विचार करा, तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून इंजिनीअर झाला आहात आणि ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला आहात. सगळी स्वप्नं पूर्ण झाल्यासारखी वाटतात ना? चांगला पगार, मोठी कंपनी, स्थायी नोकरी…? आता विचार करा असं कोणी असेल जे हे सगळं आरामातलं जगणं सोडून राजीनामा देऊन जाईल?
सचिन बंसल आणि बिन्नी बंसल हेच ते दोन तरुण होते ज्यांनी आय.आय.टी.-दिल्लीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि मग ॲमेझॉनमध्ये असलेली रग्गड पगाराची नोकरीसुद्धा सोडली; पण आज हेच दोघं आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनलेल्या ‘फ्लिपकार्ट’चे संस्थापक म्हणून ओळखले जात आहेत.
सचिन आणि बिन्नी हे दोघंही मूळचे चंदिगडचे. २००७ मध्ये या दोघांनी आपली स्वत:ची ई-कॉमर्स कंपनी उभी करायची म्हणून ॲमेझॉनमधल्या मोठ्या पगाराच्या नोकरीकडे पाठ फिरवली आणि जोरदार कामाला सुरुवात केली. फ्लिपकार्टची फक्त वेबसाइट बनवण्यात त्यांना चार लाख रुपयांचा खर्च आला. त्यांनी बराच विचार करून ही कंपनी सिंगापूरमधून रजिस्टर केली, परंतु ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यालय मात्र बंगळुरू येथेच आहे.
‘फ्लिपकार्ट’नी ‘लिव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड’ हे पुस्तक हैदराबादमधील एका ग्राहकाला विकून उद्योगाची सुरुवात केली. इतरांच्या अनुभवातून शिकतो तो प्रगती करतो. यानुसार ॲमेझॉनचा आदर्श घेऊन फ्लिपकार्टने पुस्तके विकण्यापासून सुरुवात केली.
लोक फ्लिपकार्टवरून ऑनलाइन पुस्तकांची खरेदी करत आणि फ्लिपकार्ट त्यांना घरपोच पुस्तके देत. पहिल्या वर्षात व्हेंचर कॅपिटल घेऊन फ्लिपकार्टने त्यांच्या पैशांचा तोल सांभाळला. ‘ॲसेल इंडिया’ आणि ‘टायगर ग्लोबल’ हे फ्लिपकार्टचे पहिले गुंतवणूकदार आहेत. ऑगस्ट २०१२ मध्ये ‘एम.आय.क्यू.’ कॅपिटलमार्फत फ्लिपकार्टला एक कोटी पन्नास लाख डॉलर्सची गुंतवणूक मिळाली. ग्राहकांचा तसेच गुंतवणूकदारांचा ‘फ्लिपकार्टवरील विश्वास यापुढे दृढ होतच गेला.
हळूहळू ‘फ्लिपकार्ट’ने फक्त पुस्तकांच्या विक्रीतून बाहेर पडून नवनवीन गोष्टी विक्रीसाठी आणणे सुरू केले, आता ‘फ्लिपकार्ट’वरून ४० दक्षलक्ष उत्पादने ऐंशीहून अधिक विभागांमध्ये मिळून विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
प्रत्येक उद्योजकाला छोट्या-मोठ्या प्रमाणात कधी ना कधी नुकसान होतच असते. ६ ऑक्टोबर २०१४ हा दिवस ‘फ्लिपकार्ट’साठी असाच काहीसा नुकसानकारक ठरला. या दिवशी फ्लिपकार्टने ‘बिग बिलियन डे’ ठेवला होता. या दिवशी अनेक वस्तू कमीत कमी किमतीत मिळणार होत्या. जसे एक रुपयांत ग्राइंडर, २ टीबीची मेमरी ड्राइव्ह, फक्त ६०० रुपयांत बरंच काही.. सकाळी ठीक ८ वाजता ऑनलाइन सेल सुरू झाला. सुरुवातीला सर्व ग्राहक खूप खूश होते.
जसजसा दिवस उजाडू लागला तस तसं लोकांनी फ्लिपकार्टवर उड्या घेतल्या. एवढ्या मोठ्या ग्राहकवर्गाला एका वेळी पचवू न शकल्यामुळे सकाळी १० च्या सुमारासच ‘फ्लिपकार्ट’ची सिस्टम ओव्हरलोड होऊन त्यांची वेबसाइट बंद पडली. पहिल्या दोन तासांतच बरीच विकली गेली आणि पुढच्या ग्राहकांना बऱ्याच गोष्टी ‘आऊट ऑफ स्टॉक’ दिसू लागल्या. या सेलमधून ‘फ्लिपकार्ट’ला पैशाच्या रूपात नफा भरपूर झाला, पण ग्राहक त्यांच्यावर नाराज झाले.
