‘उत्तम जोडीदार’ असणे; व्यवसायात समस्या असू शकते


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मी ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा एक मध्यमवयीन पती-पत्नी माझी वाट पाहत बसले होते. ते अगदी नीटनेटके, व्यवस्थित असे वाटले. त्यांची राहणी, तसेच आवड चांगल्या दर्जाची आहे हे दिसूनच येत होते. या गोष्टींची कारणेदेखील लवकरच कळली.

ते दोघेही नाट्य व्यवसायाशी संबंधित होते. प्रादेशिक, हौशी रंगभूमीवर त्यांना बर्‍यापैकी यश मिळालेले होते; परंतु त्या यशाने ते समाधानी नव्हते. त्यांना पाहिजे तसे यश मिळतच नव्हते. विशेषत: व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना यश मिळत नव्हते.

याचे कारण त्यांना शोधायचे होते आणि त्याबाबत काय करता येईल याची माहिती त्यांना पाहिजे होती. उद्योग ज्योतिष विषयात जातकाची पार्श्वभूमी सर्वार्थाने जाणून घेणे महत्त्वाचे असते. मला नाट्य व्यवसायाची फारशी माहिती नसल्यामुळे मी त्यांना त्यांच्या उद्योगाबद्दल सविस्तर सांगण्यास सांगितले.

पतिदेव लेखक होते तसेच ते दिग्दर्शक आणि नट या भूमिका पार पाडायचे. सौ नाटकात काम करायच्या. तसेच त्या नेपथ्य, नाटकाच्या तारखा, व्यवहार इत्यादी गोष्टींची काळजी घ्यायच्या. नाटकाशी संबंधित इतर गोष्टी, जसे भूमिकांसाठी पात्र निवड, ते दोघे मिळून, एकमेकांची मते ऐकून घ्यायचे. म्हणजे तुम्ही दोघे मिळून किशोरकुमार आहात, सब कूच एधरिच! मी त्यांना हसत हसत म्हटले आणि पत्रिकांकडे वळलो.

पहिल्यांदा नजरेत भरले ते पत्रिका मेलन. त्यांच्या पत्रिका अशा उत्तम जुळत होत्या, की मला उपमाच सुचत नाही. इतक्या सुंदर जुळणार्‍या पत्रिका फार क्वचित पाहायला मिळतात. मी प्रश्नकुंडलीकडे मोर्चा वळवला. तेथे प्रश्न सहाव्या घराशी संबंधित दर्शवीत होता.

सहावे घर म्हणजे प्रकृती, आरोग्य, छुपे शत्रू, नोकर, दैनंदिन व्यवहार इत्यादी गोष्टी दर्शवते; परंतु मूळ पत्रिकेतील सहावे घर रिक्त असल्याने तसा कुठला थेट अडथळा जाणवत नव्हता किंवा सहाव्या घराशी संबंधित दशादेखील नव्हती.

व्यवसायातील अडथळे या समस्येबद्दल ते मला विचारण्यास आले होते तेव्हा प्रश्न, प्रश्नकुंडलीप्रमाणे जुळत होता. अशा वेळी अधिकाधिक माहिती मिळवणे महत्त्वाचे असते. मी त्यांना परत एकदा त्यांची सगळी माहिती सांगण्यास सांगितले व समस्या परत समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले ते असे.

नाटक ते लिहितात, बसवतात, कलावंत निवडतात, तालमी होतात, प्रयोग होतात. आलेले लोक प्रयोगाची वाखाणणी करतात; परंतु दौरा काढण्याइतपत मागणी येत नाही. इथे दोन प्रयोग, तिथे तीन प्रयोग, असे करत कसेबसे दहा-बारा प्रयोग होऊन नाटकाचा गाशा गुंडाळण्याची पाळी येते.

जुनेजाणते कलावंत यांच्याबरोबर काम नाही करत, ते समजू शकते, परंतु नवीन कलावंतदेखील अंमळ नाखूशच दिसून येतात. आतापर्यंत असे अनेक वेळा झाल्याने आमच्या संगतीत यश नाही अशा प्रकारची कुजबुज होताना कळते.

काही वेळा जेथे प्रश्न निर्माण होतो त्या पातळीवर त्या प्रश्नाची उकल होणे कठीण जाते; परंतु त्याच्या वरच्या पातळीवर गेल्यास तोच प्रश्न सोपा होऊ शकतो. या वेळीदेखील असेच झाले. मी त्यांच्या नवमांश आणि दशमांश पत्रिकांचा अभ्यास केल्यावर मला लक्षात आले की, हे दोघे गुण परत वे जवळ जवळ जुळेच आहेत आणि सगळा तिढा सुटला.

त्या दोघांच्या कुंडल्या वर सांगितल्याप्रमाणे उत्तम जुळत होत्या. ते नवरा-बायको म्हणून अगदी योग्यच होते; परंतु जेव्हा ते एकत्र काम करीत असताना त्यांचे अंध क्षेत्रदेखील एकसमान होते. अंध क्षेत्र म्हणजे काय? आपण एक उदाहरण पाहू. कल्पना करा की, तुम्ही मोठी बस चालवत आहात. तुम्हाला समोरचा रस्ता तुमच्या समोरील काचेतून दिसतो. तुम्हाला तुमच्या बाजूची सगळी जागा आरशातून दिसते; परंतु तुमच्या बसच्या डाव्या हाताची पुढची जागा तुम्हाला दिसत नाही.

