मित्रांनो, आपण एकविसाव्या शतकातले उद्योजक आहोत. आपली व्यवसाय करण्याची पद्धतही एकविसाव्या शतकाला साजेशीच हवी, तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो आणि प्रगती करू शकतो. हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे आपल्या उद्योगवाढीसाठी आपल्याला माहिती तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे.
एवढ्या मोठ्या उलाढालीत आपला वाटा किती, याचा विचार प्रत्येक उद्योजकाने केला पाहिजे. आपण जी उत्पादने किंवा सेवा देतो आहोत त्यासाठी आपल्याला ऑनलाइन ग्राहक शोधता येणार आहेत का? किंवा त्याची प्रत्यक्ष ऑनलाइन विक्री करता येणार आहे का? हे प्रश्न या वेळी उपस्थित होणे गरजेचे आहे.
ज्याप्रमाणे कोकण रेल्वेचा शोध लागल्यावर लोकांनी जहाजाने कोकणात जाण्यापेक्षा रेल्वेने जाणे पसंत केले, त्याचप्रमाणे पारंपरिक विक्रीच्या पद्धतींसोबत आपल्याला आता ऑनलाइन विक्रीकडे वळून जागतिक खुल्या बाजारपेठेत पदार्पण करणे गरजेचे आहे.
आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे व तो त्या स्मार्टफोनवरून आपली उत्पादने वा सेवा केव्हाही विकत घेऊ शकतो. ऑनलाइन विक्री करण्याच्या तीन पद्धती आहेत. या तिन्हींची ओळख व त्याचा वापर कसा करावा याबद्दल ऊहापोह येथे केला आहे.
- स्वत:च्या वेबसाइटद्वारे विक्री
- अन्य शॉपिंग कार्टद्वारे विक्री
- प्रस्थापित मार्केटप्लेसेसद्वारे विक्री
ऑनलाइन विक्रीची पूर्वतयारी
ऑनलाइन विक्री सुरू करण्यापूर्वी त्याच्या आर्थिक गणिताचा विचार करणे गरजेचे आहे. हे गणित जुळून येत असेल आणि त्यात आपल्याला नफा होत असेल तरच यात पदार्पण करण्यात शहाणपण आहे. ऑनलाइन विक्रीमध्ये प्रामुख्याने पाच प्रकारचे खर्च येतात.
पाठवण्याचा खर्च :
वरीलपैकी कोणत्याही तीन प्रकारांमध्ये तुम्हाला माल विकायचा असल्यास तुम्हाला त्याची पाठवण्याची व्यवस्था करावी लागते किंवा तो खर्च अंगावर घ्यावा लागतो.
आज अनेक लॉजिस्टिक्स व कुरियर कंपन्या ई-कॉमर्स बिझनेससाठी ही सेवा देतात, मात्र सेवेची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि गती हे पाहून तुम्हाला लॉजिस्टिक्स कंपनी नक्की करावे लागते. प्रति किलोग्रॅमनुसार सुमारे २० रु. ते ५० पर्यंत तुम्हाला लॉजिस्टिक्स सेवा मिळू शकतात.
पॅकेजिंगचा खर्च :
एखादी वस्तू लॉजिस्टिक्सद्वारे पाठवत असताना तिचे नुकसान होऊ नये याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. नाजूक वा नाशवंत गोष्ट असेल तर ही काळजी जरा जास्त चौकसपणे घ्यावी लागते. यासाठी उत्तम प्रतीचे पॅकेजिंग करणे गरजेचे आहे, तोही खर्च धरावा लागतो.
Payment Gateway चा खर्च :
ऑनलाइन खरेदी केल्यानंतर ग्राहक जे पैसे भरतो, ते थेट आपल्या बँक खात्यात येत नसून त्यासाठी आपल्याला Payment Gateway ची मध्यस्थी स्वीकारावी लागते.
Payment Gateway ही अशी सेवा, की जी ग्राहकाकडून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI इत्यादी माध्यमांतून पैसे स्वीकारते आणि आपण उत्पादन अथवा सेवा ग्राहकापर्यंत पोहोचवल्याची खात्री केल्यानंतर आपल्या बँक खात्यात ते पैसे वळते करते.
ऑनलाईन व्यवसाय करताना Payment Gateway हा टाळता न येणारा पर्याय आहे. हे Payment Gateway आपल्याला प्रत्येक विक्रीमागे ठरलेल्या दरानुसार कमिशन आकारते, त्यामुळे हा खर्चही मोजणे आवश्यक आहे.
