तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रभावित करणारी आणि तुमच्या कळत नकळत, तुम्हाला त्यांचं अनुकरण करायला लावणारी गोष्ट म्हणजे, तुमच्या आजूबाजूची माणसं. होय माणसं आणि म्हणूनच ती जाणीवपूर्वक तुम्ही निवडा.
मी माझ्या बिझनेस कोचिंगमध्ये तर त्या उद्योजकांना योग्य ती माणसं स्वत:शी जोडायची असाइनमेंटच देतो. असं म्हटलं जातं की, जर तुमची संपत्ती किती हे जाणून घ्यायचं असेल तर ती साधारणत: तुमच्या जवळच्या पाच मित्रांच्या संपत्तीच्या सरासरी इतकी असण्याची शक्यता असते.
तुमचं यशही तुमच्या संगतीवर अवलंबून असतं. तुमची ओळख तुमच्या मित्रांवरून ठरवली जाते आणि हे जर आपल्याला माहीत असेल तर, तर मग आपण आतापर्यंत एवढे गाफील का?
मला तुमच्या सध्याच्या मैत्रीविषयी नाही बोलायचंय. मला तुमच्या यशाविषयी, भविष्याविषयी बोलायला नक्कीच आवडेल. मला नक्की काय म्हणायचंय हे मात्र तुमच्या लक्षात आलंच असेल.
अनेक उपाय करूनही अजून म्हणावं तेवढं यशाचं माप जर तुमच्या झोळीत पडलं नसेल, तर हा उपाय लगेच करून बघा. तुमच्या आजूबाजूची माणसं बदला.
तुमच्यापेक्षा यशाने, शिक्षणाने, अनुभवाने, ज्ञानाने मोठी असणारी माणसं, उद्देशपूर्वक तुमच्या मैत्रीच्या पार्कमध्ये असू द्या. तुमची विचारधारा, काम करण्याची पद्धत आणि दृष्टिकोन याने बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायला लागेल, हे नक्की.
सामान्यत: माणसाला मान देणाऱ्या लोकांमध्ये राहायला आवडतं. आपला सन्मान करणारी, आपला आदर करणारी माणसं आपण हेतूपूर्वक शोधतो, त्यांच्यात रमतो. कारण माणूस हा स्तुतिप्रिय आहे; परंतु अशा कळपात आपली प्रगती खुंटते.
असं म्हटलं जातं की, ज्या लोकांच्या समूहात आपण सगळ्यात जास्त हुशार असतो, ते ठिकाण आपल्या प्रगतीसाठी जास्त हानीकारक असतं. जर तुम्हीही अशा ठिकाणी असाल, तर वेळीच सावध व्हा. आपली जागा बदला.
तुमच्यापेक्षा हुशार माणसं शोधा. त्यांच्या सान्निध्यात राहा. त्यांच्यातील काही अनोख्या गोष्टी आत्मसात करा. खूप पुढे जाल, खूप मोठे व्हाल.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.