२०२६ पर्यंत गावागावातून १,००० यशस्वी आयात-निर्यातदार निर्माण करण्याचे ध्येय ठेवणारा उद्योजक

ही कथा सुरू होते कोकणातल्या एका खेडेगावातून. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये पोफळी गावात या ध्येयवेड्या आणि प्रयत्नवादी उद्योजकाचा जन्म झाला. शालेय शिक्षण इथे गावातच झालं.

आपल्या गावातल्या प्रत्येक घरातून एक तरी मुलगा सौदी, युएई, ओमान, दुबई अशा कोणत्या ना कोणत्या गल्फ देशात नोकरीसाठी जाताना पाहून त्याने स्वप्न बघितलं की आपण या या देशांमध्ये जाऊन नोकरी करायची नाही, तर या सर्व देशांत आपली ऑफिसेस सुरू करायची.

फैय्याज गनी सय्यद या तरुण उद्योजकाने बालवयात पाहिलेलं हे स्वप्न अजून पूर्ण झालेलं नसलं तरी प्रगतीपथावर आहे. फैय्याजचा आतापर्यंतचा जीवनप्रवास हा तुम्हाआम्हाला, कोणालाही थक्क करणारा आहे. इतक्या कमी कालावधीत त्याने जी यशाची शिखरं पार केलीत, याचं कारण आहे त्याची धोका पत्करण्याची मानसिकता, अपार कष्ट करण्याची तयारी आणि उच्च ध्येयवादी मानसिकता.

फैय्याज सरांशी बोलताना, त्यांचा हा प्रवास ऐकताना एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकत असल्यासारखं वाटतं होतं. फैय्याज यांची कथा सुरू होते चिपळूणमधल्या पोफळी गावातून. सुसंस्कारीत मुस्लीम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील सरकारी नोकरीत. घरचं वातावरण शिक्षणासाठी आग्रही.

फैय्याज यांनी आपलं शालेय शिक्षण गावातून पूर्ण केलं आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी महानगरी मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठातून बी.कॉम. पूर्ण केलं आणि अर्थाजनसाठी मिळेल ती नोकरी केली. ‘एअरटेल’मध्ये सेल्स करण्यापासून त्यांना सुरुवात करावी लागली, पण प्रयत्न सुरूच होते. ते वय शिकण्याचं होतं. नोकरीसोबत जे जे शिकता येईल, ते फैय्याज शिकत होते.

त्यांचं फायनान्स चांगलं होतं. त्याच आधारावर त्यांना बँकेची नोकरी लागली. नोकरीसोबत त्यांनी पार्ट टाईम सिव्हिल आर्किटेक्ट draughtsman चा आणि नेटवर्क इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला.

जीवनात पुढे जाण्यासाठी जिथे संधी दिसेल तिथे फैय्याज दार ठोठवायचे. एका मित्रासोबत जमिनीचा खरेदी-विक्री व्यवसाय सुरू केला, पण मित्राचा लोकांची गुंतवणुक हाताळण्याचा दृष्टिकोन न पटल्यामुळे त्या व्हेंचरमधून बाहेर पडून आपल्या पत्नीला सोबत घेऊन त्यांनी नवा व्यवसाय सुरू केला.

पुढे २०१२ मध्ये त्याचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतर केलं. महाबळेश्वर, पोलादपूर, माणगाव या ठिकाणी आऊटसोर्स प्रोजेक्ट सुरू केलेले, पण दुर्दैवाने हा व्यवसायही यशस्वी होऊ शकला नाही.

अपयश आलं तरी हार मानली नाही. छोटी मोठी काम त्यांनी सुरूच ठेवली होती. अशातच त्यांच्या आयुष्याला संपूर्ण कलाटणी देणारा आणि नवी दिशा देणारा एक फोन कॉल त्यांना आला. त्यांच्या मित्राचा. कोकणातून.

मित्राने मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याचा ट्रक पाठवलेला, पण तिथे व्यवहार होऊ शकला नाही. त्याने फैय्याजला मदत करण्याची विनंती केली. तोपर्यंत यांना या धंद्यातलं काहीच कळत नव्हतं. आपल्या राहत्या घरी ते आंबे घेऊन तर गेले पण पुढे करायचं काय हा प्रश्नच होता.

आंब्याच्या सुवास दरवळू लागला तशी लोकांनी चौकशी करायला सुरुवात केली, पण आंबे विकतात कसे, त्याची पॅकिंग कशी करतात यातलं काहीच माहीत नव्हतं. पण हार मानेल तो फैय्याज कसला? त्यांनी पुन्हा एपीएमसी मार्केट गाठलं. तिथे आंबा कसा ठेवतात, कसा विकतात, त्यांचं पॅकिंग कसं करतात या सगळ्याचा अभ्यास केला आणि तिथूनच पॅकेजिंग मटेरिअल घेऊन ते घरी पोहोचले.

घरी येऊन सगळे आंबे पॅक करून त्यांनी उत्तमप्रकारे लोकांना विकायला सुरुवात केली. घराबाहेर ग्राहकांची रांगच लागली. त्यांच्या सोसायटीत तर त्यांची मँगो अंकल अशी ओळखच निर्माण झाली.

