खरे व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?

मनाला शक्तिशाली करण्याचे उपाय

1) स्वाध्याय : नियमितपणे चांगल्या ग्रंथांचे वाचन, अध्ययन व श्रवण करण्याची सवय लावावी. संत वाङ्मय, स्वामी विवेकानंदांचे साहित्य, भगवद‍्गीता तसेच महापुरुषांची जीवनचरित्रे इत्यादीचे अध्ययन केल्यास मनाला प्रेरणा मिळते.

2) इंद्रियसंयम : इंद्रियांद्वारे आपण जे काही ग्रहण करतो त्याचे मनावर संस्कार होत असतात. म्हणून आपण इंद्रियांद्वारे चांगल्या गोष्टीच ग्रहण कराव्यात. कानांद्वारे चांगले विचार श्रवण करावेत, डोळ्यांद्वारे चांगल्या गोष्टीच बघाव्यात, इंद्रियांना आकर्षित व उत्तेजित करणार्‍या गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवावे.

3) ध्यान : मन स्वभावत:च चंचल आहे. त्याला एकाग्र करण्यासाठी दररोज नियमितपणे सकाळी व संध्याकाळी ध्यान करावे. देवाची मूर्ती समोर ठेवून प्रार्थना करावी. डोळे बंद करून हृदयामध्ये भगवंताच्या ज्योतिर्मय रूपाची कल्पना करावी. भगवंताच्या नावाचा जप करावा. ध्यान करतेवेळी ईश्वराव्यतिरिक्त इतर विचारांना मनात थारा देऊ नये. दररोज 1 तास तरी ध्यान करावे.

4) गुणदर्शन : सर्वांच्याच हृदयात ईश्वर विराजमान असल्यामुळे कुणाचीही निंदा करू नये. इतरांचे दोष बघू नयेत. कठोर शब्दांद्वारे इतरांची मने दुखवू नयेत, तर आपण आपल्या आचरणाने सर्वांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. कुणाच्याही दु:खाला आपण कारणीभूत होऊ नये. प्रत्येकामध्येच चांगले गुण असतात. त्याच्यामधील चांगले गुण बघून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.

5) आहार : शरीराला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच अन्न ग्रहण करावे. लोभाला बळी पडून जास्त प्रमाणात जेवण केल्यास शरीरात तमोगुणाची वाढ होऊन मन आळशी होते.

6) स्वावलंबन : स्वत:च स्वत:ची कामे करावीत. स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिकावे. नोकरीसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वत:च काही उद्योगधंदा शोधून काढावा. स्वावलंबी मनुष्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते.

7) परिश्रम : दररोज एक तास तरी शारीरिक परिश्रम करावेत. इतरांची सेवा करावी. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते व सेवा केल्यामुळे अहंकार कमी होतो.

8) स्वच्छता : आपले कपडे, खोली, शरीर व अवतीभवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. स्वच्छता राखल्यामुळे मन प्रसन्न राहते व रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो.

9) आज्ञापालन : आई-वडील व शिक्षकांचा आदर करावा. त्यांच्या आज्ञेचे पालन करावे व त्यांच्याशी नेहमी नम्रपणाचीच वागणूक ठेवावी, कारण तेच आपले खरे हितचिंतक होत.

10) प्रार्थना : जीवनात संकट आल्यास संकटाचा सामना करण्यासाठी देवाची प्रार्थना करावी. तोच आपल्याला सामना करण्यासाठी शक्ती देतो.

11) चिंतन : मनात वाईट विचार आल्यास लगेच चांगले विचार मनात आणण्याचा प्रयत्न करावा अथवा गायत्री मंत्राचा जप सुरू करावा. ब्रह्मचर्याचे पालन करण्यासाठी, मनाची इच्छाशक्ती वाढविण्यासाठी गायत्री मंत्र फार उपयोगी पडतो. हा मंत्र पुढीलप्रमाणे आहे-

ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि। धियो योन: प्रचोदयात्॥

(त्या तेजस्वी परमात्म्याचे आम्ही ध्यान करतो. तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.)

12) दृढविश्वास : अनेकदा चांगल्या गोष्टी वाचूनही आपला त्यावर विश्‍वास नसल्यामुळे आपण त्या आचरणात आणीत नाही. चांगल्या गोष्टींचे आचरण सुरुवातीला कठीण वाटत असले तरी शेवटी परिणाम मात्र चांगलेच होतात. सत्यमेव जयते – शेवटी सत्याचाच विजय होतो, हे नेहमी लक्षात ठेवले.

13) निर्भयता : भीती बाळगल्यामुळेच आपण दुर्बल होत असतो. भीतीमुळेच आपण खोटे बोलतो, पापाचरण करतो. आपले आचरण जर योग्य असेल तर आपल्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. सत्य, पवित्रता व नि:स्वार्थता अंगी बाळगल्यास जगातील कोणतीच शक्ती आपला नाश करू शकत नाही.

