व्यवस्थापनातील कर्णधार

कोणताही व्यवसाय म्हटला की, त्यात चार ‘एम’ महत्त्वाचे असतात. मशीन, मनी, मटेरियल आणि मेन. या चार ‘एम’मधील ‘ऑड मॅन आऊट’ असेल तर तो असतो, मेन. याच माणसाला बुद्धी, संवेदना, भावना वगैरे असतात. यंत्र आणि माणूस एकाच धाटणीचे नसतात. त्यांची रचना वेगवेगळी असते.

मशीन कधी चुकत नाही तर माणूस चुकू शकतो. म्हणूनच त्याच्या चुकाही मोठ्या मनाने मान्य कराव्या लागतात. अशात उद्योगातील मनुष्यबळाची निवड हीच त्या उद्योगाच्या यशाचे गुपित असते. या चार एममधील महत्त्वाची निवड असते ती मनुष्यबळाचीच. मनुष्यबळ सहकार्य करणारे असेल तरच त्या संस्थेची/उद्योगाची प्रगती होत असते.

व्यवस्थापनाची तशी कोणती ‘फिक्स्‌ड थेअरी’ नसते. ‘थेअरॉटिकल’गोष्टींचे ‘अप्लिकेशन’ प्रत्येक ठिकाणी जमून येईल असे नाही. त्यामुळे ‘अप्लिकेशन’नुसार ‘थेअरी’सुद्धा बदलत जाते. आपद्धर्माचे प्रसंगानुरूप पालन हेच खरे व्यवस्थापन आहे. व्यवस्थापन सांभाळायचे असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी लागते.

आपण वेळेवर पोहोचत असू तरच इतरांना वेळेवर पोहोचण्यासाठी आग्रह करण्याचा आपल्याला अधिकार असतो. मनुष्यबळ विकासाचा धडा द्यायला जाताना त्याचे प्रात्यक्षिक अनुभवत होतो. आता हेच पाहा ना! देशात एखाद्या कंपनीची बूम आली की अनेक कंपन्या उघडत असतात. कंपनी उघडली की मशीन, मनी, मटेरियल हे सारखेच असते. पण, मनुष्यबळ त्या कंपनीला खर्‍या अर्थाने उंचीवर नेत असते.

आपण इन्फोसिसचे उदाहरण पाहू. आयटीच्या क्षेत्रात स्थापन झालेल्या असंख्य कंपनीतून इन्फोसिस का उंचीवर गेली? त्या कंपनीला जागतिक स्थान कसे प्राप्त झाले? त्या कंपनीच्या कर्मचार्‍यांनाच याचे सारे श्रेय जाते. २०० रुपयांतून ७७०० कोटींची संपत्ती जमविणारे नंदन नीलेकणी किंवा नारायण मूर्ती यांच्यासारखे दिग्गज घडण्यामागे याच कर्मचार्‍यांचे परिश्रम आहेत.

कंपनीची संपूर्ण चमू जेव्हा एक ध्येय, एक विचार, एक वचनबद्धता, एक प्रामाणिकता या ध्येयातून पुढे जाते, तेव्हा त्या कंपनीचा सोनेरी क्षण दृष्टीपथात आलेला असतो.

या कंपनीने आपल्या सार्‍या कर्मचार्‍यांसाठी ‘इम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम’ तयार केली. त्यामुळे सारेच कर्मचारी कंपनीचे मालक झाले. मालकाच्या भूमिकेत आल्याने सारेच कर्मचारी मन लावून काम करायचे आणि बाजारात आपल्या कंपनीची पत कशी वाढेल, याकडे लक्ष ठेऊन असायचे.

कंपनीबद्दल बाहेर चांगलेच बोलायचे आणि त्यामुळे कंपनीला आपोआपच ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ लाभले. कंपनीची भरभराट जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नव्हती. म्हणूनच उद्योगतंत्रातील चार एमपैकी हा चौथा एम अर्थात मनुष्यबळ हीच कुठल्याही कंपनीची सर्वांत मोठी पूंजी असते. म्हणूनच इतर सॉफ्टवेअर कंपन्या सर्व इतर संसाधन असताना देखील इन्फोसिसच्या तुलनेत माघारल्या.

व्यवस्थापन कौशल्य

व्यवस्थापन कौशल्य हे अंमलबजावणीचेच शास्त्र आहे. त्याला कुठेही ‘थेअरी’त बसविता येत नाही. त्यामुळेच प्रत्येकाचा अनुभव हा निरनिराळा असतो. अशात स्वत:मध्ये उत्तम प्रशासक घडवायचा असेल तर स्वत:चा बुद्ध्यांक (इंटिलिजंट कोशन्ट) आधी कळावा लागतो. स्वत:च्या मर्यादा स्वत:ला ठावूक असणे अधिक आवश्यक असते. ‘इमोशनल कोशन्ट’वर (भावनांक) मात करता येणे जमले पाहिजे. सारेच निर्णय हे मनाप्रमाणे व्यवसायात घेता येत नसतात.

भावनिकता बाजुला सारून ते निर्णय घेता यायला हवे. वेळेच्या व्यवस्थापनासोबतच संसाधने आणि व्यक्तिगत पातळीवर असणारे सलोख्याचे संबंध हे आवश्यक असतात. अशा संबंधांतून तुमचे व्यवस्थेतील स्वीकारले जाणे किंवा न जाणे ठरत असते. संबंध चांगले असतील तर तुम्ही चटकन स्वीकारले जाता आणि नसतील तर तुमच्या आगमनाची नांदीच ही असंतोषाची जनक ठरत असते.