मराठी उद्योजक यशोगाथा

फैय्याज यांच्या जीवनाला हे नवं वळण होतं. आंबेविक्रीच्या या पहिल्या अनुभवात त्यांना व्यवसायाचं हे नवं क्षेत्र गवसलं होतं. इथेच न थांबता त्यांनी या क्षेत्रात नशीब आजमावून बघायचा निर्णय घेतला. त्यांनी ऍग्रो मार्केट पकडण्याचा निश्चय केला.

हापूस आंबे झाल्यावर नीलम, तोतापुरी, बदामी असे मिळतील ते आंबे मागवून त्यांनी व्यापार सुरू ठेवला. कर्नाटकातून टनांमध्ये आंबे येत होते आणि खपत होते.

आंब्याच्या सीजन संपल्यावर त्यांनी एपीएमसीचं लायसन्स काढून नारळाची शहाळी सप्लाय करायला सुरुवात केली. मुंबईत रात्रभरात १० टन म्हणजे ४,५०० शहाळी सप्लाय करायची असायची. पुढे नशिकवरून टोमॅटो आणून एपीएमसीबाहेर विकले. वेगवेगळी ऑरगॅनिक फळ व पदार्थ विकले.

या सगळ्यातून फैय्याज यांना काही खूप चांगला आर्थिक मोबदला मिळत नव्हता, पण अनुभव मिळत होता. ज्या देशाची संस्कृतीच कृषीसंस्कृती आहे, त्या कृषी क्षेत्रात व्यापार करण्याचा अनुभव.

मग ओघानी त्यांची पाऊलं वळली निर्यात क्षेत्राकडे. प्रथम कांदा निर्यात करण्यापासून त्यांनी सुरुवात केली. त्यांचं पहिलच कन्साइंमेंट विदेशात अडकलं. ते सोडण्यासाठी त्यांनी स्वतःची ६ लाखांची गाडी गहाण ठेवली आणि आपलं पहिलं शिपमेंट सोडवलं.

फैय्याज गनी सय्यद

आयात-निर्यातीत असे अनेक कठीण अनुभव आले, पण फैय्याज यांनी हार मानली नाही. ते खचले नाहीत. पुढे दुबईला स्वतःचे ऑफिस सुरू करून व्यापाराला चालना दिली.

फैय्याज यांना आयात-निर्यात क्षेत्राची ताकद कळली होती, पण स्वतःचा हे अनुभव त्यांना फक्त स्वत:पुरते ठेवायचे नव्हते, तर आपल्याप्रमाणे ग्रामीण भागातून संघर्ष करत पुढे येणार्‍या प्रत्येक तरुणाला त्यांना हा यशाचा मार्ग दाखवायचा होता.

याच दरम्यान त्यांची भेट झाली हसन तडवी यांच्याशी. हसन हे आयात-निर्यात प्रशिक्षक होते. त्यांनी हजारो तरुणांना प्रशिक्षित केलं होतं. मग फैय्याज आणि हसन यांच्या एकत्र येण्यातून जन्म झाला ‘ट्रेडकेअर’चा.

आयात-निर्यातीत जो संघर्ष मी पाहिला, केला; तो सामान्य तरुणांच्या आयुष्यात येऊ नये. त्यांना फक्त प्रशिक्षित करणारीच नाही तर संपूर्ण सहकार्य करणारी एखादी इकोसिस्टम निर्माण होण्याची गरज आहे.

माझ्यासारखाच गावातून आलेला प्रत्येक तरुण हा यशस्वी होऊ शकतो आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ‘ट्रेडकेअर’च्या स्थापनेमागची फैय्याज गनी सय्यद यांची भूमिका आहे.

‘ट्रेडकेअर’मध्ये फक्त आयात-निर्यात शिकवली जात नाही, तर प्रत्यक्ष ट्रेड करायला मदत केली जाते. यासाठी फैय्याज यांच्या दुबईतील कंपनीसोबतसुद्धा व्यापार केला जातो. लोकांमध्ये आयात-निर्यातीबद्दल बरेच गैरसमज असतात. त्यांना शिक्षण, परकीय भाषा, कागदपत्रं, भांडवल अशा अनेक समस्या वाटत असतात.

हसन तडवी म्हणतात, डोक्याच्या केसांपासून बोटाच्या नखापर्यंत प्रत्येक गोष्टीचा आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. यात शिक्षण, भाषा, पैसा अशी कोणतीच अडचण येत नाही. तुम्ही तुमचे कोणतेही प्रॉडक्ट किंवा सेवा आंतरराष्ट्रीय बाजारात विकू शकता.

आम्ही लोकांना हे शिकवतो. त्यांच्याकडून करून घेतो. त्यांना मदत करतो. त्यांच्या अडचणी सोडवतो. कारण आमचं ध्येय आमचे कोर्स विकणं हा नाहीय तर आयात-निर्यातदार घडवणं हा आहे.

फैय्याज सरांना २०२६ पर्यंत ‘ट्रेडकेअर’मधून ५ हजार उद्योजकांना प्रशिक्षण देऊन त्यातून कमीत कमी १ हजार यशस्वी आयात-निर्यातदार निर्माण करायचे आहेत. त्यांना देशात आयात-निर्यातदारांची एक मोठी कम्युनिटी निर्माण करायची आहे.

देशात सध्या व्यापारपोषक वातावरण आहे. सरकारसुद्धा यासाठी प्रोत्साहन देत आहे. हीच संधी आहे गावागावातून निर्यातदार निर्माण होण्याची, ही फैय्याज यांची भावना आहे.

संपर्क : 022-46038666

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?