भावनात्मक पैलू

बुद्धी आणि हृदय यांचा समतोल विकास करणे हेच शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे. आज केवळ बुद्धीच्या विकासावरच भर देण्यात येतो आणि हृदयाच्या विकासासाठी मात्र काहीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे बुद्धिमान लोकांची संख्या वाढत असून हृदयवान लोकांचा मात्र सर्वत्र अभाव आढळतो. हृदय संकुचित झाल्यामुळेच मनुष्य स्वार्थी बनतो; प्रेम, करुणा, दया, सहानुभूती, सेवा इत्यादी मानवी मूल्ये समाजातून लोप पावतात आणि मनुष्य पाषाणहृदयी होतो.

चांगल्या कार्याची प्रेरणा मिळत असते ती हृदयातूनच, कारण हृदयामधून ईश्वर बोलत असतो आणि बुद्धीद्वारे आपण स्वत: बोलतो. बुद्धी आणि हृदय यांमध्ये जर असामंजस्य असेल तर आपण नेहमी हृदयालाच प्राधान्य दिले पाहिजे.

इतरांचे दु:ख बघून ज्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही, त्याला काय मनुष्य म्हणायचे? स्वार्थीपणाच सर्व प्रकारच्या अनैतिकतेला जन्म देतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की, “ज्यांचे हृदय इतरांसाठी तळमळते, तोच खरा महात्मा होय. अन्यथा तो दुरात्माच होय.”

गांधीजींच्या अंगावरील पंचा बघून त्यांना टोमणा मारण्याच्या उद्देशाने गांधीजी विदेशात असताना त्यांना विचारण्यात आले, “गांधीजी, तुम्ही फक्त पंचा वापरता. तुमचे अंग झाकण्यापुरते वस्त्र तुमच्या देशात मिळत नाही का?” लगेच गांधीजींनी उत्तर दिले, “माझ्या 33 कोटी देशबांधवांना जोपर्यंत अंग झाकण्यास पुरेसे वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मीसुद्धा पंचाच वापरणार.” गांधीजींच्या देशावरील प्रेमामुळेच त्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखले जाते.

आज भारत स्वतंत्र होऊन 65 वर्षे लोटली, तरीही करोडो भारतवासीयांच्या आजही मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. किती लोकांना त्यांच्याबद्दल तळमळ वाटते? भारतीयांचे दारिद्य्र व अज्ञान बघून स्वामी विवेकानंद आपले अश्रू आवरू शकले नाहीत.

कन्याकुमारीला समुद्रातील खडकावर ध्यानस्थ बसून अश्रुपूर्ण नयनांनी भारतातील जनतेच्या उद्धारासाठी त्यांनी ईश्वराला प्रार्थना केली. देशवासीयांना मदत करण्यासाठीच ते अमेरिकेत गेले. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करून भारताचे व हिंदू धर्माचे नाव अजरामर केले. त्यांच्या व्याख्यानांनी प्रभावित होऊन एका श्रीमंत गृहस्थाने त्यांना घरी भोजनासाठी आमंत्रित केले.

भोजन करून खोलीमध्ये प्रवेश करताच खोलीतील सुखसुविधा बघून त्यांच्या नेत्रांत अश्रू दाटून आले. पलंगावरील मऊ गादीवर न झोपता त्यांनी जमिनीवरच अंग टाकले व रात्रभर अश्रुपूर्ण नयनांनी देवाला प्रार्थना करू लागले, “हे देवा, इथले लोक ऐश्वर्यात लोळत आहेत, तर माझ्या देशातील गरीब उपासमारीने मृत्युमुखी पडत आहेत.

त्यांच्या कल्याणासाठी मला काही तरी मार्ग दाखव. त्यांना पोटभर अन्न मिळू दे.” स्वामीजींच्या प्रेमळ हृदयामुळेच ते महान होऊ शकले. इतरांवर उपकार करणे म्हणजेच पुण्य व इतरांना कष्ट देणे म्हणजेच पाप होय, असे व्यास महर्षी म्हणतात.

आपल्या स्वार्थवृत्तीमुळे आपण इतरांना त्रास देऊन आपल्या पापांचाच बोजा वाढवीत असतो व शेवटी वाईट कर्माची फळेसुद्धा आपल्यालाच भोगावी लागतात. ‘करावे तसे भरावे’ या सृष्टीच्या नियमाचे कुणीही उल्लंघन करू शकत नाही आणि म्हणूनच इतरांना कष्ट देणे म्हणजे स्वत:ला कष्ट देणेच होय.

