Advertisement
कृषीउद्योग

कांदा प्रक्रिया उद्योग काळाची गरज

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


दर वर्षी कांद्याचे भाव गगनाला भिडतात. कांदा अक्षरश: डोळ्यांत पाणी आणतो. ₹८० ते १२० रुपये किलोच्या दराने कांदा बाजारात विकला जातो. कांद्याच्या सतत बदलणार्‍या बाजारभावामुळेही तो प्रसिद्ध आहे. अशा या काळात ग्राहक आणि उत्पादक या दोघांच्या हिताच्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार प्रकर्षाने जाणवतो. आपल्या महाराष्ट्रात कांदा प्रक्रिया उद्योगवाढीला चालना मिळायला हवी असे वाटते.

व्यापारदृष्ट्या कांदा हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात होते. नाशिकव्यतिरिक्त पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा आदी ठिकाणी कांद्याचे पीक घेतले जाते. मराठवाडा, विदर्भ व कोकणातसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

कांद्याचे पीक विविध हंगामांत वर्षभर घेतले जाते आणि संपूर्ण वर्षभर बाजारपेठेत कांदा उपलब्ध असतो. यंदा अवेळी होत असलेल्या पावसामुळे कांद्याच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे आणि बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवतो आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे बाजारात कांद्याचे दर हे अचानक गगनाला भिडतात तसेच अचानक कोसळतातसुद्धा. अशा वेळी भरडला जातो तो सामान्य शेतकरी. त्यामुळे वेळीच या नाशवंत उत्पादनावर प्रक्रिया होईल असे पूरक उद्योगांचे प्रमाण वाढायला हवे. त्यामुळे ही खूप मोठी बाजारपेठ शेतकरी, ग्रामीण युवक तसेच नव्याने उद्योगात उतरू इच्छिणार्‍यांसाठी आहे.

कांदा हा नैसर्गिक पद्धतीने जास्तीत जास्त आठ ते दहा महिने टिकतो, परंतु ‘डिहायड्रेशन’ प्रक्रियांतून आपण याचा कार्यकाळ तसेच बाजारमूल्य वाढवून जास्तीत जास्त नफा कमावू शकतो.

‘डिहायड्रेशन’ या शब्दाचा मराठी अर्थ वाळवणे असा होतो, कांदा ‘डीहायड्रेशन’च्या प्रक्रियेत कांद्याचे बारीक तुकडे करून ते उन्हात किंवा डिहाड्रेशन मशीनमध्ये वाळवले जातात. त्यानंतर हे वाळलेले तुकडे किंवा त्या तुकड्याची पावडर तयार करून बाजारात जास्त किमतीला विकली जाते. सध्या आपण नाशवंत कृषिमालांपैकी केवळ दोन टक्के मालांवर प्रक्रिया करतो.

शेतीमालाच्या प्रक्रियेसाठी आपल्या देशात अजूनही किती वाव आहे हे यावरून लक्षात येईल. कांद्याचे भाव कमी असताना त्याची पेस्ट म्हणजे वाटलेला कांदा किंवा कांद्याची पूड करून अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानाने साठवून ठेवली तर कांद्याचे भाव वाढतील तेव्हा किंवा पावसाळ्यात या पर्यायी गोष्टींचा उपयोग होईल.

कांदा निर्जलीकरण हीसुद्धा एक प्रक्रिया आहे. याद्वारे आपण कांदा पावडर, कांदा चकत्या असे पदार्थ बनवू शकतो. कांदा पूड, कांदा चकत्या, कांदा तेल, जूस, लोणचे असे अनेक प्रकार तयार केले जातात. परदेशात यांना खूप मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये कांद्याचे लोणचे आवडीने खाल्ले जाते. परदेशात कांदा चकत्या व पावडर यांचा उपयोग मांसाच्या हवाबंद पदार्थांमध्ये, सॉस, सूप, चिली यांसारख्या पदार्थांमध्ये करतात.

कांदा चकत्या व पावडर किंवा निर्जलीकरण करण्यासाठी शक्यतो पांढरा व अधिक टी.एस.एस. असलेला कांदा वापरला जातो. कांदा निर्जलीकरण केल्यास अनेक फायदे होतात. त्यात प्रामुख्याने सुकवलेल्या कांद्याचा वाहतूक खर्च तुलनेने कमी येतो.

तसेच निर्जलीकरण केलेल्या कांद्याचे नुकसान होत नाही. यासाठी काही विशेष जातीच्या कांद्याची गरज असते. या नवीन वाणांचा प्रसार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांत अशा प्रकारचं कांदा उत्पादनास वाव आहे.

सद्य:स्थितीत कांदा चकत्या, पावडर यांची निर्यात जपान, आफ्रिका, इंग्लंड, ब्रह्मदेश, श्रीलंका, हाँगकाँग, जर्मनी या देशांकडे होते. काही वर्षांपासून कांदा चकत्या, पावडर यांची निर्यात पाहिली तर असे लक्षात येते की, निर्यात वाढली असल्याने परकीय चलनप्राप्तीतही वाढ झालेली आहे. यावरून प्रक्रिया उद्योगात आज मोठा वाव असल्याचे लक्षात येते.

कांदा प्रक्रिया उद्योगात मुख्य कच्चा माल आवश्यक असतो तो म्हणजे कांदा. त्यामुळे प्रक्रिया उद्योग जर उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रदेशात किंवा कांदा खरेदी विक्री केंद्राजवळ सुरू केला तर दळणवळणाचा खर्च कमी येतो किंवा कांद्यासाठी प्रत्यक्ष शेतकर्‍यांसोबत करार करता येऊ शकतो.

उद्योग छोट्या प्रमाणात सुरू करायचा आहे की मोठ्या प्रमाणात यानुसार गुंतवणूक गरजेची असेल. अंदाजे दीड लाख ते पाच लाख गुंतवणुकीत सुरुवात करता येऊ शकते. या उद्योगासाठी कटिंग मशीन, कांदा सुकवण्यासाठी ड्रायर, ग्राइंडिंग मशीन, तयार माल पॅकिंग करण्यासाठी पॅकेजिंग मशीन लागेल. यामध्ये आपण ऑटोमॅटिक मशीन वापरून उत्पादन वाढवू शकतो.

आपण वर पाहिले त्याप्रमाणे परदेशात खूप मोठ्या प्रमाणात या उत्पादनांना मागणी आहे. त्यामुळे आपल्याला जर निर्यात करायची आहे तर त्याचे नियम समजून घ्या. एक्सपोर्ट-इम्पोर्ट नॉर्म, फूड ड्रॅग लायसेन्स तसेच इतर अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागणार. त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याप्रमाणे सुरुवात करावी.

आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. ग्राहकाची मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुरवठा करावा. भारतात आपल्याला यासाठी खूप वाव आहे. मसाला उत्पादक व्यवसाय, हॉटेलमध्ये याचा वापर होतो. हीसुद्धा खूप मोठी बाजारपेठ आपल्याकडे उपलब्ध आहे.

आपल्या देशात गुजरात राज्यात भावनगर जिल्ह्यात ७५ प्रकल्प उभारले आहेत. आपण यातून डोळ्यासमोर आदर्श ठेवून महाराष्ट्रात असे जास्तीत जास्त प्रकल्प उभारण्यासाठी कार्यरत व्हायला हवे.

प्रतिभा राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!