साठवण्याचा खर्च :
माल ऑनलाइन विकत असताना त्याची साठवणूकही करावी लागते. तो खर्चही धरणे आवश्यक आहे.
मार्केटिंगचा खर्च :
ऑनलाइन विक्रीसाठी नुसते दुकान उघडून बसल्याने विक्री होत नाही. त्यासाठी तुम्हाला जाहिरातही मोठ्या प्रमाणात करावी लागते. ऑनलाइन विक्री वाढवण्यास मोठा वाटा हा डिजिटल मार्केटिंगचा असतो, कारण डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही थेट ग्राहकाच्या हातात पोहोचू शकता.
जसे की, फेसबुकवर सर्फिंग करणारा एखादा ग्राहक आपली फेसबुक पोस्ट वा जाहिरात पाहून थेट एका क्लिकसरशी आपल्या वेबसाइटवर किंवा वेबस्टोअरवर जाऊ शकतो. यामुळे विक्री होण्याची शक्यता वाढते. शिवाय पारंपरिक जाहिरात माध्यमांपेक्षा डिजिटल मार्केटिंगचा खर्च तुलनेने खूप कमी असतो.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया प्रमोशन, ई-मेल मार्केटिंग अशा विविध प्रकारे ग्राहकाच्या हातात आपले उत्पादन किंवा सेवा हे पोहोचणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायाचा व्याप मोठा असल्यास तुम्हाला जाहिरातींच्या पारंपरिक साधनांचाही, जसे की वृत्तपत्रांतून किंवा वाहिन्यांमधून जाहिरात देणे याचा विचार करावा लागतो.
वरील पाचही प्रकारच्या खर्चाची बेरीज करता ती आपल्या उत्पादन वा सेवेच्या विक्री किमतीतून वजा केली असता नफा शिल्लक राहत असेल, तरच ऑनलाइन विक्रीची सुरुवात करणे श्रेयस्कर ठरते.
नफा = विक्री किंमत – (पाठवण्याचा खर्च + पॅकेजिंग खर्च + Payment Gateway चा खर्च + साठवण्याचा खर्च + मार्केटिंग खर्च)
स्वत:च्या वेबसाइटद्वारे विक्री
आपण आपल्या सेवा व उत्पादने ही आपल्या वेबसाइटवरून विकू शकतो. आपले दुकान किंवा ऑफिस हे दिवसातले आठ ते बारा तास उघडे असते, मात्र आपली वेबसाइट हे आपले २४ तास सुरू राहणारे ऑनलाइन दुकान असते. जगाच्या कानाकोपर्यातून तुम्ही झोपलेले असतानाही तुमचा माल इथे विकला जाऊ शकतो व तुमच्या बँक अकाऊंटला पैसे जमा होऊ शकतात.
ही किमया नक्की होऊ शकते, पण त्यासाठी तुम्हाला थोडी गुंतवणूक करून त्याप्रमाणे तुमची वेबसाइट तयार करून घ्यावी लागेल. तुमच्या वेबसाइटमध्ये शॉपिंग कार्ट असणे आवश्यक आहे.
तुमची उत्पादने वा सेवा या शॉपिंग कार्टमध्ये ग्राहक पाहू शकतात व तेथेच हवे तेवढे नग विकत घेऊ शकतात. ग्राहकाने शॉपिंग कार्टमध्ये जाऊन मागणी नोंदवली, की पुढे तो Payment Gateway वर जातो.
तिथे Payment केल्यानंतर तुम्हाला लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून माल पाठवावा लागतो. माल ग्राहकाला मिळताच त्याच्याकडून Payment Release Request पाठवली जाते. त्याद्वारे Payment Gateway कडून तुमच्या बँक खात्यात झालेल्या विक्रीचे पैसे जमा होतात.
या संपूर्ण प्रक्रियेला, म्हणजे ग्राहकाने तुमच्या वेबसाइटवरून माल खरेदी करण्याची ऑर्डर दिल्यापासून तुमच्या खात्यात मालाचे पैसे येईपर्यंत सुमारे पाच ते सात दिवस जाऊ शकतात.