राजा भर्तृहरी या जगातील लोकांचे चार श्रेणींमध्ये विभाजन करतात. ते म्हणतात, “जे इतरांच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करतात ते महापुरुष, जे स्वत:चा स्वार्थ सांभाळून इतरांनासुद्धा शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतात ते सामान्य जन, स्वत:च्या स्वार्थासाठी जे इतरांना त्रास देतात ते मनुष्य रूपातील राक्षस, तर काहीही लाभ न होता इतरांना उगीचच त्रास देणारे असतात, त्यांना काय नाव द्यावे हेच मला माहिती नाही.”

महापुरुष होणे सर्वांनाच शक्य नसले तरी आपण इतरांना मदत करून देशाचे प्रबुद्ध नागरिक नक्कीच होऊ शकतो; पण दुर्दैवाने मानवराक्षसांचीच संख्या वाढत आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, “जे दुसर्‍यासाठी जगतात तेच खर्‍या अर्थाने जिवंत असतात. बाकी सर्व जिवंत असूनही मेल्यासारखेच होत.”

स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानांनी प्रेरित होऊन व त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मिस मार्गारेट नोबल यांनी सर्वस्वाचा त्याग करून, स्वत:चा देश सोडून भारतातील जनतेच्या सेवेसाठी संपूर्ण जीवन समर्पित केले आणि म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी तिला ‘भगिनी निवेदिता’ असे सार्थ नाव दिले.

इतर देशांतील लोक येऊन आपल्या देशातील गरिबांची सेवा करतात आणि आपण मात्र केवळ आपलाच स्वार्थ बघत असतो. अशा स्वार्थी लोकांना स्वामीजी देशद्रोही म्हणतात. ते म्हणतात, “गरिबांच्या पैशांवर शिक्षण घेऊन जो त्यांचे दु:ख दूर करण्यासाठी काहीच प्रयत्न करीत नाही त्याला मी देशद्रोही म्हणतो.”

भगवान बुद्ध एका शेळीचा प्राण वाचविण्यासाठी स्वत:च्या प्राणाचे बलिदान देण्यास तयार झाले होते. त्यांचा धर्म ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’साठीच होता. संपूर्ण आयुष्य त्यांनी जगाच्या कल्याणासाठीच वेचले आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे.” या सर्व महापुरुषांच्या जीवनापासून आपण धडा घ्यायला पाहिजे.

धर्माचे मर्म न कळल्यामुळेच आज मनुष्य स्वार्थी झाला आहे. मंदिरात जाऊन देवाची पूजा करणे, अभिषेक करणे, होम, यज्ञ, नैवेद्य व देवाच्या दागिन्यांवर लाखो रुपये खर्च करणे यांपुरताच त्याचा धर्म मर्यादित आहे; पण आपण ज्या देवाची मंदिरात पूजा करतो, तोच सर्वांच्या हृदयामध्ये अधिष्ठित आहे व त्याची सेवा करणे म्हणजेच जिवंत ईश्वराची पूजा होय, हे सत्य मात्र तो सपशेल विसरतो.

संत ज्ञानेश्‍वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून हेच सत्य दाखवून दिले. संत नामदेव महाराज त्या परमेश्‍वरालाच चराचरांत बघून कुत्रा जेव्हा कोरडी भाकरी तोंडात धरून पळू लागला तेव्हा त्याच्यामागे तुपाची वाटी घेऊन धावू लागले व म्हणू लागले, “हे देवा, थांब, थांब, तुझ्या भाकरीवर तूप तरी घालू दे.”

संत तुकाराम महाराज आवर्जून सांगतात, जे रंजल्या गांजल्याची सेवा करतात तेच महापुरुष होत, कारण त्या सगळ्या भगवंताच्याच मूर्ती होत. “दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी। तुका म्हणे सांगु किती, तोची भगवंताची मूर्ती॥” आणि शेवटी स्वामी विवेकानंदसुद्धा तेच सांगतात.

“मातृदेवो भव, पितृदेवो भव असे आजवर तुम्ही वाचले, पण मी सांगतो दरिद्रीदेवो भव, मूर्खदेवो भव – दरिद्री, मूर्ख, अज्ञ, दु:खी हेच तुमचे देव होवोत. यांची सेवा म्हणजेच परमधर्म. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भगवंताचा वास आहे. जीवांची सेवा हीच ईश्वराची सेवा होय.”

यावरून हेच सिद्ध होते की, जीवनामध्ये बुद्धीपेक्षा हृदयालाच प्राधान्य दिले पाहिजे. बुद्धी आपल्याला फसवू शकते; तर्क-विचार करून आपल्या मनाचा गोंधळ उडवून देऊ शकते व स्वार्थ साधण्यासाठी मदत करू शकते, पण हृदय मात्र आपल्याला प्रेरणा देऊन धर्ममार्गावर आचरण करण्यास मदत करते; पण बुद्धी जर शुद्ध असेल तर ती आपल्याला योग्य मार्गाने घेऊन जाते आणि म्हणूनच बुद्धीला शुद्ध करून तिचा विकास करणे आवश्यक आहे.

