सैन्यात जाता आलं नाही, पण उद्योजक होण्याचे स्वप्न साकारले यशस्वी उद्योजक वैभव पाटील यांनी

दुष्काळग्रस्त शिरढोणसारख्या एका खेडेगावातून पुढे येऊन या धावत्या वाटणाऱ्या पुण्यासारख्या शहरात व्यवसायाचे एक छोटे रोपटे लावून, आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा सुरू केला.

हातावरील रेषेत भाग्य न शोधता या अवलियाने कपाळावरील घामात भविष्यातील यश शोधण्यासाठीची धडपड सुरू केली. ही कहाणी आहे कवठेमहांकाळ तालुक्यातल्या शिरढोण गावातील यशस्वी युवा उद्योजक वैभव अमृतराव पाटील यांची.

प्रवास सांगली शिरढोण ते पुणे, व्हाया रायपूर, छत्तीसगड आणि तोही क्लार्क ते एका नामांकित सिक्युरिटी कंपनीचा यशस्वी मालक असा. वैभवचा जन्म अगदी मध्यमवर्गीय ग्रामीण कुटुंबात झाला. लहानपणापासूनच संघर्ष हा त्यांच्या जीवनात ठरलेलाच. लहानपणीचा काळ संघर्षाबरोबर थोडा हालाकीचाही होता.

आजोबा गावचे पोलीस पाटील होते तर वडील एसटी ड्रायव्हर. तसे त्यांच्यावर आजोबांचे समाजकारणाचे विचार चांगलेच रुजलेले आणि बाळकडूही तेथेच मिळाले. आजी आणि आईकडून संस्काराची शिदोरी. तसे आईचे शिक्षण नसतानाही मुलांना शिकवण्याची तिची तळमळ होती.

वडील कष्ट करून मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करायचे. तरीपण वडीलांनी चार भावंडांना उच्च शिक्षित बनवले. वैभव यांचे माध्यमिक शाळेत शिक्षणात लक्ष कमी आणि खेळाकडे जास्त असे.

वैभवला सैन्यात भरती व्हायचे होते आणि सैन्याचा गणवेश चढवण्याचे खूप वेड होते, पण तेथे नशीब आड येत होते. तिथेही अपयश पाठी राहायचे. म्हणून त्यांनी आपला मार्गच बदलला आणि पुढे व्यावसायिक शिक्षण घेतले.

पुढे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी एमबीए आणि एम. कॉम अशा पदव्या संपादित केल्या. परंतु यावरच तो थांबला नाही. सध्या तो कायद्याचे शिक्षण घेत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार ‘जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक’ घ्या…. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. वैभवची या ध्येयनिश्चितीनुसार वाटचाल सुरू आहे.

२०१३ ते २०१७ या पाच वर्षाच्या कालावधीत नोकरी करत असताना ‘जयप्रकाश आसोसिएट्’ या नावाने इलेक्ट्रिकल कंत्राट घेतले. तेथे इलेक्ट्रिकल क्षेत्रात कोणताही अनुभव नसताना फक्त धाडस आणि जिद्दीच्या जोरावर कंत्राटी पद्धतीत काम करीत असताना तेथे सर्व विभागातील ज्ञान आत्मसात केले.

या अनुभवानेच नंतर स्वकर्तुत्वाने घरातून एक रुपयाही न घेता दिनांक १ जुलै २०१७ रोजी ‘यशराज’ या ब्रँडची अगदी रहात्या घरातून मुहूर्तमेढ रोवली. तीही शिरढोणसारखा खेड्यागावातून.


‘स्मार्ट उद्योजक’ मासिकात तुमचीसुद्धा कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


पुढे ते एका जागी थांबेल तो वैभव पाटील कसला! त्याने पुण्यातून ‘यशराज बिजनेस ग्रुप’ या नावाखाली ‘यशराज सिक्युरिटी सर्व्हिसेस’, पुढे ‘वाय. बी. जी. प्रा. लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली. सोबत ‘यशराज टॅक्सवे कन्सल्टन्सी’, ‘यशराज मल्टी सर्व्हिसेस’ या कंपन्या चालू केल्या.

यात खूप अडचणी, अपयश आले तरी न डगमगता यशाचा जप कायमच ठेवला. कोरोनासारख्या महाभयंकर संकटातूनसुद्धा तो वादळासारखे फिरत राहिला.

वैभवच्या या संघर्षमय प्रवासात पत्नी अनुराधा आणि कुटुंबाने खूप मोलाची साथ दिली आहे. त्याचे मार्गदर्शक आणि मुख्य म्हणजे ग्राहक वर्ग याचीही साथ मिळाली. आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे या ध्येयाने वैभवला झपाटले होते. मुळातच वैभव सेल्फ मोटिवेटेड आणि पॉझिटिव्ह माईंडसेटची व्यक्ती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन नेहमी त्याचे काम चालू असते. नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा होणार, ही जिद्द तो मनामध्ये ठेऊन काम करतो.

वैभव पाटील यांच्या ‘वाय बी जी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला भारत सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ची मान्यता मिळाली आहे. तसेच कोरोना काळात सामाजिक भावनेतून काम केल्यामुळे पुणे पोलिसांकडून ‘सुरक्षित पुणे सुरक्षा मित्र’ म्हणुन सन्मानित करण्यात आले आहे.

व्यवसायातील नफ्याचा थोडा भाग समाजासाठी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात त्याने केली. यावर्षी शिवराज्याभिषेक दिन मोठया उत्साहात साजरा केला. वैभव पाटीलांनी आतापर्यंत सामाजिक जबाबदारीतून तब्बल १४ वेळा रक्तदान केले आहे.

समाजातील अपघाती घटनांची माहिती मिळताच त्यांनी वेळोवेळी त्यांना मदत केली आहे. यातून त्यांची सामाजिक जाण आणि मदतीची भावना दिसून येते.

गेल्या सात वर्षांत वैभव पाटील यांनी केलेले काम हे दैदिप्यमान असेच म्हणायला हवे. मात्र लवकरच वैभवला ‘यशराज बिजनेस ग्रुप’चे काम देशव्यापी सुरू करायचे आहे. १ जुलै हा त्यांच्या कंपनीचा वर्धापन दिन. त्यानिमित्ताने त्यांच्या या कामाला लाख लाख शुभेच्छा.

– शैलेश राजपूत
संपर्क : ८०९०७८५९०७, 020-67088772


‘स्मार्ट उद्योजक’ मासिकात तुमचीसुद्धा कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


वैभव अमृत पाटील

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?