बाह्य प्रेरणा असावी, पण महत्त्वाचं म्हणजे आंतरिक प्रेरणा अखंड असावी, हे मानणारे बिपिन स्पष्ट करतात की मी मोटिव्हेशनल स्पीकर नाही, तर हाडाचा ट्रेनर आहे.
स्वतःचा उद्योग करा, या बाह्य मोटिव्हेशनमुळे, शास्त्रीय व वास्तवाचा विचार न करता अनेक जण कर्ज काढून व्यवसाय सुरू करून नंतर त्यात अडकून पडले आहेत. मोटिव्हेशन अगोदर तुमच्याकडे तुमच्या करावयाच्या व्यवसायाची शास्त्रशुद्ध आखणी (बिझनेस प्लॅन) व पाच टप्प्यांची तयारी हवी. नंतर कृती करण्यासाठी तुमच्या ध्येयामुळे व त्याच्या अपेक्षित परिणामांमुळे, तुम्हाला सातत्याने अंतर्गत प्रेरणा, मोटिव्हेशन लाभत राहायला हवं.
मुंबईत जन्मलेले बिपिन यांचं शिक्षण विज्ञान पदवीधर व नंतर कॉम्प्युटर मॅनेजमेंट आणि मार्केटिंगमध्ये झाले. पुढे त्यांनी एनएलपीचा विशेष अभ्यास केला. सुरुवातीला काय करावे माहीत नव्हते. १९८९ मध्ये वडिलांचे आकस्मिक निधन झालं आणि अचानक आजूबाजूच्या माणसांचे वागणे-बोलणे बदलले. जवळ असणारे अनेक जण दूर गेले तर दूर आहेत वाटणार्यांनी खूप मदत केली.
यातून माणसाच्या स्वभावाबद्दल कुतुहल निर्माण झालं. आवड तर होतीच. १९९२ पर्यंत विविध स्थानिक, देशविदेशातील ट्रेनर्स व स्पीकर्स यांचे त्यांनी कार्यक्रम पूर्ण केले. या दरम्यान अनेकांनी त्यांना त्यांच्यातील चांगल्या प्रशिक्षकाची जाणीव करून दिली आणि त्यांनीच बिपिन यांना या व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. मग त्यांनीही स्वतःला काय हवं ते चाचपून पाहिले. मनाचा कल मिळाला आणि व्यावसायिक श्रीगणेशा झाला.
सुरुवातीला भारतीय आयुर्विमा महामंडळात ‘विकास अधिकारी’ म्हणून नोकरी केली. ही नोकरीसुद्धा जनसंपर्क, बोलण्याची आवड आणि सामाजिक दृष्टिकोन यातूनच सुरू केली होती.
१९९६ साली ‘प्रसन्न प्रशिक्षणक्रमा’ची सुरुवात झाली. ही पहिली बॅच ओळखीच्या व्यक्तींमधूनच भरलेली होती. प्रतिसाद उत्तम होता. मागणी वाढली आणि हा प्रशिक्षणक्रम दादरमधील छबिलदास शाळेतून सुरू झाला.
१९९८ साली नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळासाठी ‘प्रसन्न’चे काम सुरू झालं. या काळात यशाचा आलेख चढता होता. प्रथम रविवारी एकच बॅच होती. मग हळूहळू दोन, तीन करत आठवड्याला सात बॅच सुरू झाल्या.
या काळात उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. खरं तर तो किडनीच्या दुखण्यामुळे सुरू झाला होता. पण ते यापासून अनभिज्ञ होते, कारण डॉक्टरांनी मूळ कारण न शोधता त्यांचा व्यवसाय पूर्ण देशभर पसरत असल्याने रक्तदाब वाढत आहे, असं निदान केलं.
पराकोटीचे यश, अपयश आणि आयुष्यातील मोठा धक्कादायक क्षण या सगळ्या गोष्टी बिपिन यांनी या काळात अनुभवलं आहे. पर्सनल एम्पॉवरमेंटचे ट्रेनिंग वर्ग चालू होते, पण याच वेळी मोरारजी मिल्समध्ये संदेश आचरेकर यांच्या संदर्भाने व्हाईस प्रेसिडेंट लेव्हलला ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ हा दोन दिवसांचा कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम घेण्याची संधी बिपिनना मिळाली.