बौद्धिक पैलू

अथांग समुद्रात प्रवास करणार्‍या जहाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी जशी सुकाणूची गरज असते, तसेच मनुष्याला या संसाररूपी सागरामध्ये वावरताना जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. इंद्रिये आणि मन आपल्या चंचल स्वभावामुळे योग्य निर्णय घेण्यास जेव्हा असमर्थ ठरतात, तेव्हा ती जबाबदारी बुद्धीलाच पार पाडावी लागते.

सारासार विचार करण्याची क्षमता केवळ बुद्धीमध्येच असल्यामुळे मानवी जीवनात बुद्धीला एक आगळेच स्थान प्राप्त होते. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण बरेचदा म्हणत असतो. याचा अर्थच असा की, आपण जाणीवपूर्वक चुका करीत असतो. त्याचे काय परिणाम होणार, हेही आपल्याला माहीत असते.

तरीसुद्धा आपण स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही. याचे कारण म्हणजे बुद्धीची दुर्बलता हेच होय. बुद्धी जेव्हा मन आणि इंद्रियांची गुलाम होते तेव्हाच आपल्या अध:पतनास सुरुवात होते.

एखादा मंत्री जर भ्रष्ट आणि स्वार्थी अधिकार्‍याच्या सल्ल्यानुसार वागत असेल, तर त्यांचे मंत्रिपद केव्हाही धोक्यात येऊ शकते. तसेच बुद्धी जर स्वत:चे स्थान विसरून इंद्रिय व मनाची गुलाम होऊन त्यांच्या आज्ञेनुसार वागत असेल तर त्या व्यक्तीचे अध:पतन ठरलेलेच आहे.

परीक्षांमध्ये उत्तम मार्क मिळवून यशस्वी होणे, अध्ययन करून प्रभावी वक्‍तृत्व करणे, विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविणे, लठ्ठ पगाराची नोकरी मिळविणे ही काही खर्‍या बुद्धिमत्तेची लक्षणे नव्हेत. अनेकदा आपल्याला सुशिक्षित व बुद्धिमान समजणारे लोकच स्वत:च्या स्वार्थासाठी देशाला बळी देऊन देशविरोधी कारस्थाने करताना आढळतात.

लबाड्या, लोकापवादात्मक कृती, भ्रष्टाचार व जनतेची पिळणूक करणारे बहुतेक शिकलेलेच असतात. अशिक्षित व गावंढळ मनुष्य असले दुष्कृत्य करण्याचे धाडस सहसा करणार नाही.

शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक दृष्टीने जे काही आपल्याला दुर्बल करते त्याचा जो विषाप्रमाणे त्याग करतो तोच खरा बुद्धिमान मनुष्य होय. हे जग म्हणजे चांगल्या-वाईटाचे मिश्रण होय. चांगले तेवढे ग्रहण करून वाईट सोडून देणे हेच आपले कर्तव्य ठरते.

राजहंस त्याच्यासमोर ठेवलेल्या दुधाच्या पात्रामधून दूध तेवढेच ग्रहण करतो व पाणी सोडून देतो. धर्म-अधर्म, पाप-पुण्य, चांगले-वाईट, सत्य-असत्य यांमध्ये जो विवेक करू शकतो तोच खरा बुद्धिमान समजावा. या संदर्भात भगवान श्रीरामकृष्णांची एक सुंदर गोष्ट आहे.

एकदा एक ॠषी आपल्या काही शिष्यांसह अरण्यात राहात होते. त्यांनी आपल्या शिष्यांना प्रत्येक प्राणिमात्रात ईश्वर असून त्याला प्रणाम करावा, असे सांगितले. एके दिवशी यज्ञाकरिता लाकडे गोळा करून आणण्यासाठी सर्व शिष्य जंगलात गेले होते. अचानकपणे त्यांना आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. दूर पळा, दूर पळा, माजलेला हत्ती येत आहे.

एक शिष्य सोडून बाकी सर्वांनी तेथून धूम ठोकली. सर्व प्राणिमात्रांमध्ये ईश्‍वर असतो तेव्हा या हत्तीतही तोच असणार, मग आपण पळून जाण्याचे कारणच काय, असा विचार करून तो शिष्य मात्र तेथेच उभा राहिला. हत्तीची स्तुती करून त्याला प्रणाम करू लागला; परंतु माहूत जोराने ओरडत होता, अरे पळ, दूर हो, पण शिष्य मात्र हलला नाही. माजलेल्या हत्तीने शिष्याला आपल्या सोंडेत पकडले आणि दूर भिरकावून दिले. हत्ती निघून गेला.

