आत्मविश्वास निर्माण करता येतो व वाढवता येतो


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आपण जे ध्येय निश्चित केले आहे, त्यावर ठाम राहून, इतर लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून कसे दूर राहावे, त्याचाही विचार केला. तरीही, काही वेळा, काही प्रसंगांत आपल्या ध्येयाविषयी व ते गाठण्याविषयी काही शंका आपल्या मनात येतात व आपण मनाने डगमगू लागतो.

त्यातून काळजी, भीती, शंका यामुळे आपल्या मनात अनिश्चितता निर्माण होते. यावर उपाय म्हणजे, आत्मविश्वास. आपण ठरवलेल्या ध्येयावर आपण ठाम राहाणे, ती गोष्ट प्रत्यक्षात येईल व त्या दृष्टीने तुमची योजना आहे व तुम्ही ती प्रयत्नपूर्वक राबवत आहात, तर मनाची जी अवस्था तुम्हाला ते करायला भाग पाडते, ती म्हणजे आत्मविश्वास! तुमचाच तुमच्या ध्येयावर विश्वास नसेल तर दुसरा कसा ठेवेल?

तुम्हाला विश्वास नसेल तर काम करण्याचा उत्साह राहणार नाही, तुमची एकाग्रता राहणार नाही. दुसरे तुमच्याविषयी काय बोलतात याचा विचार तुम्ही करत बसाल, त्याचा तुम्हाला राग येईल, दु:ख होईल. ह्यावर एकमेव उपाय म्हणजे, तुम्ही आत्मविश्वास बाळगणे.

आत्मविश्वास असल्यावर तुम्हाला बरोबर वाटणारी, तुम्ही ठरवलेली गोष्टच तुम्ही करता. तुम्ही काही जोखीम उचलून जास्तीचे काम करायला तयार होता. तुमच्या चुका मान्य करून दुसऱ्याकडून शिकायची तयारी ठेवता. मेहनत करून यश मिळवताना कौतुकास पात्र होता व यश सर्व संबंधितांना घेऊन साजरेही करता.

एकदा ध्येय निश्चित केल्यावर, त्याचा आराखडा तयार केल्यावर परत-परत त्यावर शंका न घेता, अपयशाची तयारी ठेवून, आपल्या ध्येयाप्रति काम करत राहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक माहिती व ज्ञान मिळविल्याने आत्मविश्वास वाढतो. ज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट करून बघितल्याने आत्मविश्वास वाढतो. तुमची तयारी व रणनीती विचार व अभ्यास करून केलेली असेल, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो.

काही उदाहरणे पाहू. एडिसनचा दिव्याचा शोध लावण्याचा आत्मविश्वासच त्याच्या यशाला कारण ठरला. हजारो प्रयत्न फसल्यावर, असा दिवा वगैरे नाही लागू शकत, असं त्याला वाटलं असतं तर?

शिवाजी महाराजांचा आग्य्राहून सुटका होण्याचा आत्मविश्वासच त्यांना तेथून सोडवू शकला. आता आपलं काही खरं नाही, असं त्यांना तेव्हा वाटलं असतं तर? बलाढ्य इंग्रजांसमोर आपला काही टिकाव लागणार नाही व आपण असेच गुलामगिरीत राहणार, असा विचार स्वातंत्र्यसैनिकांनी केला असता तर?

सरकारी लाल फीत, कामगारांचे प्रश्न, भांडवलाची कमतरता, शिक्षणाचा अभाव असे विचार करून १९५०-६० मध्ये त्या वेळच्या उद्योजकांनी उद्योग चालूच केले नसते किंवा मध्येच घाबरून किंवा शंका येऊन बंद केले असते तर?

पन्नास धावांत पाच बळी गेलेल्या फलंदाजी करणाऱ्या संघात एखादा धोनीसारखा सहावा फलंदाजही येऊन संघाच्या ३०० धावाही करून दाखवतो, ते सगळे आत्मविश्वासाच्या जोरावर. वरील सर्व उदाहरणांतील व्यक्तींनी नकारात्मक विचारांना काबूत ठेवले.

त्यांना नकारात्मक विचार आलेच नसतील, भीती, काळजी वाटलीच नसेल असे नाही; पण त्या अवस्थेत त्यांनी लक्ष्यावरील नजर हटू दिली नाही, आशा व विश्वास कायम ठेवून कृती करून पुढे जात राहिले. वेळ लागला, कष्ट पडले, साहस-जोखीम पत्करावी लागली, पण त्यांनी ध्येय गाठले. म्हणजेच सकारात्मक विचार, निर्धार, निर्भयता याच्याबरोबरच आत्मविश्वासाने त्यांनी यशाच्या मार्गावरील टप्पे पार केले.

जर तुम्ही न्यायाने पुढे जात असाल, तुमच्या कामाचा आराखडा तुमच्याकडे आहे, मार्गावर येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची तुमची तयारी आहे आणि तुमचा तुमच्यावर विश्वास आहे, तर कोणतीही गोष्ट करणे शक्य आहे. ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ कशाच्या जोरावर लिहिली असेल? ध्येय, चिकाटी, अभ्यास व जोडीला आत्मविश्वास.