इथूनच त्यांच्या कॉर्पोरेट ट्रेनिंगला सुरुवात झाली. त्यानंतर राजन महाडिक यांच्या संदर्भाने ओबेरॉय हॉटेलच्या संपूर्ण स्टाफचं ट्रेनिंग घ्यायची संधी मिळाली. लोकांना बिपिन यांचं काम आवडत होतं. सोबत कॉर्पोरेट ट्रेनिंग व्यवसायाचासुद्धा विस्तार होत होता. हळूहळू मोठ्या कंपन्या क्लायंट्स होऊ लागल्या होत्या.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे काम मिळवण्यासाठी कोणतंही मार्केटिंग करावं लागत नव्हतं. विविध कंपन्यांच्या एच.आर. डायरेक्टर्स व मॅनेजर्समध्ये आपापसात कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या सकारात्मक व प्रभावी परिणामांबद्दल चर्चा होत होती. यातूनच काम मिळत होतं; हे नम्रपणे बिपिन नमूद करतात.
आयुष्य एका सरळ रेषेत चालू असतं आणि अचानक एखादं वळण असं येतं की क्षणात सगळंच बदललेलं असतं.
“बिपिन, तुझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत”, या डॉक्टरांच्या शब्दांवर क्षणभर विश्वासच बसला नाही. पंधरा वर्षे ज्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून पुढे जात होतो, ते आज निर्विकारपणे आम्हाला हे सांगत होते. हे सगळं क्षणात घडलं नव्हतं. एक-दोन नव्हे तर तब्बल पंधरा वर्षे अगोदरपासूनच ही सुरुवात होती, पण डॉक्टरांनाही हे कळलं नव्हतं.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे दोन्ही किडनी निकामी ते किडनी ट्रान्सप्लांट हा वेदनादायी प्रवास करताना आपल्या ट्रेनिंग पॅशन आणि प्रोफेशनला जपणारे बिपिन मयेकर हे एक प्रेरणादायी आणि उमदं व्यक्तिमत्व. हॅप्पीनेस कोच बिपिन यांचा प्रवास जीवनातल्या कठीण प्रसंगांना, निर्णयांना सोपा करायला नक्कीच मदत करेल.
आज आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेले ग्यान नागपाल तसेच कांचन चिटणीस, मंदार माने, अमेय करंबे, राहुल करमरकर, मिलिंद आपटे, पल्लवी जोशी, देवेंद्र पालव, प्रतिश कोपरकर असे व्यवस्थापनातील अनेक दिग्गजांनी बिपिन यांना सहकार्य केलं आहे व अजूनही करत आहेत.
सोल्वाय, डाऊ इंडिया, क्रोडा केमिकल्स, डीएचएल, ओबेरॉय हॉटेल, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, इप्का लॅबोरेटरीज, गोदरेज, पारले, यासारख्या जवळपास दीडशे कॉर्पोरेट दिग्गज कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम्स बिपिन मयेकर यांनी घेतले आहेत.
लाखो प्रशिक्षणार्थी आहेत. तसेच व्यवसाय मार्गदर्शन अर्थात बिझनेस कोचिंगही ते करतात. पर्सनल कौन्सिलिंगसुद्धा देतात. बिपिन सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कॉर्पोरेट ट्रेनिंग दरम्यान छोट्या छोट्या ८३ वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकतात. याचबरोबर त्यांना आध्यात्मात विशेष रुची आहे.
उद्योजकाच्या होणार्या चुका, त्याच्यातील उणिवा, व्यवसायवाढीसाठी आवश्यक निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास, घातक महत्त्वाकांक्षा अशा अनेक बाबींवर परखड आणि अभ्यासू बिझनेस कोचिंग बिपिन सर देतात. व्यवसायाच्या यशासाठी पाच महत्त्वाचे टप्पे असतात.
तुमचा व्यवसाय कुठे अडकला आहे का? याची खातरजमा त्यांच्या बिझनेस कोचिंग ग्राहक असणार्या उद्योजकांना ते करवून देतात व प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी प्रॅक्टिकल तंत्रे देतात.