तुम्हाला एका चांगल्या वेब डेव्हलपरकडून ई-कॉमर्स वेबसाइट तयार करून घेणे, Payment Gateway निवडणे, त्याचे वेबसाइटमध्ये एकीकरण करणे, लॉजिस्टिक्ससोबत संधान करणे आणि डिजिटल मार्केटिंगद्वारे तुमच्या वेबसाइटची व उत्पादन वा सेवेची जाहिरात करणे अपेक्षित आहे.
अन्य शॉपिंग कार्टद्वारे विक्री
Shopify, WooCommerce, Zepo, KartRocket, Build a bazaar, MartJack, इत्यदी ही काही third party online shop solutions आहेत. याद्वारेही आपण ऑनलाइन विक्रीची सुरुवात करू शकतो.
स्वत:ची ई-कॉमर्स वेबसाइट तयार करून घेऊन त्याद्वारे ऑनलाइन विक्री करण्यापेक्षा third party online shop solutions वापरून स्वत:चे वेबस्टोअर तयार करून त्यावर आपल्या उत्पादनांची विक्री करणे हे तुलनेने कमी खर्चीक आहे.
त्यामुळे नव्याने ऑनलाइन विक्रीची सुरुवात करायची असल्यास हा पर्याय सोयीचा आहे. यामध्ये आपल्याला विशेष तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. फक्त वरीलपैकी एक प्लॅटफॉर्म निवडून त्यावरील फॉर्म भरून लॉगइन करणे गरजेचे आहे. पुढे आपल्याला वेबस्टोअरचे तयार, आकर्षक अशा विविध थीम्स उपलब्ध होतात.
ज्यातून एक निवडून आपल्याला हवे तसे, आपल्या उत्पादनांचे वेबस्टोअर तयार करू शकतो. यामध्ये तुम्ही तुमचे स्वत:चे झरूाशपीं ॠरींशुरू वापरू शकता किंवा त्यांनी उपलब्ध करून दिलेला Payment Gateway सुद्धा वापरू शकता. तुमच्या बँक खात्याचा तपशील नोंदवल्यावर झालेल्या विक्रीचे पैसे थेट तुमच्या खात्यात येऊ लागतात.
प्रस्थापित मार्केटप्लेसेसद्वारे विक्री
Flipkart, Amazon, eBay, Snapdeal, Shopclues, PayTM, Myntra, Jabong ही काही प्रस्थापित मार्केटप्लेसेसची उदाहरणे आहेत. शिवाय अनेक लहान-मोठ्या वेबसाइट्ससुद्धा अशी मार्केटप्लेसेस सेवा पुरवतात. या मार्केटप्लेसेस म्हणजे एखाद्या सुपरमार्केटप्रमाणे आहेत. इथे फक्त तुमचाच माल विक्रीला नसून तुमच्यासोबत तुमच्या स्पर्धकाचाही माल विक्रीला ठेवलेला असतो.
या मार्केटप्लेसेसचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या वेबपोर्टल्सची मोठ्या प्रमाणात जाहिरात होत असते व खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक या मार्केटप्लेसेसना खरेदीसाठी भेट देत असतात. इथे आपल्याला ग्राहकाला ओढून आणावे लागत नाही, तर ग्राहक स्वत:हून येतो.
या मार्केटप्लेसेसमध्ये तुमचा माल विकण्यासाठी तुम्हाला या वेबसाइट्सवर जाऊन विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागते. सोबत तुमच्या व्यवसायाचा पुरावा सादर करावा लागतो. पॅन क्रमांक, टॅन क्र., व्हॅट क्र., बँक खात्याचे तपशील या गोष्टींचे पुरावे सादर करावे लागतात.
विविध मार्केटप्लेसेसवर विक्री करण्याचा एकच मोठा तोटा आहे की, ते तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन आकारतात. तुलनेत तुमचा मार्केटिंग खर्चही कमी झालेला असतोच.
एक उद्योजक म्हणून तुम्ही तुमच्या व्यवसायाला साजेसा वरील तीनपैकी कोणताही पर्याय निवडा आणि ऑनलाइन विक्रीला सुरुवात करा. आपल्या माहितीतले व स्थानिक ग्राहक यांच्यावर आधारितच जर व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, तर त्या वाढीला एक नैसर्गिक मर्यादा आहे. याचसाठी आपल्याला नव्या वाटेने मार्गक्रमण करण्याशिवाय पर्याय नाही.
– शैलेश राजपूत
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.