनी फक्त सीतेसोबतच संसार केला. त्या संसारात कितीही संघर्ष सहन करावा लागला असू देत, कितीही सुख-दुःखे येऊ देत, ते विचलित झाले नाहीत.

एक उद्योजक म्हणून आपल्यालाही आपल्या संसारात दीर्घकाळपर्यंत एकच संसार थाटायचा आहे. म्हणजे एकाच व्यवसायावर टिकून राहायचे आहे. नवीन व्यवसाय सुरू करणं म्हणजे लग्न करण्यासारखंच आहे. ज्याप्रमाणे आपण लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी शोधत असतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आयुष्यभर साथ देईल का? याचा पहिला विचार करून तिची निवड करतो.

व्यवसाय सुरू करतानाही याच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. क्षणीक लाभ किंवा आकर्षणापोटी एखादा व्यवसाय सुरू केलात, तर लवकरच त्याचा गाशा गुंडाळण्याची वेळ येऊ शकते. मग सुरू होतो ‘नवा गडी, नवं राज्य’ हा खेळ. व्यवसाय बदलला की अनेक गोष्टींची सुरुवात नव्याने करावी लागते. शिवाय पहिला धंदा जसा जमला नाही, तसाच हाही जमला नाही तर काय?

हा प्रश्न कायम राहतोच. त्यामुळे आपण पाहतो की वारंवार व्यवसाय बदलणारे उद्योजक कोणत्याच एका धंद्यात पाय रोवून ठाम उभे दिसत नाहीत. तुम्ही जो व्यवसाय करता, त्यात कालांतराने तुमचा मार्केट शेअर निर्माण होण्याची गरज असते.

टाटा, अंबानी, प्रेमजी, गोदरेज, अदानी अशा सर्व उद्योजकांची उदाहरणे पाहाल तर ते ज्या व्यवसायात उतरलेत त्या त्या क्षेत्रात किमान १० ते ९० टक्क्यांपर्यंत त्यांचा मार्केट शेअर आहे. टाटांचे मीठ हेच किती घरात रोज खाल्लं जात असेल म्हणजे मीठ उत्पादन या व्यवसायात टाटांचा शेअर किती याचा विचार करा.

एखाद्या व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, मार्केट शेअर निर्माण करण्यासाठी तुम्हाला त्याच व्यवसायात बरीच वर्षे द्यावी लागतील, अनेक खाचखळगे पाहावे लागतील, संकटांचा-चढउतारांचा सामना करावा लागेल. एखाद्या क्षेत्रात तुम्हाला ब्रॅण्ड म्हणून उभं राहायचं असेल तर मोठी तपस्या करावी लागते.

टाटा, अंबानी, गोदरेज, किर्लोस्कर, चितळे अशा उद्योजकांनी एकेका क्षेत्रात आपलं नाव निर्माण करण्यासाठी काही वर्षच नाही, तर काही पिढ्या खर्ची केल्या आहेत; त्यामुळे आज आपण त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो. तरुण उद्योजकांमध्येही हीच चिकाटी, धीर आणि संयमाची गरजच आहे. प्रभूरामचंद्रांप्रमाणे एकपत्नीव्रताची गरज आहे.

– शैलेश राजपूत
(लेखक स्मार्ट उद्योजक®चे संपादक आहेत.)
९७७३३०१२९२

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?