इलेक्ट्रिशियन कसे व्हायचे? यामध्ये स्वत:चा व्यवसाय कसा सुरू करायचा?

शालेय शिक्षणाच्या उंबरठ्यावरचा एक महत्त्वाचा थांबा म्हणजे दहावीच्या परीक्षेनंतरचा काळ. कला, वाणिज्य आणि शास्त्र या पारंपारिक शाखांच्या पलीकडेही अनेक वाटा आहेत. सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने कुशल मनुष्यबळ ही काळाची गरज बनली आहे.

आयटीआय, तंत्रनिकेतन या आज रोजगाराभिन्मुख तांत्रिक शिक्षण देणार्‍या संस्था आहेत. यातील जवळपास वीस अभ्यासक्रम कौशल्य विकासामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम हमखास नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी चालना देणारे आहेत.

आयटीआयमधील इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाला आजही चांगली मागणी आहे. घरातील विजेची देखभाल व दुरुस्तीची कामे इलेक्ट्रिशियन करतात. विजेवर चालणारी यंत्रे जसे की पंखा, फ्रीज, टीव्ही, इलेक्ट्रिक मोटार, मिक्सर, इस्त्री अशा अनेक वस्तूंची देखभाल, विक्री व दुरुस्ती इलेक्ट्रिशियन करतात.

तसेच घरातील वायरिंगची फिटिंग त्यांची दुरुस्ती व देखभाल, कंपनीतील असंख्य मशिनरीची देखभाल करण्यासाठी आणि खासगी तसेच सरकारी कंपन्यात इलेक्ट्रिशियनची आवश्यकता असते. इलेक्ट्रिशियनचे महत्त्व लक्षात घेता सध्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेतच मल्टी स्कील अंतर्गत विद्युत तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जात आहे.

यात प्रामुख्याने विद्युत साधने, हत्यारांची ओळख, विविध प्रकारच्या वायर्स, स्विचेस, विद्युत तारांचे जोड, साधे वायरिंग, जिना वायरिंग, गोडाऊन वायरिंग, वायरचा गेज तपासणे, आर्थिंग करणे, फ्युज व त्यांचे महत्त्व, वीजबिल काढणे, सोल्डरिंग करणे,

अ‍ॅसिड बॅटरीची देखभाल, इन्व्हर्टरची ओळख व देखभाल, एकसर व समांतर जोडणी, डीओएल स्टार्टर, सिंगल फेज व थ्री फेज मोटार देखभाल व दुरुस्ती, सौर उर्जा व सौर उर्जेवर चालणारी विविध यंत्रे यांचे शिक्षण माध्यमिक शाळेतच दिले जाते. एकंदरीत विद्यार्थ्यांचा कल ओळखण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होते.

इलेक्ट्रिशियन कसे व्हायचे?

आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी दहावी उत्तीर्ण पात्रता असून त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पदविकात प्रवेश घेऊ शकतो. आयटीआयनंतर थेट डिप्लोमाच्या दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळतो.

आयटीआयमध्ये मशिनरीचा वापर, देखभाल व दुरुस्ती यांच्या प्रात्यक्षिकांवर जास्त भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.

उद्योगजगताला एका इंजिनिअरमागे दोन किंवा तीन डिप्लोमा होल्डर्स आणि सात ते आठ आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांची गरज असते. आयटीआय इलेक्ट्रिशियन पूर्ण केल्यानंतर महावितरण विभागात तसेच खाजगी कंपनी, महानगरपालिका, रेल्वे विभाग,

जिल्हा परिषद, जलसिंचन विभाग, एसटी महामंडळ, टेलीफोन कार्यालय, राष्ट्रीय थर्मल पॉवरकार्पोरेशन, विविध लॅब टेक्निशियन, आयटीआय, पॉलीटेक्निक तसेच विविध शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षक, व्यवसाय प्रशिक्षक आदी ठिकाणी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

विद्यार्थी स्वत:चा व्यवसायदेखील करू शकतो. यात इलेक्ट्रिकल साहित्यांची विक्री व दुरुस्ती करू शकतो. तसेच नवीन इमारत, घरे यातील इलेक्ट्रिक फिटिंगची कामेदेखील करू शकतो. त्याचबरोबर घरातील इलेक्ट्रिक देखभाल व दुरुस्ती हाही एक पर्याय उपलब्ध आहेच.

विविध कंपनीमध्ये ट्रेनी इलेक्ट्रिशियनला प्रतिमाह दहा ते पंधरा हजार रुपये वेतन दिले जाते. अनुभवी असल्यास सुमारे वीस हजार ते चाळीस हजार वेतन दिले जाते. व्यवसायात प्रतिमहिना पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

– मधुकर घायदार

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक
संपर्क : 9623237135

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?