भारत सरकारचे बारा दिवसीय अधिकृत उद्योजक प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. त्यात स्थानिक ते जागतिक पातळीवर अग्रगण्य कंपन्यांमध्ये त्यांचा ४ हजारहून अधिक ट्रेनिंग प्रोग्राम्स घेण्याचा त्यांना अनुभव आहे.
आजारपणाविषयी बोलताना बिपीन सांगतात, २०१२ साली दोन्ही किडनी निकामी झाल्याचं कळलं. काही काळ मी बावरलो, पण कुटुंबाच्या, मुलगी निहारिका व पत्नी सुप्रिया तसेच भाऊ मिलिंद व सतिशदादा यांच्या खंबीर साथीने या आव्हानासाठी तयार झालो.
असंख्य प्रकारचे वेदनादायी प्रसंग त्या काळात आले. माझे भाऊ सचिन व नितिनदादा यांचीही साथ होती. डायलिसिस आणि औषधांचे साईड इफेक्टस या सगळ्याला सामोरा गेलो.
२०२१ साली माझ्या भावाने मला किडनी दिली आणि किडनी ट्रान्सप्लांट होऊन पुन्हा एकदा उभा राहिलो आहे. या दरम्यान डॉ. लन अल्मेडा तसेच ग्लोबल हॉस्पिटलमधील नेफ्रॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. भरत शहा, त्यांच्या सहाय्यक डॉ. हेपल वोरा व संपूर्ण नेफ्रॉलॉजी विभाग तसेच ग्लोबल हॉस्पिटलमधील सर्व संबंधित विभाग मदत करत होते व आहेत.
माझे आठवड्यात तीन वेळा सुश्रुत हॉस्पिटलमधील एकेसी येथे ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०२१ डायलिसिस होत होतं. तेथील डॉ. बिल्ला व डॉ. दिपा यांच्या मार्गदर्शनाखाली रोशनी, साईल, दिनेश, पूजा, प्रणया, साई, रुबा, संजय, अक्षता, अमित या डायलिसिस टेक्निशिअन्सनी माझे डायलिसिस सेशन्स व डॉ. गणेश तसेच डॉ. कोमल या स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने केलं होतं.
रोशनी या डायलिसिस टेक्निशिअनला जिने अत्यंत काळजीपूर्वक माझे शेकडो डायलिसिस सेशन्स केले होते, तिला मी ‘मॅजिकल गोल्डन हँड्स’ ही उपाधी दिली होती व आहे. अनेकांच्या आशीर्वाद आणि प्रेमाने मी परत जोमाने कामाला लागलो, पण याचा अर्थ असा नाही की आजारपणाच्या काळात काम थांबलं होतं. काम थोडं थोडं चालूच होतं.
१९९६ पासूनच्या या संपूर्ण प्रवासात अनेक दिग्गज, लेखक, पत्रकार, संपादक, कलाकार, व्यावसायिक, वरीष्ठ व्यवस्थापक, राजकीय नेते यांच्याशी माझे ऋणानुबंध जुळले. दहशतवादी विरोधी पथकाचे महाराष्ट्र प्रमुख सदानंद दाते, यांच्यासारखे रोल मॉडेल लाभले. बिपिन सांगतात, खूप प्रेम व यश मिळालं, पण तरीही पाय जमिनीवर ठेऊन राहायलाही मी यातूनच शिकलो.
बिपिन यांच्या मनात मुंबई पोलीस दलाविषयी खूप आदर आहे. त्यांच्यासाठी विविध स्तरांवर प्रशिक्षण व्याख्याने ते घेत असतात. बिपिन मयेकर यांनी दैनिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत व सा. विवेक अशा विविध वृत्तपत्रांत व साप्ताहिकांमध्ये नऊ सदरं लिहिली आहेत.
त्यांची आतापर्यंत पाच पुस्तके, दोनई-बुक व अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. बिपिन मयेकर यांना पुढे आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत. लवकरच आपलं काम ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नेण्यासाठी ते कार्यरत आहेत.
बिपिन मयेकर : 7021508470
वेबसाइट : happinesscoachbipin.net
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.