सुखप्राप्ती हे ध्येय नव्हे

मानवाचे अंतिम लक्ष्य ज्ञान होय, सुख नव्हे, सुख, आनंद इत्यादी सर्वांना तर शेवट ठेवलेलाच आहे. सुखालाच चरम लक्ष्य, परम गती समजणे माणसाचा निखालस भ्रमच होय. संसारामधे आम्हाला भोगाव्या लागणार्‍या झाडून सार्‍या दु:खक्लेशांचे कारण हेच की, आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून, त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. पण नंतर हा भ्रमाचा भोपळा फुटून आपल्याला उमज पडतो की, आपण सारखे पुढे पुढे जात आहोत ते सुखाच्या दिशेने नसून ज्ञानाच्या.

आपल्याला समजून येते की, सुख आणि दु:ख दोघेही आपले महान शिक्षक आहेत, आणि आपण जसा शुभापासून, तसाच अशुभापासूनही धडा घेत आलो आहोत. चारित्र्य घडवण्यात सुख आणि दु:ख या दोहोंचा सारखाच वाटा आहे, व्यक्तीचे चारित्र्य एका विशिष्ट साच्यात घालून ते एका विशिष्ट घाटाचे घडवण्यात चांगले आणि वाईट या दोघांचाही वाटा सारखाच आहे आणि कुणाकुणाच्या बाबतीत तर उलट दु:खानेच सुखापेक्षा अधिक धडा, अधिक शहाणपणा शिकविल्याचे दृष्टोत्पत्तीस येईल.

या आमच्या वसुंधरेला ललामभूत झालेल्या समस्त थोर विभूतींच्या धीरोदात्त चारित्र्याचे अनुशीलन केल्यास अधिकांश स्थली हेच स्पष्ट दिसून येते की, दु:खानेच त्यांना सुखापेक्षा अधिक शिकविले आहे, दारिद्र्यानेच श्रीमंतीपेक्षा अधिक धडा दिला आहे, आणि प्रशंसेपेक्षा निंदेच्या आघातांनीच त्यांच्यातील अंत:स्थ ज्ञानाग्नीला अधिक प्रकट केले आहे.

इंद्रियसुख हे मानवाचे ध्येय नव्हे. ज्ञानप्राप्ती हेच जीवनाचे लक्ष्य होय. पशूंना इंद्रियांपासून जितका आनंद मिळतो त्यापेक्षा पुष्कळ जास्त आनंद मनुष्याला बुद्धीपासून प्राप्त होतो. तसेच बुद्धीच्या आनंदापेक्षा मनुष्याला आपल्या आत्म्यापासून प्राप्त होणारा आनंद कितीतरी जास्त असतो. म्हणून आध्यात्मिक ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान असले पाहिजे.

या ज्ञानानेच खरा आनंद प्राप्त होतो. जगातील सर्व गोष्टी म्हणजे ह्या खर्‍या ज्ञानाच्या व खर्‍या आनंदांच्या केवळ सावल्या होत, त्यांची तिसर्‍या किंवा चौथ्या दर्जाची अभिव्यक्त रूपे होत.

फक्त मुर्ख लोकच इंद्रियभोगांच्या मागे धावत असतात. इंद्रियभोगात जीवन व्यतीत करणे सोपे असते. खाणे, पिणे आणि मजा करणे ह्या जुन्या चाकोरीतून धावत राहणे अधिक सोपे असते; परंतु ह्या आधुनिक तत्त्वज्ञांचे तुम्हाला असे सांगणे आहे की ह्याच इंद्रियभोगाच्या कल्पना घ्या व त्यांच्यावर फक्त धर्माचे शिक्कामोर्तब करा की झाले! असला सिद्धान्त मोठा घातक असतो. इंद्रियभोगातच मरण आहे.

आत्म्याच्या उच्च पातळीवर जगणे हेच खरेखुरे जीवन होय; दुसर्‍या कोणत्याही पातळीवरील जीवन म्हणजे निव्वळ मरण होय. ह्या सार्‍या जीवनाचे वर्णन करावयाचे झाले तर जीवन हे एखाद्या व्यायामशाळेसारखे आहे असे म्हणावे लागेल. आपल्याला खर्‍याखुर्‍या जीवनाचा अनुभव घ्यावयाचा असेल तर आपण ह्या जीवनाच्या पलीकडे गेले पाहिजे.

– स्वामी विवेकानंद

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?