कर्ज घेताना फसवणूक व्हायची नसेल, तर या पाच गोष्टींची काळजी घ्या!

सध्याच्या काळात विविध कंपन्या हरप्रकारे विविध प्रकारची कर्जे देण्यासाठी फोन, ई-मेल, सोशल मीडियाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात. बहुतांश लोक अशा प्रलोभनांना बळी पडतात. कोणतीही शहानिशा न करता कर्जे घेतात आणि भरमसाठ इएमआयच्या जाळ्यात अडकतात.

आर्थिक बाबतीत प्रत्येकाने अतिशय काळजीपूर्वक नियोजन करायला हवे, पण परिस्थिती उलट असते. नियोजनाअभावी घेतलेले कर्ज किंवा आर्थिक व्यवहार हे अडचणीचे ठरतात. विशेषत: आर्थिक धोरण बनवताना व्यावसायिकाने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तुम्ही स्वत:चा व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेत असाल तर तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

जेव्हा एखाद्याला कर्जाची रक्कम प्राप्त होते, तेव्हा ती कर्जाची रक्कम त्याचा स्टार्टअप किंवा व्यवसायवाढीसाठी वापरायची असते, परंतु हेच जर त्याचे नियोजन नीट नसेल तर कर्जाची रक्कम वेळेवर भरल्याने अनेक प्रकारच्या आर्थिक जोखमीच्या शक्यता वाढू लागते.

कठीण परिस्थिती उद्भवू नये म्हणून कर्जे घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? विशेषत: उद्योजकाने कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात या अनुषंगाने आम्ही तुम्हाला पाच महत्त्वाच्या गोष्टी या लेखात सांगत आहोत. जेणेकरून व्यवसाय कर्ज घेताना कोणकोणत्या गोष्टी तपासायला हव्यात हे यातून कळेल. यातून पुढे येणार्‍या समस्या, अडचणी आणि चित्र स्पष्ट होईल. तुम्हाला योग्य नियोजन करून स्वत:चा व्यवसाय वाढवता येईल.

१. मार्केट रिसर्च :

कर्ज घेण्यापूर्वी मार्केटचा रिसर्च केलेला असला पाहिजे. प्रत्येक बँकेचे किंवा कर्ज पुरवणार्‍यांचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. त्यामुळे आपण थोडा अभ्यास केलेला असला तर आपल्याला कोणत्या बँकेत कमी व्याजदर आहे हे कळते. त्या ठिकाणी आपण कर्जासाठी अर्ज करू शकतो.

नेहमी बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज घ्या. बँकेच्या किंवा कर्जदाराचा आर्थिक बळकटी प्रथम तपासायला हवी. कर्ज देणारी संस्था सरकारी आहे की खाजगी हेही पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासोबतच कोणती संस्था तुम्हाला कोणत्या व्याजदराने आणि कोणत्या अटींवर कर्ज देत आहे, हेही तपासून पाहावे.

२. सिबील रिपोर्ट तपासा

कर्ज घेण्यासाठी अर्ज केला तर प्रथम बँका सिबील रिपोर्ट तपासतात. याद्वारे त्यांना तुमच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. यावरच कर्ज मिळण्याची अथवा न मिळण्याची शक्यता ठरते. म्हणूनच कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही तुमचा सिबील रिपोर्ट निश्‍चित केला पाहिजे.

यापूर्वीही जर आपण कर्ज घेतले असेल आणि त्याचा ईएमआय भरण्यास उशीर झाला, तर त्याचा परिणाम आपल्या क्रेडिट स्कोअरवर होतो. त्यामुळे नवीन कर्ज घेताना कर्ज मिळणे कठीण होते. त्यामुळे आपला सिबील स्कोअर नेहमी नीट राहील याची काळजी घेतली पाहिजे.