छ. शिवाजी महाराज, एडिसन, टाटा, बिर्लांपासून लता मंगेशकर, बिल गेट्स, अंबानी या सर्व क्षेत्रांतील लाखो व्यक्तींमधील समानता हीच की, त्यांनी ध्येय ठेवले व त्यांचा आत्मविश्वास बळकट होता, तो त्यांनी कमावला. यापैकी कोणीही व्यक्ती या लौकिकार्थाने परिस्थिती, पैसा, शिक्षण, मार्गदर्शन याबाबतीत अनुकूल अवस्थेत नव्हत्या.

यावरून हे सिद्ध होते की, आत्मविश्वास बनवता येतो व तो वाढवता येतो. ती एक मनाची अवस्था आहे, जी स्वत: स्वीकारावी लागते. यामुळेच बहुधा यशाकडे यश, पैशाकडे पैसा जातो, असे आपण बघतो; पण हे समजण्यात चूक करू नका, की प्रथम त्या व्यक्तीने पहिल्यांदा ती शक्ती व सामर्थ्य स्वत: स्वत:कडे तयार केलेले असते. त्यासाठी आपल्या मनात, विचारात, वागणुकीत व प्रत्यक्ष काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा, बदल, प्रगती केलेली असते.

आत्मविश्वास जागवण्यासाठी व वाढवण्यासाठी आधी ध्येय निश्चित करा. त्याचा लेखी आराखडा तयार करा. सर्व संबंधितांना विश्वासात घ्या. आवश्यक साधने, ज्ञान व कौशल्ये आत्मसात करा आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. प्रत्येक टप्प्यावर तपासणी करा, मोजदाद करा. काय बरोबर चाललं? कुठे चुकलं? ग्राहकांचा, कर्मचाऱ्यांचा, मित्रांचा प्रतिसाद काय आहे? यातून अभ्यास, विश्लेषण करून योजना दुरुस्त करा व पुन्हा प्रयत्न करा.

हे करत असताना, आत्मविश्वास वाढविण्यासाठी खालील वाक्ये मनात आणा व ठेवा :

  • माझ्या ध्येयावर माझा विश्वास आहे, ते प्रत्यक्षात येणारच.
  • मी योग्य वागत आहे. मी आनंद व उत्साहाने सर्व कामे करत आहे.
  • मी सर्व संबंधितांच्या उपयोगाचा, फायद्याचा, हिताचा विचार करीत असल्याने मी यशस्वी होणारच.
  • मी अभ्यास करून, समस्येचा सर्व बाजूंनी विचार करून, तज्ज्ञांची मदत घेऊन उत्तर, तोडगा, उपाय शोधून काढीन व तो अमलात आणीन.
  • मी पुढे जात आहे, शिकत आहे, यशस्वी होत आहे.प्रत्येक बाबतीत मला सर्व आवश्यक मदत व मार्गदर्शन मिळाले आहे व मिळणार आहे.
  • मी अधिकाधिक चांगल्या गुणांचा व सवयींचा विकास करत आहे.

आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपल्या कामाचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे. परिस्थिती, व्यक्ती, सरकार, प्रसंग, वस्तू या कोणत्याही बाबतीत तक्रारी करणे थांबवा. तुम्ही जबाबदारी घेऊन प्राप्त परिस्थितीत काय उत्तम करू शकता ते करा.

बहुतांश ९५% जण तक्रारीच करतात, रागावतात, टीका करतात; पण काही थोडे ५% जणच आत्मविश्वासाने व जबाबदारीने मार्ग काढतात, शोध लावतात, अभ्यास करतात, चिकाटीने पाठपुरावा करतात तेच यशस्वी होतात. आत्मविश्वास वाढविण्यासाठी SWOT-analysis करा. Strength- तुमची शक्तिस्थाने ओळखा, ती मजबूत करा, त्यांचाच फायदा घ्या.

Weakness- तुमच्यातील कमतरता भरून काढण्यासाठी इतरांची मदत घ्या. Opportunity- सुसंधींचा फायदा घ्या. Threats- धोक्यांचे ज्ञान व त्यांच्याशी लढण्याची तयारी असू द्या. अशी तयारी असल्यावर तुम्ही तयार, सतर्क, हुशार, कणखर, विचारी, दूरदृष्टीने राहता व तुमचा आत्मविश्वास वाढतो.

आत्मविश्वासाने आपली भाषा व संभाषण बदलते. आपल्या मनातील स्वप्रतिमा सुधारते. तुमची देहबोली, हावभाव, नजरेला नजर मिळवणे हे लोकांना सांगते, की तुम्ही म्हणाल ते करून दाखवाल. त्याने तुमच्याकडे मदतीचा ओघ सुरू होतो व तुम्ही यशाच्या जवळ वेगाने पोहोचता. एवढेच नाही, तर तुम्ही मोकळ्या मनाने दुसऱ्यालाही उदारपणे मदत करता तुमची जीवनतत्त्वे व स्वत:ची ओळख तुम्ही प्रामाणिकपणे करून देऊ शकता.

तुम्ही समस्येपेक्षा समाधानाकडे, उत्तराकडे लक्ष देता. तुम्ही कृतिशील, स्पर्धक, पुढाकार घेणारे, नेतृत्वगुण असणारे, उत्साही, नियमित बनता. मग आता वाट कसली बघताय? ध्येय ठेवा. आराखडा लिहून तयार करा. कृती करण्यास सुरुवात करा व दररोज १००० वेळा तरी म्हणा व मनाला सांगा की, मी माझे ध्येय गाठणारच! बघा, आत्मविश्वास वाढतो की नाही ते…

– सतीश रानडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?