शिष्य बेशुद्ध होऊन पडला. ही वार्ता ऐकून त्याचे गुरू व गुरुबंधू तिथे जाऊन त्याला आश्रमात घेऊन आले. औषधपाण्याने तो शुद्धीवर आला. नंतर त्याला एकाने विचारले, “हत्ती येतोय हे माहीत असताना तू पळून का गेला नाहीस?” शिष्य म्हणाला, “आपल्या गुरुदेवांनी मनुष्य, प्राणी ही सर्व ईश्वराने घेतलेली रूपे आहेत, असे सांगितले आहे.

म्हणून हा हत्तीरूपी ईश्वर येत आहे असे समजून मी पळालो नाही.” यावर गुरुदेव त्याला म्हणाले, “बाळा, हत्तीरूपी ईश्वर येत होता हे खरेच आहे; परंतु माहूतरूपी ईश्‍वर तुला दूर जायला सांगत होता. ईश्वराचे सांगणे का ऐकले नाहीस? तू त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतेस!”

प्रत्येक प्राणिमात्रात देव वसत असतो तरीही आपण चांगल्या माणसाच्या सहवासात राहावे आणि दुष्ट माणसांचा संग टाळावा. ईश्‍वर हा वाघामध्येसुद्धा आहे, पण म्हणून त्याला कोणी मिठी मारायला जाईल का?

पवित्र, पापी, न्यायी, अन्यायी सर्वच जीवांमध्ये ईश्वर नि:संशयपणे वास करतो; परंतु माणसाने अपवित्र, दुष्ट लोकांशी व्यवहार करू नये. त्यांच्याशी अति जवळीक साधू नये. अशा लोकांपासून चार हात दूरच राहावे.

आजच्या या वैज्ञानिक युगात आपण सगळ्याच कामांसाठी यंत्रांचा वापर करतो. साधा हिशोबसुद्धा कॉम्प्युटर किंवा कॅलक्युलेटरच्या साहाय्याने करण्याची आपल्याला सवय असते. यंत्रावर जास्त विसंबून राहिल्यामुळे बुद्धीला चालना मिळत नाही. डॉ. रामानुजम् यांना गणिताचे कोणतेही प्रश्‍न सोडविण्यासाठी यंत्राची गरज पडली नाही.

बुद्धीचा उपयोग करूनच त्यांनी सर्व प्रश्न सोडविले. भगवंताने सर्वांनाच बुद्धी दिली असली तरी थोडेच लोक तिचा वापर करून जीवनात पुढे जातात. कोणत्याही विषयाचे आकलन होण्यासाठी त्यावर सखोल चिंतन करण्याची गरज असते.

चिंतनाच्या प्रक्रियेमधूनच मोठमोठे वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, संगीतकार, खेळाडू, धुरंधर राजकारणी व योगी आणि ॠषी निर्माण होत असतात. केवळ इतरांची नक्कल व अनुसरण करून जगात कुणीही महान होऊ शकत नाही.

कठीण गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची गरज असते, चिंतनामुळेच बुद्धीला धार येते, पण बरेचदा कठीण गोष्टी आत्मसात करण्याऐवजी आपण टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आपल्या बुद्धीच्या विकासाची प्रक्रिया मंद होते. जीवनामध्ये आव्हाने स्वीकारून त्यांचा सामना करणे व त्यामधून योग्य उपाय शोधून काढून त्यामध्ये यश मिळविणे हेच बुद्धीचे प्रमुख कार्य आहे.

बुद्धीचा विकास झाल्याशिवाय आपण सूक्ष्म गोष्टीची धारणा करू शकत नाही. बरेचदा आपण शास्त्राचे अध्ययन करतो, संतसाहित्य वाचतो, स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचतो, पण त्यातील मथितार्थाचे आपल्या बुद्धीला आकलन होत नाही. कधी कधी तर त्या सर्वांचा विपरीत अर्थ लावल्याने आपले आचरण हास्यापद होऊन जाते. शास्त्रातील सूक्ष्म तत्त्वे समजण्यासाठी त्यावर सखोल चिंतन करण्याची गरज असते. परत परत वाचून व त्यावर चिंतन करूनच आपण ते ग्रहण करू शकतो.

स्वामी विवेकानंदांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होती. कोणत्याही गोष्टीचे आकलन करण्यास त्यांची बुद्धी समर्थ होती. तर्कविचारामध्ये त्यांना कुणीच हरवू शकत नसे. भारतीय वेदान्ताचे गूढ तत्त्वज्ञान पाश्चात्त्यांना सहज व सरळ भाषेत आकलन करून सांगण्याची कला त्यांना माहीत होती आणि म्हणूनच अमेरिकेतील विद्वान प्राध्यापकांना स्वामीजी प्रभावित करू शकले. बुद्धिमान असणे चांगले, पण चलाख किंवा धूर्त असणे मात्र फारच वाईट असते.