३. कर्जाचा व्याजदर समजून घेणे

कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी त्या कर्जाचा व्याजदर किती आहे हे तपासणे अत्यंत गरजेचे असते; प्रथम ते तपासा. कर्ज म्हटले की त्याचे व्याज तर द्यावेच लागणार, पण व्याज किती आणि कसे आहे हे पाहावे. जेणेकरून आपल्याला त्याची परतफेड करताना ताण येणार नाही.

जेव्हा कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी कुठल्या बँकेत किती व्याजदर आहे हे तपासून पाहावे. बर्‍याच वेळा माहितीच्या अभावामुळे व्यापारी चढ्या व्याजदराने कर्ज घेतात आणि मग त्या जाळ्यात अडकतात. यामुळे ते जास्त पैसे मोजतातच शिवाय या चक्रात असे अडकतात की त्याचा परिणाम व्यवसायाच्या प्रगतीवरसुद्धा होतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही कुठूनही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा सर्वप्रथम त्या कर्जावर व्याजदर किती आहे हे तपासा.

जर व्याजदर तुम्हाला अनुकूल असेल तरच कर्जासाठी पुढे जा, अन्यथा दुसर्‍या ठिकाणी कर्जासाठी अर्ज करा. कायम लक्षात ठेवा कर्ज हे परत करायचे असतेच त्यामुळे त्यावर व्याजही आकारला जाणार. मग तो आपल्याला झेपेल असाच असायला हवा.

४. प्री-पेमेंट

अनेकवेळा उद्योजकाला कर्ज घेण्याची घाई असते. अशावेळी तो कोणतेही कागदपत्र न वाचता कर्ज घेण्यास तयार होतो. बहुतांश बँका त्यांच्या अटी व शर्ती अतिशय लहान अक्षरात छापतात. अनेकदा व्यवसायात तात्काळ पैशांची गरज असते. अशा वेळी व्यावसायिकांना मोठमोठ्या आकर्षक ऑफर्स दिसतात, पण त्यासोबत जोडलेल्या अटींकडे दुर्लक्ष होते.

जेव्हा त्यांना कर्ज मिळते आणि काही काळानंतर त्यांना व्यवसायात नफा होतो, तेव्हा उद्योजकाला एकाच वेळी कर्जाची परतफेड करायची असते, परंतु कर्जाची एकाच वेळी परतफेड करण्यासाठी त्यांना प्री-पेमेंट शुल्क भरावे लागते. प्री-पेमेंट म्हणजे निर्धारित वेळेपूर्वी कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यावर आकारले जाणारे शुल्क. बर्‍याच वेळा या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे कर्जाची परतफेड करताना प्री-पेमेंट शुल्क किती आहे किंवा ते लागणार नाही याची अगोदरच खात्री करून घेतलेली असली पाहिजे.

५. कर्ज परतफेडीची अंतिम मुदत तपासा

अनेकदा उद्योजक त्यांच्या व्यवसायाची गरज म्हणून घाई किंवा झटपट मिळणारे कर्ज घेतात. यावेळी त्यांचे एका गोष्टीकडे दुर्लक्ष होते ते म्हणजे कर्जाच्या परतफेडीची कालमर्यादा. कर्जपरतफेडीची कालमर्यादा ही कर्जफेडीबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. कर्जपरतफेडीची कालमर्यादा खूप कमी किंवा खूप जास्त कालावधीची असेल तर त्याचा परिणाम व्याजदरावर होतो.

यामध्ये व्याजदर वाढतात आणि पर्यायाने आपली परतफेडीची दरमहा रक्कमही वाढते. त्यामुळे याचा थेट परिणाम आपल्या कर्जावर किंबहुना आपल्या परतफेडीच्या क्षमतेवर होत असतो. म्हणूनच आपणच ही कालमर्यादा निश्‍चित करून घेणे आवश्यक असते.

वरील पाच गोष्टींची नीट काळजी घेवून विचारपूर्वक कृती केली तर व्यवसायातील आर्थिक गरज पूर्ण करता करता आपण आपल्या व्यवसायाला एक वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी घेतलेले कर्ज योग्यरितीने वापरून भविष्यातील चुका, समस्या, अडचणी टाळू शकतो.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?