आजही गरजेचा आहे ‘सायबर कॅफे’ व्यवसाय


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आजचे युग हे ‘सायबर युग’ आहे. ‘डिजिटल इंडिया’कडे आपली वाटचाल सुरू आहे. आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात इंटरनेटसह स्मार्टफोन आहे. देशात इंटरनेटचे वापरकर्ते दिवसेंदिवस वाढत आहेत. आज इंटरनेट कनेक्शनदेखील मोबाईल इतकंच जीवनावश्यक बाब झालं आहे, असं असतानादेखील आपल्या सभोवती सायबर कॅफे किंवा इंटरनेट कॅफेचा व्यवसाय सुरू असलेला आपण पाहतो.

आज सायबर कॅफे या व्यवसायाविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. आज प्रत्येक काम संगणक आणि इंटरनेटच्या मदतीने केले जात आहे. युवक-युवती स्मार्टफोनमधील इंटरनेट वापरून संगणक, लॅपटॉपवर ऑनलाइन कामे करतात, पण प्रत्येक ऑनलाईन काम मोबाइलवर करणे शक्य नाही. प्रत्येकाकडे संगणक किंवा लॅपटॉप उपलब्ध नसतो.

सायबर कॅफे अशी जागा आहे, जिथे कोणतीही व्यक्ती संगणकाद्वारे इंटरनेटचा वापर करीत आपले काम करू शकतो. मॉल, मार्केट, बस किंवा रेल्वे स्टेशन, शाळा, महाविद्यालय, शासकीय किंवा खासगी ऑफिसजवळ किंवा गर्दीच्या ठिकाणी रस्त्यालगत दुकान भाडेतत्वावर घेऊन युवक सायबर कॅफे हा व्यवसाय सुरू करू शकतो. या व्यवसायासाठी संगणक, एक जलद इंटरनेट कनेक्शन, प्रिंटर आणि स्कॅनर, इन्व्हर्टर, खुर्च्या, टेबल किंवा क्युबिकल बॉक्स आदी साहित्यांची आवश्यकता असते.

युवकाकडे उपलब्ध भांडवलानुसार कमीत कमी दोन जास्तीत जास्त आठ ते दहा संगणकाची व्यवस्था सायबर कॅफेत करू शकतो. या व्यवसायासाठी सुमारे दोन ते पाच लाख भांडवल लागते.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

सायबर कॅफेमध्ये शासकीय योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे, विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप तसेच परीक्षा फॉर्म भरणे, आरटीओ लायसेन्स, पासपोर्ट, शॉप अ‍ॅक्ट परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेत खाते उघडणे, वीज बिल, घरपट्टी भरणे, ऑनलाईन गेम खेळणे आदी विविध प्रकारची कामे केली जातात.

युवकांकडे हे सर्व करण्यासाठी काही कौशल्यांची गरज असते. सायबर कॅफेसाठी लागणार्‍या कौशल्यांत मराठी आणि इंग्रजी टायपिंग करणे, स्कॅन करणे, प्रिंट काढणे, हार्डवेअर, सॉफ्टवेअरचे ज्ञान व ते सुलभरीत्या हाताळण्याचे कौशल्य मात्र हवे.

आज सायबर क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या युवकांसाठी सरकारी तसेच खासगी शैक्षणिक संस्थेत विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सायबर कॅफेत काही कामे दुकानदाराला स्वत: करून द्यावी लागतात. संगणक व इंटरनेटचा वापर करीत अनेक जण सायबर कॅफेत बसून ही कामे स्वत: करतात. सायबर कॅफेत वीस ते पन्नास रुपये प्रती तास याप्रमाणे चार्ज आकारला जातो. स्कॅनिंग करण्याचे पाच ते दहा रुपये, प्रिंटचे तीन ते पाच रुपये आणि कलर प्रिंटचे पाच ते दहा रुपये, ऑनलाईन फॉर्म भरून प्रिंट देण्याचे सत्तर ते शंभर रुपये आकारले जातात.

मात्र या व्यवसायात सायबर कॅफे चालवणार्‍या मालकाने रजिस्टर ठेवणे गरजेचे आहे. त्यात संगणकावर काम करणार्‍या व्यक्तीचे नाव, पत्ता आय डी प्रूफ आदी माहिती लिहली गेली पाहिजे. संगणक वापरणार्‍या व्यक्तीने कोणत्या संकेतस्थळाला भेट दिली याचीही माहिती सॉफ्टवेअरमध्ये नोंदली जायला हवी. सायबर गुन्हे उघडकीस येण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे.

प्रत्येक संगणक वापरकर्त्यांची योग्य नोंद रजिस्टरमध्ये करणे अत्यावश्यक आहे. संगणक हाताळण्याचे कौशल्य असेल तर सायबर कॅफे हा एक योग्य व्यवसाय आहे. या व्यवसायातून प्रती माह पंधरा ते चाळीस हजार रुपये कमाई होऊ शकते.

युवकांच्या अंगी संगणक हाताळण्याचे कौशल्य असल्यास तसेच सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे योग्य ज्ञान असल्यास सायबर कॅफे सुरू करणे योग्य पर्याय आहे, पण यात गरज आहे ती प्रामाणिक सेवा देण्याची.

– मधुकर घायदार
9623237135
(लेखक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातपूर नाशिक येथे शिल्पनिदेशक आहेत)

error: Content is protected !!
Scroll to Top