पाचवी नापास ते ‘मसाला किंग’ पद्मभूषण महाशय धर्मपाल गुलाटी

एक ९६ वर्षांचे आजोबा एमडीएच मसाल्यांची जाहिरात करताना आपल्याला दिसतात आणि प्रत्येक घराघरात आज ते लोकप्रिय आहेत. ते आहेत, महाशय धर्मपाल गुलाटी. ‘एमडीएच मसाले’चे संस्थापक मालक. महाशयजींना २०१९ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. ९६ वर्षांचे हे एक तरुण उद्योजक आहेत. आज पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या या उद्योजकाचा उद्योजकीय प्रवास आपण जाणून घेऊयात.

महाशय धर्मपाल यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तान येथील सियालकोट येथील मोहल्ला मियानपूर येथे १९२३ साली झाला. फाळणीनंतर महाशय दिल्लीला आले व इथेच स्थायिक झाले. दिल्लीला येताना त्यांच्याजवळ केवळ १५०० रुपये होते. उदरनिर्वाहासाठी काही ना काही काम करणे गरजेचे होते.

महाशयांनी आपल्याकडील पैशांमधून एक टांगा खरेदी केला आणि ते चालवण्याचे काम ते करू लागले. परंतु त्यामध्ये त्यांचे मन रमत नव्हते. हवे तसे पैसेही सुटत नव्हते. काही काळानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि टांगा चालवण्याचे सोडून स्वत:चा पारंपारिक उद्योग सुरू करण्याचे ठरवले.

महाशय धर्मपाल यांचा वडिलोपार्जित सियालकोट येथे मसाल्यांचा उद्योग होता. फाळणीच्यावेळी सियालकोट पाकिस्तानमध्ये गेले. आणि त्यांचा हा उद्योग बंद करून त्यांना दिल्लीला यावे लागले. महाशय धर्मपाल यांना मसाले बनविण्याशिवाय इतर काही येत नव्हते. शिक्षणात रूची कमी असल्याने वडिलांनी मागे लागूनही ते शिकले नाहीत. पाचवीत नापास झाल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडले होते. अशावेळी त्यांनी पुन्हा एकदा मसाले उद्योगात उतरायचे ठरवले.

मसाले उद्योगात उतरताना सुरुवातीच्या काळात त्यांनी मसाले घरातच तयार करण्यास सुरुवात केली. पुढे हळूहळू काम वाढू लागले तेव्हा १९५९ साली त्यांनी एमडीएच मसाल्यांची फॅक्ट्री दिल्ली येथे किर्तीनगरमध्ये सुरू केली. त्यांच्या फॅक्ट्रीचे नाव होते ‘महाशियां दी हट्टी’.

महाशय धर्मपाल गुलाटी तरुणपणी आपल्या पत्नीसोबत

प्रामाणिक व्यक्तिमत्त्व असलेल्या महाशयांच्या मसाल्यांमध्ये स्वाद होता त्यामुळे लवकरच त्यांचा ग्राहकवर्ग वाढू लागला. बघता बघता एमडीएच एक खूप मोठा ब्रँड झाला. या ब्रॅण्डची ओळख आहेत महाशय धर्मपाल गुलाटी.

सध्या एमडीएच १५० विविध प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये एकूण ६२ उत्पादनांच्या रूपात बाजारात उपलब्ध आहे. आज संपूर्ण देशात १५ पेक्षा जास्त ठिकाणी एमडीएचचे कारखाने आहेत तर जगभरात २९ देशांत एमडीएच मसाले निर्यात केले जातात.

महाशय धर्मपाल गुलाटी म्हणजे खऱ्या अर्थाने ‘मसाला किंग’ आहेत. औद्योगिक क्षेत्रातील लक्षणीय यशासोबतच त्यांचे स्वत:चे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. एमडीएच मसाल्यामध्ये भागीदारी, काही कारखाने, शाळा आणि एक हॉस्पिटल त्यांच्या मालकीचे आहेत. जवळपास ९४० करोडची मालमत्ता त्यांच्या मालकीची आहे.

महाशय धर्मपाल यांचा संपूर्ण जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. त्यांचा जीवनप्रवास पाहता यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. माणसाने मनाशी खुणगाठ पक्की केली की तो काहीही करू शकतो. गरज असते. दृढनिश्चयाची आणि इमानदारीची.

– प्रतिभा राजपूत

MDH च्या संस्थापकांचे ९८व्या वर्षी हृदयविकाराने निधन

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?