हे झाले तुमचे अंध क्षेत्र. म्हणून येथेच तुमच्या सहकार्‍याला बसवले जाते. तसेच बसच्या मागे काय चालते हे तुम्हाला किंवा तुमच्या सहकार्‍यालादेखील दिसू शकत नाही. हे पूर्ण क्षेत्र तुमच्या दोघांसाठीदेखील अंध क्षेत्र असते. म्हणूनच प्रत्येक बसमध्ये लिहिलेले असते- बस मागे घेताना वाहकाच्या सूचनेशिवाय मागे घेऊ नये; पण हा वाहकदेखील बसमध्येच बसून राहिला तर?

आपण अजून एक छोटासा प्रयोग करून पाहू या.

तुम्हाला येथे एक काळे वर्तुळ आणि एक फुल्‍ली दिसतात. तुमचा डावा डोळा हाताने झाका आणि पानाच्या अगदी जवळ या. काळ्या वर्तुळाकडे पाहत राहा. चित्त एकाग्र करा. डोळ्याच्या कोपर्‍यातून तुम्हाला फुल्‍ली दिसेल, परंतु तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करू नका.

आता वर्तुळावर नजर एकाग्र करत हळूहळू पानापासून दूर जा. थोड्याच वेळात फुल्‍ली दिसेनाशी होईल. झाली? आता तुमचा डावा डोळा उघडा आणि उजवा डोळा बंद करा. डाव्या डोळ्याने फुल्‍लीकडे पहा, वर्तुळ अदृश्य झाले?

याला म्हणतात तुमचे अंध क्षेत्र. अगदी डोळ्यासमोर असलेल्या गोष्टीदेखील जर अंध क्षेत्रात असल्या तर बिलकूल दिसत नाहीत आणि तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांचे अंध क्षेत्र सारखेच असले तर? तुमच्या अंध क्षेत्रातील जोडीदारच तुम्हाला चांगले मार्गदर्शन करू शकतो. उद्योग ज्योतिषामध्ये आपण सिंहावलोकन केल्यामुळे ही गोष्ट द‍ृग्गोचर झाली.

अनेक स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांची हीच समस्या असते. त्यांना वाटते की अभ्यास कमी पडला आणि ते अधिकाअधिक अभ्यास करतात, परत परत परीक्षेस बसतात; पण जर तुमची दुबळी अंगे तशीच राहिली असतील तुमची अंध क्षेत्रे तशीच असतील, तर यश कसे बरे मिळेल?

हे दोघेही सारखाच विचार करतात. त्यांना सारख्याच कल्पना, विचार, युक्त्या, प्रयुक्त्या, विचार सुचतात तसेच ते एकमेकांची बाजू उचलून धरतात. त्यांचे वादविवाद होतच नाहीत. झालेच तर डब्यूडब्यूइच्या नुरा कुस्तीप्रमाणे. यामुळे त्यांची दुबळी अंगे दबलेलीच राहतात.

बरे कुणी सांगायला आले तर ही दोघेही त्यांना मिळून अंगावर घेणार. त्यामुळे फारसे कुणी यांना समजावयाला जात नसावे आणि फारसे यश मिळाले नसल्याने टीकाकारांना यांच्यामध्ये काय स्वारस्य? म्हणजे अनुल्लेखाने मारणे होत असावे.

त्यामुळे अनुभवी कलाकार यांना टाळतात आणि यांना कुणी हौशेनवशेगवशे वरती अवलंबून आपले प्रयोग पुढे रेटायला लागतात. अशा प्रयोगानापण बोकड पास घेऊन येणारे निवृत्त कलाकार, दिग्दर्शक, लेखक इत्यादी यांना थोडेच मार्गदर्शन करणार? पुढच्या वेळी बोकड पास मिळायला हवा ना?

त्यामुळे हे दोघेजण वर्षानुवर्षे त्याच त्याच चुका वेग वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणत होते आणि म्हणून त्यांना यश दुरापास्त होते. अशा प्रकारे उत्तम जोडीदार असणे देखील अशा वेळी समस्या असू शकते.

मी त्यांना या विश्‍लेषणाचा गोषवारा सांगितला व त्यांना हेदेखील सांगितले की, हा आजार मुरलेला असल्यामुळे त्यावर उपाय करण्यास आणि उपाय मुरण्यासदेखील बर्‍यापैकी वेळ लागणार. त्यांना मी लाइफ कोचिंगचे महत्त्व समजून सांगितले. यामध्ये आपण त्याच्याशी समस्यांबद्दल चर्चा तर करतोच, परंतु त्यांना वेगवेगळा वस्तुनिष्ठ गृहपाठ देऊन त्यांना स्वतःलाही अंध क्षेत्रे पाहण्यास भाग पाडतो.

या प्रकारच्या कार्यकारी प्रशिक्षणामुळे त्यांना त्यांच्या परत परत होणार्‍या चुका पूर्णार्थाने समजतात व ते आपल्यामध्ये सुधारणा करू शकतात. हे ज्ञान त्यांच्या आतूनच येत असते आणि आपण फॅसिलिटेटर या अर्थाने त्यांना मदत करतो. आपल्या आतून येणार्‍या ज्ञानाला आपला विरोध असत नाही आणि त्यामुळे आपली सर्वांगीण प्रगती होणे सुकर बनते.

पुढचे सहा महिने हे जोडपे माझ्याकडे येत राहिले आणि त्यांची बरीच प्रगती झाली. त्यांनी त्यांची संस्था एका दुसर्‍या संस्थेबरोबर विलीन केली. आता त्यांची वेगवेगळी नाटके रंगमंचावर येतात व यशस्वीही होतात. त्यांनी नाटकात काम करणे कमी केले असून, भूमिकेस योग्य अशा कलाकारांना वाव देत त्यांची बस उत्तम प्रकारे चालली आहे, अगदी खंडाळ्याच्या घाटामध्येदेखील.

– आनंद घुर्ये
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)
संपर्क : ९८२०४८३४१६

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?