चलाखीद्वारा आपण इतरांना फसवू शकतो असे आपल्याला वाटते; पण आपण त्यामुळे स्वत:लाच फसवत असतो. जगात कोणतेच महान कार्य चलाखीद्वारा वा धूर्तपणाने होऊ शकत नाही. कावळा किंवा गिधाड स्वत:ला खूप धूर्त समजते, पण विष्ठा व मेलेल्या प्रेतांकडेच त्यांचे लक्ष असते.

तात्पर्य, बुद्धीद्वारे दृढनिश्चय करून आपण स्वत:ला व्यसनांपासून मुक्त करू शकतो. केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड इच्छाशक्ती व दृढविश्‍वास आपल्याला बुद्धीच प्रदान करीत असते.

कठीण विषयाचे आकलन करणे, चांगले व वाईट यांमध्ये विवेक करणे, सूक्ष्म तत्त्वांची धारणा करणे, दूरदृष्टी ठेवून मोठमोठ्या योजना आखणे, जागरूक राहून भविष्यातील संभाव्य धोक्यांना टाळणे, इंद्रिये व मन यावर नियंत्रण ठेवून त्यांना सत्कार्यात गुंतविणे, ही सर्व कामे बुद्धीलाच पार पाडावी लागतात आणि म्हणूनच बुद्धीचा विकास करण्यासाठी चिंतन करण्याची गरज असते.

आज सगळीकडेच गोंगाट असल्यामुळे चिंतन करण्यासाठी मधूनमधून एकांतवास करणे आवश्यक आहे. जास्त बोलणारी व्यक्ती सखोल चिंतन करू शकत नाही. म्हणूनच कमी बोलणे व जास्त चिंतन करणे हाच मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. मनाला जितके आपण शांत ठेवू तितकीच आपल्या बुद्धीची सर्जनशीलता, कल्पकता व प्रज्ञा वाढेल. इतरांची सेवा करूनसुद्धा आपण आपल्या बुद्धीचा विकास करू शकतो.

दृढनिश्चयामुळेच गुरूच्या मदतीशिवाय एकलव्य धनुर्विद्येत प्रवीण होऊ शकला, दृढनिश्चयामुळेच शिवाजी महाराज मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करू शकले, दृढनिश्चयामुळेच पितामह भीष्म आजीवन ब्रह्मचर्याचे पालन करू शकले, दृढनिश्चयामुळेच मंदमती पाणिनी संस्कृत व्याकरणात पारंगत होऊ शकले, दृढनिश्चयामुळेच भगवान बुद्ध निर्वाण लाभ करू शकले, दृढनिश्चयामुळेच गांधीजी सत्य व अहिंसेचे पालन करू शकले, दृढनिश्‍चयामुळेच डाकू रत्नाकर ॠषी वाल्मीकी होऊ शकला व दृढनिश्चयामुळेच राजा विश्‍वामित्र ब्रह्मर्षी विश्‍वामित्र होऊ शकला आणि म्हणूनच बुद्धीने दृढनिश्चय केल्यास जगात असाध्य असे काहीच उरत नाही.

आध्यात्मिक पैलू

देवाचे सुंदर मंदिर निर्माण करून आपला मंदिरातील देवाशी काहीच संबंध नाही, असे म्हणणार्‍या व्यक्तीस जसे आपण वेड्यात काढतो, तसेच आपला अध्यात्माशी काहीच संबंध नाही, असे जे म्हणतात त्यांची खरोखरच कीव करावीशी वाटते. शरीररूपी मंदिराचे अस्तित्व त्यामध्ये वास करणार्‍या चैतन्यरूपी देवावरच अवलंबून असते. ते चैतन्य जर शरीर सोडून गेले, तर शरीर निर्जीव होऊन पडून राहते.

अशा ह्या अंतर्यामी देवाचे अस्तित्व जो नाकारतो, त्याला शुद्ध वेडाच म्हटले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, “अध्यात्म विद्या विद्यानाम्”- सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या हीच श्रेष्ठ आहे. आपण आपला सर्व वेळ, शक्ती व पैसा भौतिक विद्या प्राप्त करण्यासाठी खर्च करतो; परंतु सर्वांत श्रेष्ठ विद्या जी अध्यात्मविद्या त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो.

अध्यात्मसुद्धा एक विज्ञान आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र, गणितशास्त्र त्याप्रमाणेच अध्यात्मसुद्धा एक शास्त्रच आहे. आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षे तपस्या करून जोपासलेले हे अध्यात्मशास्त्र, ज्याचे आपण वारसदार आहोत, तेच जर नष्ट झाले तर भारताचाच नव्हे, तर संपूर्ण जगाचा ध्वंस होईल.