कुठल्याही व्यवसायात हितधारक, भागधारक आणि भांडवलधारक हेही तितकेच महत्त्वाचे असतात. लेंडर, क्रेडिटर्स यांचेही हित जपले जाणे आवश्यक असते. या सर्व मालिकेत विश्‍वासाची नदी दोन्हीकडून प्रवाहित होणे आवश्यक असते. या नदीच्या प्रवाहात कुठेही अवरोध असतील तर ते निश्‍चितपणे त्या संस्थेसाठी घातक ठरत असते.

अनेकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती त्या कंपनीच्या यश-अपयशाला कारणीभूत ठरत असते. पण, प्रशासनाची, व्यवस्थापनाची भूमिका ही ‘थँकलेस’ अशीच असते. तो कधीही कुणाचे समाधान करू शकत नाही. याला जबाबदार कर्मचारीही तितकाच आहे.

कारण, साधारणत: कर्मचारी हा स्वत:च्या अधिकारांप्रती जितका जागरूक असतो, तितकी त्याला स्वत:च्या कर्तव्याची जाणीव नसते. कर्तव्याच्या आघाडीवर अनेकदा टाळाटाळ होत असते आणि अधिकार भांडून-भांडून घेतले जातात. कर्मचारी हा नेहमीच वर्तमानकाळात आणि भुतकाळात रममाण होत असतो तर मालक हा भविष्याकडे वाटचाल करतो. नेमकी हीच दरी एकमेकांना समजून न घेण्याचे मुख्य कारण बनते. या स्थितीला तोंड द्यायचे असेल तर स्वत:च्या आदर्शातूनच इतरांपुढे आदर्श उभा करायचा असतो.

कामाची पारदर्शिता, भावनात्मकता बाजुला ठेऊन निर्णय घेणे, स्वत:ही प्रामाणिक राहण्यातून अनेक निर्णय घेतले जातात. त्यातून गटबाजीचा बागुलबुवा उभा केला जातो. पण अशा सर्व आरोपांपासून दूर राहत आपल्या निर्णयाच्या क्षमतेवर पूर्णत: विसंबून असले पाहिजे. हे करीत असताना त्यांच्या मनातही शिरले पाहिजे आणि आपले स्वत:चे स्थान निर्माण केले पाहिजे. निर्णय घेताना स्वार्थ कधीही मनात शिरू देऊ नये आणि संस्थाहित सर्वतोपरी जपले पाहिजे.

तरीही अनेकदा तंटे का उद्भवतात? कारण, कंपनीतून निलंबन किंवा बडतर्फी ही कधीही त्या व्यक्तीला काम येत नाही किंवा त्याची कार्यक्षमता कमी आहे, म्हणून होत नाही, तर त्याला कारणीभूत असतो त्याचा व्यवहार. ‘पीपल आर सॅक्ड नॉट बिकॉज दे आर इनकॉम्पिटण्ट बट बिकॉज ऑफ देअर ऍटिट्युड’.

व्यवस्थापक म्हणून आपण जर कर्मचार्‍यांचे उणेच काढत बसलो तर त्या कर्मचार्‍यांचे खच्चीकरणच होते आणि त्याने संस्थेचे नुकसान होत असते. कमजोरी कुणात नसते? प्रत्येकच व्यक्ती प्रत्येक गोष्टीत तरबेज राहूच शकत नाही. तसा दावा करणारा हा थोतांडीच असतो.

मात्र प्रत्येकामध्ये काही चांगल्याही गोष्टी असतात. आपण जर त्याच्या शक्तिस्थानावर लक्ष देऊन त्यातील कमजोरी बाजुला सारत काम करवून घेतले तर एक टीम म्हणून बघता बघता आपण संस्थेच्या कामाचे आऊटपुट वाढवू शकतो.

शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघेही उत्तम खेळाडू. विक्रमांच्या शैलीचा विचार करायचा तर सचिनला स्पर्धा नाही आणि नेतृत्त्वाच्या कौशल्याचा विचार करायचा तर धोनीला स्पर्धा नाही. सचिनचा विक्रम धोनी करू शकत नाही आणि धोनीने ज्या पद्धतीने संयमाने, धैर्याने, सकारात्मक पद्धतीने संघ हाताळाला, तसे सचिनला करता येणार नाही. सचिनला कर्णधारपद प्राप्त झालेही होते. पण वर्षभरातच त्याने ते सोडले.

स्वत:च्या शैलीचा अंगीकार इतरांनीही करावा, या अट्टाहासापायी त्याने उगाचच वेळ घालवला आणि एक अयशस्वी कर्णधार म्हणून गणला गेला. तरीही तो असामान्य का तर त्याने स्वत:च्या शक्तिस्थानावर लक्ष केंद्रीत केले आणि कर्णधारपद हे आपल्यासाठी नाही, हे वेळीच ताडले. तोच सचिन आज भारतरत्न झाला.

बरेचदा आपण आपल्यासाठी काय वाढले आहे, हे त्वरित समजून न घेता एखाद्या गोष्टीविषयी आग्रही असतो आणि स्वत:च्या वेळेचे अमूल्य नुकसान करतो. काही गोष्टींना हार किंवा जीत न मानता प्रारब्ध म्हणून स्विकारले की आयुष्य जगायला मदतच होते. इतरांमधील सकारात्मक बाजु लक्षात घेत, त्यावर काम करणे आणि त्यासाठी दोन नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करीत त्याला आपल्या टीमचा एक घटक बनविणे, हेही तितकेच आवश्यक असते. म्हणूनच

व्यवस्थापनातील कर्णधार हा संयमी, मितभाषी, सकारात्मक, टीम म्हणून पुढे नेणारा असेल तरच तो यशस्वी होणार असतो.

– विश्‍वास पाठक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?