बऱ्याच घरात पाहिलं आहे की लोकं एकमेकांशी बोलत नाहीत. विशेषतः पुरुष. बायका वेळप्रसंगी रुसतात, भांडतात, पण एकमेकींशी बोलतात; या उलट पुरुष मंडळी एकमेकांमध्ये काहीही वितुष्ट नसलं तरीही एकमेकांशी सहज म्हणून काही बोलत नाहीत, गप्पा मारत नाहीत. हे सगळ्या घरात नाहीय, पण काही घरांमध्ये असं दिसून येतं.
अशा सगळ्या घरातल्या लोकांना सध्या जास्त कंटाळा येतोय.
बायकांचा दिवस त्यातल्या त्यात घरातली कामं आणि बाकीच्या गोष्टीत व्यस्त तरी असतो, पण पुरुषांना घर खायला उठतंय.
इतर वेळी ही गोष्ट ठीक होती, पण सध्या आपण खूप भयानक स्थितीला सामोरे जातोय. अमेरिका, इटलीतली दृष्य पाहिली की याची कल्पना येते. अशा वेळी घर म्हणून, कुटुंब म्हणून एकमेकांना धरून राहणं, सांभाळणं खूप गरजेचं आहे. अगदीच विपरीत विचार करायचा झाला तर हे वादळ सरेल तेव्हा कोण कोण शिल्लक असेल कोणालाच माहीत नाहीय, मग का हा दुरावा?
आतापर्यंत झालं ते झालं, पण आता सगळ्या घराने एकत्र येणं, एकमेकांना समजून घेणं, जे कधी बोलता आलं नाही ते बोलणं, व्यक्त होणं गरजेचं आहे. होऊ नये, पण व्यक्त होण्याची संधी पुन्हा मिळाली नाही तर?
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
जुने मित्र, जवळची मंडळी, नातेवाईक, रुसून-फुगून बसलेली पण आपली माणसं या सगळ्यांशी जोडलं जाण्याचा, एक हाक देण्याची हीच वेळ आहे. अंतर वाढलं असलं तरी तंत्रज्ञानाने आज आपण खूप जवळ आलो आहोत. झूम कॉलवर सगळे एकमेकांना दिसू शकतो, बोलू शकतो. इतरही खूप पर्याय उपलब्ध आहेत.
बाहेर चित्र कितीही भयावह असलं तरी आपली कुटुंबव्यवस्था ही आपल्या समाजाची खरी शक्ती आहे, ही शक्ती एकवटली तर कोरोना वगैरेची मनातली भीती कमी होईल. जर काही संकट ओढवलंच, तर त्यावर मात करण्याचं बळ मिळेल.
हे होण्यासाठी गरज आहे फक्त सुरुवात करण्याची. मानापमान सोडून पुढाकार घेण्याची. संवादाचा सेतू स्वतःपासून सुरू करण्याची!
– शैलेश राजपूत
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.