भारताचे अध्यात्मज्ञानच जगाला सुखशांतीची संजीवनी प्रदान करू शकते आणि म्हणूनच पुण्यभूमी भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्र व सुकन्या यांनी त्यांना मिळालेल्या आध्यात्मिक संपदेचे रक्षण करून संपूर्ण जगात त्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या शुभकार्यामध्ये सक्रिय भाग घेण्याची गरज आहे.

हजारो वर्षांच्या गुलामीनंतरही हिंदू धर्म व भारतीय संस्कृती टिकून राहिली, कारण तेव्हाही ह्या भारतमातेने संतमहात्म्यांना, साधुसंतांना, योगीमुनींना व कवी-महर्षींना जन्म देऊन भारताची आध्यात्मिक परंपरा अबाधितपणे टिकवून ठेवली होती. आपण त्यांचेच वंशज आहोत. आपल्या शरीरात त्यांचेच रक्त वाहात आहे. धर्म आणि अध्यात्म आपल्या हाडामांसात भिनलेले आहे. आपण धर्म किंवा अध्यात्म सोडूच शकत नाहीत.

आज केवळ आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे एवढेच आणि म्हणूनच ह्या अज्ञानाच्या गाढ निद्रेतून आपल्याला जागे करण्याची जेव्हा गरज होती तेव्हा तोच ॠषींचा संदेश घेऊन स्वामी विवेकानंद अवतीर्ण झाले व संपूर्ण जगाला त्यांनी आवाहन केले, “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत कुठेच थांबू नका.” “उतिष्ठत, जाग्रस्त, प्राप्य वरान् निबोधत.

“स्वामी विवेकानंदांनी स्वत:च त्यांच्या जीवनाचा उद्देश स्पष्टपणे सांगितला आहे. ते म्हणतात, “माझे ध्येय काही थोड्याशा शब्दांत मांडले जाऊ शकते आणि ते याप्रमाणे – “मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणार्‍या ईश्वरत्वाचा उपदेश देणे आणि जीवनातील प्रत्येक कार्यात हे ईश्वरत्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे, हेच माझे ध्येय आहे.”

सगळी शास्त्रे व सर्व महापुरुष आपल्याला आवर्जून सांगतात की, आपण हे हाडामांसाचे शरीर नाही, तर शरीरामध्ये वास करणारा आत्मा आहोत. आपण जड नाही, तर चैतन्यस्वरूप आहोत. आपण प्रकृतीचे गुलाम नाही, तर स्वामी आहोत. जन्म, मृत्यू, रोग, शोक हे सर्व शरीराचे धर्म आहेत; पण आपण यापासून मुक्त आहोत. शरीरावरील आसक्तीमुळेच आपण बंधनात पडलो आहोत. आपल्याला जन्म नाही, मृत्यू नाही.

जन्मापूर्वीही आपण होतोच आणि मृत्यूनंतरही आपण राहणारच. बदल शरीरांमध्ये होत असतो, आपल्यामध्ये नव्हे. आपण भूतकाळात अनेक शरीरे धारण केली आणि भविष्यातही आपण नवनवीन निर्माण करू. सर्व ज्ञान, आनंद आपल्यामध्येच आहे. आपण सर्वव्यापी ज्योतिर्मय आत्मा आहोत. मायेच्या पडद्यामुळे आपण आपले खरे स्वरूप विसरून शरीरालाच ‘मी, मी’ म्हणत असतो.

आपण शरीर नाही हा आपला नेहमीचा अनुभव असतो. आपण शरीरापासून वेगळे आहोत हेही आपल्याला कळत असते, पण वळत नाही. आपण म्हणतो, माझे शरीर स्थूल आहे, माझे शरीर कुरूप आहे, माझा डोळा दुखतो आहे, माझे पोट दुखत आहे, माझे मन चंचल आहे. आपण जेव्हा ‘माझे’ म्हणतो याचाच अर्थ की, मी त्यापासून वेगळा आहे. माझ्या चंचल मनाचा मी साक्षी आहे.

चंचल आणि स्थिर ह्या दोन्ही मनाच्या अवस्था आहेत आणि मी त्या दोन्ही अवस्थांना बघणारा आहे. झोपेमध्ये शरीर जेव्हा पडून राहाते, बाह्य जगाचे आपल्याला भान नसते तेव्हासुद्धा आपण असतोच. आपण जर नसतो तर झोपेत स्वप्न बघणारा मग तो कोण होता?

स्वामी विवेकानंद म्हणतात, “ईश्वराचे पुत्र तुम्ही, तुम्ही अमृताचे अधिकारी! पवित्र, पूर्ण. तुम्ही ह्या मर्त्यभूमीवरील देवता! उठा, मृगराजांनो, उठा आणि आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरामरणरहित, मुक्त आणि नित्यानंदस्वरूप आत्मा आहात. तुम्ही जड नाही. तुम्ही देह नाही. जड तुमचा दास, तुम्ही जडाचे दास नाही.”

