स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
आपण बरेचदा शिक्षणात अपयशी ठरलेल्या व्यक्ती उद्योगात यशस्वी झाल्याचं पाहतो, पण साईनाथ आवसारे हा असा उद्योजक आहे, जो पदवीधर आहे आणि पदवीच्या शेवटच्या वर्षाला प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयात आलेल्या अपयशाला आपल्या उद्योजकीय यशाचं श्रेय देतो.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
साईनाथचे वडील हे सरकारी कर्मचारी. लहानपणापासूनच त्याने नोकरीतली ओढाताण, नोकरी करताना रोजच्या जगण्यात कराव्या लागणार्या तडजोडी साईनाथने जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळेच त्याने नोकरी न करता स्वत:चं काहीतरी करण्याचा निश्चय केला.
याला पुष्टी मिळाली ते २००६-०७ या काळात जगभर सुरू झालेल्या स्टार्टअपच्या ट्रेंडमुळे. त्यातच २००९ साली मुंबईच्या साठे महाविद्यालयातून बी.एस्सी (आय.टी.) च्या शेवटच्या वर्षाला असताना प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयात तो पास होऊ शकला नाही आणि पुढे त्याला हा विषय पूर्ण करून पदवीधर व्हायला दोन वर्षं लागली.
या काळात मोठ्या नोकरीची स्वप्नं पाहत न बसता साईनाथने अनुभव घेण्यासाठी मिळेल ती छोट्यात छोटी नोकरी स्वीकारली. यातून त्याने स्वत:मधली कौशल्य विकासित करण्यावर भर दिला. पहिली नोकरी वडिलांच्या ओळखीने मिळाली ती फ्रंट डेस्कची. या नोकरीमध्ये साईनाथ संवादकौशल्य शिकला. ग्राहकांशी कसं बोलावं, त्यांच्याशी संबंध कसे निर्माण करावेत, हे तो रोजच्या अनुभवातून शिकत होता. या सात-आठ महिन्यांच्या नोकरीत त्याचा आत्मविश्वास दृढ होऊ लागला.
पुढे तो एका इलेक्ट्रिकल कंपनीमध्ये कामाला लागला. इथे तो संगणक शिकला. त्यासोबतच क्वोटेशन बनवणं, निविदा भरणं, व्यवसायातल्या बारीकसारिक कागदपत्रांची पूर्तता करणं, या सगळ्याचं ज्ञान त्याला इथे मिळालं. साईनाथचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्याची निरीक्षण क्षमता.
त्याने केलेल्या नोकर्यांमध्ये त्याला कोणतीच गोष्ट हाताला धरून शिकवली गेली नाही, तर स्वत:च्या निरीक्षणातूनच तो अनेक गोष्टी शिकत होता. या निरीक्षणांतून शिकलेल्या बारीक बारीक गोष्टींचाच आज त्याला स्वत:च्या व्यवसायात उपयोग होतोय.
२०११ साली पदवी पूर्ण झाल्यावर साईनाथला एका स्टार्टअपमध्ये नोकरी मिळाली. इथे कंपनीच्या रिि बद्दल लोकांचा अनुभव जाणून घेणं आणि त्यातल्या तांत्रिक चुका दुरुस्त करून घेणं तो शिकला. शिवाय सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगचे धडेही त्याला इथेच मिळाले.
एकूणच या छोट्या छोट्या नोकर्यांदरम्यान त्याची नेहा गर्ग नावाच्या एका आर्किटेक्टशी ओळख झाली. त्यांच्यासोबत याचे व्यावसायिक धागे जुळू लागले. दोघांनी एकत्र येऊन Alankrrit Interiors या नावाने एक कंपनी सुरू केली. स्वत:च्या घरातलंच इंटेरियरचं काम एकाने अर्धवट सोडल्यामुळे त्या कामातले खाचखळगे साईनाथला ते काम पूर्ण करून घेताना लक्षात आले होते.
याचा उपयोग त्याला Alankrrit Interiors मध्ये झाला. पैशांसाठी घासाघीस करणारे ग्राहक, काम पूर्ण करून घेऊन पैसे अपूर्ण देणारे ग्राहक अशी ग्राहकांची विविध रूपे साईनाथने या व्हेंचरमध्ये पाहिली. पुढे काही कारणांनी ही कंपनी बंद करावी लागली.
आता साईनाथ थांबणारा नव्हता. त्याचा स्वत:ची स्वतंत्र वाट शोधायची होती. नवी दिशा शोधायची होती. एका मित्राकडून त्याला पर्यटन क्षेत्राबद्दल माहिती मिळाली. मग अहोरात्र या क्षेत्राचा त्याने अभ्यास केला. शेकडो वेबसाइट्सचा अभ्यास केला. शेवटी त्याने या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायचीच हे ठरवलं. यातूनच जन्म झाला ‘डॉक्टर हनिमुन’ अशी ओळख निर्माण झालेल्या साईनाथ आवसारेचा.
पर्यटन क्षेत्रात साईनाथने उडी तर घेतली, पण अजून त्याच्या प्रवासाला म्हणावी तशी सुरुवात झाली नव्हती. त्याच दरम्यान मुंबईत एक देशव्यापी पर्यटन विषयक प्रदर्शन भरलं होतं. यात साईनाथ एक प्रेक्षक म्हणून गेला. इथे त्याला देशभरातील विविध ठिकाणचे संपर्क मिळाले.
