‘द आंत्रप्रेन्युअर’ : एका यशस्वी मराठी उद्योजकाने सांगितलेला उद्योजक होण्यासाठीचा राजमार्ग!

‘व्हिजन’ म्हणजे नेमके काय, याचा अर्थ सांगणारं… आयुष्यात वेगळ्या दिशेचा शोध घेणार्‍या प्रत्येक युवकासाठी दिशादर्शक ठरेल असं पुस्तक म्हणजे ‘द आंत्रप्रन्युअर.’ हे पुस्तक नुकतेच वाचून झाले आणि पुस्तक वाचल्यावर याची जाणीव झाली की, साध्याच्या मागे पळत असताना आपलं साधन जर योग्य नसेल तर त्या साध्याचा, ध्येयाचा पाठलाग करणे निरर्थक ठरते.

त्यामुळे योग्य दिशेने आणि योग्य साधनासोबत ध्येयाकडे वाटचाल करणे गरजेचे असते. पुस्तकाचे नाव जरी ‘द आंत्रप्रेन्युअर’ असले तरी मी या पुस्तकाला कुठल्याही एका वर्गापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही, कारण आयुष्याचं मूल्यशिक्षण यातून मांडले आहे, जे प्रत्येकाला समजणे गरजेचे आहे.

नैराश्यात गेलेल्या तरुणाला यातून लेखकाने केवळ यशाचा मार्ग सांगितला नाही, तर जीवनाचे सार समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कुठलंही यश हे कधीच पूर्णपणे शाश्वत नसते; पण आयुष्याचे सार ज्याला समजले त्याचा प्रवास थांबविण्याचे सामर्थ्य कुणामध्ये नसते.

केवळ प्रेरणादायी वाक्यांचा तरुणांवर भडिमार करून त्यांना योग्य दिशा दाखविता येत नाही, तर त्याचबरोबर वास्तविकतेची जाणीव करून देणे गरजेचे असते.. आणि ती लेखकाने करून दिली आहे, त्यामुळे हे पुस्तकाचे वेगळेपण ठरते.

बाकी काही असो, ज्याला बाप आणि त्याचं प्रेम समजलं, त्याला आयुष्य समजतं. बाप हा एकमेव माणूस आपल्या आयुष्यात झालेला गुंता सोडवू शकतो याची जाणीव लेखकाने करून दिली आहे. बाप म्हणजे नेमके काय आणि त्यांच्याशी वागावे कसे याची जाण तरुण पिढीमध्ये रुजवण्याचे आणि पेरण्याचे काम लेखकाने अतिशय प्रभावीपणे केले आहे.

यशाच्या शिखरावर गेल्यावरही पाय जमिनीवर घट्ट रोवलेले पाहिजे आणि त्या यशाच्या शिखरावर केवळ एकटे न जाता, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची मानसिकताच माणसाला मोठं करते. हे केवळ पुस्तक नाही तर लेखक शरद तांदळे यांनी उद्याचा तरुण कसा असावा यासाठी दाखविलेली दिशा व बघितलेले स्वप्नं आहे.

‘द आंत्रप्रन्युअर’ आयुष्यात वाट चुकलेल्या, अस्वस्थ, भरकटलेल्या, नैराश्यात गेलेल्या आणि उघड्या डोळ्यांनी मोठी स्वप्नं पाहणार्‍या आणि त्याच्या पूर्तीसाठी धडपडणार्‍या प्रत्येक तरुणाला यातून आपल्या इच्छित गोष्टी साध्य करण्यासाठी नक्कीच कानमंत्र मिळेल.

वाट चुकलेल्यांना योग्य दिशा दाखवण्याचे आणि स्वप्नांचा शोध घेणार्‍यासाठी स्वप्न म्हणजे नेमके काय? याची जाणिव करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे एकंदरीत समाजव्यवस्थेचा विचार केला तर बर्‍याचदा विशिष्ट वयोगटातील मुले चुकत असतील, त्यांना योग्य-अयोग्य यातील फरक नीट समजत नसेल, तर इतर लोक या वयोगटातील मुलांना दोष देण्याचे काम करतात; परंतु पिढीला केवळ दोष देऊन चालत नाही, तर त्यांना घडवण्यासाठी, दिशा देण्यासाठी आपण काय करतो याचा विचार करणे महत्त्वाचे असते.

तसेच आयुष्यामध्ये प्रत्येकाकडून चुका होतात; पण त्या चुका स्वीकारून स्वतःमध्ये परिवर्तन करून येणार्‍या पिढीला घडविण्यासाठी वाटाड्याची भूमिका या पुस्तकामधून लेखकाने स्वीकारली आहे.

आपल्या अजाणत्या वयात काही गोष्ट योग्य वेळी न समजल्याने आपला गेलेला वेळ, नंतर परिस्थितीशी करावा लागलेला झगडा हा निदान येणार्‍या पिढीच्या वाट्याला येऊ नये, म्हणून सकारात्मक पिढी घडवण्यासाठी त्यांनी उचललेला विडा येणार्‍या काळात समाजात एक नक्कीच आशादायी चित्र निर्माण करेल. प्रेरणादायी गोष्टी सांगून पिढी घडत नसते.