इतके सर्व होऊनही सचिन आणि बिन्नी ह्यांनी मात्र ग्राहकांना धन्यवाद दिले, कारण त्यांना हे समजले की, ग्राहकांचे आपल्यावर किती प्रेम आहे आणि किती मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी फ्लिपकार्टला प्रतिसाद दिला. पुढे ही बातमी मुखपृष्ठावरून आतल्या पानांत आणि मग भूतकाळात विरून गेली. परंतु इतक्या कठीण परिस्थितीतही सचिन आणि बिन्नी हे निराश झाले नाहीत आणि फ्लिपकार्टची विजयी घोडदौड पुढे चालूच राहिली.
‘फ्लिपकार्ट’च्या प्रवासाचा धावता आढावा
२००७ मध्ये पुस्तके विकण्यापासून फ्लिपकार्टची सुरुवात झाली. २००८ मध्ये २४ x ७ ग्राहक सेवा सुरू झाली. त्यानंतर २०१० मध्ये गाणी, चित्रपट आणि मोबाइल फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध झाले तसेच वस्तू घरी मिळाल्यावर पैसे देण्याची सोय म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरी (सी.ओ.डी.) ही सुविधा उपलब्ध झाली. मग २०११ मध्ये तीस दिवसांत वस्तू बदलून घेण्याची सोय उपलब्ध करून दिली.
२०१३ मध्ये ‘फ्लिपकार्ट’ने एका दिवसात १ लाख पुस्तके विकली… २०१४ मध्ये तर आपल्याला माहीतच आहे ‘बिग बिलियन सेल’द्वारे भरपूर नफा कमविला. २०१५ मध्ये ‘फ्लिपकार्ट लाइट’ हे अधिक सोपे व अधिक जलद असे ॲप बाजारात आणलं. २०१६ मध्ये ‘फ्लिपकार्टचं ॲप हे पहिलं भारतीय ॲप होतं ज्याचे ५० दशलक्षहून अधिक वापरकर्ते आहेत आणि ‘फ्लिपकार्ट’ही अशी एक भारतीय कंपनी बनली जिच्याकडे ७५ दशलक्षहून अधिक नोंदणी केलेले ग्राहक आहेत.
‘फ्लिपकार्ट’हा २००७ साली सुरू झालेला स्टार्टअप हा खरोखर भारतीय नवउद्योजकांसाठी एक प्रेरणास्थान आहे. कारण आजच्या घडीला ‘फ्लिपकार्ट’ दर महिन्याला ८ दशलक्ष निर्याती करते. इतकंच नव्हे, तर दर दिवसाला ‘फ्लिपकार्ट’च्या ऑनलाइन स्टोअरला १० दशलक्ष लोक भेट देत आहेत म्हणजेच दर मिनिटाला ६,९४४ लोक ‘फ्लिपकार्ट’ला भेट देत आहेत.
ई-कॉमर्स क्षेत्रात खूप मोठी ताकद आहे, हे आपण सर्वांनी ऐकलेच असेल. हे वाक्य सचिन आणि बिन्नी बंसाल या दोन तरुणांनी आज फ्लिपकार्ट रूपात सिद्ध करून दाखवले आहे. “मला माझे ऑनलाइन स्टोअर निर्माण करायचे आहे”, या वाक्यावर ठाम राहिलेल्या सचिन आणि बिन्नी आज प्रचंड गतीने वाढत असलेल्या ‘फ्लिपकार्ट’ या कंपनीचे चालक आहेत. ‘ॲमेझॉन’मधील त्यांचा पगार हा काही कमी नव्हता.
त्यांच्या केवळ गरजाच नाही तर चैनीसुद्धा भागल्या असत्या, पण आज ‘फ्लिपकार्ट’मध्ये ते किती तरी लोकांना तितकाच पगार देत असतील आणि किती तरी लोकांच्या चैनी भागवत असतील. प्रत्येक उद्योजकाकडे असावी ती म्हणजे आपल्या कल्पनेवरील निष्ठा जी या दोन्ही तरुणांकडे होतीच. त्याचसोबत साधारण लोकांचा एक विश्वास असतो की, प्रत्येक यशस्वी स्टार्टअपमागे एक डिग्रीमध्ये नापास झालेला किंवा शिक्षण सोडलेला व्यक्ती असतो. हेसुद्धा सचिन आणि बिन्नी ह्या आय.आय.टी. इंजिनीयर्सनी खोटं ठरवून दाखवलं आहे.
‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे’, याचं योग्य उदाहरण म्हणून आपण आज ‘फ्लिपकार्ट’च्या संस्थापकांचं नाव घेऊ शकतो, कारण फ्लिपकार्ट हा उद्योग सुरू करून दोन तरुण आज त्यांच्या वाढत चाललेल्या ऑनलाइन दुकानातून अनेकांना रोजगार आणि आपणाला घरपोच उत्पादने देत आहेत.
– शैवाली बर्वे
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.