याच लोकांशी जोडला जाऊन त्याने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. या प्रदर्शनातून जोडल्या गेलेल्या काही लोकांसोबत तो आजही जोडलेला आहे आणि त्यांच्यासोबत व्यवसायही करतो आहे. २ जून २०१५ रोजी साईनाथने आपल्या कंपनीचा श्रीगणेशा केला आणि कंपनीला नाव दिलं ‘गो टू जॉय हॉलिडेज’.
हा काळ म्हणजे मोठमोठ्या ऑनलाइन कंपन्यांचा या क्षेत्रात बोलबाला असण्याचा. यात सामान्य ग्राहकसुद्धा थोडं फार स्वस्त मिळतं म्हणून ऑनलाइन कंपन्यांनाच प्राधान्य देऊ लागले. परंतु अनेकदा ऑनलाइन कंपन्या ग्राहकांना प्रत्यक्ष पर्यटनाला गेलेले असताना तिथे काही अडचण आली, योग्य सेवा मिळाली नाही तर सहकार्य करू शकत नाहीत.
साईनाथने हीच गोष्ट हेरून ग्राहकाला शंभर टक्के सहकार्य देण्यावर लक्ष्य केंद्रित केले. यामुळे साईनाथ जास्त ग्राहक मिळवण्याच्या मागे न लागता, जे ग्राहक आहेत त्यांना पूर्ण समाधानकारक सेवा देण्याचा प्रयत्न करतो.
प्रवाशांना एखाद्या एजंटकडून किंवा ऑनलाइनसुद्धा विमानांची तिकिट खरेदी करताना कन्वेनियन्स चार्जेस भरावा लागतो. २०१८ मध्ये साईनाथने एका अशा कंपनीसोबत टायअप केले की, तो ग्राहकांना शून्य कन्वेनियन्स चार्ज व शून्य सेवा शुल्कात विमानांची तिकिट काढून देऊ शकतो. या त्याच्या नवीन सेवेमुळे त्याच्या व्यवसायात चांगलीच वाढ झाली.
पहिल्या पिढीतील एक मराठी उद्योजक म्हणून उभं राहत असताना साईनाथला म्हणावी तशी साथ कोणाचीच नव्हती. ही साथ त्याला मिळाली सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची. सॅटर्डे क्लब ही मराठी उद्योजकांना उभी करणारी एक सपोर्ट सिस्टिम आहे. या संघटनेशी साईनाथ जोडला गेल्यावर त्याच्या व्यवसायात चांगलीच भरभराट होऊ लागली.
मराठी युगुलांमध्ये मधुचंद्राबद्दल अनेक संभ्रम असतात. बरीच जोडपी तर यावेळीच शहराबाहेर हॉटेलमध्ये वगैरे स्वतंत्र राहणं, फिरणं वगैरे या गोष्टी पहिल्यांदाच करत असतात. त्यामुळे त्यांच्या मनात बर्याच प्रकारची भीती असते. अज्ञान असतं. शिवाय जिथे जातील तिथे चांगल्या सेवा मिळाल्या नाहीत तर बरीच गैरसोय होते.
ही अडचण लक्षात घेऊन साईनाथने अशा दांपत्यांसाठी उत्तम, वाजवी आणि सुरक्षित अशी हनिमून पॅकेज तयार केली. याचा बर्याच दांपत्यांना चांगला अनुभव आला आणि यातूनच हळूहळू लोकं साईनाथला ‘डॉक्टर हनिमुन’ म्हणून ओळखू लागले.
साईनाथ एवढ्यावरच थांबत नाहीय तर आता तो असोसिएट्स म्हणून आपल्यासोबत इतरांनाही जोडतो आहे. त्याने ‘गो टू जॉय हॉलिडेज’ची अशी असोसिएट्स योजना तयार केली आहे की कोणीही व्यक्ती त्याच्यासोबत जोडली जाऊ शकते आणि पैसे कमवू शकते. यासाठी त्यांना फक्त लोकांना ‘गो टू जॉय हॉलिडेज’सोबत जोडून द्यायचं आहे. पुढील सर्व काम साईनाथ पाहणार आहे. या असोसिएट्सना कामाचं प्रशिक्षणही तो देतो आहे.
‘डॉक्टर हनिमुन’ म्हणून लग्नात लागणार्या विविध सेवा; जसे की फोटोग्राफर, मेहंदी, मेकअप आर्टिस्ट अशा सगळ्यांचे एकत्रित टायअप असलेले असे एक मॉड्युल साईनाथ २०२० मध्ये आणणार आहे. शिवाय महाराष्ट्रातील निवडक तालुक्यांमध्ये ‘गो टू जॉय हॉलिडेज’च्या फ्रॅन्चायझीजसुद्धा साईनाथ आगामी काळात देणार आहे.
साईनाथची आई एक गृहिणी असूनसुद्धा ती नेहमी मार्गदर्शन करत असते. तसंच त्याची बहीण जी एक एम.डी. डॉक्टर आहे, तीही साईनाथला वेळोवेळी योग्य सल्ले देत असते; म्हणून साईनाथ या दोघींप्रती, तसेच संपूर्ण कुटुंबाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो.
संपर्क : साईनाथ आवसरे
9029605048 । 9619385048
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.