वास्तविकतेचे भान ठेवून वेळ न घालवता स्वत:ला सिद्ध करत एक रचनात्मक काम उभं केलं तर तुमची दखल लोक घेतात. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यासाठी प्रेरणादायी कथा सांगितल्या, पण बरोबरच या स्वराज्यनिर्मितीसाठी करावा लागणारा त्याग, संघर्ष आणि धोक्याची जाणीव करून दिली म्हणून महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची निव तेवढ्याच सक्षमपणे उभी राहिली.

त्याचप्रमाणे लेखकाने पोकळ प्रेरणेला दिलेली तिलांजली आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्नांकडे बघण्याची तरुणाला दिलेली दृष्टी येणार्‍या काळात सक्षम पिढी घडवेल.

हे पुस्तक उद्योजक कसे व्हावे यासोबतच मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या या सगळ्या आयमातून स्वत:कडे बघत असताना माणूस म्हणून आपण कसे असावे याचे प्रतिबिंब दाखविणारे आहे. लेखकाने स्वप्न म्हणजे काय याची नवीन व्याख्या दिली.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून छोटी छोटी ध्येयं साध्य करतच मोठं यश साध्य करू शकता. एक चांगला समाज घडवायचा असेल तर समाजाच्या पारंपरिक व्यवस्थेवर बोट ठेवून नवीन दृष्टिकोन समाजाला देणे गरजेचे असते.

प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्याचे कलागुण वेगळे आहेत, त्यामुळे सगळ्यांना एकाच सामाजिक तराजूमध्ये तोलून त्यांच्या यशाची किंमत ठरविणे म्हणजे नवनिर्मिती किंवा मूल्यनिर्मिती थांबविणे. विशिष्ट क्षेत्र म्हणजे खूप भारी, प्रवाहाच्या दिशेने स्वतःची क्षमता लक्षात न घेता वाहवत गेला तर स्वतःचे अस्तित्व संपुष्टात आणाल.

त्यापेक्षा स्वतःच्या आकलन क्षमतेचा, स्वतःला काय जमते याचा विचार करून आपला मार्ग ठरविला तरच तुम्ही स्वत:च्या स्वप्नाला न्याय देऊ शकता. आयुष्यात चुका होणारच, नैराश्यही येणारच; पण न खचता जो आयुष्याच्या प्रवासात पुढे जातो, त्याचा प्रवास एक दिवस दुसर्‍यांना दिशा दाखवणारा असतो. त्यातील एक प्रवासी म्हणजे लेखक.

लेखकाचा संपूर्ण प्रवास वाचल्यावर वाटले की, एका सामान्य व्यक्तीचं एका असामान्य व्यक्तीत परिवर्तन काय एका दिवसात झाले नाही. त्यासाठी केलेल्या संघर्षामुळे, रचनात्मक कामामुळेच नियतीलाही बदलावं लागलं. एका सामान्य ध्येयवादी मुलाची दखल एके काळी जगावर राज्य करणार्‍या देशाच्या राजघराण्याच्या प्रमुखाला घ्यायला भाग पडलं.

महान पुरुषांचे चरित्र केवळ वाचायचे नसते, तर ते जगायचेसुद्धा असते. तरच तुमचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडू शकते. भावनिक बंध आयुष्यात फार महत्त्वाचे असतात. आपल्या आईवडिलांना कधीही दुखवू नका कारण आयुष्यात सगळं कमावता येईल, फक्त आईवडील गमावल्यावर पुन्हा मिळवता येत नाहीत. लेखकाचा बापाशी असणारा पुस्तकातील सुरुवातीचा संवाद आणि बाप समजल्यानंतरचा संवाद हृदय हेलावून टाकतो.

मरणाच्या दारात असतानासुद्धा ज्यांना तुम्हाला जिंकलेले बघायचे असते त्यांना कधीच दुखवू नका. हृदयाच्या शिंपल्यामध्ये जो आपल्या बापाचे अश्रू साठवून आयुष्यभर ठेवू शकतो तोच खरा नायक. आयुष्यात झुकायचे फक्त आई आणि बापासमोर. बाकी नियतीला आणि परिस्थितीला स्वतःसमोर झुकवायचे सामर्थ्य आपल्यामध्ये असते.

समाजाने ठरविलेल्या यशाच्या परिभाषेत स्वतःला अडकवून ठेवलत तर तुमची अवस्थासुद्धा त्या बंदिस्त पिंजर्‍यातील पक्ष्यासारखी होईल ज्याला कधी आपण मुक्तपणे गगनभेदी भरारी घेऊ शकतो याची जाणीवच नसते… त्यामुळे जग खूप मोठं आहे.

तुम्ही कशात उंच भरारी मारू शकता याचा विचार करा. स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःला मोठं करण्यासाठी वेळ द्या. एक नवीन जग तुमच्या प्रतीक्षेत आहे. अशा कित्येक प्रसंगांतून, संवादांतून लेखकाने जगण्याची कला हातोटीने शिकवली आहे. प्रत्येकाने आपल्या संग्रहात ठेवावे असे पुस्तक ‘द आंत्रप्रन्युअर’!

– प्रियांका चौधरी

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?