आपण शरीर नाही, तर आत्मा आहोत. ह्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेणे हाच मनुष्यजीवनाचा उद्देश आहे. जोपर्यंत हा साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत फिरून फिरून या संसारात शरीर धारण करून यावे लागते. आत्मसाक्षात्कारामुळेच आपले संसाराचे बंधन तुटते व जन्म-मरणाच्या चक्रातून आपली कायमची मुक्ती होते.

आत्मसाक्षात्कार का होत नाही? आपले मनच आपल्या बंधनाचे कारण आहे. मन चंचल व अपवित्र असल्यामुळेच आत्मा आपल्या अगदी निकट असूनही आपण त्याला बघू शकत नाही. दुधामध्ये लोणी असूनही आपण ते आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. दुधाचे दही करून त्याचे मंथन केल्यानंतरच आपल्याला लोणी वेगळे करता येते. तसेच वेगवेगळ्या साधना करून मनाचे मंथन केल्यास मन पवित्र होते.

त्या वेगवेगळ्या साधनांनाच शास्त्रामध्ये योग म्हणतात. स्वामी विवेकानंदांनी चार योगांवरती पुस्तके लिहिली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग. भगवद‍्गीतेमध्येसुद्धा या चार योगांनाच प्राधान्य दिले आहे. ह्या चार योगांचा अभ्यास करून मन शुद्ध केल्यास आपण आत्मसाक्षात्कार करून संसाराच्या बंधनातून कायमचे मुक्त होऊ शकतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. या चार पुरुषार्थांमध्ये मोक्ष हाच परमपुरुषार्थ होय.

1) भक्तियोग – प्रेम प्रत्येकाच्याच हृदयामध्ये असते. ह्या प्रेमाला भगवंताच्या चरणी अर्पित केल्यास त्याला आपण भक्ती म्हणतो; पण हेच प्रेम जगाला दिल्यास आपण जगात आसक्त होतो. संत तुकाराम, नामदेव, मीराबाई, कबीर, एकनाथ ह्यांनी भगवंताच्या चरणी भक्ती करून मुक्तिलाभ प्राप्त करून घेतला.

ईश्वराच्या नामाचा जप, त्याच्या रूपावर ध्यान व भगवंताच्या लीलेचे चिंतन केल्यास मन पवित्र होते व आपली संसारावरील आसक्ती कमी होऊन भगवंताच्या चरणी भक्ती निर्माण होते.

2) कर्मयोग – जगात कर्म केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही. जे काही कार्य भगवंताने आपल्यावर सोपविले आहे, ते श्रद्धापूर्वक व कर्तव्यबुद्धीने केल्यास आध्यात्मिक प्रगतीला कारणीभूत ठरते. मात्र त्यामध्ये आसक्ती, अहंकार व कसलीच अपेक्षा असू नये. ईश्वरबुद्धीने इतरांची सेवा करणे हासुद्धा कर्मयोगच होय.

3) राजयोग – मन चंचल असेल तर काहीच साध्य होऊ शकत नाही. चंचल मनाला एकाग्र करण्यासाठी नियमितपणे ध्यानाभ्यास करणे आवश्यक आहे. पतंजलीने सांगितलेल्या अष्टांगयोगाचा (यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी) अभ्यास करून समाधीचा अनुभव घेता येतो.

4) ज्ञानयोग – हा विचाराचा मार्ग आहे. यामध्ये प्रथम शास्त्राचे श्रवण करून आत्मस्वरूपाबद्दल जाणून घ्यावे लागते. नंतर शरीर आणि आत्मा यांमध्ये विवेक करून शरीरासंबंधी सर्व विचार सोडून मनाला आत्मचिंतनात मग्‍न करावे लागते. मनामधून जगासंबंधी सर्व वासनांचा त्याग होताच मन शुद्ध होते व आत्मदर्शन होऊन मनुष्य मुक्त होतो.

अशा प्रकारे भगवंतांनी दिलेल्या ह्या शरीररूपी यंत्रांच्या सर्व पैलूंचा विकास करणे म्हणजेच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास होय. आज जगाला अशा चारित्र्यवान स्त्री-पुरुषांची गरज आहे, की जे केवळ स्वत:पुरताच विचार न करता संपूर्ण विश्वालाच स्वत:चा परिवार समजून त्याच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतील.

स्वामी विवेकानंद म्हणतात, “अंतर्निहित पूर्णत्वाचे प्रकटीकरण करणे म्हणजेच शिक्षण होय.” आणि पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाच्या सर्वच पैलूंचा विकास करणे आवश्यक असते.

– स्वामी श्रीकान्तानंद

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?